Leading International Marathi News Daily

बुधवार, १२ ऑगस्ट २००९

शाळांमधील घटक चाचणी रद्द
पुणे, ११ ऑगस्ट / खास प्रतिनिधी
पुणे-मुंबई महानगर परिसरातील सर्व शाळांच्या पहिली ते दहावी इयत्तेच्या पहिल्या सत्रात घेण्यात येणारी घटकचाचणी रद्द करण्यात आली आहेत. ‘स्वाइन फ्लू’ संसर्गाच्या पाश्र्वभूमीवर शाळा, विद्यार्थी-पालकांमध्ये परीक्षा व अभ्यासाचा तणाव राहू नये, यासाठी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेत असल्याचे शालेय शिक्षणमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी ‘लोकसत्ता’ला स्पष्ट केले.

उपचारानंतर मुंबईतील २८२ रुग्ण ठणठणीत!
मुंबई, ११ ऑगस्ट/ प्रतिनिधी

स्वाईन फ्लूने राज्यात जितके थैमान घातले आहे त्यापेक्षा कितीतरी अधिक त्याबाबत प्रसिद्धीमाध्यमांकडून भीती पसरवली जात आहे. त्यामुळे देशाची आर्थिक राजधानी मुंबईतही उपनगरी रेल्वे गाडय़ा, टॅक्सी, रिक्षा, बेस्ट बसपासून ते अगदी रस्त्यावर चालणाऱ्या नागरिकांच्या नाकावर मास्क किंवा रुमाल गुंडाळलेले दिसत आहेत.

मुंबईत महिलेचा मृत्यू; ‘स्वाइन फ्लू’ बळींची संख्या ११
मुंबई, ११ ऑगस्ट/प्रतिनिधी

मुंब््रयातील सईदा अब्दुल दोराजीवाला (६२)या महिलेचा आज मुंबईतील रुग्णालयात मृत्यू झाला. यामुळे देशभरातील ‘स्वाइन फ्ल्यू’ने घेतलेल्या बळींची संख्या आता ११वर गेली आहे. पुण्यातील अहिल्यादेवी शाळेत आठवी इयत्तेत शिकणारी तेरा वर्षांची श्रृती भानुदास गावडे या मुलीचा आज पहाटे दीड वाजण्याच्या सुमारास ससून रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात उपचारादरम्यान ‘स्वाइन फ्लू’ने मृत्यू झाला.

नवी मुंबईतील सर्व शाळा, महाविद्यालये आठ दिवस बंद
नवी मुंबई, ११ ऑगस्ट /प्रतिनिधी

मुंबईतील स्वाईन फ्लू नियंत्रणात असल्याचा दावा एकीकडे राज्य करीत असतानाच नवी मुंबई महापालिकेने उद्यापासून (बुधवार) शहरातील सर्व शाळा-महाविद्यालये आठवडाभरासाठी बंद करण्याचा निर्णय आज घेतला. नेरूळ येथील सीवूड वसाहतीत रहाणाऱ्या रिटस् बॅनर्जी या १३ वर्षांच्या विद्यार्थिनीस स्वाईन फ्लू झाल्याचे आज निदान झाले. मागील तीन दिवसात शहरांत स्वाईन फ्लूची लागण झालेला सलग पाचवा रुग्ण सापडल्याने महापालिका आयुक्त विजय नहाटा यांनी आज तातडीने हा निर्णय जाहीर केला.

लस सप्टेंबर अखेपर्यंत येण्याची शक्यता
जगभरात कोठेही लस विकसित झाल्यास पडेल ती किंमत मोजून ती आयात करू - केंद्रीय आरोग्यमंत्री
पुणे, ११ ऑगस्ट/खास प्रतिनिधी
जगातील पहिली ‘स्वाइन फ्लू’ प्रतिबंधात्मक लस सप्टेंबर अखेपर्यंत विकसित होण्याची शक्यता असून, अमेरिकेतील मेरीलँड विद्यापीठाच्या वतीने कालपासून तिच्या मानवी चाचणीला प्रारंभ करण्यात आला आहे. ‘जगभरात कोठेही लस विकसित झाल्यास पडेल ती किंमत मोजून ती आयात केली जाईल,’ असे केंद्रीय आरोग्यमंत्री गुलाम नबी आझाद यांनी जाहीर केल्याने अमेरिकेतील लसीच्या घडामोडींना महत्त्व प्राप्त होत आहे.

आबूराव, बाबूराव.. ‘बंगल्या’वर चला..
मुंबई, ११ ऑगस्ट / खास प्रतिनिधी

येत्या १० ते १५ दिवसांमध्ये आचारसंहिता लागू होण्याची शक्यता लक्षात घेऊन कामे करून घेण्याकरिता मंत्रालय व परिसरातील मंत्र्यांच्या बंगल्यांवर प्रचंड गर्दी होऊ लागली आहे. ठेकेदार, बिल्डर्स आणि दलालांची धावपळ बंगल्यावर चालली असून आचारसंहितेआधी आपलं काम बिगीबिगी करून घेण्याचा तणाव या पांढऱ्या कपडय़ांतील ‘मूषकां’च्या चेहऱ्यांवर दिसतो आहे. या गर्दीत भर पडते आहे ती गावोगावाहून आलेल्या सर्वसामान्य जनतेची. आपली कामे मार्गी लागतील या आशेने मंत्रालयात घुटमळणारे ‘साहेबां’च्या भेटीला बंगल्यावर थडकत असून मंत्र्यांचा बंगला हे फाईली मार्गी लावण्याचं प्रमुख केंद्र बनले आहे.

