Leading International Marathi News Daily

बुधवार, १२ ऑगस्ट २००९

कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या जळगाव पालिकेची अशीही ‘मक्ते’दारी!
वार्ताहर / जळगाव

सक्षम विरोधी पक्ष, कामगार संघटना तसेच कर्तव्य कठोर प्रशासकीय अधिकाऱ्यां अभावी येथील महापालिकेवर कर्जाचा प्रचंड डोंगर असतानाही पालिकेतील काही मुखंड विविध प्रकारचे मक्ते देण्याच्या माध्यमातून कोटय़वधीची वरकमाई करीत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. शहरातील ठराविक रस्ते वगळता अंतर्गत सर्वच रस्त्यांची अवस्था सध्या गंभीर बनली आहे. नव्या वस्त्या आणि कॉलन्यांतील नागरिकांना तर खडीचे रस्ते सुद्धा नाहीत. गेल्या मे महिन्यात त्याबाबत ओरड झाल्यानंतर पालिका स्थायी समितीच्या सभेत शहरातील रस्ते दुरूस्तीसाठी सुमारे एक कोटी ३० लाखाचा मक्ता धुळे येथील ठेकेदाराला देण्यात आला.

आजार ‘मेंदू दाह’चा संशय ‘स्वाईन फ्लू’चा
मनमाड / वार्ताहर

राज्यात ‘स्वाईन फ्लू’ची जबरदस्त दहशत निर्माण झाली असून स्वाईन फ्लू पसरू नये म्हणून दक्षता घेतली जात असतानाच येथील एका खासगी रुग्णालयात स्वाईन फ्लू सदृष्य रुग्ण आढळल्याच्या चर्चेने शहरात एकच खळबळ उडाली, त्यामुळे त्याला तातडीने नाशिक येथे शासकीय रुग्णालयात तपासणीसाठी पाठविण्यात आले असता या रुग्णास ‘मेंदूचा दाह’ असल्याचे स्पष्ट झाले. दरम्यान, शहरात स्वाईन फ्लूचा रुग्ण नसल्याचे येथील उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. टी. ए. बागवान यांनी स्पष्ट केले.

स्वातंत्र्यवीरांच्या शाळेची इमारत टाकणार नवी कात
मनसेच्या इशाऱ्यानंतर जिल्हा परिषदेला आली जाग
वार्ताहर / भगूर
स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी बालपणी मुळाक्षरे गिरविलेल्या शाळेचा इतिहास जपण्याऐवजी ती शाळाच बंद करण्याचा जिल्हा परिषदेचा प्रयत्न मनसेच्या आंदोलनाच्या दणक्यामुळे फसला असून शाळेचा इतिहास जपण्याच्या उद्देशाने इमारत दुरूस्तीसाठी आता सव्वा दोन लाखाचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. या निर्णयामुळे शाळेतील ऐतिहासिक आठवणींना उजाळा मिळणार आहे. लहवित रस्त्यावरील १८६५ मध्ये स्थापन झालेल्या या मराठी शाळेत स्वातंत्र्यवीर सावरकर, त्यांचे बंधू नारायणराव सावरकर, गणेश सावरकर यांनी आपले प्राथमिक शिक्षण घेतल्याची नोंद आहे.

प्रलंबित मागण्यांसाठी येवल्यात पालिका कर्मचाऱ्यांचा मुंडन मोर्चा
येवला / वार्ताहर

नगरपालिकेतील कर्मचाऱ्यांनी सोमवारी एकजुटीने सामूहिक मुंडन मोर्चाचे आयोजन करून घोषणाबाजी करीत सहाव्या वेतन आयोगासह अन्य मागण्या पदरात पाडून घेण्यासाठी शासनाचे लक्ष वेधले. येवल्याच्या इतिहासात प्रथमच अशारितीने सामूहिक मुंडन मोर्चा काढण्यात आला. दोन ऑगस्ट पासून महाराष्ट्रातील नगरपालिका कर्मचारी आपल्या मागण्यांसाठी बेमुदत कामबंद आंदोलनात सहभागी आहे.

पालिका कामगारांचा निषेध मोर्चा
मनमाड / वार्ताहर

राज्यातील नगरपालिका कामगारांना सहावा वेतन आयोग लागू करावा यासह इतर मागण्यांसाठी नगरपालिका कामगारांनी पुकारलेल्या बेमुदत संपाची शासनाने अद्याप दखल न घेतल्याच्या निषेधार्थ येथील कामगारांनी जोरदार निषेध मोर्चा काढला. यापुढेही शासनाने उपाययोजना न केल्यास त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशारा कामगारांतर्फे शासनाला यावेळी देण्यात आला.

किसान सभेचा देवळा येथे मोर्चा
देवळा / वार्ताहर

नाशिक जिल्हा किसान सभेच्यावतीने येथील तहसील कार्यालयावर विविध मागण्यांसाठी मोर्चा काढण्यात आला.बाजार समितीच्या प्रवेशव्दारापासून किसान सभेच्या कार्यकर्त्यांनी मोर्चा काढला. मोर्चाचे रुपांतर तहसील कार्यालयाच्या आवारातच जाहीर सभेत झाले. शिस्तबद्ध पद्धतीने निघालेल्या या मोर्चातील उपस्थिती पाहून नागरिकांमध्ये व प्रामुख्याने इतर पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये चर्चेचा विषय ठरला.

