Leading International Marathi News Daily

बुधवार, १२ ऑगस्ट २००९

‘स्वाईन फ्लू’च्या संशयाने पछाडले नाशिककर
पुणे-मुंबईत ‘स्वाईन फ्लू’चा प्रसार झपाटय़ाने होत असल्याच्या पाश्र्वभूमीवर, उभय शहरांपासून जवळपास सारख्याच अंतरावर असलेल्या नाशिकला देखील स्वाईन फ्लूच्या संशयाने पछाडले आहे. मुंबई-पुणे-नाशिक हा राज्याच्या सुवर्ण त्रिकोण समजला जातो. त्यातही नोकरी-व्यवसायानिमित्त दररोज नाशिकहून मुंबईला ये-जा करणाऱ्यांची संख्या मोठी असल्याने दोन्ही शहरांची ‘कनेक्टिव्हिटी’ अधिक आहे. परिणामी, गेल्या दोन दिवसांत मुंबईत या साथीचा प्रसार झपाटय़ाने होत असल्याच्या वृत्तामुळे नाशिककरांना देखील स्वाईन फ्लूच्या चिंतेने ग्रासले आहे. त्यातच या रोगाचे दोन संशयित रुग्ण आढळल्याने अनेकांच्या अस्वस्थतेत भर पडली आहे. साहजिकच या साथीपासून बचाव कसा करावा त्याबाबतचे एसएमएस असोत की खबरदारीचा उपाय म्हणून थेट मास्क खरेदी असो, सर्वत्र केवळ हाच विषय चर्चेत आहे.

कचऱ्याचे ढीग अन् डुकरांचा मुक्त संचार
वार्ताहर / नाशिकरोड

स्वाईन फ्लूच्या विषाणूचा प्रसार होण्यामागे वराह अर्थात डुक्कर या प्राण्याकडे बोट दाखविले जात असले तरी या प्राण्याची खरेदी-विक्री तसेच मांस विक्रीचा व्यवसाय सद्यस्थितीतही शहरात विशेष काळजी न घेता नेहमीप्रमाणेच खुलेआम सुरू असल्याचे दिसून येते. विशेष म्हणजे, या व्यवसायात खुद्द पालिकेच्या आरोग्य विभागातील काही कर्मचाऱ्यांचा सहभाग असल्याच्या तक्रारी आहेत. वराह पालनाच्या व्यवसायाबरोबर उघडय़ावर चाललेली मांसविक्री, ठिकठिकाणी साचलेले कचऱ्याचे ढीग याकडे आरोग्य विभागाने सोयिस्कर दुर्लक्ष केल्याचे दिसत असून सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने ही बाब अत्यंत गंभीर असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

पालिकेचे कारवाईचे निर्देश
राज्यात उद्भवलेल्या ‘स्वाईन फ्लू’च्या पाश्र्वभूमीवर, शहरातील उघडय़ा असणाऱ्या गटारींवर ढापे टाकणे, दाट लोकवस्तींच्या भागात जंतू नाशकांची फवारणी, शालेय विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी, स्वच्छता मोहीम असे विविध प्रतिबंधात्मक उपाय योजण्याची सूचना मंगळवारी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत जवळपास सर्वच नगरसेवकांनी केली. तब्बल तीन तास या विषयावर सखोल चर्चा झाल्यानंतर आयुक्त बी. डी. सानप यांनी स्वाईन फ्लूचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून युद्धपातळीवर विविध उपाय योजना राबविल्या जात असल्याचे सांगून शहरात स्वच्छता राखण्याच्या कामात कुचराई करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले. महापौर विनायक पांडे यांच्या अध्यक्षतेखाली सकाळी सभेला सुरूवात झाली.

