Leading International Marathi News Daily

बुधवार, १२ ऑगस्ट २००९

(सविस्तर वृत्त)

बचत गटांच्या मदतीने त्वरित स्वच्छता मोहीम घेण्याचा ठराव
इचलकरंजी, ११ ऑगस्ट / वार्ताहर

नगरपरिषद कर्मचाऱ्यांच्या संपामुळे शहरातील स्वच्छतेचा प्रश्न गंभीर बनला आहे. स्वाईन फ्लूच्या भीतिदायक वातावरणामुळे आरोग्याचे गांभीर्य लक्षात घेऊन आपत्कालीन परिस्थितीत असलेले नगराध्यक्षांचे अधिकार वापरून महिला बचत गटांमार्फत ताबडतोब स्वच्छता मोहीम हाती घ्यावी,

 

अशा आशयाचा प्रस्ताव येथील नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात आला.
नगरपालिकेकडील विविध ४८ विषयांवर नगराध्यक्ष तथा प्रश्नंताधिकारी विजयसिंह देशमुख यांनी आज सायंकाळी सभा बोलावली होती. सभेत सुरुवातीलाच नगरपरिषद कर्मचारी संप आणि शहराच्या स्वच्छतेचा गंभीर झालेला प्रश्न असे पाच ऐनवेळचे विषय शहर विकास आघाडीच्या वतीने देण्यात आले. विषय दाखल करतानाच शविआ व काँग्रेस अशा दोन्ही बाजूंच्या सदस्यांत शाब्दिक चकमक उडाली.
नगरपरिषद कर्मचाऱ्यांना सहावा वेतन आयोग लागू करावा अशा मागण्यांसाठी राज्यातील पालिका कर्मचाऱ्यांनी ३ ऑगस्टपासून बेमुदत संप सुरू केला आहे. त्यामुळे शहरात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढिग, गटारी तुंबल्याने स्वच्छतेचा प्रश्न गंभीर झाला आहे. त्यातच स्वाईन फ्लूची भीती पसरली असून शहरात डुकरांची संख्याही अधिक आहे. म्हणून नगराध्यक्षांनी आपत्कालीन स्थितीत असलेले अधिकार वापरून महिला बचत गटांच्या साहाय्याने युध्दपातळीवर स्वच्छता मोहीम राबवावी अशा प्रस्तावावर चर्चा करण्यात आली.
स्वच्छता प्रस्तावावर चर्चा करताना काँग्रेसचे नगरसेवक सुरेश गोंदकर यांनी हरकत घेतल्याने काहीवेळ शाब्दिक चकमक उडाली. पण बहुमताने विषयक्रमाचे प्रश्नधान्य ठरविता येते असे नगराध्यक्ष देशमुख यांनी सांगितले. या विषयावर चर्चेस सुरुवात करताना हाळवणकर यांनी नगरपरिषद कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत शासन उदासीन असल्याची टीका केली. तसेच शहरात कचऱ्याचे ढिग साचल्याने आणि स्वाइन फ्लूच्या भीतीने नगराध्यक्ष देशमुख यांनी आपत्कालीन परिस्थितीत नगराध्यक्षांना मिळणाऱ्या अधिकारांचा वापर करून शहरात स्वच्छता मोहीम राबविणे आवश्यक असल्याचे म्हणत टीका केली. त्यास उत्तर देताना देशमुख यांनी माझ्याकडे नगराध्यक्षपदाचा प्रभार असला तरी आपण प्रश्नंताधिकारी म्हणून शासनाचा घटक आहोत असे सुनावले. लोकप्रतिनिधींनी शासनावर टीका केली तर चालते पण नगराध्यक्षांचे आपत्कालीन अधिकार मला वापरता येणार नाहीत असे स्पष्ट केले.
या विषयावर नगरसेवक गोंदकर, सौ.किशोरी आवाडे, मदन कारंडे, विठ्ठल चोपडे आदींनी आपले विचार मांडले. शहराच्या स्वच्छतेसाठी नगराध्यक्ष देशमुख यांना सर्वाधिकार देण्याचा प्रस्ताव मंजूर होताच आजच्या विषयपत्रिकेवर अनेक विकासकामे व धोरणात्मक विषय आहेत. पण पालिका कर्मचाऱ्यांच्या संपामुळे या विषयावर अभ्यास करता आलेला नाही. म्हणून आजची सभा रद्द करण्याचा प्रस्ताव शहर विकास आघाडीने अचानकपणे नगराध्यक्ष देशमुख यांच्याकडे दिला. सभेत तो प्रस्ताव मतदानात टाकल्याने २५ विरुध्द १९ मतांनी तो संमतही झाला आणि सभा संपली. यावेळी सभेतील एकाही विषयावर चर्चा झाली नाही.