Leading International Marathi News Daily

बुधवार, १२ ऑगस्ट २००९

फैलाव रोखण्यास वाढीव रसद;शहरातील तपासणी केंद्रे, अतिदक्षता केंद्रांमध्ये वाढ
पुणे, ११ ऑगस्ट / खास प्रतिनिधी

झपाटय़ाने फैलावत चाललेल्या ‘स्वाइन फ्लू’चा सामना करण्यासाठी सात नवी तपासणी केंद्रे, अतिदक्षता विभागाची निर्मिती, कॅन्टोन्मेट बोर्डांसाठी स्वतंत्र रुग्ण तपासणी व्यवस्था, तपासणी केंद्रे व खासगी रुग्णलयातही ‘टॅमी फ्लू’चा पुरवठा आणि रुग्णांना तपासण्यासाठी अतिरिक्त ४५ वैद्यकीय अधिकाऱ्यांची नेमणूक अशी वाढीव रसद जिल्हाधिकारी चंद्रकांत दळवी यांनी आज दिली.

‘ सहावी पातळी अद्याप नाही’
पुणे, ११ ऑगस्ट / प्रतिनिधी

‘स्वाइन फ्लू’ला महासाथ म्हणून संबोधण्यात आले असले तरी त्याला ‘सहावी पातळी’ जाहीर करण्याची गरज नाही, असे स्पष्टीकरण जिल्हाधिकारी चंद्रकांत दळवी यांनी आज दिले.
‘स्वाइन फ्लू’ ही साथ नसून ती जागतिक महासाथ म्हणून तिला जागतिक आरोग्य संघटनेक डून संबोधण्यात आले आहे. तसेच शहरात ‘स्वाइन फ्लू’ने अनेक जणांना बाधा झाली आहे. त्यातच शहरात या फ्लूमुळे पाचजणांचा बळी गेल्याची घटना घडली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. साथीची ही सहावी पातळीच असल्याचे काही तज्ज्ञांचे म्हणणे आहे. ती जाहीर करावी, अशी मागणीही करण्यात आली.

पुण्या-मुंबईतील शाळांच्या घटक चाचण्या रद्द
पुणे, ११ ऑगस्ट / खास प्रतिनिधी

पुणे-मुंबई महानगर परिसरातील सर्व शाळांच्या पहिली ते दहावी इयत्तेच्या पहिल्या सत्रात घेण्यात येणाऱ्या दोन्ही घटकचाचण्या रद्द करण्यात आल्या आहेत. ‘स्वाइन फ्लू’ संसर्गाच्या पाश्र्वभूमीवर शाळा, विद्यार्थी-पालकांमध्ये परीक्षा व अभ्यासाचा तणाव राहू नये, यासाठी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेत असल्याचे शालेय शिक्षणमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी ‘लोकसत्ता’ला स्पष्ट केले.
‘स्वाइन फ्लू’ संसर्गामुळे पुणे-िपपरी, ठाण्यातील सर्व शाळा आठवडाभरासाठी बंद ठेवण्यात आल्या आहेत.

िपपरीत विद्यार्थिनीस ‘स्वाइन फ्लू’ रुग्णांची संख्या अकरा; संशयित २१४
िपपरी, ११ ऑगस्ट / प्रतिनिधी

िपपरीतील अजमेरा कॉलनी येथील एका १५ वर्षीय मुलीला स्वाइन फ्लू झाल्याचे आज निश्चित निदान झाले. तथापि, पुण्यातील नायडू व औंध रुग्णालये ‘फुल्ल’ झाल्याचे सांगत औषधे देऊन घरीच उपचार करण्याचा सल्ला मुलीच्या पालकांना देण्यात आला. येथील आरोग्य अधिकाऱ्यांमध्ये समन्वय नसल्याने त्या पालकांना चांगलाच मनस्ताप झाला. िपपरी पालिकेच्या सेवेत असलेला हा इसम अजमेरा कॉलनीत राहतो. िपपरीतील डॉ. डी. वाय. पाटील विद्यालयात दहावीत शिकणाऱ्या एका मुलाला दोन दिवसांपूर्वी स्वाइन फ्लूचे निदान झाले होते.