स्वाईन फ्लूचा धसका नको, या उपायांचा अवलंब करा..
सद्यस्थितीत ‘स्वाईन फ्लू’चा धसका घेऊन घाबरून जाण्यापेक्षा प्रत्येकाने अगोदरपासून काही दक्षता घेतली तर वैयक्तिकरित्या का होईना, हा आजार टाळता येऊ शकतो, असा दावा वैद्य एकनाथ कुलकर्णी यांनी केला आहे. स्वाइन फ्लू हा तापाचाच एक प्रकार असल्याने आयुर्वेदाने सांगितलेली जीवनपद्धती स्वीकारल्यास त्याचा प्रतिबंध करणे शक्य होईल, असे त्यांचे म्हणणे आहे. त्यासाठी आयुर्वेद व आधुनिक वैद्यक शास्त्राची सांगड घालत त्यांनी सुचविलेले काही उपाय.. * हात वारंवार धुवावेत. त्यासाठी विषाणु प्रतिबंधक साबण अथवा कडूनिंब, हळद, त्रिफळा टाकून उकळलेल्या पाण्याचा वापर करावा. * मास्क अथवा रूमालाची घडी करून नाका-तोंडावर संरक्षक कवच बनवावे.

महागाईविरोधात महिलांचा ठणठणाट
प्रतिनिधी / नाशिक

डाळी, भाजीपाला यासारख्या जीवनावश्यक वस्तूंचे भाव गेल्या काही दिवसांत गगनाला भिडले आहेत. सर्व स्तरांवरून त्याविषयी ओरड होत असूनही शासन त्याची म्हणावी तशी दखल घेत नसल्याची सर्वसामान्यांची भावना आहे. या पाश्र्वभूमीवर, वाढत्या महागाईकडे शासनाचे लक्ष वेधण्याच्या हेतूने शिवसेना तसेच मनसेच्या महिला कार्यकर्त्यां मंगळवारी पदर खोचून पुढे सरसावल्या.

भूमीहिनांच्या सबलीकरणाची यशोगाथा..
मुखेड हे येवला तालुक्यातील सहा हजार लोकसंख्या असलेले गाव. मुखेड फाटय़ावर उतरून अगदी पाच किलोमीटर अंतराच्या वळणावरती हिरव्यागार शेतातून जाणारी वाट संपली की मुखेडच्या पांढरीत पाऊल पडते. तसं हे पेठेचं गाव आहे. पण या गावातील अनुसूचित जातीतील लोकांना स्वत:च्या मालकीचा जमीनजुमला नाही.दुर्बलतेवर जनवर्ग आणि विशेषत: अनुसूचित जाती आणि अनुसूचित जनजाती यांचे विशेष काळजीपूर्वक शैक्षणिक व आर्थिक हितसंवर्धन करील आणि सामाजिक अन्याय व सर्व प्रकारचे शोषण यापासून त्यांचे संरक्षण करील या भारतीय संविधानातील अनुच्छेद ४६ नुसार सामाजिक न्याय विभागाने कर्मवीर दादासाहेब गायकवाड अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांचे सबलीकरण व स्वाभिमान योजना सुरु केली आहे.

राष्ट्रवादीचे कार्यकर्तेच म्हणतात, खुच्र्या खाली करा
झोपडपट्टीधारकांना पिवळ्या शिधापत्रिकेच्या मागणीसाठी राष्ट्रवादीचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा
नाशिक / प्रतिनिधी
शहरातील सर्व झोपडपट्टीधारकांना पिवळी शिधापत्रिका वारंवार मागणी करूनही दिली जात नसल्याच्या निषेधार्थ मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेसने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी ‘शिधापत्रिकांचे वाटप करा अन्यथा खुच्र्या खाली करा’ अशी घोषणाबाजी करून एकप्रकारे आघाडी सरकारला राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे घरचाच अहेर देण्यात आला. आपण नेमकी कोणती मागणी करत आहोत याचे भान राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांना नसले तरी रस्त्यावरील ज्या-ज्या नागरिकांच्या कानी या अजब घोषणा पडल्या, साहजिकच त्यांचे लक्ष आपोआप मोर्चाकडे वळले.