भुसावळ येथे पिता-पुत्रांवर चाकू हल्ला, पित्याचा मृत्यू
वार्ताहर / भुसावळ
येथील रेल्वे स्थानकाकडून आपल्या घराकडे निघालेल्या पित्यासह दोन मुलांवर मंगळवारी पहाटेच्या सुमारास पाच ते सहा जणांनी केलेल्या चाकू हल्ल्यात पित्याचा मृत्यू झाला तर एक मुलगा गंभीर जखमी झाला आहे. केशरलाल प्रल्हाद पाटील असे मृत पित्याचे नांव असून जखमी पुत्र मुकेश याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दुसरा मुलगा पंकज यालाही मारहाण करण्यात आली असून याप्रकरणी बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे तर अन्य फरार आहेत. केसरलाल पाटील (४७) हे आपल्या दोन मुलांसह पहाटे तीनच्या सुमारास रेल्वे स्थानकावरून घरी निघाले होते. त्यावेळी हॉटेल शालीमारच्या ओटय़ावर बसलेल्या ३० ते ३५ वयोगटातील पाच ते सहा तरुणांनी पंकजला कोणतेही कारण नसताना मारहाण सुरू केली. त्यावेळी केसरलाल पाटील हे मध्ये पडले असता तरुणांपैकी एकाने त्यांच्यावर चाकू हल्ला चढविला. त्यात केसरलाल यांचा मृत्यू झाला तर दुसरा मुलगा मुकेश जखमी झाली. या प्रकरणामुळे शहरात खळबळ उडाली असून पोलिसांनी मोहम्मद नदीम व कादीर या दोन संशयितांना चौकशसाठी ताब्यात घेतले आहे.दरम्यान, घटनास्थळी जिल्हा पोलीस अधीक्षक संतोष रस्तोगी, अपर पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी आदींनी भेट दिली. याप्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

पालिका कर्मचारी संपामुळे नवापूरला नागरी सेवा विस्कळीत
वार्ताहर / नवापूर

विविध प्रलंबित मागण्यांसाठी पालिका कर्मचाऱ्यांनी आपल्या संपाची व्याप्ती वाढविल्याने नागरी सेवांवर त्याचा विपरित परिणाम झाला आहे. मागण्यांबाबतची बोलणी फिसकटल्याने संघटनेने संपाची तीव्रता वाढवत अत्यावश्यक सेवांतील पाणी पुरवठा बंद केल्याने नागरिकांची प्रचंड गैरसोय झाली आहे. पाणी पुरवठा व आरोग्य या अत्यावश्यक सेवा असूनही त्या गरजांपासून नवापूरकर वंचित झाल्याने शहराला ओंगळ रुप आले. कचऱ्याचे साम्राज्य पसरले आहे. नगरपालिका कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष संजय राजपूत, उपाध्यक्ष आंनद साळवे, सरचिटणीस अनंत पाटील यांच्या नेतृत्वाखालील कर्मचाऱ्यांनी तहसील कार्यालयावर मोर्चा काढून तहसीलदार देवराज अहिरे यांना मागण्यांचे निवेदन सादर केले. नगराध्यक्ष गोविंद वसावे व मान्यवरांनी संप मिटावा यासाठी शासनाशी निवेदनाव्दारे संपर्क साधला आहे. त्यात म्हटले आहे की, कर्मचाऱ्यांच्या संपामुळे जनजीवन विस्कळित झाल्याने त्यांच्या मागण्या मान्य कराव्यात. संपामुळे साऱ्यांचीच गैरसोय होत आहे. कचऱ्याचे ढीग व अस्वच्छतेमुळे साथीचे आजार फैलावले तर साथ आटोक्यात आणणे कठीण होईल. त्यामुळे कर्मचाऱ्यांनीही लवकारत लवकर आपल्या मागण्या मान्य कराव्यात. कामावर रुजू व्हावे असा प्रस्तावही नगराध्यक्षांनी दिला आहे.

भगूरमध्ये ४० लाखांच्या विकासकामांना सुरूवात
भगूर / वार्ताहर

भगूर नगरपालिकेने दलित वस्ती सुधार योजनेंतर्गत समतावाडी या भागातील रस्ते काँक्रिटीकरण व भूमिगत गटारी यासारख्या सुमारे ४० लाख रुपयाच्या विकासकामांचा शुभारंभ पालिकेच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत करण्यात आला. समतावाडी परिसरातील रस्त्यांची अतिशय वाईट अवस्था झालेली होती. अरुंद रस्त्यामुळे या भागात वाहनांना जाणे-येणे अडचणीचे झाले आहे. या समस्येवर तोडगा म्हणून नगरपालिकेने दलित वस्ती सुधार योजनेतून संपूर्ण समतावाडीतील छोटे रस्ते तसेच मोठे रस्ते, बुद्धविहार मैदांनाचे काँक्रिटीकरण आदी कामे हाती घेतली आहे. तसेच सांडपाण्याची योग्य व्यवस्था व्हावी यासाठी व साथीच्या रोगापासून बचाव व्हावा यासाठी समतावाडीतील संपूर्ण गटारी या भूमिगत करण्यात आल्या आहेत. या भागातील मुख्य ठिकाण असलेल्या बुद्धविहारासमोरील चौकही संपूर्ण काँक्रिटीकरण करण्यात येणार आहे. या कामाचा शुभारंभ नगराध्यक्ष भारती साळवे, नगरसेवर शरद उबाळे, नगरसेवक गोरखनाथ बलकवडे, दिपक बलकवडे, बांधकाम सभापती अजय लोट आदींच्या हस्ते श्रीफळ फोडून करण्यात आला. गेल्या काही दिवसांपासून रस्त्याचे तसेच गटारीची कामे झालेले नव्हते त्या कामांसाठी नगरपालिकेने प्राधान्याने निधी उपलब्ध करून ही कामे तात्काळ पूर्ण करण्याचा निर्णय घेतला होता. यावेळी समतावाडीतील अनेक नागरिक यावेळी उपस्थित होते.