Leading International Marathi News Daily

बुधवार, १२ ऑगस्ट २००९

(सविस्तर वृत्त)

दुकान फोडून ६३ हजारांची रोकड लंपास
मिरज, ११ ऑगस्ट/ वार्ताहर

शहरातील मध्यवस्तीत घर फोडीचे सत्र कायम राखत चोरटय़ांनी शनिवारी भरदिवसा सराफ असोसिएशनच्या अध्यक्षांचे दुकान फोडून ६३ हजारांची रोकड हातोहात लंपास केली. चोरीच्या सत्राने त्रस्त झालेल्या व्यापाऱ्यांनी रस्त्यावर ठाण मांडून रहदारी रोखली. दुपारनंतर मुख्य पेठेतील

 

व्यवहार बंद ठेवण्यात आले.
वसंदादा शेतकरी बँक, अलफताह अर्बन बँक, जिल्हा मध्यवर्ती बँक आणि अलंकार ज्वेलर्स या ठिकाणी महिन्यात घरफोडीचे प्रकार घडले. या चोऱ्या उघडकीस आणण्यात पोलीस यंत्रणा अद्याप यशस्वी ठरलेली नसताना पुन्हा शनिवारी दुपारी चोरटय़ांनी आपला हात साफ करीत ६३ हजारांची रोकड लंपास केली. मिरज असोसिएशनचे सुनील चिपलकट्टी यांचे चिपलकट्टी ज्वेलर्स हे सराफी दुकान सराफ कट्टा शनिवार पेठ येथे आहे. चिपलकट्टी नेहमीप्रमाणे दुपारी दीड वाजता भोजनासाठी दुकान बंद करून गेले. दुपारी ३ वाजता दुकान पुन्हा उघडले असता चोरीचा प्रकार उघडकीस आला.
चोरटय़ांनी पाठीमागील बाजूने वरील पत्रा काढून दुकानातील सिमेंट पत्र्याचे सीलिंग फोडून दुकानात प्रवेश केला. दुकानातील सोन्याचे दागिने तसेच तिजोरीच्या कप्यात ठेवण्यात आलेली ६३ हजारांची रोकड लंपास केली. घटनास्थळी रक्झिन पिशवी आणि पत्रा उचकटण्यासाठी वापरलेले स्क्रूड्रायव्हर मिळून आले.
चोरटय़ांचा माग काढण्यासाठी सांगलीहून श्वानपथक मागविण्यात आले. या पथकाने पाठीमागील रस्त्याने मगदूम गल्ली, खंडोबा देवालयपर्यंत माग काढला. मात्र त्या ठिकाणाहून परत घटनास्थळाकडे श्वान आले.
दरम्यान, शहरात वारंवार होणाऱ्या चोऱ्यांचा तपास लावण्यात आणि मालमत्तेच्या संरक्षणासाठी पोलीस यंत्रणा कुचकामी ठरली आहे. याच्या निषेधार्थ सराफ कट्टा येथील मुख्य रस्ता सराफ असोसिएशन आणि व्यापारी असोसिएशन यांनी रोखून धरला. रस्त्यावरच व्यापाऱ्यांनी ठाण मांडले.
व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष विराज कोकणे, उपाध्यक्ष गजेंद्र कुल्लोळी, सराफ असोसिएशनचे सुनील चिपलकट्टी, भारतीय जनता पक्षाचे माजी नगरसेवक प्रसाद मगभावीकर, डॉ. भालचद्र साठय़े यांनी ‘रास्ता रोको’ केले.
वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी तपासाबाबत ठोस अश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.