Leading International Marathi News Daily

बुधवार, १२ ऑगस्ट २००९

भाजपने केली विदर्भातील ४१ मतदारसंघांची चाचपणी
नागपूर, ११ ऑगस्ट / प्रतिनिधी

नागपुरातील सहाही मतदारसंघांबाबत चर्चा
कामठी, हिंगण्यात एकच दावेदार
उमरेडसाठी गवईंचे शक्तिप्रदर्शन
कामठीतून चंद्रशेखर बावनकुळे एकमेव दावेदार
काँग्रेस पाठोपाठ भारतीय जनता पक्षानेही उमेदवार निश्चित करण्यासाठी थेट त्या-त्या मतदारसंघातील पदाधिकारी व प्रमुख दावेदारांशी संवाद साधून चाचपणी सुरू केली आहे. विदर्भाच्या तब्बल ४१ मतदारसंघांची चाचपणी करताना सुमारे चार ते सहा मतदारसंघांचा अपवाद वगळता सर्वत्र तीन ते पाच किंवा त्यापेक्षा अधिक इच्छुकांनी दावेदारी केली आहे. उमरेडमधील उमेदवारीवरून स्थानिक पदाधिकाऱ्यांनी तीव्र असंतोष व्यक्त केला.

स्वाईन फ्लूच्या तपासणीसाठी रुग्णांची गर्दी
नागपूर, ११ ऑगस्ट / प्रतिनिधी

आणखी ५ संशयित रुग्ण मेडिकलमध्ये येण्यापूर्वी कौटुंबिक डॉक्टरांचा सल्ला घेण्याचे आवाहन
देशभरात स्वाईन फ्लूचा प्रसार झाल्याने नागपूरकरांमध्ये दहशत निर्माण झाली असून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात तपासणीसाठी येणाऱ्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे. यामुळे रुग्णालय प्रशासनावरील ताण वाढला आहे. या पाश्र्वभूमीवर स्वाईन फ्लूसारख्या आजाराची लक्षणे असणाऱ्या रुग्णांनी आधी त्यांच्या कौटुंबिक डॉक्टरांकडून तपासणी करून घेऊन गंभीर बाब आढळल्यासच शासकीय रुग्णालयात यावे, असे आवाहन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. दीप्ती डोणगावकर यांनी केले आहे.

मेटॅडोरच्या धडकेने स्कुटीस्वार महिला ठार
नागपूर, ११ ऑगस्ट / प्रतिनिधी

वेगात आलेल्या मेटॅडोरच्या धडकेने स्कुटीस्वार महिला ठार तर, दुसरी गंभीर जखमी झाली. सेंट्रल अ‍ॅव्हेन्यूवर दारोडकर चौकात मंगळवारी दुपारी एक वाजताच्या सुमारास हा अपघात घडला. स्नेहा दिवाकर पराते (रा. गुलमोहर नगर) हे ठार झालेल्या महिलेचे नाव आहे. मीनाक्षी चंद्रशेखर पराते तिच्या जावेसह एमएच ३१ सीई १४०८ क्रमांकाच्या स्कुटी पेपवर भाजी घेऊन घरी जात होती. दारोडकर चौकात मागून वेगात आलेल्या एमएच ३१ एम ८४९० क्रमांकाच्या मेटॅडोरने स्कुटीला धडक दिली. या अपघातात स्कुटीवर मागे बसलेली स्नेहा जागीच ठार झाली. मीनाक्षी गंभीर जखमी झाली असून तिला मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघातानंतर मेटॅडोरसह चालक तेथून पळून गेला.

