Leading International Marathi News Daily

बुधवार, १२ ऑगस्ट २००९

(सविस्तर वृत्त)

गोळीबाराच्या निषेधार्थ कोळी समाजाचे धरणे
सांगली, ११ ऑगस्ट/ प्रतिनिधी

धुळे येथे कोळी समाजाच्या मोर्चावर झालेल्या गोळीबाराच्या निषेधार्थ सांगली येथे महादेव कोळी

 

महासंघाच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले.
कोळी समाजाच्या समस्या अनेक वर्षे प्रलंबित आहेत त्याचा पाठपुरावा करण्यासाठी राज्यभर महासंघाच्या वतीने आंदोलने सुरू आहेत. धुळे जिल्ह्य़ातील कोळी जमातीने जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा नेला होता. शिवसेना नेते अनंत तरे यांच्याकडे या मोर्चाचे नेतृत्व होते. मोर्चा व्यवस्थित पार पडला. निवेदनही शांततेत देण्यात आले. परंतु अचानक लाठी चार्ज व अमानुष गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात कोळी समाजाचे चार कार्यकर्ते ठार झाले आहेत तर अनेकजण जखमी झाले आहेत. या घटनेचा महादेव कोळी महासंघाच्या वतीने तीव्र निषेध करण्यात येत आहे, असे महासंघाचे जिल्हाध्यक्ष जयसिंगराव कोळी यांनी सांगितले. दरम्यान या घटनेचा निषेध करतानाच समाजाच्या मागण्यांचे निवेदनही जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. अनुसूचित जमातीचे दाखले सुलभतेने मिळावेत, १५ जून १९९५ चे संरक्षण २००९ पर्यंत वाढविण्यात यावे. जात पडताळणी समितीवर न्यायाधीशांची नियुक्ती व्हावी, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत.
या आंदोलनात विलासराव मस्के, हिम्मत कोळी, धोंडीराम कोळी, अमोल नांद्रेकर, आनंदा कोळी यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते.