Leading International Marathi News Daily

बुधवार, १२ ऑगस्ट २००९

प्रादेशिक

मंत्री व आमदारांच्या दबावामुळे राज्यभर टंचाईसदृश्य परिस्थिती जाहीर होणार!
मुंबई, ११ ऑगस्ट / खास प्रतिनिधी

पावसाने दडी मारल्याने राज्यातील फक्त १२९ तालुक्यांमध्ये टंचाईसदृश्य परिस्थिती जाहीर करण्यात आल्याने त्याची सत्ताधारी आघाडीत तीव्र प्रतिक्रिया उमटली आहे. निवडणुकीच्या तोंडावर आपल्या जिल्ह्य़ातही टंचाई जाहीर झाली पाहिजे, असा आग्रह मंत्र्यांबरोबरच आमदारांनी धरल्याने शेवटी राजकीय दबावापुढे झुकून सरकारने संपूर्ण राज्यात टंचाई जाहीर करण्याच्या दिशेने आज पावले उचलली.

ऐक्याच्या झेंडय़ाखाली आलेल्या रिपब्लिकन नेत्यांत मतभेद
प्रकाश आंबेडकरांचा नकारच
मुंबई, ११ ऑगस्ट / प्रतिनिधी
आठवडय़ापूर्वी ऐक्याची घोषणा करणाऱ्या रिपब्लिकन नेत्यांत पुढील राजकीय भूमिका काय घ्यावी यावरुन मतभेद निर्माण झाले आहेत. आज पार पडलेल्या बैठकीत याबाबतीत नेत्यांनी वेगवेगळी मते व्यक्त केली तर पत्रकार परिषदेतही नेत्यांची तोंडे दाही दिशेला असल्याचेच चित्र दिसले. दरम्यान, प्रकाश आंबेडकर यांनी ऐक्याचे नेतृत्व करावे, असा प्रस्ताव त्यांच्यापुढे ठेवण्यात आलेला असला तरी त्यांनी ऐक्य प्रक्रियेत सहभागी होण्यास स्पष्ट नकार दिला आहे.

राणे यांनी दिलेली जमीन पतंगरावांनी दिली चर्मकारांच्या गृहसंस्थेला!
उच्च न्यायालयाचा ‘जैसे थे’ आदेश
मुंबई, ११ ऑगस्ट/प्रतिनिधी
मालवणी-मालाड येथील नगर भूमापन क्र. २६३/६ए पैकी चार एकर दोन गुंठे जमीन वॉल्टर रेमण्ड पटेल व त्यांच्या कुटुंबियांना देण्याच्या माजी महसूलमंत्री नारायण राणे यांनी गेल्या वर्षी मार्चमध्ये दिलेल्या निकालात फेरफार करून ही जमीन पटेल यांच्याकडून काढून घेऊन त्या जमिनीचा ताबा चर्मकार निवारा केंद्र सहकारी गृहनिर्माण संस्थेस देण्याच्या आताचे महसूलमंत्री डॉ. पतंगराव कदम यांच्या आदेशास आव्हान देणारी एक रिट याचिका उच्च न्यायालयात करण्यात आली असून सर्व संबंधितांनी या जमिनीच्या संदर्भात ‘जैसे थे’ स्थिती कायम राखावी,

व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे होणार आज अमेरिकन नागरिकांची साक्ष
मुंबई, ११ ऑगस्ट / प्रतिनिधी

मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याप्रकरणी उद्या तीन अमेरिकन नागरिकांची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे साक्ष नोंदविण्यात येणार असून त्यासाठी न्यायालयात चार ‘स्क्रिन’ लावण्यात येणार आहेत. या तीन साक्षीदारांनंतर अमेरिकेच्या फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशनचे (एफबीआय) दोन अधिकारी साक्षीसाठी न्यायालयात व्यक्तिश: हजर राहणार आहेत. खटल्यात पहिल्यांदाच परदेशी नागरिकांची साक्ष नोंदविण्यात येणार असून मुंबई हल्ल्याचा कट पाकिस्तानातच रचला गेल्याचा मुख्य दावा अभियोग पक्ष या पाच अमेरिकन साक्षीदारांच्या साक्षीतून सिद्ध करण्याचा प्रयत्न करणार आहे.

