Leading International Marathi News Daily

बुधवार, १२ ऑगस्ट २००९

स्थिती नियंत्रणात - जिल्हाधिकारी
नगर, ११ ऑगस्ट/प्रतिनिधी

शहर व जिल्ह्य़ात स्वाइन फ्लूचे १३ संशयित रुग्ण आढळले असले तरी परिस्थिती नियंत्रणात आहे. नागरिकांनी भीती बाळगू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. पी. अन्बलगन यांनी केले.
खासगी डॉक्टरांना स्वाइन फ्लूवरील उपाययोजनांची माहिती देण्यासाठी आयोजित बैठकीत डॉ. अन्बलगन बोलत होते. अतिरिक्त जिल्हाधिकारी बाबुराव केंद्रे, निवासी उपजिल्हाधिकारी विवेक गायकवाड, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. माधव मुंडे, महापौर संग्राम जगताप, आयुक्त कल्याण केळकर, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी वीरेंद्र बडधे या वेळी उपस्थित होते.

नगरमध्ये ‘मास्क’ चा काळा बाजार
स्वच्छ, सुती हातरुमाल वापरा- डॉ. मुंडे

नगर, ११ ऑगस्ट / प्रतिनिधी

‘स्वाइन फ्लू’ च्या धास्तीने मागणी अचानक वाढल्याने नगर शहरात मास्कचा तुटवडा निर्माण होऊन काळाबाजार सुरू झाला आहे. शाळांनी विद्यार्थ्यांना मास्क लावून येण्याची सूचना केली आहे. मात्र जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. माधव मुंडे यांनी मास्कऐवजी प्रतिबंधासाठी सुती, स्वच्छ हात रुमालाचा वापर करावा, असा सल्ला दिला आहे. नगर शहरातही स्वाइन फ्लूचे संशयित रुग्ण आढळल्याने नागरिक सतर्कता बाळगू लागले आहेत. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घाबरून न जाण्याचे आवाहन केले आहे.

स्वाइन फ्लूचे कर्जतला ४, शेवगावमध्ये दोन संशयित
कर्जत, ११ ऑगस्ट/वार्ताहर

स्वाइन फ्लूची लक्षणे जाणवणारे चार रुग्ण येथे आढळले. खात्री करून घेण्यासाठी त्यांना नगरला पाठविण्यात आल्याची माहिती आज मिळाली. या संदर्भात वैद्यकीय अधिकारी डॉ. पवार यांच्याशी संपर्क साधला असता खात्री झाल्याशिवाय नेमके काय ते सांगता येणार नाही, मात्रकाही रुग्णांना नगरला पाठविल्याचे त्यांनी मान्य केले. शहरात स्वाइन फ्लूचे संशयित रुग्ण आढळल्याची चर्चा सुरू होतीच. जो तो तोंडाला मास्क वा रुमालाने तोंड बांधून फिरताना दिसत आहे.

काही शाळा तूर्त बंद
संशयित रुग्णांमध्ये एकाच कुटुंबातील तिघे
नगर, ११ ऑगस्ट/प्रतिनिधी
स्वाइन फ्लूच्या रुग्णांसाठी जिल्ह्य़ात ‘टॅमी फ्लू’च्या साडेचार हजार गोळ्या नगर येथे प्राप्त झाल्या आहेत. दरम्यान, प्रशासनाने आदेश दिला नसला तरी शहरातील काही संस्थाचालकांनी तूर्त शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. संशयित रुग्णांमध्ये एकाच कुटुंबातील तिघांचा व त्यांच्यासह एकाच भागातील (कल्याण रस्ता) चौघांचा समावेश आहे. शहरातील संशयित १३ रुग्णांच्या घरी जाऊन त्यांच्या घरासह परिसरात औषध फवारणी करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.

‘मुख्यमंत्र्यांनी निर्णय न बदलल्यास ८५ जागा पाडू’
आदिवासींचा अकोल्यात मोर्चा
अकोले, ११ ऑगस्ट/वार्ताहर
खोटे व बनावट आदिवासी ठरलेल्यांना, ओबीसी एसबीसी (विशेष मागास प्रवर्ग) व बनावट प्रमाणपत्राच्या आधारे ९५ हजार आदिवासींना मुख्यमंत्री फायदा देऊ पाहत आहेत. हा निर्णय मुख्यमंत्र्यांनी तातडीने रद्द न केल्यास आमदारांच्या राखीव २५, तर आदिवासीबहुल ६० जागांवर आदिवासी आपला करिश्मा दाखवून देतील, असा सडेतोड इशारा आमदार मधुकरराव पिचड यांनी आज येथे दिला.