फुलांचा बाजार बंद
पुणे, ११ ऑगस्ट / खास प्रतिनिधी

‘स्वाइन फ्लू’ची ग्रामीण भागात लागण होऊ नये यासाठी गुलटेकडी येथील फुलांचा बाजार येत्या रविवारपर्यंत (दि. १६) बंद ठेवण्याचा निर्णय फूल बाजार आडते असोसिएशनने घेतला आहे. बाजार बंद केल्यामुळे दररोज पन्नास लाखांहून अधिक रुपयांची उलाढाल थांबणार असून शेतकऱ्यांनी सुरक्षिततेच्या कारणास्तव नुकसान सहन करण्याची तयारी दर्शविली आहे. गुलटेकडी येथील फुलांच्या बाजारात जिल्ह्य़ाच्या सर्व भागांमधून शेकडो फूल उत्पादक शेतकरी सकाळी माल घेऊन येतात. मालाची विक्री झाल्यानंतर हा शेतकरी वर्ग पुन्हा आपल्या गावी परततो. शेतकऱ्यांचा हा फूलमाल खरेदी करण्यासाठी शहरातील व्यापारी, ठोक विक्रेते, किरकोळ विक्रेते, फुलवाले मोठय़ा संख्येने बाजारात येतात.

सुवर्णयुग मंळाचीही दहीहंडी रद्द
पुणे, ११ ऑगस्ट/विशेष प्रतिनिधी

अखिल मंडई मंडळापाठोपाठ श्रीमंत दगडूशेठ हलवाई ट्रस्टच्या सुवर्णयुग तरुण मंडळानेही यंदाची दहीहंडी रद्द करण्याचा निर्णय केला आहे. तसाच निर्णय नातूबाग मंडळ आणि शनिपार मंडळानेही केला आहे. स्वाइन फ्लूच्या साथीमुळे अखिल मंडई मंडळाने दहीहंडीचा कार्यक्रम रद्द केला होता. आता सुवर्णयुग मंडळानेही तसाच निर्णय केला असल्याचे मंडळाचे उपाध्यक्ष दिलीप कापरे यांनी सांगितले. बाजीराव रस्ता नातूबाग मंडळाने दहीहंडीऐवजी श्रीकृष्णाकडे स्वाइन फ्लू आटोक्यात आणण्यासाठी साकडे घालण्याचे ठरविले असल्याचे अध्यक्ष प्रमोद कोंढरे यांनी कळविले आहे.
दरम्यान, स्वातंत्र्यदिनासारखा राष्ट्रीय सणही आपल्याला समूहाने साजरा करता येणार नसल्याचे नमूद करून दहीहंडी आणि गणेशोत्सव हे उत्सवही साधेपणाने साजरे करण्याचे आवाहन सजग नागरिक मंचचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी केले आहे.

कोकरे यांच्या भावालाही स्वाइन फ्लूची लागण
पाटस, ११ ऑगस्ट / वार्ताहर

बोरीपार्धी (ता. दौंड) येथील नाथनगरचे सुनील तुकाराम कोकरे (वय ३४) यास स्वाइन फ्लू झाल्याचे तपासणीअंती आज दुपारी निष्पन्न झाले आहे. स्वाइन फ्लूचा बळी ठरलेले शिक्षक संजय कोकरे यांचे ते धाकटे बंधू आहेत. त्यांच्यावर औंध सामान्य रुग्णालयात उपचार करण्यात येत असल्याची, माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अशोक रासगे यांनी दिली. स्वाइन फ्लूने दि. ८ रोजी शिक्षक संजय कोकरे यांचे पुणे येथे निधन झाले होते. ते आजारी असताना त्यांना भेटावयास आलेले नातेवाईक, कुटुंबीय सान्निध्यात आलेले इतर व्यक्ती अशा ३१ लोकांची औंध रुग्णालयात दि. ९ रोजी तपासणी करण्यात आली होती. यामध्ये सुनील कोकरे यांना स्वाइन फ्लू झाल्याचे निष्पन्न झाले आहे.