मोटारींना ‘अटक’ झाल्याने मालकांची पायपीट!
मुंबई, ११ ऑगस्ट/प्रतिनिधी

हुंदाई कंपनीच्या गाडय़ा खरेदी केलेले आणि कॉटनग्रीन येथील जयभारत हुंदाई वर्कशॉपमध्ये दुरुस्ती-देखभालीकरिता मोटारी दिलेल्या ४० ते ४५ कुटुंबांवर संकट कोसळले आहे. हुंदाई कंपनी आणि सेंट्रल वेअरहाऊसिंग कॉर्पोरेशन (सीडब्ल्यूसी) यांच्यातील वादात हे वर्कशॉप सीडब्ल्यूसीने बंद केल्याने दुरुस्तीला दिलेल्या गाडय़ा पुन्हा ताब्यात येणार की नाही या चिंतेने व्याकूळ झालेल्या या मोटार मालकांवर पायपीट करण्याची पाळी आली आहे.

लोकशाही समाजवादी विचारधारेवर आजपासून दोन दिवसीय परिसंवाद
मुंबई, ११ ऑगस्ट/प्रतिनिधी

सध्या देशभरात काँग्रेस किंवा भाजप हे दोनच राजकीय पर्याय जनतेसमोर दिसत आहेत. मात्र या दोन्ही पक्षांच्या मूलभूत नीतींमध्ये कोणताही फरक नाही. त्यामुळे देशातील गोरगरीब जनतेचे अपरिमित नुकसान होत आहे. यातून खरा मार्ग केवळ लोकशाही समाजवादी विचारधाराच देऊ शकते, असे मानणाऱ्या देशातील २०० बुद्धिवंत व राजकीय कार्यकर्त्यांचा दोन दिवसांचा परिसंवाद मुंबईतील पार्ले इन्टरनॅशनल येथे उद्यापासून सुरू होणार आहे.

दहीहंडीची उंची आणि पारितोषिकांवर गोविंदा मंडळे ठाम
मुंबई, ११ ऑगस्ट / खास प्रतिनिधी

स्वाइन फ्लूच्या वाढत्या फैलावाच्या पाश्र्वभूमीवर दहीहंडीची उंची कमी करण्याबरोबरच भरमसाठ रक्कमेची बक्षिसे देण्याचे टाळावे, असे आवाहन मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केले असले तरी गोविंदा मंडळांना ही सूचना मान्य झाली नाही. उंची कमी करण्यास नकार देतानाच पारितोषिकांची रक्कम आधीच जाहीर झालेली असल्याने कमी करण्यास नकार दिला.

वसई-विरार महापालिका क्षेत्रातून ग्रामीण भाग वगळण्याचे मुख्यमंत्र्यांचे आश्वासन
विवेक पंडित यांचे बेमुदत उपोषण ५६ तासानंतर मागे
ठाणे, ११ ऑगस्ट/प्रतिनिधी
ज्या ग्रामपंचायतींच्या ग्रामसभांनी वसई-विरार महापालिकेत समाविष्ठ होण्यास असहमती दर्शविली होती, त्या ग्रामसभांच्या ठरावांचा आदर करून त्यांना महापालिका क्षेत्रातून वगळण्याची प्रक्रिया शासन तातडीने सुरू करेल आणि या इतर प्रकल्पांचा फेरविचार करण्यासाठी कोकण विभागीय आयुक्तांची एक सदस्यीय समिती नियुक्त करण्याचे आश्वासन आज मुख्यमंत्र्यांच्या वतीने गृह राज्यमंत्री नितीन राऊत यांनी दिले.

मस्जिदचा रेल्वे पूल पाडण्यासाठी ४८ तासांचा ब्लॉक
उपनगरी वाहतूक भायखळा आणि वडाळापर्यंतच
मुंबई, ११ ऑगस्ट / प्रतिनिधी
मस्जिद स्थानकालगतचा ब्रिटिशकालीन पूल पाडण्यासाठी करण्यात येणाऱ्या ब्लॉकची आणि प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी केलेल्या उपाययोजनांची सविस्तर माहिती मध्य रेल्वेतर्फे आज जाहीर करण्यात आली. त्यानुसार १४ ऑगस्ट रोजी रात्री साडेदहा वाजल्यापासून सुरू होणारा हा ब्लॉक ४८ तास चालणार आहे. त्याकाळात मध्य रेल्वेच्या मेन आणि हार्बर मार्गावरील उपनगरी वाहतूक अनुक्रमे सीएसटी-भायखळा आणि सीएसटी-वडाळादरम्यान पूर्णत: बंद ठेवण्यात येणार आहे.