राहुल शिंदे यांचे उपोषण लेखी आश्वासनानंतर मागे
पारनेर, ११ ऑगस्ट/वार्ताहर

वाळवणे-रांजणगाव मशीद या ७ किलोमीटर रस्त्याचे काम पंतप्रधान ग्रामसडक योजनेतून करण्याचे लेखी आश्वासन योजनेचे नोडल कार्यकारी अभियंता यू. जी. चव्हाण यांनी दिल्यानंतर युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राहुल शिंदे व त्यांच्या सहकाऱ्यांनी या प्रश्नी सुरू केलेले उपोषण आज तिसऱ्या दिवशी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या हस्ते लिंबूपाणी घेऊन मागे घेतले.

पवारांच्या दौऱ्यानंतरही निळवंडे कालव्यांची कोंडी कायम
अकोले, ११ ऑगस्ट/वार्ताहर

निळवंडय़ाचे कालवे अडीच वर्षांत पूर्ण करण्याचे आश्वासन जलसपंदामंत्री अजित पवार यांनी दिले असले, तरी कालव्याच्या मुखाशी अद्यापि कामाला सुरुवात झालेली नाही. पवारांच्या दौऱ्यानंतरही तालुक्यात कालव्यांची कोंडी फुटण्याची चिन्हे दिसत नाहीत. त्यामुळे तालुक्यात कालव्यांची कामे केव्हा सुरू होणार, याबाबत अनिश्चितता आहे. धरणात पाणी अडविण्यास सुरूवात झाली असली तरी कालव्यांमधून हे पाणी दुष्काळी भागाला मिळण्यासाठी अजूनही अनेक वर्षे प्रतीक्षा करावी लागेल.

देहू, आळंदी, पंढरपूर विकास योजनेत नेवाशाच्या समावेशास अंतिम मान्यता
नगर, ११ ऑगस्ट / प्रतिनिधी
देहू, आळंदी, पंढरपूर विकास योजनेत नेवाशाचा (जि. नगर) समावेश करण्यास पुण्यात सोमवारी झालेल्या बैठकीत अंमित मान्यता देण्यात आली. जिल्ह्य़ाचे पालकमंत्री दिलीप वळसे यांनी यासाठी पुढाकार घेतला. पालखीतळ विकासासाठी राज्य सरकारने देहू, आळंदी, पंढरपूर या तिन्ही शहरांचा विकास करणारी योजना जाहीर केली आहे.

‘उमेदवार आयात न करता निष्ठावंतांना संधी द्या’
राष्ट्रवादीतील इच्छुकांची मागणी
नगर, ११ ऑगस्ट / प्रतिनिधी
विधानसभेच्या नगर शहरातील जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवार आयात करण्यापेक्षा पक्षातीलच निष्ठावंतांना संधी द्यावी, अशी मागणी प्रमुख इच्छुकांनी काल रात्री पक्ष कार्यालयात झालेल्या बैठकीत केली. माजी नगराध्यक्ष अभय आगरकर यांच्या हालचालींच्या पाश्र्वभूमीवर ही मागणी करण्यात आली. मात्र असे असले तरी अखेर पक्षाचे नेते शरद पवार देतील त्या उमेदवाराचा प्रचार करण्याचा ठराव संमत करण्यात आला.

जगताप यांच्याविरोधात गडकरींकडे रदबदली!
‘भाजपने निष्ठावानालाच संधी द्यावी’
श्रीगोंदे, ११ ऑगस्ट/वार्ताहर
भाजप-शिवसेना युतीची उमेदवारी भाजपच्या निष्ठावान व जुन्या कार्यकर्त्यांला द्यावी, अशी मागणी करीत भाजप श्रीगोंदे व नगर तालुका शाखाध्यक्षांनी अप्रत्यक्षपणे कुकडी साखर कारखान्याचे अध्यक्ष कुंडलिकराव जगताप यांच्याविरोधात थेट प्रदेशाध्यक्ष नितीन गडकरी यांच्याकडे व्यूहरचना केली. मतदारसंघातील भाजपच्या प्रमुख नेत्यांनी काल मुंबईत ही भेट घेऊन पक्षात नव्याने आलेल्यांचा वा येणाऱ्यांचा उमेदवारीसाठी विचार करू नये, असा आग्रह धरला.

