Leading International Marathi News Daily

बुधवार, १२ ऑगस्ट २००९

(सविस्तर वृत्त)

मुंबईत महिलेचा मृत्यू; ‘स्वाइन फ्लू’ बळींची संख्या ११
मुंबई, ११ ऑगस्ट/प्रतिनिधी

 

मुंब्रयातील सईदा अब्दुल दोराजीवाला (६२)या महिलेचा आज मुंबईतील रुग्णालयात मृत्यू झाला. यामुळे देशभरातील ‘स्वाइन फ्ल्यू’ने घेतलेल्या बळींची संख्या आता ११वर गेली आहे. पुण्यातील अहिल्यादेवी शाळेत आठवी इयत्तेत शिकणारी तेरा वर्षांची श्रृती भानुदास गावडे या मुलीचा आज पहाटे दीड वाजण्याच्या सुमारास ससून रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात उपचारादरम्यान ‘स्वाइन फ्लू’ने मृत्यू झाला. ऑक्सिजनचे प्रमाण कमी होत गेल्याने तिला कृत्रिम श्वासोच्छ्वास (व्हेंटिलेटर) सुरू करण्यात आला. मात्र तिचा आज पहाटे दीड वाजण्याच्या सुमारास स्वाइन फ्लूने मृत्यू झाला. आज बडोदा व तिरूवनंतपूरम येथे प्रत्येकी एक जण या साथीने दगावला.
अे.के. जोशी शाळेतील प्रणिता कुलकर्णी या विद्यार्थीना काल स्वाईन फ्लू झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर आज टिकुजीवाडीतील हिरानंदानी शाळेतील पुष्कर तडये (रा. हॅपीव्हॅली) या स्वाईन फ्लू झाल्याचे निदान झाले. त्याच्यावर मुलुंडमधील अग्रवाल रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनांमुळे शहरात प्रचंड घबराट पसरली आहे. त्याच्या हॅपीव्हॅलीमधील घरातील सदस्यांवर प्रतिबंधात्मक उपचार करण्यात आले आहे. हे वृत्त समजताच तात्काळ हिरानंदानी शाळेला सुट्टी देण्यात आली. शाळा बंद करण्यावरून मनसे आणि शिवसेनेत चढाओढ लावल्याने अनेक खासगी शाळांनी रविवापर्यंत शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेऊन तशी लेखी माहिती मुलांच्या पालकांना पाठविली आहे. हे पाहिल्यानंतर ठाणे महापालिका शिक्षण मंडळाचे अध्यक्ष सुरेश गडा यांनी पालिकेच्या १२७ शाळांना आठवडाभर सुट्टी देण्याचे आदेश शिक्षणाधिकाऱ्यांना काढले आहेत.