Leading International Marathi News Daily

बुधवार, १२ ऑगस्ट २००९

औरंगाबादमध्ये स्वाइन फ्लू संशयितांमध्ये वाढ
सर्दीने त्रस्त असलेल्या ९०० रुग्णांची तपासणी
औरंगाबाद, ११ ऑगस्ट/प्रतिनिधी

औरंगाबाद शहरात स्वाइन फ्लूच्या संशयितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. संशयितांची संख्या आता १५७ इतकी झाली असून त्यातील ६० जणांचे नमुने तपासणीसाठी पुण्याच्या प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. आज १७ जणांचे नमुने पाठविण्यात आले. शनिवारपासून नमुने पाठविण्यात येत असले तरी अद्यापि एकाचाही अहवाल येथे प्रश्नप्त झालेला नाही. संशयितांपैकी एकाला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलेले आहे.
आतापर्यंत १५७ जणांकडे संशयित म्हणून पाहण्यात आले होते.त्यातील ६० जणांचे नमुने पाठविण्यात आले आहेत. औरंगाबाद शहरात दुपारी तीन वाजण्यापर्यंत ८७६ रुग्णांची तपासणी करण्यात आली.

नांदेडमध्ये संशयित रुग्णांच्या संख्येत वाढ
नांदेड, ११ ऑगस्ट/वार्ताहर

संपूर्ण देशात खळबळ उडवून देणाऱ्या स्वाईन फ्ल्यू या आजाराच्या संशयित रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. आजमितीस हा रुग्ण गुरुगोविंदसिंग शासतीय रुग्णालयात उपचार घेत आहेत.
पुणे-मुंबईपुरता मर्यादित असलेला स्वाईन फ्ल्यू आता राज्याच्या वेगवेगळ्या भागांत हातपाय पसरत चालला आहे. नांदेडमध्ये सोमवारी दोन रुग्ण दाखल झाल्यानंतर त्यात आणखी चारजणांची भर पडली आहे. स्वाईन फ्ल्यूसाठी स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात आला असून औषधांचाही मुबलक साठा उपलब्ध करून देण्यात आला आहे. काल शासकीय रुग्णालयात धम्मपाल सिद्धार्थ पाटील व महेश ओहाळ या दोन विद्यार्थ्यांना दाखल करण्यात आले होते.

दलित व अल्पसंख्याक समाजाला अधिक प्रतिनिधित्व -मोहन प्रकाश
बीड, ११ ऑगस्ट/वार्ताहर

काँग्रेस पक्ष आगामी विधानसभा निवडणुकीत दलित व अल्पसंख्याक समाजाला जास्तीत जास्त प्रतिनिधित्व देणार आहे, असे सांगून लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातही सर्वसामान्य मतदारांमध्ये सकारात्मक विचार दिसत असल्याने काँग्रेसला चांगले यश मिळेल, असा विश्वास विधानसभा निवडणूक केंद्रीय पक्ष निरीक्षक मोहन प्रकाश यांनी व्यक्त केला. बीड येथे मंगळवारी मोहन प्रकाश यांच्या उपस्थितीत सहाही विधानसभा निवडणुकीतील कार्यकर्त्यांचा मेळावा झाला. त्यानंतर पत्रकार बैठकीत बोलताना प्रकाश म्हणाले, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे निवडणूक निरीक्षक म्हणून आपण जिल्ह्य़ातील स्थानिक पातळीवरील पक्षाची परिस्थिती जाणून घेतली.

बाहेरगावाहून आलेल्या मंडळींमुळे बीड जिल्ह्य़ात स्वाइन फ्लू पसरला
बीड, ११ ऑगस्ट/वार्ताहर

स्वाइन फ्लूच्या भीतीने पुणे-मुंबईकडील लोक मोठय़ा संख्येने गावाकडे परतले आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातही आता या रोगाचे रुग्ण आढळू लागल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. जिल्ह्य़ात दोन दिवसांत बाहेरगावहून आलेले तीन संशयित रुग्ण आढलून आले आहेत. जनतेने घाबरून न जाता आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी मोहन कट्टे यांनी केले आहे. बीड जिल्ह्य़ातून पुणे-मुंबई या भागात नोकरी-व्यवसाय आणि शिक्षणासाठी असलेले लोक स्वाइन फ्लूच्या भीतीने आपल्या मूळ गावाकडे परतत आहेत.