पारनेर दूध संघ अध्यक्षपदी झावरे चौथ्यांदा बिनविरोध
गुलाबराव डेरे उपाध्यक्ष
पारनेर, ११ ऑगस्ट/वार्ताहर

तालुका दूध संघाच्या अध्यक्षपदी संस्थापक माजी आमदार नंदकुमार झावरे यांची, तर उपाध्यक्षपदी गुलाबराव डेरे यांची बिनविरोध निवड झाली. झावरे यांची सलग चौथ्यांदा, तर डेरे यांची दुसऱ्यांदा बिनविरोध निवड झाली. तहसीलदार गोविंद शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली संचालक मंडळाच्या बैठकीत ही निवड झाली. मच्छिंद्र वराळ यांनी झावरे यांचे नाव सुचविले. माजी उपाध्यक्ष रामचंद्र मांडगे यांनी अनुमोदन दिले. दादाभाऊ वारे यांनी डेरे यांचे नाव सुचविले. विठ्ठलराव शेळके यांनी अनुमोदन दिले. दूध व्यवसाय बिकट स्थितीतून वाटचाल करीत आहे. दुष्काळसदृश स्थितीत दूधउत्पादकांना सावरण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील, असे नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांनी निवडीनंतर सांगितले.

वीरगावच्या ग्रामस्थांचे आज उपोषण
अकोले, ११ ऑगस्ट/वार्ताहर
वीरगाव शाळेचा जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल योजनेत समावेश व्हावा, यासाठी ग्रामस्थ विद्यार्थ्यांसह उद्या (बुधवारी) तहसील कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण करणार आहेत.
जिल्ह्य़ातील ४०५ शाळांची मॉडेल स्कूल योजनेसाठी निवड करण्यात आली. अकोल्यातील १८ शाळांचा त्यात समावेश आहे. या योजनेत समाविष्ट होण्यासाठी पात्र असतानाही या भागास जाणीवपूर्वक डावलले असल्याची ग्रामस्थांची तक्रार आहे. वीरगाव हे निर्मलग्राम पुरस्कारप्राप्त गाव असून विविध सरकारी योजना राबविण्यात गाव पुढे असते. गावातील शाळेस सन २००८-०९चा साने गुरूजी स्वच्छ शाळा प्रथम पुरस्कार मिळालेला आहे.
ग्रामपंचायत पदाधिकारी, तसेच ग्रामशिक्षण समितीच्या सदस्यांनी जिल्हा परिषद अध्यक्षा, शालेय शिक्षणमंत्री, पंचायत समितीचे सभापती, जिल्हा परिषद सदस्या यांची समक्ष भेट घेऊन निवेदने दिली. मात्र, अद्याप याबाबत कुठलीही ठोस कार्यवाही झाली नाही. त्यामुळे ग्रामस्थदिनाच्या कार्यक्रमात ठरल्याप्रमाणे उद्या विद्यार्थ्यांसमवेत उपोषणास बसण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

शिरसाठ समर्थकांसह भाजपमध्ये दाखल
पाथर्डी, ११ ऑगस्ट/वार्ताहर
तालुक्यातील टाकळीमानूर येथील गहिनीनाथ शिरसाठ यांनी त्यांच्या अनेक समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश केला. शिरसाठ यांच्या प्रवेशामुळे ढाकणे यांची टाकळीमानूर गटावरील पकड अधिक भक्कम झाल्याचे मानले जाते.
गेल्या पंचायत समिती निवडणुकीत शिरसाठ अपक्ष उमेदवार होते. कोणतेही राजकीय पाठबळ नसताना त्यांनी चांगली मते मिळविली होती. तीन दिवसांपूर्वी त्यांनी जिल्हाध्यक्ष प्रताप ढाकणे यांच्यासह मुंबईत राष्ट्रीय सरचिटणीस गोपीनाथ मुंडे यांची भेट घेतली होती. आज शहरातून वाजतगाजत मिरवणूक काढून समर्थकांसह त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. संस्कारभवनमध्ये ढाकणे, तालुकाध्यक्ष रामनाथ बंग, भाजप युवा मोर्चा तालुकाध्यक्ष अमोल बडे, जिल्हा उपाध्यक्ष विजय मंडलेचा यांच्या उपस्थितीत हा प्रवेश झाला. प्रवेशानंतर बडे यांनी शिरसाठ यांची युवा मोर्चा तालुका उपाध्यक्षपदी निवड जाहीर केली. शिरसाठ यांना पक्षात सन्मानाची वागणूक देऊ, असे ढाकणे यांनी सांगितले. येत्या विधानसभा निवडणुकीत ढाकणे यांना टाकळीमानूर गटातून चांगले मताधिक्य मिळवून देऊ, असे शिरसाठ यांनी सांगितले. डॉ. मृत्युंजय गर्जे, आरती निऱ्हाळी, शहादेव खेडकर, आदिनाथ खेडकर, अमोल अंदुरे, विष्णू खेडकर, अर्जुन इगारे, राजेंद्र नागरगोजे या वेळी उपस्थित होते. सरचिटणीस जे. बी. वांढेकर यांनी प्रास्ताविक केले. वसंत खेडकर यांनी आभार मानले.