दुबईतील परिषदेत डॉ. बागूल यांचा शोधनिबंध सादर
पुणे, ११ ऑगस्ट/प्रतिनिधी

दुबई येथे होणाऱ्या जागतिक आरोग्य परिषदेत ‘स्टेमसेल थेरपी’ या विषयावरील शोधनिबंधाचे सादरीकरण करण्याची संधी पुण्यातील डॉ. अनंत बागूल यांना मिळाली आहे. डॉ. बागूल यांनी आज पत्रकार परिषदेत याबाबत अधिक माहिती दिली. ते म्हणाले, ‘चौदा ते सोळा ऑगस्ट या कालावधीत होणाऱ्या जागतिक आरोग्य परिषदेमध्ये मूळ पेशी उपचारपद्धती (स्टेमसेल थेरपी) या विषयावर शोधनिबंध सादर करण्याची संधी मिळाली आहे.’ मेंदूचा पक्षाघात, सेरेब्रल पाल्सी, मतिमंदत्व, पार्किंन्सन व मधुमेह यासह अनेक बऱ्या न होणाऱ्या आजारांवर नवीन वैद्यकीय उपचारपद्धतीनुसार, म्हणजेच मूळ पेशी उपचारपद्धतीच्या आधारे इलाज करता येतो. या उपचारपद्धतीद्वारे चैतन्य रुग्णालयात आतापर्यंत ४२ रुग्णांवर उपचार करण्यात आला आहे, अशी माहिती डॉ. बागूल यांनी या वेळी दिली.

‘दिलीपकुमार यांना ‘भारारत्न’ देण्यास हिंदू महासभेचा विरोध ’
पुणे, ११ ऑगस्ट / प्रतिनिधी

चित्रपट अभिनेते दिलीपकुमार यांना ‘भारतरत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्याचा अनेक सिनेकलावंतांनी दिलेल्या प्रस्तावाला हिंदू महासभा संघटनेने विरोध दर्शविला आहे. संघटनेच्या अध्यक्षा हिमानी सावरकर यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये प्रस्तावाला विरोध करण्याच्या कारणांची माहिती दिली. त्या म्हणाल्या, ‘‘’भारत-पाकिस्तान युद्धाच्यावेळी दिलीपकुमार यांच्या चित्रीकरणाच्या स्टुडिओमध्ये ‘ट्रान्समिटर्स’ची यंत्र सापडली होती. या यंत्रांद्वारे देशातील महत्त्वपूर्ण माहिती पाकिस्तानात पोहोचवली जात होती. त्यावेळच्या वर्तमानपत्रांमध्ये याबाबतची वृत्त प्रसारित झाली होती. त्यामुळे दिलीपकुमार हे श्रेष्ठ अभिनेते असले तरी त्यांना ‘भारतरत्न’ या देशाच्या सर्वोच्च पुरस्काराने गौरविण्यात येऊ नये .’’ ‘दिलीपकुमार यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्याच्या प्रस्तावाला प्रसिद्ध अभिनेता शाहरूख खान, अमिर खान आदी अनेक सिनेकलावंतांनी पाठिंबा जाहीर केला होता. दिलीपकुमार यांना पुरस्कार मिळण्यासाठी या सिनेकलावंतांनी घातलेला हा घाट म्हणजे हास्यास्पद प्रकार आहे.’