‘स्वाइन फ्लू ’ चा संशयित रुग्ण अंबाजोगाईतही
अंबाजोगाई, ११ ऑगस्ट/वार्ताहर
मुंबई, पुणे शहराला स्वाईन फ्ल्यूच्या साथीने घेरले असताना, त्याचा फैलाव आता ग्रामीण भागात होऊ लागला आहे. अंबाजोगाई तालुक्यातील उजनी येथील सतीश मुंडे (वय २०) यांना त्रास होऊ लागल्याने येथील स्वाराती रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्याच्या रक्ताचे नमुने पुणे प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले असून त्याला स्वाईन फ्ल्यूची लागण झाली असल्याचा संशय डॉक्टरांनी व्यक्त केला आहे. या धर्तीवर रुग्णालयात स्वतंत्र कक्ष सुरू करण्यात आला आहे. यामुळे शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

हिंगोलीत स्वाइन फ्ल्यूचा संशयित रुग्ण
हिंगोली, ११ ऑगस्ट/वार्ताहर

हिंगोली शहरातील मंगळवारा भागातील एक स्वाईन फ्ल्यूचा संशयित रुग्ण आढळला असून त्याला येथील सामान्य रुग्णालयात दाखल करून घेतल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली आहे.
वैद्यकीय अधिकाऱ्यांनुसार, शहरातील मंगळवारा परिसरातील संशयित रुग्ण अमोल उत्तमराव पाटील (वय २७) हा त्रास होत असल्याने सामान्य रुग्णालयात दाखल झाला असून त्याच्या गळ्यातील द्रव्याचा नमुना तपासणीसाठी प्रयोगशाळा पाठविला आहे. काय अहवाल येतो त्यानंतरच रुग्णाला स्वाईन फ्ल्यू आहे किंवा नाही, हे कळू शकेल, असे डॉ. करवा यांनी सांगितले.

परभणीत स्वाइन फ्लू नाही-केंद्रे
परभणी, ११ ऑगस्ट/वार्ताहर

जिल्ह्य़ात कुठेही स्वाईन फ्ल्यूचा प्रश्नदुर्भाव नसून नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन अप्पर जिल्हाधिकारी डॉ. धनराज केंद्रे यांनी केले. स्वाईन फ्ल्यूच्या पाश्र्वभूमीवर येथील जिल्हाधिकारी कार्यालयात श्री. केंद्रे यांच्या अध्यक्षतेखाली आज बैठक पार पडली. आरोग्य विभागाने तसेच वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्या सर्व घटकांनी सज्ज राहण्याच्या सूचनाही यावेळी जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आल्या.

धारुरमध्ये शिवसेनेचा मोर्चा
धारूर, ११ ऑगस्ट/वार्ताहर

येथील तहसील कार्यालयावर आज विविध मागण्यांसाठी शिवसेनेच्या वतीने भव्य मोर्चा काढण्यात आला. मोर्चाचे नेतृत्व शिवसेना जिल्हाप्रमुख बाळासाहेब पिंगळे यांनी केले. शिवाजी चौकातून काढण्यात आलेल्या मोर्चात मोठय़ा प्रमाणात शेतकरी सहभागी झाले होते.

उस्मानाबादमध्येही तरुणाला लागण
उस्मानाबाद, ११ ऑगस्ट/वार्ताहर

पुण्यात स्वाइन फ्लूचा वाढलेला प्रकोप उस्मानाबादपर्यंत वेगाने सरकला आहे. पुण्याहून उस्मानाबाद येथे आलेल्या विकास गिलबिले या २६ वर्षाच्या तरुणावर स्वाइन फ्लू आजाराची घेतलेली चाचणी सकारात्मक आल्याने जिल्हा प्रशासन सतर्क झाले आहेत, तर अन्य तिघांना स्वाइन फ्लूचा संशयित रुग्ण म्हणून उपचार सुरू करण्यात आले आहेत. कळंब तालुक्यातील दोघे व उस्मानाबाद तालुक्यातील एका व्यक्तीस स्वाइन फ्लूची शक्यता वर्तविण्यात आली बालाजी वैजीनाथ चिंचकर, तानाजी कोळगे केशेगाव या तिघांच्या लाळेचे नमुने तपासणीसाठी पुणे येथे पाठविण्यात आले आहेत. अभियंता म्हणून पुणे येथे काम करणारे विकास गिलबिले ७ ऑगस्टला उस्मानाबाद येथे आले होते. त्यांना स्वाइन फ्लूची लक्षणे असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या लक्षात आले होते. त्यांना हा आजार झाल्याचे निष्पन्न झाले.स्वाइन फ्लूच्या भीतीमुळे सर्वत्र नाकाला रूमाल बांधून लोक वावरत आहेत.