‘नॉनस्टॉप सुपरफास्ट एक्स्प्रेस’ला मुहूर्तच गवसेना
नागपूर, ११ ऑगस्ट/ प्रतिनिधी

बहुचर्चित मुंबई-नागपूर ‘नॉनस्टॉप सुपरफास्ट एक्स्प्रेस’ विषयी जनतेत प्रचंड उत्सुकता असतानाच ही गाडी नेमकी केव्हा सुरू होणार, याबाबत निश्चित वेळापत्रक अद्याप रेल्वे प्रशासनाने तयार केले नसल्याने नियोजित वेळेवर ही गाडी सुरू होण्याची शक्यता कमी आहे. रेल्वेमंत्री ममता बॅनर्जी यांनी अर्थसंकल्पात १५ ‘नॉनस्टॉप सुपरफास्ट एक्स्प्रेस’ सुरू करण्याची घोषणा केली. त्यापूर्वी तत्कालिन रेल्वेमंत्र्यांनी अंतिरिम अर्थसंकल्पात ५१ नवीन गाडय़ांची घोषणा केली. आधीच रेल्वेचे वेळापत्रक अत्यंत व्यस्त असल्याने नवीन गाडय़ांसाठी रेल्वे मार्ग उपलब्ध करून देणे आणि त्यांची वेळ ठरवणे, हे जिकरीचे काम आहे.

गोदामावर छापा; मोठा धान्यसाठा जप्त
रेशनचा माल काळ्याबाजारात नेण्याचा प्रयत्न फसला
नागपूर, ११ ऑगस्ट / प्रतिनिधी

गुन्हे शाखेच्या पथकाने पूर्व नागपुरातील भारत नगरातील एका गोदामावर छापा मारून मोठय़ा प्रमाणावर धान्य जप्त केले. रेशनचे हे धान्य काळ्या बाजारात विकण्यासाठी नेले जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पूर्व नागपुरातील भारत नगरातील एका गोदामात धान्य साठवून ठेवले असल्याची माहिती समजताच गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक चंद्रकांत गांगुर्डे, उपनिरीक्षक व्ही. एम. झुंजारे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने मंगळवारी दुपारी साडेचार वाजताच्या सुमारास छापा घातला.

समुपदेशन केंद्रांना अनुदान देण्याची संचालयांची मागणी
नागपूर, ११ ऑगस्ट / प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या निर्देशानुसार जिल्हा परिषदेच्या शेषफंडातून समुपदेशन केंद्रांकरिता १० लाख ३२ हजार रुपयांची तरतुद करण्यात आली होती. त्यानुसार नागपूर जिल्हय़ातील १३ तालुक्यात फेब्रुवारी २००९ पासून सर्व पंचायत समिती स्तरावर महिला समुपदेशन केंद्रे सुरू झाली.
या सर्व समुपदेशन केंद्रांचा आढावा घेऊन ती पुढे कार्यरत राहतील, असे सांगण्यात आले होते. एक वर्षाकरता स्थापन झालेली केंद्रे कार्यरत राहून सर्व केंद्रांना पुढील महिन्यापासून निधी उपलब्ध केला जाईल, असेही आश्वासन शासनातर्फे देण्यात आले. ही सर्व केंद्रे कार्यरत आहेत पण, अजूनपर्यंत त्यांना अनुदान प्रश्नप्त झालेले नाही. महिला बालकल्याण विभाग व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांनी ऑगस्ट २००९ पासून ही केंद्रे बंद करण्याचे संकेत दिले आहेत. ही केंद्रे बंद करण्यात येऊ नये, अशी मागणी कुही येथील केंद्राच्या संचालक रुबिना पटेल यांनी पत्रकार परिषदेत केली. पत्रकार परिषदेला पी.जी. खेरगडे, मंजू निकोसे, राजन गोंडाणे, राजकुमार बागडे, ज्ञानेश्वर वागदे, नंदा गजभिये, आशिष चांभारे आदी विविध केंद्रांचे संचालक उपस्थित होते.