स्वाइन फ्लूबाबत दक्षता घ्या - डॉ. घोगरे
राहाता, ११ ऑगस्ट/वार्ताहर
स्वाइन फ्लूबाबत नागरिकांनी काळजी घ्यावी. मात्र, अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. गोकुळ घोगरे यांनी केले.स्वाइन फ्लूच्या नियंत्रणासाठी डॉक्टर आणि आरोग्य सेवकांचे प्रबोधन करण्यासाठी व त्यांना त्याबाबत माहिती देण्यासाठी आयोजित करण्यात इलेल्या जनजागृती कार्यक्रमात डॉ. घोगरे बोलत होते. या वेळी डॉ. पी.जी. गुंजाळ, डॉ. संतोष डिघोळकर, डॉ. विजय म्हस्के, डॉ. रवींद्र घोगरे, डॉक्टर असोसिएशनचे तालुकाध्यक्ष डॉ. नचिकेत वर्पे, डॉ. आर. एम. पगारिया व डॉ. डी. एम. मेनन उपस्थित होते. डॉ. घोगरे म्हणाले की, स्वाइन फ्लूचा संसर्ग झालेल्या व्यक्तींच्या सान्निध्यात दीर्घकाळ राहिल्यास त्या व्यक्तीलाही स्वाइन फ्ल्यूचा संसर्ग होऊ शकतो. सर्दी, ताप, घशात दुखणे, खोकला, डोके व अंग दुखणे ही या आजाराची लक्षणे आहेत. ही लक्षणे दिसल्यास ग्रामीण रुग्णालयाशी त्वरित संपर्क साधावा, असे आवाहन त्यांनी केले.

वैद्यकीय घडामोडींचे डॉक्टरांना प्रशिक्षण
राहाता, ११ ऑगस्ट/वार्ताहर
आणीबाणीच्या प्रसंगी योजण्यात येणाऱ्या उपायांवर जागृती वाढविणे हे जागतिक आरोग्य संघटनेचे यावर्षीचे घोषवाक्य आहे. प्रवरा परिसरातील वैद्यकीय विद्यार्थी व व्यावसायिकांसाठी वैद्यकीय क्षेत्रात घडणाऱ्या नवीन घडामोडींची माहिती तज्ज्ञांनी प्रशिक्षण वर्गात देण्यात आली.प्रवरा अभिमत विद्यापीठात झालेल्या या प्रशिक्षणात जवळपास ३०० डॉक्टरांनी भाग घेतला. कर्नल डॉ. तिवारी यांनी स्वागत केले. नाशिकचे डॉ. प्रकाश जोशी, डॉ. राहूल बावीस्कर, डॉ. प्रितेश जुनागडे, पुण्याचे डॉ. आशिष सिन्हा, डॉ. डी. बी. कदम, डॉ. प्रसाद, डॉ. बी. पी. सिंग, महाडचे डॉ. बावसकर या मान्यवर तज्ज्ञांनी सर्पदंश, विंचूदंश, श्वसनाचे गंभीर आजार, रक्तस्त्राव, ह्रदयविकार आदी विषयांवर विचार मांडले. प्रशिक्षण वर्गाचे उद्घाटन प्रवरा अभिमत विद्यापीठाचे कुलपती बाळासाहेब विखे यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी प्रवरा मेडिकल ट्रस्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अशोक पाटील, कुलगुरु डॉ. बी. सदानंद, पुणे विद्यापीठ अभिसभेचे सदस्य राजेंद्र विखे, डॉ. डी. एन. अग्रवाल उपस्थित होते.