विकास नियंत्रण नियमावलीतील बदलाने गिरणी मालकांची धन; कामगार मात्र वाऱ्यावर !
मुंबई ११ ऑगस्ट/खास प्रतिनिधी

बंद पडलेल्या शहरातील गिरण्यांच्या मालकांना त्यांच्या भूखंडावर नव्या विकासासाठी परवानगी देताना विकास नियंत्रण नियमावलीत बदल करण्याची त्वरा दाखविणाऱ्या राज्य शासनाने कामगारांना मात्र पुरते वाऱ्यावर सोडल्याचे स्पष्ट झाले आहे. धक्कादायक बाब म्हणजे विकासासाठी परवानगी मिळालेल्या गिरण्यांच्या मालकांनी शासनाला देय असलेली जमीन दिलेली तर नाहीच पण मुळात अशी जमीन संपादित करण्यासाठीची तरतूदच करण्याचे राज्य शासन सोयीस्कररीत्या विसरले आहे !

संपकरी प्राध्यापकांचे जेलभरो आंदोलन
मुंबई, ११ ऑगस्ट / प्रतिनिधी

राज्यभरातील विद्यापीठे व महाविद्यालयीन प्राध्यापकांनी ‘महाराष्ट्र फेडरेशन ऑफ युनिव्हर्सिटी अ‍ॅण्ड कॉलेज टिचर्स ऑर्गनायझेशन’च्या (एमफुक्टो) नेतृत्वाखाली पुकारलेल्या संपाला एक महिना उलटून गेला तरी राज्य सरकार लक्ष देत नसल्याच्या निषेधार्थ संपकरी प्राध्यापकांनी आज जेलभरो आंदोलन केले. विद्यापीठाच्या फोर्ट संकुलात झालेल्या आंदोलनात सुमारे एक हजार प्राध्यापक सहभागी झाले होते. यापैकी सुमारे ९०० प्राध्यापकांना आझाद मैदान पोलिसांनी अटक करून नंतर सोडून दिले. पुणे वगळता राज्यभरात सर्वत्र जेलभरो आंदोलन झाल्याचे एमफुक्टोचे अध्यक्ष सी. आर. सदाशिवन यांनी सांगितले.

तुकाराम चव्हाण रेल्वेचे तर के. एल. प्रसाद राज्य गुप्तचर विभागाचे नवे आयुक्त
मुंबई, ११ ऑगस्ट / प्रतिनिधी

गेले काही महिने प्रतीक्षेत असलेल्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना अखेर आज अतिरिक्त महासंचालक तसेच सहआयुक्त, महानिरीक्षकपदी बढत्या देण्यात आल्या. त्यानुसार आता तुकाराम चव्हाण हे रेल्वेचे तर के. एल. प्रसाद हे राज्य गुप्तचर विभागाचे नवे आयुक्त असतील, असे सूत्रांनी सांगितले. मात्र रात्री उशिरापर्यंत हे आदेश महासंचालक कार्यालयात पोहोचू शकले नव्हते.रेल्वेचे विद्यमान आयुक्त अशोक शर्मा यांची बढतीने अतिरिक्त महासंचालक (प्रशिक्षण) म्हणून महासंचालक कार्यालयात नियुक्ती करण्यात आली आहे. अतिरिक्त आयुक्त टी. एस. भाल तसेच सुरेश खोपडे यांनाही महानिरीक्षकपदी बढती देण्यात आली आहे.
भाल यांना महाराष्ट्र पोलीस गृहनिर्माण मंडळ येथेच तर खोपडे यांची महासंचालक कार्यालयात नियुक्ती करण्यात आली आहे. राज्य मानवी हक्क आयोगाचे अतिरिक्त महासंचालक म्हणून पंकज गुप्ता यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

ज्ञानेश महाराव यांना आचार्य अत्रे पुरस्कार
मुंबई, ११ ऑगस्ट/ प्रतिनिधी

मुंबई मराठी पत्रकार संघातर्फे देण्यात येणारा आचार्य अत्रे पुरस्कार साप्ताहिक चित्रलेखाचे संपादक ज्ञानेश महाराव यांना जाहीर करण्यात आला आहे. गुरुवार, १३ ऑगस्ट रोजी सायंकाळी सहा वाजता पत्रकार भवन येथे होणाऱ्या समारंभात प्रमुख पाहुणे दै. लोकमतचे समूह संपादक दिनकर रायकर यांच्या हस्ते महाराव यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येईल.आचार्य अत्रे यांच्या कन्या शिरीष पै यांनी हा पुरस्कार पुरस्कृत केला असून पाच हजार रुपये रोख, स्मृतिचिन्ह, शाल-श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.