Leading International Marathi News Daily

बुधवार, १२ ऑगस्ट २००९

नवनीत

जी व न द र्श न
कृष्णखूण

 

बासरीतून श्रावणसरी न्हात्याधुत्या झाल्या. त्यांना आपल्यात काहीतरी अपूर्ण आहे असे जाणवले. त्यांना स्वरातून अक्षरांमध्ये यायचे होते. त्या यमुनेवर निवांत एकांत शोधीत होत्या. शोधता शोधता यमुनेचे मौन सुटले नि ती म्हणाली, ‘इंद्रायणीपाशी जा.’ धावत धावत त्यांनी मेघाला विनविले, ‘आम्हाला देवाच्या आळंदीला ने नाऽऽ.’ मेघ लगेच म्हणाला, ‘मला तिकडेच जायचेय.’ मेघात स्वर बसले. फिरत फिरत मेघ इंद्रायणीपाशी आला. स्वरांना हळुवार उतरवीत म्हणाला, ‘इथं तुम्ही काय होणार?’ सूर म्हणाले, ‘आम्हाला शब्द व्हायचंय.’ मेघ हसला नि उद्गारला, ‘यमुनेकाठीच व्हा ना!’ सूर म्हणाले, ‘त्या गोपी काही शब्द देत नाहीत.’ सुरांनी आसपास पाहिले. इंद्रायणी शांत वाहत होती. सुरांनी इंद्रायणीत शाही स्नान केले. जवळच्या बनात गेले. त्यांना नाही करमले. फिरता फिरता त्यांनी सोन्याचा िपपळ पाहिला नि ते तिथे आले. गाईले, नाचले नि शब्द कधी झाले ते त्यांचे त्यांना कळले नाही. शब्द पसरले. शब्द बोलू लागले नि गोकुळअष्टमीला मध्यरात्री ज्ञानदेव अवतरले. कृष्णांचा सूर भावार्थदीपिका झाला. लोकांना अमृतानुभव मिळाला. रात्रीच्या गाभाऱ्यातली दीपकळी सुप्रकाशित झाली. व्यवहारात छप्पन्न बाबी पाहणाऱ्यांना पासष्टी मिळाली. सामान्याला हरिपाठ आला. वद्य पक्षातला अंधार कृष्णखूण बनला. विश्वाचे आर्त उधाणले. ते त्याने आपल्यात घेतले. विश्वाला आनंदाचे आवार दिले. त्याच्या शब्दाशब्दांतले मार्दव हलवून सोडणारे होते. तो साऱ्यांचा आश्वस्त आधार झाला. त्याच्या कुशीत सारे निवांत लोळले. ‘माऊली.. माऊली’चा आतून पुकारा झाला. सामान्याच्या मनात वसत असलेल्या स्वाभाविक जिव्हाळय़ाला त्याने चैतन्याचे कोंदण दिले. प्रेमाची नव्हाळी दिवाळी झाली. हृदयातले खळत्व संपविले. मायेची काळी रात्र पसरली. त्यात प्रभूचे काळेपण सामावले. तो अवघा काळा बुक्का झाला. माया ईश्वराला झाकते म्हणून ती काळी, कुरूप. ईश्वर त्या मायेला झाकून टाकतो म्हणून तो उज्ज्वल काळा. ज्ञानोत्तर प्रेमभक्तीच्या आकाशात त्याने इंद्रायणीचे वाळवंट सामावले. माणसातले सच्चे देवपण जागे केले. निवृत्तिनाथांनी दिलेला अनुभव खूण म्हणून जपला. अंतर्यामातला आवाज प्रसाद म्हणून वाटला. देणेघेणे अतीत झाले. आजही गोकुळअष्टमीला सोन्याच्या पिंपळाच्या पानांवरले शब्द फडफडतात. सुंदर पहाट होते. ती मध्यान्ह आणि अस्त पेलायची ताकद देते. ही कृष्णखूण असते.
यशवंत पाठक