भारिप-बहुजन महासंघाच्या जिल्हाध्यक्षपदी उन्हवणे व म्हस्के
नेवासे, ११ ऑगस्ट/वार्ताहर
भारिप-बहुजन महासंघाच्या जिल्हाध्यक्षपदी (उत्तर) भगवान उन्हवणे यांची, तर दक्षिणच्या जिल्हाध्यक्षपदी सुजय म्हस्के यांची निवड करण्यात आली. जिल्हा निरीक्षक वसंत साळवे यांच्या उपस्थितीत नगर येथे झालेल्या बैठकीत जिल्हा कार्यकारिणी निवडण्यात आली.अन्य कार्यकारिणी अशी - जिल्हा उपाध्यक्ष रमेश गायकवाड, शहराध्यक्ष सुनील शिंदे व नगर तालुकाध्यक्ष बाळासाहेब कांबळे. यावेळी उन्हवणे म्हणाले की, उत्तर जिल्ह्य़ातील तालुका कार्यकारिणी निवडण्यासाठी १६ ऑगस्ट रोजी श्रीरामपूर येथे कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला आहे. यावेळी कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन त्यांनी केले. बैठकीस रावसाहेब मोहन, उषाताई उन्हवणे उपस्थित होते.

जवाहर विहिरींचे १ कोटीचे अनुदान वर्ग केल्याने समाधान
नेवासे, ११ ऑगस्ट/वार्ताहर

जवाहर योजनेतंर्गत तालुक्यातील लाभार्थीचे विहिरींचे सुमारे १ कोटी रुपयांचे अनुदान लघु पाटबंधारे उपविभागाकडे वर्ग केल्याने लाभधारक शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. थकित अनुदानासाठी शिवछत्रपती प्रतिष्ठानचे अध्यक्ष अनिल ताके यांनी आंदोलनाचा इशारा दिला होता. त्याची दखल घेऊन जि. प. चे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी उत्तमराव कर्पे यांनी ही रक्कम तातडीने वर्ग केली. तालुक्यात जवाहर योजनेतंर्गत सुमारे १८० विहिरींची प्रकरणे मंजूर झाली. त्यापैकी शंभर लाभधारकांनी पाच महिन्यांपूर्वी विहिरींची कामे पूर्ण केली होती. परंतु अनुदान न मिळाल्यामुळे ते सर्वच जण अडचणीत सापडले होते. यासंदर्भात लाभधारकांनी शिवछत्रपती प्रतिष्ठानचे अध्यक्ष ताके यांच्यापुढे आपली कैफियत मांडली. त्यानंतर ताके यांनी कर्पे यांना निवेदन पाठवून बेमुदत उपोषण करण्याचा इशारा दिला होता. कर्पे यांनी त्याची दखल घेत अनुदानाचे १ कोटी जि. प. च्या लघु पाटबंधारे उपविभागाकडे वर्ग केले. त्यामुळे लाभधारकांमध्ये समाधानाचे वातावरण पसरले आहे.

मिरजगावचे मांडओहळ कार्यालय हलविल्यास रस्त्यावर उतरू - पिसाळ
कर्जत, ११ ऑगस्ट/वार्ताहर