रेशनच्या गहू व तांदळाचा चार लाखांचा अपहार
चाकूर, ११ ऑगस्ट/वार्ताहर

येथील शासकीय गोदामातील रेशनच्या गहू व तांदळाचा चार लाख २१ हजार ८१५ रुपयांचा अपहार झाला असून गोदामपालास पोलिसांनी गजाआड केले आहे. त्यामुळे तालुक्यात एकच खळबळ माजली आहे. तर गोदामपालास १७ ऑगस्टपर्यंत न्यायालयाने पोलीस कोठडी दिली आहे. सहायक संचालक नागरी पुरवठा मुंबई यांनी २७ जुलै ते ३० जुलै या काळात येथील तहसील कार्यालयाच्या शासकीय गोदामात असलेल्या रेशनच्या धान्यांची तपासणी केली असता गोदामातील ३३३ क्विंटल गहू व २०६.५० क्विंटल तांदूळ यांची किंमत ४,२१,८१५ रुपये असून हा माल गोदामातून गायब झाल्याचे आढळले. म्हणून नायब तहसीलदार एन. बी. कलशेटे यांनी गोदामपालाविरुद्ध पोलिसात फिर्याद दिली.

पशुधन बचाव संघर्ष समितीचा मुखेडमध्ये जनावरांसह मोर्चा
नांदेड, ११ ऑगस्ट/वार्ताहर

पशुधन बचाव संघर्ष समिती व संभाजी ब्रिगेडच्या वतीने आयोजित दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी ४ हजारांवर जनावरांचा भव्य मोर्चा सोमवारी मुखेड तहसील कार्यालयावर धडकला. राज्य रस्ता मार्गावर बैलगाडय़ा, जनावरे सोडून चार तास रास्ता रोको आंदोलन यावेळी करण्यात आले. पशुधन बचाव संघर्ष समितीचे अध्यक्ष सदाशिव पाटील, शिवसांब मठपती, संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष रामदास पाटील, शेतकरी संघटनेचे गुणवंत पाटील-हंगरगेकर, प्रल्हाद राजकुंटवार आदींच्या नेतृत्वाखाली आज आगळ्यावेगळ्या पद्धतीने जनावरांचा भव्य मोर्चा मुखेड तहसील कार्यालयावर नेण्यात आला. यामध्ये चार हजार गुरे, सुमारे २०० बैलगाडय़ा, हजारावर शेतकरी सहभागी झाले होते. मोर्चास पोलीस ठाण्यापासून सुरुवात होऊन तहसील कार्यालयावर नेण्यात आला. जनावरांना चारा-पाणी द्या, मुखेड तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा, शेतकऱ्यांना हेक्टरी २० हजार रुपये अनुदान द्या आदी मागण्यांच्या घोषणांनी शहर दणाणून गेले होते.मोर्चेकऱ्यांच्या शिष्टमंडळाने मागण्यांचे निवेदन सादर केले. तहसील कार्यालयासमोर आघाडी शासनाच्या विरोधात सदाशिव पाटील, गुणवंत पाटील, प्रल्हाद राजकुंटवार आदींची भाषणे झाली.

