Leading International Marathi News Daily

बुधवार, १२ ऑगस्ट २००९

स्वाईन फ्ल्यूची टांगती तलवार, तरीही उत्सव होणारच..
प्रसाद रावकर

आर्थिक मंदीमुळे खर्चाचा मेळ घालताना बेजार झालेल्या गोविंदा पथकांवर आता स्वाईन फ्ल्यूची टांगती तलवार लटकते आहे. गोविंदा, गणेशोत्सव आदी सण जवळ येऊन ठेपले आहेत. उत्सव साजरे करावेत की नाही याबाबत सरकारकडून कोणतीही ठोस सूचना करण्यात आलेली नाही. त्यामुळे गोपाळकाला उत्सवाचे आयोजक आणि गोविंदा पथकांनी हा उत्सव कोणत्याही परिस्थितीत साजरा करायचाच असा निर्णय घेतला आहे. गोपाळकाल्यापूर्वी गोविंदा पथकातील तरूणांची वैद्यकीय तपासणी करण्याचा निर्णय मंडळांतर्फे घेण्यात आला आहे.

.. गोविंदांची वैद्यकीय तपासणी करणार
स्वाईन फ्ल्यूच्या भीतीने समस्त मुंबईकरांना ग्रासले असून गोविंदा पथकांचीही भीतीने गाळण उडाली आहे. मात्र त्यावर तोडगा म्हणून गोविंदा पथकांनी प्रत्येक गोविंदाची वैद्यकीय तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे. असे असले तरीही अनेक जण सरावाला न येता प्रत्यक्ष गोपाळकाल्याच्या दिवशी गोविंदा पथकांमध्ये सहभागी होत असतात. अशा एखाद्या व्यक्तीला ताप, सर्दी, खोकला येत असेल तर त्याची लागण पथकातील अन्य गोविंदांनाही होऊ शकते.

वसईतील असंतोषाला भावनेची किनार!
सोपान बोंगाणे
गेली दोन दशके वसई-विरार परिसरावर आपला धाक आणि राजकीय वचक निर्माण करणारे आमदार हितेंद्र ठाकूर आणि त्यांच्या आशीर्वादानेच खासदार झालेले बळीराम जाधव यांच्यावरच रविवारी रात्री या भागातील पेटून उठलेल्या नागरिकांनी हल्लाबोल केला. वसई-विरार महापालिकेत ग्रामीण भाग बळजबरीने समाविष्ट करून आमदारांनी आमचा विश्वासघात केला, ही भावना या उद्रेकामागे असून त्यामुळे वसई भागातील सौहार्दाची भावना व शांततेच्या वातावरणाला छेद गेला आहे.

आठवणी कृष्णावताराच्या
स्वप्नील जोशी

मी कृष्णाची भूमिका केली होती. त्यामुळे मला गोकुळाष्टमीच्या दिवशी भारतभरातून बोलावणी यायची. मथुरेतील एका कृष्ण मंदिराचे उद्घाटन माझ्या हस्ते अर्थात कृष्णाच्या हस्ते करायचे होते. मी त्यावेळी कुमारवयीन होतो. रामानंद सागर यांच्यासोबत मी तेथे गेलो. मी येणार म्हणून तेथे जवळपास २०-२५ हजार भाविक जमले होते. आम्ही हेलिकॉप्टरमधून उतरलो आणि तिथून मंदिरापर्यंत चालत जायचे होते. हे अंतर केवळ तीन मिनिटांचे होते. पण तोच रस्ता चालत जायला आम्हाला सुमारे साडेसहा तास लागले. मला पाहण्यासाठी, केवळ स्पर्श करण्यासाठी प्रचंड धक्काबुक्की होत होती.

पश्चिम रेल्वे : नव्या १५ लोकल धूळ खात पडून
कैलास कोरडे

मुंबई नागरी परिवहन प्रकल्पांतर्गत (एमयूटीपी) आजवर ५७ नव्या लोकल मुंबईत दाखल झाल्या आहेत. मागील दोन वर्षांत मुंबईत इतक्या मोठय़ा संख्येने नव्या लोकल पोहोचल्यानंतरही मुंबईकरांना लोकल प्रवास फारसा सुखकारक झाल्याचे दिसत नाही. पश्चिम रेल्वेचा आडमुठेपणा आणि चुकीची धोरणे त्यास कारणीभूत असल्याचे रेल्वे वर्तुळात बोलले जात आहे.
एमयूटीपीच्या नव्या लोकलपैकी १६ लोकल मध्य रेल्वेच्या आणि उर्वरित पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात दाखल झाल्या आहेत.

