Leading International Marathi News Daily

बुधवार, १२ ऑगस्ट २००९

(सविस्तर वृत्त)

लस सप्टेंबर अखेपर्यंत येण्याची शक्यता
जगभरात कोठेही लस विकसित झाल्यास पडेल ती किंमत मोजून ती आयात करू - केंद्रीय आरोग्यमंत्री

पुणे, ११ ऑगस्ट/खास प्रतिनिधी

 

जगातील पहिली ‘स्वाइन फ्लू’ प्रतिबंधात्मक लस सप्टेंबर अखेपर्यंत विकसित होण्याची शक्यता असून, अमेरिकेतील मेरीलँड विद्यापीठाच्या वतीने कालपासून तिच्या मानवी चाचणीला प्रारंभ करण्यात आला आहे. ‘जगभरात कोठेही लस विकसित झाल्यास पडेल ती किंमत मोजून ती आयात केली जाईल,’ असे केंद्रीय आरोग्यमंत्री गुलाम नबी आझाद यांनी जाहीर केल्याने अमेरिकेतील लसीच्या घडामोडींना महत्त्व प्राप्त होत आहे.मेरीलॅंड विद्यापीठाच्या संकेतस्थळावर ही लस विकसित करण्याच्या मोहिमेची माहिती प्रसारित करण्यात आली आहे. विद्यापीठातील ‘दी सेंटर फॉर व्हॅक्सिन डेव्हलपमेंट’ विभाग आंतरराष्ट्रीय वैद्यकविश्वात ख्यातकीर्त आहे. यापूर्वी या विभागाला टायफॉईड-कॉलरा, मलेरिया, कांजिण्या, एव्हियन फ्लू यासारख्या साथीच्या रोगांवरील लस विकसित करण्यात यश आले आहे. त्यामुळेच ‘स्वाइन फ्लू’वरील लसीची जबाबदारीसुद्धा त्यांच्यावरच सोपविण्यात आली. लसीची प्रयोगशाळेतील चाचणी यशस्वी झाली असून अमेरिकेतील १० केंद्रांवर सुमारे तीन हजार ‘कार्यकर्त्यां’वर लसीची मानवी चाचणी करण्यात येणार आहे. २२ जुलैपासून लसीच्या संशोधनाला प्रारंभ करण्यात आला असून, कालपासून मानवी चाचणीच्या महत्त्वाचा टप्प्याला प्रारंभ करण्यात आला.
अर्थात, मेरीलँड विद्यापीठातील संशोधकांनी युद्धपातळीवरील ही मोहीम विश्वकल्याणासाठी हाती घेतलेली नाही. अमेरिकेतील कडाक्याच्या थंडीच्या हंगामामध्ये ‘स्वाइन फ्लू’चा संसर्ग प्रचंड संख्येने फोफावण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळेच त्यापूर्वी, म्हणजेच ऑक्टोबरपूर्वी लस उपलब्ध करून देणे त्यांच्यासाठी अत्यावश्यक आहे.मेरीलँड विद्यापीठातील ‘व्हॅक्सिन डेव्हलपमेंट सेंटर’च्या डॉ. विल्बर चेन यांनी मानवी चाचणीची माहिती दिली.