सदानंद खाडिलकर यांचे निधन
पुणे, ११ ऑगस्ट / प्रतिनिधी

रहस्यकथा, अपराध, पाठलाग, भावना व योगसिद्धी या वाचकप्रिय मासिकांचे प्रकाशक व संपादक सदानंद महादेव खाडिलकर यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. गेली दीड वर्षे ते ‘पार्किन्सन’ या आजाराने ग्रस्त होते. ते ८१ वर्षाचे होते. १९७६ पासून त्यांनी ‘अपराध’ व ‘पाठलाग’ या गुन्हेगारीविषयक मासिकांचे प्रकाशन नियमितपणे चालू केले. अल्पावधीतच या मासिकांवर वाचकांच्या उडय़ा पडू लागल्या. १९८० साली त्यांनी ‘अपराध’, ‘पाठलाग’, ‘भावना’, ‘योगसिद्धी’, ‘धनंजय’ व ‘चंद्रकांत’ असे एकूण सहा दिवाळी अंक प्रकाशित करून जणू उत्तुंग षटकारच ठोकला होता. त्यांच्या मागे पत्नी सुनंदा, तसेच अमेरिकास्थित मुलगा चंद्रशेखर, पुतणे ‘गंधर्ववेद’ प्रकाशनचे दीपक व प्रकाश खाडिलकर, तसेच जावई ‘अंजली पब्लिशिंग हाऊस’चे संचालक आनंद साने व मुलगी सौ. अंजली साने व नातवंडे असा परिवार आहे.

मॉलच्या दुकानांची कुलपे तोडून दीड लाखांचा ऐवज लंपास
पुणे, ११ ऑगस्ट/प्रतिनिधी

बालाजीनगर येथे असलेल्या के.के. मार्केटमधील मॉलच्या दुकानांची कुलपे तोडून रोख रकमेसह विविध प्रकारचे कपडे व कॉस्मेटिक वस्तूंसह एक लाख ६५ हजारांचा ऐवज अज्ञात चोरटय़ाने चोरून नेला. रविवारी (दि. ९) रात्री सव्वादहा ते सोमवारी सकाळी दहा या वेळेत ही घरफोडीची घटना घडली. मॉलचे मालक हेमंत सागर ओसवाल (वय ३३, रा. अश्वमेघ सोसायटी, रामबाग कॉलनी, पौड रस्ता) यांनी याबाबत सहकारनगर पोलिसांकडे फिर्याद दिली. पोलिसांनी अज्ञात चोरटय़ाविरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बालाजीनगर येथे असलेल्या के.के. मार्केटमध्ये ओसवाल यांच्या मालकीचा मॉल आहे.

यंदा पालिकेच्या गणेशोत्सव सजावट स्पर्धा नाहीत
िपपरी, ११ ऑगस्ट/प्रतिनिधी

‘स्वाइन फ्लू’च्या संकटामुळे खबरदारीचा उपाय म्हणून िपपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने दरवर्षी घेण्यात येणाऱ्या गणेशोत्सव सजावट स्पर्धा यंदा रद्द करण्याचा निर्णय महापौर अपर्णा डोके यांनी आज जाहीर केला. मागील वर्षीच्या स्पर्धाचा पारितोषिक वितरण समारंभ येत्या काही दिवसांत होणार होता. मात्र गर्दी टाळण्याच्या हेतूने हा कार्यक्रमही रद्द करण्यात आला आहे. बक्षीस विजेत्या मंडळांना पालिकेच्या तळमजल्यावरील जनसंपर्क कार्यालयात सकाळी दहा ते सायंकाळी साडेपाच या वेळेत धनादेशांचे वाटप करण्यात येणार आहे, असेही महापौरांनी सांगितले. शहरात जवळपास ११०० मंडळे गणेशोत्सव साजरा करतात, त्यापैकी ५०५ मंडळे नोंदणीकृत आहेत. धार्मिक देखाव्यांबरोबरच सामाजिक प्रबोधनपर देखाव्यांना प्रश्नेत्साहन देण्यासाठी पालिकेने या स्पर्धाना सुरुवात केली होती. मात्र स्वाइन फ्लूचे संकट लक्षात घेता यंदा या स्पर्धा रद्द करण्याचा निर्णय पालिकेने घेतला असल्याचे महापौर डोके यांनी सांगितले. दरम्यान, गणेशोत्सव मंडळांना साधेपणाने उत्सव साजरा करण्याचे आवाहन महापौर डोके, तसेच पत्रकार संघाचे अध्यक्ष नंदकुमार सातुर्डेकर यांनी स्वतंत्र निवेदनाद्वारे केले आहे.