पीक सुकल्याने शेतकऱ्यांची आत्महत्या
हिंगोली, ११ ऑगस्ट/वार्ताहर

सेनगाव तालुक्यातील जामठी येथील शेतकऱ्याने पीक सुकल्याने विष घेऊन आत्महत्या केली. फुलाजी कऱ्हाळे यांच्या फिर्यादीवरून गोरेगाव पोलिसात नोंद झाली आहे. पोलीस सूत्रांनुसार, जामठी येथील शेतकरी किसन रायाजी कऱ्हाळे (वय ४०) या शेतकऱ्याने खासगी कर्ज काढून पेरणी केली; परंतु पावसाने पाठ फिरविल्याने शेतातील पीक वाळू लागल्याने चिंतेत सापडलेल्या किसन यांनी ९ ऑगस्टला बाहेरगावी जात असल्याचे सांगून शेतात जाऊन विष घेतले आणि घरी आला. त्याची प्रकृती गंभीर झाल्याने त्याला हिंगोलीच्या रुग्णालयात दाखल केले असता त्याच रात्री त्याचे निधन झाले. त्याचा भाऊ फुलाजी कऱ्हाळे यांनी फिर्याद दिल्याने घटनेची नोंद झाली.

दोन्ही कॉंग्रेसकडून फक्त राजकारण’
निलंगा, ११ ऑगस्ट/वार्ताहर

निराधार योजनेच्या लाभार्थी निवडण्याच्या बैठकीस काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे अशासकीय सदस्य गैरहजर राहून राजकीय भांडवलासाठी तालुक्यातील गरीब जनतेस वेठीस धरत असल्याचा आरोप आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी पत्रकार परिषदेत केला. मंगळवार, ११ ऑगस्टला संजय गांधी योजना व श्रावणबाळ योजनेतील गरजू लाभार्थ्यांची निवड करण्यासाठी तहसील कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस अशासकीय सदस्य गैरहजर राहिल्याने कोरमअभावी बैठक रद्द करण्याची वेळ प्रशासनावर आली. या योजनेंतर्गत सुमारे सात हजार अर्ज तहसील कार्यालयात मंजुरीच्या प्रतिक्षेत आहेत. याबाबत आमदार संभाजीराव निलंगेकर म्हणाले, निराधार समितीवरील काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे अशासकीय सदस्य जाणीवपूर्वक गैरहजर राहून राजकीय षडयंत्र रचून प्रशासनाची दिशाभूल करीत आहे. सामान्य जनतेची अडवणूक करून त्यांच्या भावनेशी खेळण्यापेक्षा विरोधकांनी निवडणुकीच्या आखाडय़ात येऊन राजकीय डावपेच खेळावे, असे आवाहन आमदार निलंगेकर यांनी केली. या योजनेकरिता डी.आर.डी.ची अट रद्द झाल्याने मोठय़ा प्रमाणात अर्ज दाखल झाले आहेत. संजय गांधी व श्रावणबाळ योजना समितीची पुढील बैठक १८ ऑगस्टला ठेवण्यात आली असून संबंधित सदस्यांना याबाबत कळविले असल्याचे प्रशासनाने सांगितले.

वीजबिलाच्या थकबाकीवरून तंत्रज्ञास जातिवाचक शिवीगाळ
बोरी, ११ ऑगस्ट/वार्ताहर

थकीत वीजबिलाची रक्कम न भरल्याने वीजपुरवठा खंडित करणाऱ्या वीज वितरण कंपनीच्या कनिष्ठ तंत्रज्ञास जातीवाचक शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्यावरून कोक, ता. जिंतूर येथील चारजणांविरुद्ध बोरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. याप्रकरणी वीज वितरण कंपनीच्या बोरी कार्यालयातील कनिष्ठ तंत्रज्ञ किसन यमाजी खंदारे यांनी बोरी पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले की, कोक येथील वीजग्राहकांकडील थकीत बिलवसुलीची मोहीम चालू असताना शेख सलीम शेख दादामियाँ व शेख कलीम शे. दादामियाँ यांच्याकडे थकबाकीची मागणी केली असता त्यांनी थकबाकी भरली नाही. त्यामुळे मी त्यांचा वीजपुरवठा खंडित करण्यासाठी खांबावर चढलो असता त्यांनी जातीवाचक शिवीगाळ केली. खांबाखाली मी उतरू नये यासठी त्या ठिकाणी कापसाच्या पराटय़ाचा जाळ केला व जीवे मारण्याची धमकी दिली.

