Leading International Marathi News Daily

बुधवार, १२ ऑगस्ट २००९

(सविस्तर वृत्त)

थोडा दिलासा
उपचारानंतर मुंबईतील २८२ रुग्ण ठणठणीत!
मुंबई, ११ ऑगस्ट/ प्रतिनिधी

 

स्वाईन फ्लूने राज्यात जितके थैमान घातले आहे त्यापेक्षा कितीतरी अधिक त्याबाबत प्रसिद्धीमाध्यमांकडून भीती पसरवली जात आहे. त्यामुळे देशाची आर्थिक राजधानी मुंबईतही उपनगरी रेल्वे गाडय़ा, टॅक्सी, रिक्षा, बेस्ट बसपासून ते अगदी रस्त्यावर चालणाऱ्या नागरिकांच्या नाकावर मास्क किंवा रुमाल गुंडाळलेले दिसत आहेत. मात्र चंडिपूरा विषाणू, चिकन गुनिया, मलेरिया आदींएवढा हा गंभीर आजार नसल्याचे सांगतानाच आजवर २८२ स्वाईन फ्लूचे रूग्ण ठणठणीत बरे होऊन घरी गेल्याची माहिती राज्याच्या सार्वजनिक आरोग्य खात्याच्या प्रधान सचिव शर्वरी गोखले यांनी आज दिली. तसेच एकदा स्वाईन फ्लूच्या आजारातून बरे झालेल्या व्यक्तीला तो पुन्हा होत नसल्याची माहितीही गोखले यांनी दिली.
राज्यातील स्वाईन फ्लूच्या स्थितीची माहिती देताना शर्वरी गोखले म्हणाल्या की, आजवर पुण्यामध्ये ३४,४०८ लोकांची तर मुंबईत ४,४५६ लोकांची स्वाईन फ्लू संदर्भात चाचणी करण्यात आली आहे. त्यांपैकी १३०९ जणांना रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले आहे. राज्यात कालपर्यंत स्वाईन फ्लूची शक्यता असलेल्या नव्या २०१ रुग्णांना दाखल करण्यात आले आहे. राज्यात नव्याने स्वाईन फ्लू झालेल्या रुग्णांची संख्या आता ८१ झाल्याची माहितीही गोखले यांनी दिली. एकूण चाचणी केलेल्यांपैकी १०६१ लोकांच्या चाचणीत स्वाईन फ्लूचा विषाणू आढळला नाही.
दरम्यान, ताप, सर्दी, खोकल्यामुळे कालपर्यंत दहा हजार रुग्णांच्या झालेल्या तपासणीतून सुमारे १००८ संशयितांपैकी ९०३ रुग्णांना उपचार करून घरी सोडून देण्यात आले आहे. तर चोवीस तासांत शहरात सुमारे ७३ जणांना स्वाइन फ्लूची बाधा झाल्याचे निदान करण्यात आले. राज्यात एकूण ८१ रुग्णांना स्वाइन फ्लू झाला आहे.