मेयो, मेडिकलमधील वैद्यकीय शिक्षकांचे आंदोलन
नागपूर, ११ ऑगस्ट / प्रतिनिधी

सहावा वेतन आयोग लागू करावा, नोकरीत कायम करावे या प्रमुख मागण्यांसह मेडिकल आणि मेयोतील वैद्यकीय शिक्षकांनी आज सामूहिक रजा आंदोलन केले. यानंतर मेयोतील वैद्यकीय शिक्षकांनी आज कस्तुरचंद पार्क येथून मोर्चा काढून शासनाचे लक्ष त्यांच्या मागण्यांकडे वेधले.
मेडिकलमधील शिक्षक संघटनेचे अध्यक्ष डॉ. अभिमन्यू निस्वाडे, उपाध्यक्ष डॉ. थवानी, सचिव गोलावार यांच्या नेतृत्वाखाली वैद्यकीय शिक्षकांनी आज सकाळी अधिष्ठाता कार्यालय परिसरात निदर्शने केली. यानंतर त्यांनी मागण्यांचे एक निवेदन आमदार देवेंद्र फडणवीस यांना दिले. मेयोतील वैद्यकीय शिक्षकांनी कस्तुरचंद पार्क येथून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. त्यांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी प्रवीण दराडे यांना मागण्यांचे निवेदन दिले. या शिष्टमंडळात महाराष्ट्र राज्य वैद्यकीय शिक्षक संघटनेच्या अध्यक्ष डॉ. अर्चना देशपांडे, सचिव डॉ. अशोक गजभिये, उपाध्यक्ष डॉ. मनीष श्रीगिरीवार, डॉ.समीर गोलावार सहभागी झाले होते. मेडिकलमधील १७५ तर मेयोतील १२० वैद्यकीय शिक्षकांनी सामूहिक रजा घेऊन आंदोलन केले. या सामूहिक रजा आंदोलनामुळे दोन्ही रुग्णालयातील आरोग्य सेवेचा भार निवासी डॉक्टरांवर येऊन पडला. मागण्या मान्य न झाल्यास १३ ऑगस्टपासून बेमुदत आंदोलन करण्याचा इशारा मेयो आणि मेडिकलमधील डॉक्टरांनी दिला आहे.

ऐक्य तुटले तर खबरदार; रिपब्लिकन नेत्यांना इशारा
नागपूर, ११ ऑगस्ट/ प्रतिनिधी

काँग्रेस किंवा भाजपशी युती करण्यासाठी रिपब्लिकन ऐक्य तुटले तर पक्षाच्या नेत्यांना नागपुरात पाय ठेवू देणार नाही, असा इशारा रिपब्लिकन मूव्हमेंट या संघटनेने दिला आहे. आमदार निवासात झालेल्या शहरातील आंबेडकरी कार्यकर्त्यांच्या बैठकीत रिपब्लिकन मूव्हमेंट या संघटनेची स्थापना करण्यात आली. नेत्यांना एकत्रित ठेवण्यासाठी दबावगट म्हणून ही संघटना काम करणार आहे. काँग्रेस किंवा भाजपसोबत न जाण्याचा निर्णय रिपब्लिकन नेत्यांनी घेतला आहे. रिपब्लिकन जनतेने या भूमिकेचे स्वागत केले आहे. प्रकाश आंबेडकर यांनी या ऐक्यात सहभागी होण्याची अपेक्षा आहे. मात्र ते सामील न झाल्यास ऐक्य प्रक्रिया थांबवणे योग्य होणार नाही, असे मत संघटनेने व्यक्त केले आहे. ऐक्यवादी नेत्यांनी विधानसभेच्या सर्व जागा स्वबळावर लढवाव्या, असे आवाहन करून संघटनेने म्हटले आहे की, कुणा नेत्याने काँग्रेस-भाजपाशी युतीचा आग्रह धरून ऐक्य फोडण्याचा प्रयत्न केला, तर नेत्यांना नागपुरात पाय ठेवू देणार नाही. संघटनेचे संयोजक प्रवीण कांबळे असून त्यात निरंजन वासनिक, संजय पाटील, टी.एन. कोटांगळे, आर.डी. खैरकर, सुधाकर सोमकुंवर, रंजना दुपारे, अलका कांबळे इ. कार्यकर्त्यांचा समावेश आहे.

