Leading International Marathi News Daily

बुधवार, १२ ऑगस्ट २००९

(सविस्तर वृत्त)

आबूराव, बाबूराव.. ‘बंगल्या’वर चला..
मुंबई, ११ ऑगस्ट / खास प्रतिनिधी

 

येत्या १० ते १५ दिवसांमध्ये आचारसंहिता लागू होण्याची शक्यता लक्षात घेऊन कामे करून घेण्याकरिता मंत्रालय व परिसरातील मंत्र्यांच्या बंगल्यांवर प्रचंड गर्दी होऊ लागली आहे. ठेकेदार, बिल्डर्स आणि दलालांची धावपळ बंगल्यावर चालली असून आचारसंहितेआधी आपलं काम बिगीबिगी करून घेण्याचा तणाव या पांढऱ्या कपडय़ांतील ‘मूषकां’च्या चेहऱ्यांवर दिसतो आहे. या गर्दीत भर पडते आहे ती गावोगावाहून आलेल्या सर्वसामान्य जनतेची. आपली कामे मार्गी लागतील या आशेने मंत्रालयात घुटमळणारे ‘साहेबां’च्या भेटीला बंगल्यावर थडकत असून मंत्र्यांचा बंगला हे फाईली मार्गी लावण्याचं प्रमुख केंद्र बनले आहे.
आचारसंहिता २० ते २५ ऑगस्ट दरम्यान जाहीर होण्याची शक्यता आहे. यामुळे कामे करून घेण्यासाठी प्रत्येकाला घाई झाली आहे. कोणाला महाविद्यालयाला परवानगी मिळाली असली तरी त्याबाबतचा आदेश मिळालेला नाही, बदल्या व बढत्या, भूखंड वाटप, रखडलेल्या फाईंलींना मंजूरी यासाठी मंत्रालयात लगबग वाढली आहे. गेले तीन-चार दिवस मोठे बिल्डर्स मंत्रालयात चकरा मारताना दिसत आहेत. अनेकदा गाडय़ांना मंत्रालयात प्रवेश मिळावा म्हणनू आमदारांना बंदोबस्तावरील पोलिसांशी वाद घालावा लागतो. मात्र मोठय़ा बिल्डर्सच्या आगमनाची खबर पोलिसांकडे मंत्री किंवा सचिवांच्या कार्यालयातून आगाऊ गेलेली असते. आज मुलुंड परिसरात मोठे प्रकल्प उभारणाऱ्या एका बिल्डरच्या गाडीला थेट मंत्रालयात प्रवेश देण्यात आला होता.
मंत्रालयात तळ मजल्यापासून ते सातवा मजला आज गर्दीने फुलून गेला होता. मंत्री नसले तरी त्यांच्या सचिवांकडे गर्दी होती. प्रत्येकाला आपल्या फाईलची काळजी होती. स्वाईन फ्ल्यूच्या धास्तीने गावागावातून मंत्रालयात आलेल्या अनेकांनी तोंडाला मास्क अथवा रुमाल बांधले होते. यामुळे आज मंत्रालय एखाद्या रुग्णालयासारखे भासत होते.
काही मंत्र्यांनी बंगल्यात बसून फाईली ‘हातावेगळ्या’ करण्यास सुरुवात केली आहे. मंत्रालयात उगाचच कोणाची नजर जाऊ नये म्हणून ही खबरदारी घेण्यात येते. तसेच मंत्रालयात ये-जा करताना तपासणी होते. बंगल्यावर मात्र ‘बॅगा’ सहजपणे नेता येतात. आज मंत्रालय परिसरात एवढी वाहने थडकली की वाहतूक कोंडीच झाली . वाहनांची संख्या एवढी होती की, मंत्र्यांच्या बंगल्याबाहेरील रस्त्यावर दुतर्फा उभी करावी लागली. निवडणुकीचा आढावा घेण्यासाठी विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्याकरिता मुख्य निवडणूक आयुक्त नवीन चावला व आयुक्त एस. वाय. कुरेशी आणि व्ही. एस. संपत हे गुरुवारी मुंबईत येत आहेत. त्यादिवशी सर्व विभागीय आयुक्त व काही जिल्ह्य़ांच्या जिल्हाधिकाऱ्यांना बैठकीसाठी पाचारण करण्यात आले आहे. २५ तारखेनंतर केव्हाही आचारसंहिता लागू होऊ शकते.