Leading International Marathi News Daily

बुधवार, १२ ऑगस्ट २००९

(सविस्तर वृत्त)

बेपत्ता मुलाचा झाडावरून पडून मृत्यू झाल्याचा संशयिताचा दावा
शाहूवाडी, ११ ऑगस्ट / वार्ताहर

शाहूवाडी तालुक्यातील परळे येथील बेपत्ता प्रवीण विष्णूपाटील (वय १३) याचा झाडावरून पडून मृत्यू झाला व सदरचा प्रकार कोणालाही कळू नये यासाठी त्याला पुरून टाकले असे सांगणाऱ्या

 

संशयित आरोपी राजू उमर राऊत (वय ४५) यास पोलिसांनी घटनास्थळी आणून मृतदेहाचा शोध घेतला. त्याने दाखविलेल्या ठिकाणापासून जवळच दोन हाडे व एक खाकी रंगाची चड्डी मिळाली. ती हाडे बेपत्ता प्रवीणचीच आहेत का यासाठी रासायनिक पृथक्करण करण्यात येणार असल्याचे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक पी.जी.दाभाडे यांनी सांगितले.
दोन जून रोजी प्रवीण बेपत्ता झाला होता व दुसऱ्या दिवसांपासून संशयित आरोपी गावातून बेपत्ता होता. पोलिसांच्या गतिहीन तपासाला कंटाळून गावानेच संशयितास पकडून पोलिसांच्या हवाली केले. तेव्हा राऊत याने प्रवीणला आंब्याच्या झाडावर आंबे काढण्यासाठी चढवले होते. या वेळी आंब्याचा कर्नाटकातील व्यापारी अहमद सैदूसाब बागवान (वय ४६) व अन्य एकजण बरोबर असल्याचे पोलिसांना सांगितले. प्रवीण आंबे तोडत असताना झाडावरून पडला व जागीच मृत्यू पावला. तेव्हा ही बाब अंगलट येऊ नये म्हणून तिघांनी मिळून त्यास गावाच्या उत्तरेला असणाऱ्या सखुदाच्या मळ्यातील ओढय़ात पुरल्याचे सांगितले. त्याने सांगितलेला अहमद बागवान यासही पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याला मात्र आज गावात आणले नव्हते. मात्र घटनास्थळी मिळालेली चड्डी प्रवीणचीच असल्याचे त्याच्या आईने ओळखले आहे.
तपासासाठी घटनास्थळावर राऊत यास पहाटे सहा वाजता त्याने सांगितलेल्या ठिकाणी आणण्यात आले. तेव्हा त्याने ज्या ठिकाणी प्रवीणला पुरल्याचे सांगितले. त्या ठिकाणी ओढय़ात पाण्याचा साठा व वाहते पाणी आहे. इंजिन लावून पाणी उपसा करण्यात आले व तिथे उकरण्यात आले मात्र तिथे काहीच मिळाले नाही. मात्र येथून थोडय़ा अंतरावर दोन हाडे मिळाली. ती हाताची व पायाची असावीत असा प्रश्नथमिक निष्कर्ष आहे. या व्यतिरिक्त एक चड्डी थोडय़ा लांब अंतरावर मिळाली. दरम्यान दुसरा ताब्यात असलेला संशयित राऊत याला ओळखत नसल्याचे म्हणत असल्याचे समजते. याबाबत गावातील काही लोकांना घेऊन ओळखपरेड घेणार असल्याचे कळते. साडेदहापर्यंत शोध मोहीम चालू होती.
ग्रामस्थांनी सोमवारी रास्ता रोको करण्याचा निर्णय घेतला होता. पण पोलिसांच्या तपासकामात अडथळा नको म्हणून रास्ता रोकोचा निर्णय मागे घेतला आहे. तपासकामाला पूर्णविराम मिळाला नसून तपास पुढे चालूच राहणार आहे. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून गावात तंग असलेले वातावरण आजही तसेच होते. शाहूवाडीचे सहायक पोलिस निरीक्षक ए.एस.थोरात यांच्या कार्यपद्धतीविषयी ग्रामस्थांमध्ये राग असून गावातील जाणकार मंडळींनी शांतता राखण्याकामी मोठे योगदान दिल्याने कोणताही अनुचित प्रकार घडलेला नाही. आज तपासपथकात पोलिस उपअधीक्षक भरत तांगडे, पोलिस निरीक्षक पी.जी.दाभाडे यांचा समावेश होता.