परांजपे शाळेत वनमहोत्सव साजरा
नागपूर, ११ ऑगस्ट/ प्रतिनिधी

बजाजनगरातील ले.क. व्ही.डी. परांजपे स्मृती उच्च प्रश्नथमिक शाळेत नुकताच सामूहिक वनमहोत्सवाचा कार्यक्रम साजरा करण्यात आला. संस्थेच्या अध्यक्ष पद्माताई काळे कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या होत्या. मराठी माध्यमातील पाचवी ते सातवी व इंग्रजी माध्यमातील पहिली ते सातवीचे विद्यार्थी वनमहोत्सवात सहभागी झाले होते. पाचवीच्या विद्यार्थ्यांनी वन आणि वृक्षांचे महत्त्व सांगणारी घोषवाक्ये व फलके तयार केली. सहावीच्या विद्यार्थ्यांनी वृक्षारोपण, वृक्षतोड, जंगलाचे महत्त्व, चिपको आंदोलन यावरील चित्रांचे प्रदर्शन लावले. सातवीच्या विद्यार्थ्यांनी वृक्षांचे महत्त्व, औषधी वनस्पतींचे उपयोग आणि वृक्षतोडीचे दुष्परिणाम इ. विषयाची माहिती फलकावर लावली. मयुरी पराडकर हिने वृक्षांचे महत्त्व सांगणारे छोटेसे भाषण केले. इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांनी वृक्षसंवर्धनाविषयी एक नाटिका सादर केली. शैल मेडिकॉमकडून मिळालेल्या वीस औषधी वनस्पतींची लागवड शाळेच्या परिसरात करण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांना रोपटय़ांचे वाटप करून त्यांचे संगोपन व निरीक्षण करण्यास सांगण्यात आले. सगळ्या छोटय़ा वनस्पती मोठय़ा झाडांच्या सान्निध्यात वाढतात. त्यामुळे प्रत्येकाने छोटी झाडे तरी लावावीत, असे आवाहन पद्माताई काळे यांनी केले. ‘झाडे लावा, झाडे जगवा’ असा संदेश देणाऱ्या वृक्षदिंडीने कार्यक्रमाची सांगता झाली.

शिक्षक, विद्यार्थ्यांसाठी गीता प्रबोधन शिबीर
नागपूर, ११ ऑगस्ट/ प्रतिनिधी

‘ज्ञानवर्धिनी’ या संस्थेतर्फे २२ ऑगस्ट रोजी शाळा-महाविद्यालयीन शिक्षक आणि विद्यार्थ्यांसाठी गीता प्रबोधन शिबिर आयोजित करण्यात आले आहे. हे शिबीर दुपारी १२ ते ३ या वेळेत रेखा मनोहर पार्डीकर यांच्या घरी, नटराज टॉकीजजवळ, झेंडा चौक, महाल येथे होईल. प्रत्येक विद्यार्थ्यांमागे २५ रुपये शुल्क राहील. त्यासाठी अर्ज रवींद्र गोविंद पांडे, ६९, यशोदानगर भाग २, जयताळा मार्ग, नागपूर १६ या पत्त्यावर (दूरध्वनी २२२५६६९) येत्या १८ तारखेपर्यंत पाठवावेत, अशी विनंती आयोजकांनी केली आहे.

केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार उद्या शहरात
नागपूर, ११ ऑगस्ट / प्रतिनिधी

केंद्रीय कृषी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे येत्या गुरुवारी एक दिवसाच्या नागपूर दौऱ्यावर येत आहेत. १ हजार ९८० मेगाव्ॉट क्षमतेच्या कोराडी महाऔष्णिक वीज प्रकल्पाचा कोनशिला त्यांच्या हस्ते होणार आहे. सकाळी १०.३० हा कार्यक्रम होईल. राज्याचे ऊर्जामंत्री सुनील तटकरे अध्यक्षस्थान भूषवणार असून केंद्रीय ऊर्जामंत्री सुशीलकुमार शिंदे आणि केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री मुकुल वासनिक विशेष पाहुणे राहतील. पालकमंत्री बाळासाहेब थोरात, अर्थमंत्री दिलीप वळसे पाटील, अन्न व नागरी पुरवठा मंत्री रमेश बंग, वस्त्रोद्योग मंत्री अनीस अहमद, ऊर्जा राज्यमंत्री डॉ. सुनील देशमुख, गृह राज्यमंत्री नितीन राऊत आणि खासदार विलास मुत्तेमवार प्रश्नमुख्याने उपस्थित राहतील. शरद पवार यांच्या स्वागतासाठी कार्यकर्त्यांनी विमानतळावर उपस्थित रहावे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष अशोक धवड आणि जिल्हाध्यक्ष सदानंद निमकर यांनी केले.

खासगी सुरक्षा रक्षक शासकीय सुविधापासून वंचित
नागपूर, ११ ऑगस्ट/प्रतिनिधी

महापालिकेत कार्यरत सुरक्षा रक्षक व इतर प्रतिष्ठानमधील खासगी सुरक्षा रक्षकांना महापालिका प्रशासन व खासगी सुरक्षा रक्षक एजन्सीचे संचालक शासकीय सुविधापासून वंचित ठेवून त्यांचे शोषण करीत असल्याचा आरोप, मानव बहुउद्देशीय जनकल्याण संस्थेचे अध्यक्ष कृष्णराव खंडाळे यांनी पत्रकार परिषदेत केला. कामगार मंत्री नवाब मलिक यांनी, सुरक्षा मंडळातील गैरव्यवहाराची चौकशी गुन्हे शाखेमार्फत केल्या जाईल, असे आश्वासन विधानसभेत दिले होते पण, ते आश्वासन फोल ठरले आहे. मंदीच्या सावटाचे कारण पुढे करून साठ सुरक्षा रक्षक कमी करण्यात आले. महाराष्ट्र शासनाने ४ डिसेंबर २००८च्या अध्यादेशात, राज्यातील महापालिका व नगरपालिकासारख्या स्वायत्त संस्थांवर शासनाचे पूर्ण नियंत्रण राहील असे म्हटले होते पण, अजूनपर्यंत या निर्णयावर अंमलबजावणी झाली नाही. तेव्हा खासगी सुरक्षा रक्षकांना न्याय देण्यात यावा, अशी मागणी खंडाळे यांनी केली. पत्रकार परिषदेला कृष्णराव खंडाळे, सूर्यकांता नाचणे, राजेश बोरकर, उषा झामरे, अरविंद वाटेकर, सुशील खेडीकर, प्रशांत काळे, राजेश नरांजे, विवेक गणवीर, प्रवीण राऊत आदी उपस्थित होते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर अर्बनची सर्वसाधारण सभा
नागपूर, ११ ऑगस्ट/प्रतिनिधी

