Leading International Marathi News Daily

बुधवार, १२ ऑगस्ट २००९

४५० कोटींच्या कामांना महापालिकेत ‘मूक’ मंजुरी
मलनिस्सारण केंद्राचे प्रकल्प वादाच्या भोवऱ्यात

नवी मुंबई/प्रतिनिधी - सांडपाण्यावर प्रक्रिया करून स्वच्छ पाणी निर्माण करण्याच्या अतिशय महत्त्वाकांक्षी अशा ४५० कोटी रुपयांच्या तीन मोठय़ा प्रकल्पांना स्थायी समिती सभापती संदीप नाईक यांच्या अनुपस्थितीत कॉँग्रेस, शिवसेनेच्या सदस्यांनी कोणत्याही ठोस चर्चेविना मंजुरी दिल्याने एकच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, संदीप नाईक अनुपस्थितीत असताना राष्ट्रवादी कॉँग्रेसचे सभागृह नेते जयवंत सुतार, अनंत सुतार यांच्यासारख्या ज्येष्ठ नगरसेवकांसमोर या प्रस्तावांना मंजुरी दिली जात असताना या सदस्यांनीही यावर अळी मिळी गुप चिळीचे धोरण अवलंबिल्याने सत्ताधाऱ्यांच्या गोटात अस्वस्थता आहे. एवढय़ा मोठय़ा रकमांचे प्रस्ताव मंजूर केले जात असताना त्यावर चर्चा करणे अपेक्षित मानले जात होते. पीठासीन अधिकारी म्हणून सभापती स्थानावर विराजमान झालेले

 

कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नामदेव भगत यांनी हे प्रस्ताव सदस्यांपुढे चर्चेसही ठेवले. मात्र, एकाही सदस्याने या विषयावर ब्रसु्दधा उच्चारला नाही. यामुळे या तीन मोठय़ा प्रस्तावांमागील मंजुरीचे गौडबंगाल काय, असा सवाल आता महापालिका वर्तुळात उपस्थित केला जाऊ लागला आहे.
नवी मुंबई महापालिकेने यापूर्वी शहरात नेरुळ, वाशी आणि ऐरोली भागात सांडपाण्यावर प्रक्रिया करणारी तीन केंद्रे उभारली आहेत. पर्यावरणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे समजल्या जाणाऱ्या या प्रकल्पांच्या यशस्वीतेच्या दृष्टीने मात्र अनेक प्रश्न आजही उपस्थित केले जात आहेत. स्वच्छ झालेले पाणी विकण्यात येईल, अशी घोषणा यापूर्वी महापालिका आयुक्त विजय नहाटा यांनी केली आहे. असे असताना अद्याप तरी आयुक्तांचे हे स्वप्न प्रत्यक्षात उतरलेले नाही. या पाश्र्वभूमीवर बेलापूर, कोपरखैरणे येथे अशीच आणखी केंद्रे उभारण्याचे सुमारे ४५० कोटी रुपयांचे तीन प्रस्ताव स्थायी समितीपुढे मंजुरीसाठी ठेवण्यात आले होते. या प्रकल्पांवर निश्चितच चर्चा होणे अपेक्षित होते. मात्र, स्थायी समिती सभापती संदीप नाईक या सभेस वेळेवर पोहचू शकले नाहीत, त्यामुळे उपस्थित सदस्यांनी नियमानुसार नामदेव भगत यांची सभापती म्हणून निवड करून सभा सुरू केली. यावेळी महत्त्वाच्या विषयांवर आधी चर्चा व्हावी, यासाठी भगत यांनी ४५० कोटी रुपयांचे तीन प्रस्ताव सुरुवातीस मंजुरीसाठी ठेवले. त्यावर चर्चाही अपेक्षित धरण्यात आली होती. मात्र, सभागृहात उपस्थित असलेले शिवसेनेचे शिवराम पाटील, विजय माने, काँॅग्रेसचे संतोष शेट्टी, हेमांगी सोनावणे, श्रीमती काळे या सदस्यांनी या विषयावर ब्रही काढला नाही. विशेष म्हणजे, यावेळी सभागृहात आलेले जयवंत सुतार, अनंत सुतार, श्रीमती गवते या राष्ट्रवादीच्या सदस्यांनीही संदीप नाईकांच्या अनुपस्थितीत गप्प रहाणे पसंत केले. कुणीही चर्चा करत नाही म्हणून भगत यांनी हे प्रस्ताव मंजुरीस टाकले. यावेळी राष्ट्रवादीचे सदस्य वगळता शिवसेना आणि काँॅग्रेसच्या सदस्यांनी त्यास मंजुरी दिली. सुमारे ४५० कोटी रुपयांचे प्रस्ताव चर्चेसाठी असताना स्थायी समितीने त्यावर चर्चा करण्यापूर्वी विषय मंजूर केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या प्रकल्पांसंदर्भात अनेक प्रश्न उपस्थित होतील, अशी शक्यता होती. मात्र, एकाही सदस्याने या विषयावर चर्चा केली नाही. सभापती संदीप नाईक यांच्या अनुपस्थितीत झालेल्या या प्रकारामुळे सध्या महापालिका वर्तुळात खळबळ उडाली असून ४५० कोटींचे प्रस्ताव वादात सापडले आहेत.
या संदर्भात पीठासीन अधिकारी म्हणून उपस्थित असलेले नामदेव भगत यांना छेडले असता, त्यांनी आपण सर्व सदस्यांना चर्चेसाठी पुरेसा वेळ दिला होता, असे सांगितले. हे विषय शहराच्या पर्यावरणाच्या दृष्टीने महत्त्वाचे होते. असे असल्याने आपण या विषयांना इतर विषयांपेक्षा अधिक प्राधान्य दिले, असे त्यांनी सांगितले. कुणीही चर्चा करत नाही, हा माझा दोष नाही, असेही ते म्हणाले.