रस्त्यावर मास्क विक्री
औरंगाबाद, ११ ऑगस्ट/प्रतिनिधी

नागरिकांनी स्वाईन फ्लूची धास्ती घेतल्यामुळे याचा फायदा घेण्यासाठी धंदेवाईक सरसावले आहेत. शहरात जागोजागी कापडाच्या मास्कची मोठय़ा प्रमाणावर विक्री करण्यात येत आहे. साध्या कापडापासून तयार केलेले हे मास्क १० रुपयांपासून पुढे विकले जात आहेत. या मास्कला ग्राहक मिळत असल्यामुळे स्थानिक पातळीवर त्याची निर्मिती होत असल्याचे सांगण्यात येत आहे.
रस्त्यावर ठिकठिकाणी तसेच रुग्णालयांसमोर हातगाडीवर मास्क विक्रीसाठी उपलब्ध आहेत. काहींनी तर कार्यालये, दुकानांमध्ये जाऊन विक्री चालविली आहे. साध्या कापडापासून शिवण्यात आलेल्या या मास्कमुळे स्वाईन फ्लूच्या विषाणूंपासून बचाव होत नसल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले असले तरी नागरिक याची खरेदी करीत असल्याचे दिसते. औषध विक्रेत्यांकडे असलेला मास्कचा साठा केव्हाच संपला असल्याचे अधिकृतपणे सांगण्यात आले आहे. त्यामुळे उपचार करणाऱ्या डॉक्टरांकडेही मास्क नाहीत. तेही शस्त्रक्रियेसाठी वापरण्यात येणारे मास्क वापरतात. डॉक्टरांच्या तोंडावर दिसणारा मास्क आपणही वापरलेला बरा म्हणून रस्त्यावरील मास्कच्या खरेदीसाठी झुंबड पडताना दिसत आहे. वाहनधारकही आता या मास्कचा वापर करीत आहेत.

दुष्काळ जाहीर करण्यासाठी माकपची निदर्शने
औरंगाबाद, ११ ऑगस्ट/खास प्रतिनिधी

आकाशाला भिडलेली महागाई, साखर, डाळ आणि जीवनावश्यक वस्तुंचा रास्त दरात पुरवठा करा, साठेबाज व्यापाऱ्यांवर खटले भरा आणि मराठवाडय़ात दुष्काळ जाहीर करून खरीप पिकाची नुकसानभरपाई द्यावी, या मागण्यांसाठी मंगळवारी दुपारी माकपातर्फे निदर्शने करण्यात आली.
कापूस पिकाला विमा लागू करा, यंदाचा बँक कर्ज हप्ता माफ करा, शेतकऱ्यांचे वीज बिल माफ करा, जनावरांसाठी मोफत चारा छावण्या लावा, पिण्याच्या पाण्याचे पुरवठय़ाचे नियोजन करा आदी मागण्या माकपच्या वतीने करण्यात आल्या आहेत. जिल्हा समितीचे सचिव कॉ. उद्धव भवलकर यांच्या नेतृत्वाखाली ही निदर्शने करण्यात आला. लक्ष्मण साक्रुडकर, दामोदर मानकापे, बाबासाहेब वावळकर, भगवान भोजने, छगन साबळे, डॉ. ज. रा. शिंदे, डॉ. निकम आणि प्रकाश वाघ यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदविला.

मालमोटारीचे सुटे भाग विकणाऱ्यास अटक
औरंगाबाद, ११ ऑगस्ट/प्रतिनिधी

मालमोटारीच्या सुटय़ा भागाची विक्री करणाऱ्या सय्यद मकबुल सय्यद अहेमद (रा. कटकट गेट) यास गुन्हे शाखेच्या पथकाने काल रात्री छापा घालून अटक केली. त्याच्याकडून २० हजार रुपये किमतीचे मालमोटारीचे सुटे भाग जप्त करण्यात आले आहे.पोलिसांनी नारेगाव येथील राजेंद्रनगर येथे छापा घातला. सय्यद मकबुल हा तेथे मोटारीच्या सुटय़ा भागांसह आढळून आला. त्याच्याविरुद्ध सिडको औद्योगिक वसाहत पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.चोराकडून दोन दुचाकी जप्त गुन्हे शाखेच्या पथकाने केलेल्या आणखी एका कारवाईत एका चोराकडून दोन दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. दिनेश बाबुराव चांदणे (रा. हर्षनगर) असे आरोपीचे नाव आहे. त्याने या दुचाकी चौराहा आणि पैठणगेट येथील सब्जी मंडीतून चोरल्याची कबुली दिली आहे. घरफोडय़ाकडून मोबाईल जप्त घरातून पळविलेला मोबाईल घरफोडय़ा अंकुश शंकरराव निकम (वय १९, रा. सिद्धार्थनगर) याच्याकडून जप्त करण्यात आला आहे. सहा महिन्यांपूर्वी त्याने हा मोबाईल सिडकोतील एका घरातून पळविला होता. मोबाईलची किमत १२ हजार ८०० रुपये इतकी आहे.