डॉ. बाबासाहेब आंबेडकर अर्बन को-ऑप. बँक लिमिटेडची वार्षिक सर्वसाधारण सभा बजाजनगरातील करुणा भवन येथे पार पडली. डॉ. बाबासाहेबांच्या प्रतिमेला हार घालून व दिवंगत सदस्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. बँकेचे अध्यक्ष प्रश्नचार्य जानराव गजभिये व उपाध्यक्ष तुलसी पगारे यांनी बँकेची प्रगती, वाटचाल, पुढील उद्दिष्टे व द्यावयाचा लाभांश याविषयी सविस्तर माहिती दिली. तसेच, रिझर्व बँकेच्या संमतीने दोन नवीन शाखा सुरू करण्याचा संचालक मंडळाचा मनोदय असल्याचे विषद केले. यावेळी सभेत दहावीच्या परीक्षेत अवंती लखोटे, अश्विनी शंभरकर, पूजा दुबे, अपूर्वा गेडाम, प्रियंका बोदेले आणि बारावीच्या परीक्षेत आशिर्ष खर्चे, मिनल मेश्राम, समीर वासनिक, अजय बडवणे, श्व्ोता लोहवे तसेच, हस्ताक्षर स्पध्रेत संपूर्ण महाराष्ट्रातून प्रथम कलारत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल कर्मचाऱ्यांच्या पाल्यांचा स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. यावेळी पालकांचासुद्धा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी डॉ. टी.व्ही. गेडाम, वामन कोंबाडे, मधुकर बेलगे, संभाजी दौने, सुलोचना गाणार, दुषंतला उके या बँकेच्या ज्येष्ठ सदस्यांचा तसेच, पीएचडीधारक प्रश्न. डॉ. गोपाल शर्मा यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला. संचालन अशोक कोल्हटकर यांनी केले. आभार प्रश्न. जयंत जांभुळकर यांनी मानले.

गुरुजींचे ‘जेलभरो’ यशस्वी
नागपूर, ११ ऑगस्ट/ प्रतिनिधी

सहाव्या वेतन आयोग लागू करण्यासह इतरही अनेक मागण्यांकडे राज्य शासनाचे लक्ष वेधण्यासाठी संपावर असलेल्या प्रश्नध्यापकांनी आज जेलभरो आंदोलन केले. एकूण १ हजार २० प्रश्नध्यापकांना अंबाझरी पोलिसांनी अटक केली त्यात १०९ महिला प्रश्नध्यापकांचा समावेश होता.
गेल्या एक महिन्यापासून प्रश्नध्यापकांचा संप सुरू आहे. राज्य शासनाशी वेळोवेळी चर्चेच्या फेऱ्या झाल्यावरही संपावर तोडगा निघत नसल्याने आज नुटातर्फे जेलभरोचे आवाहन करण्यात आले होते. दुपारी १२ वाजतापासून आंदोलनाला सुरुवात झाली. आंदोलन जोर धरू लागले असतानाच पाऊस आला, मात्र त्याही स्थितीत आंदोलन सुरुच होते. नुटातर्फे आंदोलनासाठी पोलिसांकडे परवानगी मागण्यात आली होती, पण ती नाकारण्यात आली. तरीही आज प्रश्नध्यापकांनी आंदोलन केले. दिवसभरात एकूण १ हजार २० प्रश्नध्यापकांना अंबाझरी पोलिसांनी अटक केली व नंतर सुटका केली.

सेवादलातर्फे नारळी पौर्णिमेनिमित्त देवडिया भवनात कार्यक्रम
नागपूर, १० ऑगस्ट / प्रतिनिधी

सेवादलातर्फे नारळी पौर्णिमेनिमित्त देवडिया भवनात कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सेवादल प्रमुख रामगोविंद खोब्रागडे अध्यक्षस्थानी तर, काँग्रेसचे शहर अध्यक्ष जयप्रकाश गुप्ता, आमदार दीनानाथ पडोळे, रवींद्र दुरुगकर, डॉ. राजेश नाईक, सुलभा नागपूरकर, मिलिंद सोनटक्के आणि शंकरलाल बैसवारे प्रमुख पाहुणे होते. महिला कार्यकर्त्यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांना राखी बांधली. सेवादलाच्या कार्यकर्त्यांस उमेदवारी देण्याची मागणी योग्य असून याकडे पक्षश्रेष्ठींचे लक्ष वेधण्यात येईल, अशी ग्वाही जयप्रकाश गुप्ता यांनी यावेळी बोलताना दिली. कार्यक्रमास तारा मेंडुले, सरस्वती सोनी, फामता कौसर चिस्ती, स्नेहलता कोल्हे, इंदुमती साखरकर, निशा मेश्राम, आशा चौधरी, शीला सूर्यवंशी, माया डहारे, कांता धांडे, लता गवई, अकिला अहमद व सुलभा गड्डमवार आदींचे सहकार्य लाभले. पाहुण्यांचे स्वागत रत्नमाला फोपरे यांनी तर, संचालन माया घोरपडे यांनी केले. आभार प्रमिला ठाकूर यांनी मानले.