तालुक्यातील मिरजगाव येथील सीना धरणाचे मांडओहळ कालवा उपविभागीय कार्यालय नगरला हलवण्याचा घाट घातला जात आहे. हे कार्यालय हलवल्यास शेतकऱ्यांसह रस्त्यावर उतरण्याचा इशारा जि. प. सदस्य अंबादास पिसाळ यांनी दिला. प्रसिध्दीपत्रकात त्यांनी म्हटले आहे की, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे उपविभागीय कार्यालय रात्रीतून नगरला हलवले. निमगाव गांगर्डा व १७ गावे आणि आखोणीसह २२ गावे या दोन्ही पाणीयोजना निकृष्ट कामामुळे सुरूच झालेल्या नाहीत. अनेक गावे पाणीटंचाईग्रस्त असताना हे कार्यालय स्थलांतरीत करण्यात आले. या बाबत सरकारदरबारी लोकप्रतिनिधींनी आवाज उठवण्याची गरज असताना ते मूग गिळून गप्प आहेत. आता सीना कालव्याचे मिरजगाव येथील कार्यालय हलवण्याच्या हालचाली सुरू आहेत. वास्तविक, सीना धरण कुकडीच्या लाभक्षेत्रात येते. भोसे खिंडीचे काम पूर्ण झाले आहे. कालव्याची देखभाल, पाण्याचे नियोजन, सीनाचे आवर्तन आदी कामांसाठी शेतकऱ्यांना कार्यालयात जावे लागते. तरीही कार्यालय हलवण्याचा प्रयत्न सुरू आहे. आत्ताच आवाज उठवला नाही, तर हळूहळू सर्वच कार्यालये तालुक्याबाहेर जातील, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

मॉडेल स्कूल योजनेत नेवाशावर अन्याय होऊनही लंघे गप्प - मापारी
नेवासे, ११ ऑगस्ट/वार्ताहर
शालेय शिक्षणमंत्री राधाकृष्ण विखे यांचा राहाता तालुका शिक्षणक्षेत्रात अग्रेसर राहावा, यासाठी नेहमी प्रयत्न असतो. हा आदर्श घेण्याऐवजी भाजपचे जि. प. सदस्य विठ्ठलराव लंघे कोटय़वधी रुपयांच्या मॉडेल स्कूल या महत्त्वाकांक्षी योजनेत नेवासे तालुक्यावर अन्याय होऊनही मौनीबाबाच्या भूमिकेत का आहेत, असा सवाल युवा नेते महेश मापारी यांनी केला. मंत्री विखे यांचा मॉडेल स्कूल हा आदर्श व महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. या योजनेंतर्गत प्राथमिक शाळांच्या गुणवत्तावाढीसाठी मूलभूत सुविधा देण्यात येणार आहेत. त्यासाठी कोटय़वधींचा निधी उपलब्ध होत आहे. या योजनेसाठी जि. प.ने प्रस्ताव पाठवताना अध्यक्ष शालिनीताई विखे यांनी स्वतच्या राहाता तालुक्याला झुकते माप देणे समजण्यासारखे आहे. परंतु नेवाशावर अन्याय होत असताना विरोधक या नात्याने जि. प. व स्थायी समिती सदस्य असणाऱ्या लंघे यांनी आवाज उठवायला हवा होता. परंतु स्वतची राजकीय सोय पाहून तालुक्यातील मुलांच्या शैक्षणिक भवितव्याचा बळी देऊन या अन्यायाला मूकसंमती दिली. त्यांची बोटचेपी भूमिका आश्चर्यकारक आहे.

एचआयव्ही उपचारांसाठी जिल्ह्य़ात लवकरच पाच ठिकाणी केंद्रे
नगर, ११ ऑगस्ट/प्रतिनिधी
एचआयव्ही बाधितांवरील उपचारांसाठी केंद्रे लवकरच पाथर्डी, कर्जत, श्रीरामपूर, संगमनेर व नेवासे येथील सरकारी रुग्णालयात सुरू केली जाणार असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. माधव मुंडे व समुपदेशन केंद्राचे प्रमुख हणमंत हराळकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. एड्समुळे जिल्ह्य़ात गेल्या पावणेदोन वर्षांत १८६ जणांचा मृत्यू झाल्याचे त्यांनी सांगितले.
नगराध्यक्षा जिल्हा रुग्णालयातील समुपदेशक व उपचार केंद्रात गेल्या सात महिन्यात जून अखेर ११ हजार ४७३ महिला व १४ हजार ३१६ अशा एकूण २५ हार ४२९ जणांची तपासणी करण्यात आली. त्यात ८६४ पुरुष व ६८५ महिला असे एकूण १ हजार ५४९ बाधित आढळले. नगरचे केंद्र ऑक्टोबर २००७ मध्ये सुरू झाले. तेव्हा पासून ४ हजार ४०५ बाधित आढळले. त्यातील २ हजार २६३ जणांवर उपचार सुरू आहेत. उर्वरित उपचारा पलिकडे गेले असल्याने त्यांच्या क्षमता वाढीसाठी प्रयत्न सुरू आहेत. बाधितचे प्रमाण तरुण पिढीत अधिक आहे. केंद्र सुरू झाल्यापासून १८६ जणांचा मृत्यू झाल्याचे त्यांनी सांगितले. ३२ गरोदर बाधित मातांना समुपदेशन केल्याने २६ बाळे सुरक्षित जन्मली, ६ बाळे बाधित आढळली, अशी माहिती देण्यात आली.