संक्षिप्त :
सीबीडीत चार लाखांचा दरोडा

बेलापूर - सीबीडीत भर दिवसा चार दरोडेखोरांनी सोसायटीतील घरात घुसून चाकूचा धाक दाखवून चार लाखांचा ऐवज लुटून नेल्याची घटना नुकतीच घडली. या प्रकारामुळे येथील रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. विशेष म्हणजे पोलीस कॉलनीच्या बाजूलाच हा दरोडा पडला आहे. याप्रकरणी फिर्यादी कांता कोठारी यांनी सीबीडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. कोठारी त्यांची आठ वर्षांंची मुलगी व सासऱ्यासह घरात असताना सायंकाळी साडेसहा वाजता चार दरोडेखोरांनी सेक्टर-१ येथील त्यांच्या घरात जबरदस्तीने प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी सर्वांना चाकूचा धाक दाखवून घरातील रोख रक्कम व सोन्याचे दागिने असा चार लाखांचा ऐवज लुटून नेला.

स्वाईन फ्ल्यूवर खुले चर्चासत्र
बेलापूर - नेरुळ येथील तेरणा हॉस्पिटल आणि रीसर्च सेंटरमध्ये स्वाईन फ्ल्यूवर बुधवारी खुल्या चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. १२ ऑगस्ट रोजी दुपारी २ ते ३ या वेळेत होणाऱ्या चर्चासत्रात महापालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपक परोपकारी, तेरणाचे डॉ.एम.आर. जपे व अन्य तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. या आजाराबाबत कोणती खबरदारी घ्यावी याची माहिती दिली जाणार आहे.

माजी उपनगराध्यक्ष काँग्रेसमध्ये
पनवेल - आगामी विधानसभा निवडणुकांच्या पाश्र्वभूमीवर पनवेलमध्ये पक्षांतरे आणि फोडाफोडीच्या राजकारणाला जोर आला आहे. पनवेल नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष अवेश मस्ते यांनी नुकताच काँग्रेसमध्ये प्रवेश केला. विशेष म्हणजे पूर्वाश्रमीचे काँग्रेसचे मस्ते यांनी काही वर्षांंपूर्वी शेकापशी घरोबा केला होता. त्यानंतर आता पुन्हा ते काँग्रेसमध्ये परतले आहेत. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात झालेल्या या पक्षांतराच्या कार्यक्रमातला माजी खासदार रामशेठ ठाकूर, लक्ष्मण पाटील, डॉ. भक्तीकुमार दवे, प्रशांत ठाकूर आदी नेते उपस्थित होते. पनवेलमध्ये शेकापला खिंडार पडत असून, त्या पक्षातील अनेकजण दररोज काँग्रेसमध्ये दाखल होत आहेत. आगामी निवडणुकीत शेकापचा फुगा फुटणार आहे, असा दावा रामशेठ ठाकूर यांनी केला. यावेळी मस्ते यांच्यासह कच्छी मोहल्ला, पटेल मोहल्ला, बंदर शेड, मुस्लिम नाका येथील असंख्य कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. दरम्यान, पनवेल शहर आणि तालुक्यातील महिला कार्यकर्त्यांसाठी बुधवारी १२ ऑगस्टला काळण समाज सभागृहात एक कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे.

‘भगवान श्रीकृष्ण हा पूर्णावतार’
पनवेल - ज्ञान, वैराग्य, यश, ऐश्वर्य, श्री, औदार्य या गुणांनी युक्त असणारा श्रीकृष्ण हा श्रीविष्णूंचा एकमेव पूर्णावतार होता, तसेच श्रीकृष्णालाही याची पूर्ण जाणीव होती, असे प्रतिपादन प्रसिद्ध कीर्तनकार चारुदत्त आफळे यांनी येथे केले. श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या पाश्र्वभूमीवर ‘संस्कार भारती’तर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘भगवान श्रीकृष्ण’ या विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते. श्रीकृष्णाचे संपूर्ण आयुष्य निर्लेप होते, ऐश्वर्यसंपन्न सहा राजधान्या निर्माण करूनही त्याला कसलाही मोह नव्हता, भीष्म-व्यास आदी श्रेष्ठांनीही त्याचे देवत्व मान्य केले होते, असे ते म्हणाले. कृष्ण विलासी होता, तसेच त्याने १६ सहस्त्र स्त्रियांशी विवाह केला होता, असा अपप्रचार सर्रास केला जातो; परंतु त्याने नरकासुराच्या तावडीतून या स्त्रियांची सुटका करून त्यांची यादवांशी लग्ने लावून दिली आणि त्यांचे पालकत्व स्वीकारले ही वस्तुस्थिती आहे, असे त्यांनी सांगितले. कुलपती, राष्ट्रपती अशा शब्दांमध्येही पती या शब्दाचा अर्थ पालक असा आहे, परंतु त्याचा गैरअर्थ काढला जात नाही. भगवान श्रीकृष्णाची मात्र नाहक निंदा केली जाते, अशा शब्दांत आफळे यांनी नाराजी व्यक्त केली. या व्याख्यानासाठी असंख्य श्रोते उपस्थित होते.