आचार्य बाळकृष्ण महाराज यांचा जन्मदिनी वृक्षारोपण
नागपूर, ११ ऑगस्ट/प्रतिनिधी

नागपूर जिल्हा योग समितीच्या वतीने पतंजली योगपीठ हरिद्वारचे कुलगुरू आचार्य बाळकृष्ण महाराज यांचा जन्मदिवस, वासंती उच्च प्रश्नथमिक शाळेतील विद्यार्थ्यांच्या सहकार्याने वृक्षारोपण करून साजरा करण्यात आला. यावेळी पतंजली योग समितीचे नागपूर अध्यक्ष अ‍ॅड. नामदेव फटिंग, भारत स्वाभिमान व विकास आश्रम शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रदीप काटेकर, महामंत्री शशिकांत जोशी, मंत्री छाजुराम शर्मा, वृक्षारोपण प्रमुख भारती मोहिते उपस्थित होते. पतंजली योग समितीच्या वतीने शहरात वृक्षारोपण व वृक्ष संवर्धनाचे काम सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हणून आचार्य बाळकृष्ण महाराजांच्या जन्मदिवसाचे औचित्य साधून या कार्याचा शुभारंभ करण्यात आला. प्रश्नस्ताविक मुख्याध्यापिका शोभा कांदेकर यांनी केले. बोरीकर यांनी आभार मानले.

पत्नीचा हुंडय़ासाठी छळ; आरोपीला कारावास
नागपूर, ११ ऑगस्ट / प्रतिनिधी

पत्नीचा हुंडय़ासाठी शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी एका आरोपीला न्यायालयाने सहा महिन्यांच्या कारावासाची शिक्षा सुनावली. बाबुराव बळीराम शिरसाठ (रा़ आठवा मैल, रामजी आंबेडकर नगर, वाडी) हे आरोपीचे नाव आहे. त्याची पत्नी अर्चनाला तिच्या माहेरुन १० हजार रुपये आणण्यास त्याने सांगितले. ते न आणल्याने त्याने दारू पिऊन शिवीगळ व मारहाण केली़ चारित्र्यावर संशय घेऊन शारीरिक व मानसिक छळ करीत जिवे मारण्यची धमकी दिल्याची तक्रार अर्चनाने १३ ऑगस्ट २००८ला वाडी पोलीस ठाण्यात केली. भारतीय दंड विधानाच्या कलम ४९८अ,५०४ व ५०६ अन्वये गुन्हा दाखल करून वाडी पोलिनांनी २१ ऑगस्ट २००८ला आरोपी बाबुरावला अटक केली. हवालदार झेवियर यांनी या प्रकरणाचा तपास करून न्यायालयात आरोपपत्र सादर केले. प्रथमश्रेणी न्यायदंडाधिकारी चंद्रपाल आऱ बलवानी यांच्यापुढे या प्रकरणाची सुनावमी झाली. बचाव व सरकार पक्षाच्या वकिलांची युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर न्यायालयाने शिक्षा सुनावली. आरोपी बाबुराव बळीराम शिरसाठ (रा़ आठवा मैल, रामजी आंबेडकर नगर, वाडी) याला सहा महिने कारावास, २ हजार रुपये दंड व दंड न भरल्यास एक महिना शिक्षा सुनावली. सरकारी पक्षातर्फे स्वाती श्रृंगारपुरे, तर आरोपीतफे आऱ बी़ निकोडे या वकिलांनी बाजू मांडली.