लाड सुवर्णकार सोसायटी विकास पॅनेलच्या ताब्यात
नगर, ११ ऑगस्ट/प्रतिनिधी
शहरातील नावाजलेल्या लाड सुवर्णकार सेंट्रल को-ऑप. क्रेडिट सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीत सुभाष कायगावकर यांच्या नेतृत्वाखालील विकास पॅनेलचे सर्वच्या सर्व ९ उमेदवार विक्रमी मतांनी विजयी झाले. संस्थेवर विकास पॅनेलने निर्विवाद सत्ता मिळविली. प्रमोद बुऱ्हाडे सर्वाधिक ३३६ मताधिक्याने निवडून आले.प्रमोद बुऱ्हाडे, मुकुंद बुऱ्हाडे, सुभाष कायगावकर, नितीन कुलथे, संतोष देडगावकर, राजेंद्र वालकर, प्रकाश हिंगणगावकर, प्रदीप कुलथे (सर्वसाधारण मतदारसंघ), बालाजी डहाळे (मागासवर्गीय मतदारसंघ) यांनी बाजी मारली. प्रमिला देवळालीकर (महिला राखीव), रमाकांत बेंद्रे (दुर्बल मतदारसंघ) बिनविरोध निवडून आले होते. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ए. ए. शेख व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून समीर खडके यांनी काम पाहिले. विजयी उमेदवारांचे दीपक बागडे, किशोर महाले, गोविंद माळवे, प्रा. मुंडके, प्रवीण मैड आदींनी अभिनंदन केले.

सडय़ातील कार्यकर्त्यांचा कोल्हे गटामध्ये प्रवेश
कोपरगाव, ११ ऑगस्ट/वार्ताहर
तालुक्यातील सडे गावात शिवसेना-परजणे गटांत फूट पडून २५ कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीचे प्रदेश सचिव बिपीन कोल्हे यांचे नेतृत्व मान्य करुन कोल्हे गटात प्रवेश केला. अध्यक्षस्थानी बापूराव बारहाते होते. उपसरपंच सुभाष बारहाते, सभापती मच्छिंद्र टेके, कासलीचे रावसाहेब जाधव, जगन्नाथ वाकचौरे, श्रीधर वाकचौरे, माधवराव बारहाते, नारायणराव लोहकणे यावेळी उपस्थित होते. यावेळी कोल्हे म्हणाले की, तालुक्यात लोकांचा लोकप्रतिनिधींकडून भ्रमनिरास झाला. शेवटी आम्हालाच विकासासाठी केंद्र व राज्य सरकारकडून निधी आणावा लागला. श्रीधर वाकचौरे यांनी प्रास्ताविक केले. अण्णासाहेब कोताडे यांनी आभार मानले.

आढाव यांचा सत्कार
राहता, ११ ऑगस्ट/वार्ताहर
शिंगणापूर येथील अमृत संजीवनी शुगर ट्रान्सपोर्ट कंपनीच्या निमंत्रित संचालकपदी जालिंदर आढाव यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा राष्ट्रवादीचे प्रदेश सचिव बिपीन क ोल्हे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या प्रसंगी राष्ट्रवादी युवकचे जिल्हाध्यक्ष संदीप वर्पे, संचालक त्र्यंबकराव परजणे, माजी सभापती शिवाजी वक्ते उपस्थित होते. संजीवनी कारखान्याचे उपाध्यक्ष सुभाष आव्हाड कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. कैलास संवत्सरकर यांनी प्रास्ताविक केले. ‘संजीवनी’चे संचालक विश्वासराव महाले यांनी आभार मानले.