बेवारस बॅगमुळे खळबळ
औरंगाबाद, ११ ऑगस्ट/प्रतिनिधी

आकाशवाणी भागात सायं. ७.३० च्या सुमारास बेवारस बॅगमुळे पुन्हा एकदा खळबळ उडाली. गेल्याच आठवडय़ात याच परिसरात अशीच बेवारस बॅग आढळून आली होती.आकाशवाणी चौकात एक बॅग बराच वेळ पडून असल्याचे निदर्शनास आल्यानंतर येथील नागरिकांनी पोलिसांना कळविले होते. स्वातंत्र्यदिन जवळ आला असल्याने पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतले आणि लगेच बॉम्बशोधक आणि नाशक पथकासहीत पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी परिसराचा ताबा घेतला. बॉम्बशोधक पथकाने तपासणी केल्यानंतर त्या बॅगेत काही धनादेश आणि कागदपत्रे आढळले आणि पोलिसांनी सुटकेचा श्वास घेतला. गेल्या आठवडय़ात अशाच एका बॅगमुळे आकाशवाणी परिसर खळबळला होता. त्या पिशवतही कागदपत्रे आढळली होती.

कुटुंबीयांसह उपोषणाचा कर्मचाऱ्यांचा इशारा
औरंगाबाद, ११ ऑगस्ट/प्रतिनिधी

औरंगाबाद पालिकेतील अडीचशे अस्थायी कर्मचारी शुक्रवारपासून (दि.१४) मुंबईत मंत्रालयासमोर कुटुंबीयांसह उपोषणास बसणार आहेत.अनेक वेळा मागणी करूनही सेवेत कायम न करण्यात आल्याने हा निर्णय घेण्यात आला असल्याचे प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. शुक्रवारी सकाळी साडेदहा वाजता उपोषणास सुरुवात होणार आहे. मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनाही देण्यात आले आहे. या २४८ कर्मचाऱ्यांबरोबर नोकरीस लागेलल्या अन्य कर्मचाऱ्यांना सेवेत सामावून घेण्यात आले आहे.

परळीच्या औद्योगिक वसाहतत २१ लाखांची वीजचोरी उघड
परळी वैजनाथ, ११ ऑगस्ट/वार्ताहर

औद्योगिक वसाहतीतील युनिक ऑईल इंडस्ट्रीजमधील २१ लाख रुपयांची वीजचोरी वीज वितरण कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी उघडकीस आणली. याप्रकरणी संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. शहराच्या औद्योगिक वसाहतीमध्ये सचिन सारडा यांची युनिक ऑईल इंडस्ट्रीज आहे. याच्या दोन युनिटमध्ये वीज मीटरच्या सिटीमध्ये रिमोटद्वारे विद्युतप्रवाह नियंत्रित करून वीजचोरी केली जात असल्याची माहिती वीज वितरण कंपनीच्या वरिष्ठांना समजली. यावरून महावितरणच्या लातूर परिमंडळाचे अभियंता रामराव मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकारी अभियंता सुंदर लटपटे, अंबाजोगाई विभागाचे गणेश लटपटे, परळी उपविभागाचे ए. व्ही. राख, कनिष्ठ अभियंता कांदे, राख, सोनवणे, काळूमाळी, कराड, तेलंग आदींनी ७ ऑगस्टला दुपारी कंपनीवर छापा घातला. यातील कारवाईनतंर युनिक ऑईल इंडस्ट्रीजच्या मालकांनी २१ लाख रुपयांची वीजचोरी केल्याचे स्पष्ट झाले. सोमवारी रात्रीपर्यंत कारवाई सुरू होती.