शाळा, सार्वजनिक कार्यक्रम, उत्सव स्थगित करण्याचा पुरंदरमध्ये निर्णय
सासवड, ११ ऑगस्ट / वार्ताहर

पुरंदर तालुक्यामध्ये स्वाइन फ्लू चा प्रसार होऊ नये यासाठी सर्व प्रकारे दक्षता घ्यावी अशा सूचना आमदार अशोक टेकवडे यांनी आज दिल्या. सासवड तहसील कार्यालयात टेकवडे यांनी अधिकाऱ्यांनी बैठक घेतली. तालुक्यातील प्रत्येक गावात जनजागृती फलक लावावेत. गावोगावी सभा घेऊन, बैठका घेऊन या रोगासंबंधी व उपाययोजनासंबंधी माहिती घ्यावी. अफवा पसरणार नाहीत याची काळजी घ्यावी. प्रश्नथमिक आरोग्य केंद्राचे काम २४ तास चालू ठेवावे. आरोग्य विभागाचे कर्मचारी शंभर टक्के उपस्थित ठेवावेत. शासकीय कामगारांबरोबरच सेवाभावी संस्थांनाही सहभागी करून घ्यावे, असे टेकवडे यांनी सांगितले. ‘दहीहंडी’ साठी कोणालाही परवानगी देऊ नये. दहीहंडीमध्ये काही झाल्यास संबंधित मंडळास जबाबदार धरावे; तसेच तालुक्यातील सर्व शाळांचे कामकाज बंद ठेवावे. एखाद्या शाळेने कामकाज सुरू ठेवल्यास व तेथे ‘स्वाइन फ्लू’ बाबत काही झाल्यास संबंधित शिक्षणसंस्था जबाबदार राहातील असेही या बैठकीत ठरविण्यात आले.

सक्तीच्या सुटीमुळे पालकांची ‘परीक्षा’!
पुणे, ११ ऑगस्ट / खास प्रतिनिधी

शाळांना सक्तीची सुटी द्यावी लागल्याने पालकवर्गाची मात्र ‘परीक्षा’ सुरू झाली असून खबरदारीचा उपाय म्हणून मुला-मुलींना घरातच कसे ठेवायचे, असा यक्षप्रश्न त्यांच्यापुढे उभा राहिला आहे.
शहर व परिसरातील शाळा-महाविद्यालयांना आठवडाभराची सुटी देण्यात आल्याने लाखो विद्यार्थ्यांना घरी बसावे लागले आहे. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी आवाहन करूनही महाविद्यालयीन तरुणाईपैकी काहींनी चक्क सहलीला धूम ठोकली असली, तरी शालेय विद्यार्थ्यांना मात्र घरातच थांबवून कसे ठेवण्यासाठी पालकांना कसरत करावी लागत आहे. सुटीच्या कालावधीत मुला-मुलींनी क्लास-मैदाने, छंदवर्गच नव्हे, तर सोसायटी-कॉलनीमध्येही एकत्रित येऊ नये आणि संसर्ग टाळावा, असे आवाहन डॉक्टरांकडून करण्यात येत आहे. त्यामुळेच मुला-मुलींना घरीच थांबण्यावाचून पर्याय नाही. टीव्ही पाहण्यावर आणि कॉम्प्युटर गेम्स खेळण्यावर एरवी बंधने असतात. आता मात्र या संदर्भातील धोरण शिथिल ठेवण्यावाचून पालकांपुढे पर्याय राहिलेला नाही. त्याचप्रमाणे सुटीनंतर गुंडाळून ठेवण्यात आलेले पत्ते-कॅरम आदी बैठे खेळही पुन्हा बाहेर काढण्यात आले आहेत. सरकारी-खासगी क्षेत्रातील कार्यालयांना सुटी देण्यात आलेली नाही. त्याचप्रमाणे शिक्षकवर्गालाही शाळेतील उपस्थिती सक्तीची करण्यात आली आहे. परंतु, ‘स्वाइन फ्लू’ मुळे पाळणाघरे बंद ठेवण्यात आल्याने नोकरदार पालकांच्या समस्यांमध्ये मात्र भर पडली आहे.