एका पुतळ्याची ‘कर्म कथा’
१३ जून १९६९ या दिवशी आचार्य अत्रे आपल्यातून निघून गेले. मराठीचा अत्यंत अभिमानी असा महापुरुष निघून गेला. ज्या महापुरुषाने मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची लढाई प्राणपणाने लढूनजिंकली, त्याचे मराठी मनाला विस्मरण होऊ लागले याची टोचणी लागून राहिली. परंतु आर्थिक किंवा सामाजिक दृष्टीने आम्ही फारच लहान होतो. शरद पवार यांनी बँकेत खाते उघडण्यासाठी आम्हाला पाच हजार रुपयांचा चेक दिला. त्यानुसार आम्ही दादर जनता सहकारी बँकेत खाते उघडले आणि स्मारकाचे काम सुरू होण्यापूर्वीच ती बँक बंद पडली.

उजळणी ‘डायल 1916’ची!
मुंबईकरांच्या दैनंदिनीतील असंख्य अडचणींना वाचा फोडण्यासाठी अद्ययावत तक्रार निवारण यंत्रणा मुंबई महानगरपालिकेकडे आहे. 1916 या दूरध्वनी क्रमांकावर केवळ एक फोन करून आपली तक्रार नोंदविण्याची सुविधा मुंबईकरांना अक्षरश ‘बारा महिने तेरा काळ’ उपलब्ध आहे. परंतु, या यंत्रणेबाबत प्रचार आणि प्रसार झाला; तर महापालिकेची अकार्यक्षमता आणि कारभारातील त्रुटी उघड होतील, या भीतीपोटीच की काय या यंत्रणेला पालिकेने प्रसिद्धी दिलेली नाही.

विवाह परिषदेनिमित्त राज्यस्तरीय निबंध स्पर्धा
प्रतिनिधी

‘मिळून साऱ्याजणी’ मासिक आणि विमेन्स नेटवर्क संस्थेच्या संयुक्त विद्यमाने जानेवारी २०१० मध्ये सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त विवाह परिषदेचे आयोजन केले जाणार आहे. यानिमित्त राज्यस्तरीय निबंध स्पर्धा घेण्यात येत आहे.

‘ठसा उमटविणारी कलाकृती अजून हातून घडली नाही!’
रंगकर्मी अरुण होर्णेकर यांची खंत
नाटय़-प्रतिनिधी
‘वसंत सोमण हा रंगभूमीचा एक सरळ-साधा शिपाईगडी होता. तो सतत काहीतरी नाटकात करायला धडपडत असे. माझं त्याच्याशी काही अंशी साम्य असल्यानेच बहुधा माझी त्याच्या नावे दिल्या जाणाऱ्या या पुरस्कारासाठी निवड झाली असावी. म्हणूनच हे पारितोषिक स्वीकारताना मला समाधान वाटतंय,’ असं सांगून नाटय़कर्मी अरुण होर्णेकर पुढे म्हणाले की, ‘परंतु अद्यापि माझा अमीट ठसा उमटविणारी कलाकृती माझ्या हातून घडलेली नाही.

उद्या ‘साहित्य पुरूषोत्तम’ कार्यक्रम
प्रतिनिधी
पु.भा. भावे स्मृतीदिनानिमित्त गुरूवार, १३ ऑगस्ट रोजी रात्री ८ वाजता शिवाजी मंदिर येथे त्यांच्या साहित्यकृतींवर आधारित साहित्य पुरूषोत्तम हा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. श्रीराम केळकर, मिलिंद बेडेकर, यतीन ठाकूर, अंजली आमडेकर, अपर्णा अपराजित आणि मंजिरी मराठे हे कलावंत या विशेष कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. याचवेळी भावेंनी लिहिलेल्या नाटक-चित्रपटांमधून अभिनय केलेले ज्येष्ठ रंगकर्मी भालचंद्र पेंढारकर , चित्तरंजन कोल्हटकर, प्रभाकर पणशीकर, उमादेवी नाडगौडा उर्फ बेबी शकुंतला आणि आशा काळे-नाईक यांचा समितीचे अध्यक्ष ज्योतिर्भास्कर जयंत साळगांवकर यांच्या हस्ते सत्कार केला जाणार आहे. त्याचप्रमाणे प्रकाश पाठक, श्रीराम शिधये, जयंत पवार, सुभाष कवडी आणि दिनकर धारणकर यांना भावे स्मृती पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत.

जंगल भ्रमंती
प्रतिनिधी
पर्यावरण दक्षता मंच या संस्थेतर्फे निसर्ग भ्रमंती हा उपक्रम राबविला जात असून निसर्गाशा आपले नाते दृढ व्हावे, निसर्गाचाय सानिध्यात राहून त्याची माहिती मिळावा हा यामागील हेतू आहे. यावेळेस जंगल भ्रमंती हा विषय घेतला असून १६ ऑगस्ट रोजी सकाळी ससून नवघर येथील सागरी माहिती केंद्र येथे ही भ्रमंती आयोजित केली आहे. अधिक माहितीसाठी दू. क्र. ९८१९४९८७९८ वर संपर्क साधावा.