नाशिकमध्ये गेल्या चार वर्षांत हद्दपारीची ११० प्रकरणे
नाशिक / प्रतिनिधी
पोलीस आयुक्तांच्या कार्यक्षेत्रात गेल्या चार वर्षांत नाशिकमध्ये पाच हजार ८७० दखलपात्र गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. यामध्ये ११० जणांविरुद्ध हद्दपारीचे गुन्हे नोंदविलेले असून त्यांच्या राजकीय संबंधाची माहिती गोपनीय ठेवण्यात आली आहे. माहितीच्या अधिकारात ही माहिती मिळण्याबाबत अर्ज करण्यात आला होता. या गुन्ह्य़ांमध्ये जुगारीच्या २०४ व दारूबंदीच्या ४५३ प्रकरणांची नोंद आहे. चोऱ्या चार हजार १२३, दरोडे ४०, खून १३९, बलात्कार ४६, जाळपोळ ३४, दंगे-दंगली ५३०, ठकबाजी व फसवणूक २२८, पळून गेलेल्या (मुले) ५४, खंडणी १९ या प्रमाणे गेल्या तीन वर्षांत गुन्हे नोंदविले आहेत. हद्दपारीचे २००८ मध्ये ३७ तर २००९ मध्ये सर्वात जास्त ५० गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. एकूण ११० हद्दपारीच्या गुन्ह्य़ात किती हद्दपार केले व त्यांचा कोणकोणत्या राजकीय पक्षांशी संबंध आहे, याबाबतची माहिती गोपनीय असल्याचे माहिती अधिकारात सांगण्यात आले आहे. अर्जदार व सामाजिक कार्यकर्ते पां. भा. करंजकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली.

औद्योगिक सुरक्षा विषयक अभ्यासक्रमास प्रारंभ
नाशिक / प्रतिनिधी
क. का. वाघ तंत्रनिकेतनमध्ये यावर्षीपासून सुरू केलेल्या ‘अ‍ॅडव्हान्स डिप्लोमा इन इंडस्ट्रिअल सेफ्टी’ या नवीन अभ्यासक्रमाचे औद्योगिक सुरक्षा व आरोग्य विभागाचे संचालक प्रकाश परदेशी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. औद्योगिक सुरक्षा व आरोग्य हे उत्पादनांइतकेच महत्वाचे असून कंपनी कायद्यानुसार कारखान्यात किमान एक सुरक्षा अधिकारी असणे आवश्यक आहे. सुरक्षेसंदर्भात कामगारांमध्येही जागृती होणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन प्रकाश परदेशी यांनी यावेळी केले. अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब वाघ व विश्वस्त यांनी मोलाचे योगदान दिले. सदर कार्यक्रमादरम्यान तंत्रनिकेतनचे प्राचार्य प्रा. एम. डी. कोकाटे यांनी संस्थेची माहिती दिली. एम. एस. कुलकर्णी यांनी अभ्यासक्रमाच्या उपयुक्तेबद्दल मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे आयोजन तंत्रनिकेतनच्या रसायन अभियांत्रिकी विभागाने केले. सूत्रसंचलन एस. एस. रिकामे यांनी तर पी. एम. पाठक यांनी आभारप्रदर्शन केले.

गुणगौरव समारंभ
नाशिक / प्रतिनिधी

नाशिक येथील देवाडिगा ग्रुप ऑफ कल्चर एज्युकेशन अ‍ॅण्ड स्पोटर्सतर्फे १६ ऑगस्ट रोजी अशोक स्तंभ येथील सत्यानंद योग केंद्रात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. याप्रसंगी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार केला जाणार आहे.प्रारंभी, सामुहिक श्री सत्यनारायण पूजन, विद्यार्थी-पालक मेळावा, सांस्कृतिक मेळावा, नेत्ररोग शिबीर होईल. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून आरोग्य राज्यमंत्री डॉ. शोभा बच्छाव व देवाडिगा संघाचे अध्यक्ष के. के. मोहनदास उपस्थित राहणार आहेत. अधिक माहितीसाठी ९६०४६६३७१९ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.