१४ ऑगस्ट अखंड हिंदुस्थान दिन पाळण्याचे आवाहन
नागपूर, ११ ऑगस्ट/प्रतिनिधी

१४ ऑगस्ट हा अखंड हिंदुस्थान दिन म्हणून पाळावा, असे आवाहन हिंदू महासभेचे अध्यक्ष अरुण जोशी यांनी एका प्रसिद्धी पत्रकातून केले आहे. १५ ऑगस्ट १९४७ साली भारत स्वतंत्र झाला. त्याच दिवशी भारताची फाळणी करण्यात आली व भारत आणि पाकिस्तान अशी दोन राष्ट्रे निर्माण झाली. भारताला स्वातंत्र मिळाले ते खंडित स्वरूपात आणि त्याचवेळी पवित्र सिंधू नदी पाकिस्तानात गेली. फाळणीमुळे अनेक निरपराध हिंदूंची हत्या झाली. त्याचवेळी स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी अखंड हिंदुस्थान केल्याशिवाय गप्प बसणार नाही, अशी प्रतिज्ञा केली होती. त्यांची ही प्रतिज्ञा व्यर्थ जायला नको म्हणून १४ ऑगस्ट हा दिवस अखंड हिंदुस्थान दिवस म्हणून पाळावा आणि ठिकठिकाणी हिंदू जनजागृतीचे कार्यक्रम घ्यावे, असे आवाहन अरुण जोशी यांनी केले. येत्या १४ ऑगस्टला अखंड हिंदुस्थान दिनानिमित्त टिळक पुतळा, महाल येथील हिंदू महासभेच्या सभागृहात सभा आयोजित करण्यात आली आहे.

बिडगणेशपूरच्या उच्च माध्यमिक शाळेतील आठ विद्यार्थी शिष्यवृत्तीकरता पात्र
नागपूर, ११ ऑगस्ट/ प्रतिनिधी

हिंगणा बिडगणेशपूरच्या उच्च माध्यमिक शाळेतील २००८-०९ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता सातवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेला एकूण ३६ विद्यार्थी बसलेले होते. त्यापैकी ३४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले तर ८ विद्यार्थी शिष्यवृत्तीकरता पात्र ठरलेले आहेत. यात रोहण नेवारे, पंकज डहेरिया, राजेश माकडे, मृत्यूंजय रजक, प्रियंका कन्नाके, जयश्री कळसकर, सपुरा राम व डिलेश्वरी कापसे या विद्यार्थ्यांनी ही शिष्यवृत्ती प्रश्नप्त केली असून त्याचे श्रेय ते आई, वडिलांना व शाळेतील मुख्याध्यापक अंबादास डाफ, मनिषा देशपांडे, मीनाक्षी अवचट, नंदकिशोर उजवणे, सेवानिवृत्त मुख्याध्यापक श्रीमती सुनंदा झाडे यांना देतात. या सर्वाचे शाळेच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.

उद्या बाळशास्त्री हरदास स्मृती व्याख्यान
नागपूर, ११ ऑगस्ट/ प्रतिनिधी

भारतीय शिक्षण मंडळाच्या वतीने वीणाताई हरदास पुरस्कृत बाळशास्त्री हरदास स्मृती व्याख्यान आयोजित करण्यात येत आहे. व्याख्यान १३ ऑगस्टला सायंकाळी ६ वाजता महालातील जिजीबाई लाभे स्मृती नवयुग विद्यालयाच्या बाळशास्त्री हरदास सभागृहात होईल. याप्रसंगी ‘हिंदुत्वाचे भाष्यकार- स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर’ या विषयावर साहित्यिक आणि समीक्षक प्रश्न. डॉ. वि. स. जोग विचार व्यक्त करणार आहेत.