शाळा बंद करण्याच्या निर्णयासाठी पालिकाआयुक्त एसएसएम कौल घेणार
मुंबई, ११ ऑगस्ट / प्रतिनिधी

‘स्वाइन फ्लू’च्या साथीच्या पाश्र्वभूमीवर मुंबईतील महापालिकेच्या शाळा आठ दिवस बंद करण्याची सभागृहातील सर्वपक्षीय सदस्यांनी एकमुखाने केलेली मागणी आयुक्त जयराज फाटक यांनी आज स्पष्टपणे फेटाळून लावली. पालिका शाळांतील एकाही विद्यार्थ्यांला आतापर्यंत स्वाइन फ्लूची लागण झालेली नसून साथ नियंत्रणात आणण्यासाठी शाळा बंद ठेवणे हा उपाय नाही, असे आयुक्तांनी स्पष्ट केले. सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींची मागणी अशी स्पष्टपणे फेटाळणाऱ्या आयुक्तांनी याबाबतच्या निर्णयासाठी काही हजार मुंबईकरांना एसएमएस पाठवून त्यांचा कौल मागविण्याचा अजब निर्णय घेतला आहे. बहुसंख्य मुंबईकरांनी कौल दिल्यास शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेऊ, अशी मल्लीनाथीही आयुक्तांनी केली. लोकप्रतिनिधींचे मत विचारात न घेणाऱ्या आयुक्तांच्या या मनमानीच्या विरोधात सर्व नगरसेवकांनी सभागृहाचे काम तहकूब केले. महापौरांना ताप आला आहे म्हणून पालिका सभागृह आपण बंद ठेवले आहे का (ताप आल्याने आज महापौर अनुपस्थित होत्या), आयुक्तांना ताप आला तर पालिका बंद ठेवणार का, असे प्रश्न उपस्थित करीत आयुक्तांनी शाळा बंद ठेवल्याने भीती वाढेल असा दावा केला. केंद्र सरकारचेही निर्देश शाळा बंद करा, असे नाहीत तर परिस्थितीनुसार निर्णय घ्या, असे आहेत असे आयुक्तांनी सांगितले. पालिका सभागृहाने एकमुखाने केलेली मागणी फेटाळल्यानंतर आयुक्तांनी एसएसएमद्वारे मुंबईकरांची मते मागितली आहेत. आयुक्तांचा हा निर्णय वादग्रस्त ठरण्याची शक्यता आहे. जनतेने निवडून दिलेल्या सभागृहाचा हा अपमान आहे, अशी टीका नगरसेवकांनी केली आहे.

अभिनेत्री भावना गेल्या..
मुंबई,११ ऑगस्ट/ नाटय़-प्रतिनिधी
‘काचेचा चंद्र’, ‘माझं काय चुकलं?’, ‘स्पर्श’, ‘अश्वमेध’ यांसारख्या अनेक गाजलेल्या नाटकांतून तसेच ‘पाठलाग’, ‘मुंबईचा जावई’ आदी चित्रपटांतून आपल्या अभिनयाचा ठसा उमटविणाऱ्या ज्येष्ठ नाटय़-चित्रपट अभिनेत्री भावना तथा सुमन ताटे यांचे आज सकाळी राहत्या घरी अपघाती निधन झाले. गेली काही वर्षे त्यांची दृष्टी अधू झाल्याने नाटय़-चित्रपटसृष्टीपासून त्या दुरावल्या होत्या. आपल्या ‘नाटय़सुमन’ या संस्थेतर्फे त्यांनी अनेक यशस्वी नाटकांची निर्मितीही केली होती. त्या ७१ वर्षांच्या होत्या. त्यांच्या पश्चात एक पुत्र आहे.
सुमन ताटे यांची अभिनय कारकीर्द गाजली ती ‘भावना’ या नावानेच! त्यांनी आपल्या कारकीर्दीची सुरुवात लिटिल थिएटरच्या ‘मधुमंजिरी’, ‘जादूचा वेल’ इत्यादी बालनाटय़ांतून केली. बालरंगभूमीच्या सुधाताई करमरकर यांच्याकडे त्यांनी अभिनयाचे धडे गिरवले. त्यानंतर साहित्य संघाच्या ‘सुंदर मी होणार’ या नाटकाद्वारे त्यांनी व्यावसायिक रंगभूमीवर पदार्पण केले. त्यांची ‘हॅम्लेट’मधील भूमिका चांगलीच गाजली. सतीश दुभाषींबरोबर त्यांनी ‘देह देवाचे मंदिर’ या नाटकात काम केले होते. त्यांची भूमिका असलेल्या ‘कलावैभव’ संस्थेच्या ‘काचेचा चंद्र’ या नाटकाला प्रचंड यश लाभले. त्यातली त्यांची भूमिकाही खूप गाजली. पुढे धि गोवा हिंदु असोसिएशनची ‘स्पर्श’, ‘सूर्याची पिल्ले’ ही नाटके त्यांनी केली. त्यांच्या ‘नाटय़सुमन’ या संस्थेतर्फे ‘माझं काय चुकलं?’, ‘अश्वमेध’ इत्यादी नाटकांची निर्मिती करून त्यांनी व्यावसायिक रंगभूमीवर ही संस्था सुस्थापित केली. अनेक चित्रपटांतूनही त्यांनी कामे केली. त्यांचा ‘पाठलाग’ हा राजा परांजपे दिग्दर्शित चित्रपट सर्वाधिक गाजला. अलीकडेच १४ जूनच्या कलावंत मेळाव्यात नाटय़ परिषदेनं त्यांना जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरविले होते.

 

प्रत्येक शुक्रवारी