कु तू ह ल
प्रकाशाचा वेग
प्रकाशाचा वेग मोजण्यासाठी खगोलशास्त्राचा उपयोग कसा झाला?
प्रकाशाचा वेग सेकंदाला सुमारे तीन लक्ष किलोमीटर इतका आहे. हा प्रचंड वेग मोजण्याच्या प्रयत्नांना इ.स. १६७६ साली ओले रोमर या डॅनिश शास्त्रज्ञाला सर्वप्रथम यश मिळालं. गुरूच्या चंद्रांच्या गुरूभोवतीच्या प्रदक्षिणेचा कालावधी हा गुरू-पृथ्वी अंतरानुसार बदलत असल्याचं रोमेरनं जाणलं. गुरूचं पृथ्वीपासूनचं अंतर त्याच्या सौरकक्षेतल्या स्थानानुसार बदलत असल्यामुळे, गुरूकडून निघालेला प्रकाश पृथ्वीपर्यंत पोहोचायला लागणारा वेळही बदलत असतो. यामुळेच पृथ्वीवरून केलेल्या निरीक्षणांत गुरूच्या चंद्रांच्या प्रदक्षिणाकाळांत फरक पडत असलेला आढळतो. आयो या गुरूच्या चंद्राच्या प्रदक्षिणाकाळांतील फरकाची गुरू-पृथ्वी यांच्यातील अंतरातील फरकाशी सांगड घालून रोमरने आपलं गणित मांडलं. या गणितानुसार प्रकाशाचा वेग सेकंदाला सुमारे सव्वादोन लक्ष किलोमीटर इतका भरला.
यानंतर इ.स. १७२८ साली जेम्स ब्रँडली या इंग्लिश खगोलज्ञाने वेगळय़ा पद्धतीने प्रकाशाचा वेग काढला. आकाशातल्या ताऱ्यांचं स्थान हे वर्षभराच्या कालावधीत छोटय़ाशा वर्तुळाकार स्वरूपात बदलत असल्याचं ब्रँडली याला आढळलं. ताऱ्याच्या स्थानातील या बदलाचं कारण ब्रँडलीने शोधलं. पाऊस पडत असताना आपण वाहनातून प्रवास केला तर, वारा वाहत नसतानाही पाऊस तिरका कोसळताना दिसतो. पावसाच्या सरींचा हा तिरकेपणा वाहनाच्या गतीवर, तसंच पावसाच्या थेंबांच्या वेगावर अवलंबून असतो. ब्रँडलीला आढळलेल्या ताऱ्यांच्या स्थानातील बदलाचं कारणही अशाच प्रकारचं होतं. पृथ्वीच्या सूर्याभोवती फिरण्यामुळे ताऱ्यांकडून येणाऱ्या प्रकाशाची दिशा किंचितशी बदलल्यामुळे ताऱ्यांची स्थानेही बदललेली दिसत होती. या बदलाचं प्रमाण हे पृथ्वीच्या गतीवर आणि प्रकाशाच्या वेगावर अवलंबून होतं. पृथ्वीची सूर्याभोवती फिरण्याची गती आणि ताऱ्याच्या स्थानातील बदलाचं प्रमाण लक्षात घेऊन ब्रँडलीने प्रकाशाचा वेग शोधून काढला. ब्रँडलीने काढलेला प्रकाशाचा वेग सेकंदाला सुमारे दोन लक्ष पंचाण्णव हजार किलोमीटर इतका होता.
राजीव चिटणीस
मराठी विज्ञान परिषद, विज्ञान भवन, वि. ना. पुरव मार्ग, शीव-चुनाभट्टी (पूर्व), मुंबई ४०००२२
दूरध्वनी - (०२२)२४०५४७१४ , २४०५७२६८

दि न वि शे ष
कादंबरीकार टोमास मान
आंतरराष्ट्रीय कीर्तीचे जर्मन कादंबरीकार नोबेल पारितोषिक विजेते टोमास मान यांचा जन्म ६ जून १८७५ रोजी ल्यूबेक येथे झाला. त्यांचे वडील एक प्रतिष्ठित व्यापारी होते. पण व्यापारात त्यांना खोट खावी लागल्याने त्यांचा व्यापार बुडाला. तेव्हा शिक्षण संपल्यावर मान एका विमा कंपनीत कामाला लागले. पुढे ते एका वृत्तपत्राचे संपादकही झाले. कालांतराने त्यांनी आपल्या मोठय़ा भावाप्रमाणे साहित्याची सेवा करायचे ठरविले. ‘डेझर क्लइन हेअर फ्रीडमान’ हा त्यांचा कथांचा संग्रह १८९८ ला प्रसिद्ध झाला. पण त्यांना नाव मिळाले ते ‘वुड्डेन ब्रुक्स’ या कादंबरीमुळे. पहिल्या महायुद्धाच्या काळात युरोपात, विशेषत: जर्मनीत युद्धाचे समर्थन करणारे जे लेखक होते त्यात ते एक होते. पण नंतर त्यांचे विचार बदलले आणि ते लोकशाहीवादी झाले. परिणामी हिटलरच्या नाझी राजवटीत त्यांना जर्मन सोडावे लागले. नाझीवादावर त्यांनी उघडउघड टीका केली. तेव्हा त्यांची डॉक्टरेटची पदवी नाझी सरकारने काढून घेतली. इतकेच नव्हे तर त्यांचे जर्मन नागरिकत्वही काढून घेतले. तेव्हा ते अमेरिकेत स्थाईक झाले त्यांच्या साहित्याचा गौरव १९२९ साली नोबेल पारितोषिक देऊन करण्यात आला. १२ ऑगस्ट १९५५ रोजी त्यांचे निधन झाले.
संजय शा. वझरेकर