तालुका शालेय क्रीडा स्पर्धा १७ ऑगस्टपासून
राहाता, ११ ऑगस्ट/वार्ताहर
तालुका शालेय क्रीडा स्पर्धा १७ ऑगस्ट ते १७ सप्टेंबरदरम्यान आयोजित केल्याची माहिती क्रीडाप्रमुख राजेंद्र पाटणकर यांनी दिली. या वेळी स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले.
या स्पर्धेचे वेळापत्रक असे, खो-खो, कबड्डी १४, १७, १९ ऑगस्ट. ग्रामीण मुले - १७, २१ ऑगस्ट व मुली १८, २२ ऑगस्ट. व्हॉलीबॉल, कुस्ती, मैदानी स्पर्धा १, १०, १६ व १७ सप्टेंबर. १७ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता स्पर्धेचे उद्घाटन होईल.

अनिल सोनवणे ‘मनसे’त दाखल
कोपरगाव, ११ ऑगस्ट/वार्ताहर
तालुक्यातील शिवसेनेच्या एका गटाने पक्षाला ‘जय महाराष्ट्र’ करीत मनसेमध्ये प्रवेश केला. अनिल सोनवणे यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांचे हे पक्षांतर तालुक्यात बहुचर्चित ठरले आहे. मनसेच्या आज येथे झालेल्या बैठकीत श्री. सोनवणे यांच्यासह कान्हेगावचे उपसरपंच बाळासाहेब निकम, बहादराबादचे शाखाप्रमुख राजेंद्र पाचोरे यांच्यासह इतर कार्यकर्त्यांनी मनसेत प्रवेश केला.शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रावसाहेब सोनवणे यांचे अनिल हे चिरंजीव आहेत. त्यामुळेच हे पक्षांतर बहुचर्चित ठरले. प्रवेशानंतर बैठकीत अनिल सोनवणे यांनीच विधानसभेसाठी बाळासाहेब जाधव यांच्या उमेदवारीची मागणी केली.

रावसाहेब खेवरे राहुरीतून तडीपार
राहुरी, ११ ऑगस्ट / वार्ताहर
शिवसेनेचे तालुकाप्रमुख रावसाहेब सदाराम खेवरे (राहणार देसवंडी) याला सहा महिन्यांसाठी राहुरी तालुक्यातून हद्दपार करण्यात आले आहे.श्रीरामपूरच्या प्रांताधिकारी गीतांजली बावीस्कर यांनी हा आदेश काढला आहे. कोणत्याही प्रकारच्या राजकीय दबावाला न जुमानता प्रांताधिकाऱ्यांनी हा निर्णय घेतला आहे. राहुरीचे पोलीस उपनिरीक्षक आय. एम. पठाण यांनी ताबडतोब या आदेशाची अंमलबजावणी केली. पाचपेक्षा अधिक गुन्हे एखाद्या व्यक्तीविरूध्द दाखल झाल्यास तडिपार केले जाते, असे पोलिसांनी सांगितले.

श्रीरामपूरला शुक्रवारी नेत्रशिबिर
श्रीरामपूर, ११ ऑगस्ट/प्रतिनिधी

अ‍ॅम्पेथी फाउंडेशन (मुंबई), तसेच बच्चूअली रुग्णालयाच्या सहकार्याने नगरपालिकेच्या वतीने शुक्रवारी (दि. १४) प्रियदर्शनी मंगल कार्यालयात मोफत नेत्र शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. शिबिरात मोफ त नेत्रचिकित्सा, शस्त्रक्रिया व चष्मेवाटप केले जाणार असून, गरजू रुग्णांनी लाभ घ्यावा, असे आवाहन आमदार जयंत ससाणे यांनी केले आहे.

बाबासाहेब मिरीकर यांचा आज १६ वा स्मृतिदिन
नगर, ११ ऑगस्ट/प्रतिनिधी

ज्येष्ठ इतिहास संशोधक सरदार बाबासाहेब मिरीकर यांचा १६ वा स्मृतिदिन उद्या (बुधवारी) ऐतिहासिक वस्तू संग्रहालयात साजरा करण्यात येणार आहे. (कै.) मिरीकर यांनी वस्तू संग्रहालयाची स्थापना केली. संस्थेचे हे सुवर्णमहोत्सवी वर्ष आहे. उद्या दुपारी ३ वाजता बेहराम नगरवाला यांच्या अध्यक्षतेखाली व शशिकांत मुथा, डॉ. लीला गोविलकर यांच्या प्रमुख उपस्थितीत (कै.) मिरीकर यांना आदरांजली अर्पण करण्यात येईल. मिरीकर कुटुंबीय या वेळी उपस्थित राहणार असून, इतिहासप्रेमींनी कार्यक्रमास यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.