Leading International Marathi News Daily

बुधवार, १२ ऑगस्ट २००९

(सविस्तर वृत्त)

‘शासकीय योजनांची माहिती लोकप्रतिनिधींनी गावपातळीवर पोहोचवावी’
कोल्हापूर, ११ ऑगस्ट / प्रतिनिधी

अल्पसंख्याकांच्या विकासासाठी विविध शासकीय विभागातील योजनांची माहिती गावपातळीपर्यंत पोहचविण्यासाठी अधिकाऱ्यांनी व लोकप्रतिनिधींनी प्रयत्न करावेत असे आवाहन जिल्हाधिकारी

 

लक्ष्मीकांत देशमुख यांनी येथे केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आज जिल्हाधिकारी लक्ष्मीकांत देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा अल्पसंख्यांक समितीची बैठक घेण्यात आली. या बैठकीस अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी नामदेव ननावरे, निवासी उपजिल्हाधिकारी अजित रेळेकर, विशेष जिल्हा समाज कल्याण अधिकारी डॉ.बाजीराव पाटील,
जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक डॉ.प्रमोद शिंदे, जिल्हा महिला बाल विकास अधिकारी संजय माने तसेच या समितीचे अशासकीय सदस्य सर्वश्री अ‍ॅड.विल्सन नाथन, चंद्रकांत वाकळे, रफिक बागवान, नसिरखान पठान आदी उपस्थित होते.
ग्रामीण भागातील अल्पसंख्यांक असलेल्या समाजातील महिला व बालकांच्या विकासासाठी असणाऱ्या योजनांची माहिती पोहचली पाहिजे. शाळाबाह्य़ असलेल्या मुलांना शैक्षणिक सुविधा उपलब्ध झाल्या पाहिजेत. अल्पसंख्यांक समाजातील एकत्र येऊन बचतगट स्थापन करणे तसेच अल्पसंख्यांकांच्या वस्तीमध्ये अंगणवाडय़ांची सुरूवात करणे आदी बाबींवर लक्ष केंद्रीत करण्यात यावे. जिल्ह्य़ातील ऊर्दू शाळांमध्ये पुरेसा शिक्षकवर्ग नेमणे व या शाळांत मागेत त्याला प्रवेश दिला जावा. मौलाना आझाद महामंडळामार्फत शैक्षणिक, मुदत व थेट कर्ज वितरीत केले जाते या कर्जाचा लाभ गरजूंना देण्यासाठी अधिकाऱ्यांनी विशेष प्रयत्न करावेत. इंदिरा आवास योजनेंतर्गत दारिद्रय रेषेखालील अल्पसंख्यांकांना घरकुल योजनेचा लाभ घेता येतो. अधिकाऱ्यांनी जिल्ह्य़ातील दारिद्रय रेषेखालील अल्पसंख्यांकांची माहिती संकलीत करावी व त्या लाभार्थ्यांना घरकुल मंजूर करावे अशा सुचनाही जिल्हाधिकारी लक्ष्मीकांत देशमुख यांनी या बैठकीत दिल्या.