गो ष्ट डॉ ट कॉ म
सोनूचा धडा
सोनू प्रत्येकासारखं व्हायचा आणि वागायचा प्रयत्न करायचा. भावंडं त्याला हसायची. ‘कॉपी कॅट’ म्हणून चिडवायची. पण सोनूला त्याचं काही नसायचं. दुसरा जसा आहे तसं आपण असावं, असं त्याला सारखं वाटायचं. खरंतर तो वाघाचा बच्चा होता. त्यानं कसं ऐटीत राहायचं, भावंडांशी खेळायचं, आईकडून शिकार करायला शिकायचं; पण सोनू भावंडांबरोबर न खेळता जंगलात भटकायचा. मनाशी म्हणायचा, जे दिसेल तसं मी करून पाहणार. एकदा भटकायला निघाल्यावर त्याला उलटे टांगून झोप घेणारे वटवाघूळ दिसले. ‘मीही असाच झोपणार’, सोनू म्हणाला. वटवाघळाने समजूत घातली, ‘फक्त वटवाघळेच असं झोपतात.’ पण काही न ऐकता सोनू एका फांदीला उलटे लोंबकळला आणि दुसऱ्या क्षणी धाडदिशी खाली आपटला. ‘बघ, तरी मी सांगत होऽऽऽतो’, असे म्हणेपर्यंत वटवाघूळ झोपूनसुद्धा गेले. सोनू उठला. धूळ झटकून पुढे निघाला. त्याला एका पायावर पाण्यात उभा असलेला बगळा दिसला. लगेच सोनू पाण्यात शिरला. ‘काहो बगळेदादा असे उभे?’ ‘मासे पकडतोय बाळा’, बगळा म्हणाला. ‘किती वेळ?’ सोनूने विचारले. ‘खूप वेळ. पक्षी असे उभे राहू शकतात.’ ‘मी का नाही’, म्हणत सोनूने पाण्यात एक पाय उचलला. ‘अरे वा! मला येतंय. म्हणत दुसरा आणि तिसरा पाय उचलला अन् धबकन सोनू पाण्यात पडून गटांगळय़ा खायला लागला. ‘सांगितलं होतं मी तुला’, म्हणत बगळय़ाने डोळे मिटून घेतले. सोनू पुढे गेला. एका ओंडक्यावर त्याला ओंडक्याच्या रंगाचा सरडा दिसला. तो पानावर चढला तसा त्याचा रंग हिरवा झाला. सोनूला मजा वाटली. म्हणाला, ‘मीही रंग बदलला. बघ, मी हिरवा झालो.’ ‘छे, तू पिवळा-काळाच आहेस’, म्हणत सरडा परत ओंडक्यावर येऊन तपकिरी झाला. सोनूला राग आला. तो बगळा असलेल्या तळय़ाकाठच्या चिखलात लोळ लोळ लोळला आणि सरडय़ाला येऊन म्हणाला, ‘बघ, मीही झालो तुझ्या रंगाचा.’ सरडा खो खो हसला. वेडा आहेस तू, म्हणत पुन्हा हसायला लागला. सोनूला एका झाडाखाली पिसे दिसली. त्यात लोळला. तशी त्याच्या ओल्या अंगाला पिसे चिकटली. तो आनंदाने सरडय़ाला म्हणाला, ‘बघ, आता रंग बदलून मी पांढरा झालो’ आणि तो ऐटीत आपल्या घराकडे निघाला. घराच्या बाहेर संध्याकाळी त्याची भावंडे खेळत होती. अंधारले होते. काळोखातून आवाज आला हुऽऽऽहूहू. एक पांढरी आकृती बाहेर आली. सगळे बछडे घाबरून जवळच्या नदीच्या पाण्यात शिरून पोहायला लागले. त्यांना घाबरवायला सोनू पाण्यात शिरला तशी पिसे, चिखल वाहून गेला. सोनूला पाहून सगळय़ांनी त्याला धोपटले. सोनू म्हणाला, ‘पुरे पुरे, यापुढे मी कधी कुणासारखा व्हायचा प्रयत्न करणार नाही.’ आजचा संकल्प - कुणासारखे होण्याऐवजी मी स्वत:सारखा होईन.
ज्ञानदा नाईक
dnyanadanaik@hotmail.com