Leading International Marathi News Daily

बुधवार, १२ ऑगस्ट २००९

(सविस्तर वृत्त)

फैलाव रोखण्यास वाढीव रसद;शहरातील तपासणी केंद्रे, अतिदक्षता केंद्रांमध्ये वाढ
पुणे, ११ ऑगस्ट / खास प्रतिनिधी

झपाटय़ाने फैलावत चाललेल्या ‘स्वाइन फ्लू’चा सामना करण्यासाठी सात नवी तपासणी केंद्रे, अतिदक्षता विभागाची निर्मिती, कॅन्टोन्मेट बोर्डांसाठी स्वतंत्र रुग्ण तपासणी व्यवस्था, तपासणी केंद्रे

 

व खासगी रुग्णलयातही ‘टॅमी फ्लू’चा पुरवठा आणि रुग्णांना तपासण्यासाठी अतिरिक्त ४५ वैद्यकीय अधिकाऱ्यांची नेमणूक अशी वाढीव रसद जिल्हाधिकारी चंद्रकांत दळवी यांनी आज दिली. शहरातील परिस्थिती आटोक्यात असल्याने स्वाइन फ्लूची सहावी पातळी जाहीर करण्याची गरज नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
पुणे शहरालगतच्या हवेली, मुळशी व मावळ तालुक्यातील शाळा आणि कॉलेज बंद करण्याचा आदेश देण्यात आला आहे. होस्टेल बंद करण्याचा आदेश मात्र काढलेला नाही. होस्टेलमधील विद्यार्थ्यांनी आपल्या खोल्या सोडू नयेत आणि त्यांना सर्वतोपरी सुविधा देण्यात याव्यात अशा सूचना देण्यात आल्या आहेत, असे जिल्हाधिकारी दळवी यांनी स्पष्ट केले आहे.
पुणे शहरात सुरू करण्यात आलेल्या पंधरा आणि पिंपरीतील आठ तपासणी केंद्रांवर काल मोठी गर्दी झाली होती. दहा हजारांहून अधिक नागरिकांनी स्वाइन फ्लूची तपासणी करून घेतली. त्यातील १४८ जणांना नायडू हॉस्पिटलमध्ये तपासणी करण्याची सूचना डॉक्टरांनी केली. मात्र तपासणीसाठी होणारी गर्दी पाहता शहरातील हॉस्पिटल्समध्ये नव्याने आणखी सात तपासणी केंद्रे सुरू करण्यात येणार आहेत. पुणे व खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डात अशी प्रत्येकी तीन तपासणी केंद्रे सुरू करण्यात येणार आहेत. ही केंद्र उद्यापासून सुरू केली जाणार आहेत.
सह्य़ाद्री-मुनोत रुग्णालयात ‘आयसीयू सेंटर’
ससूनची रुग्णक्षमता व येणाऱ्या रुग्णांची संख्या पाहता हे रुग्णालय अपुरे पडत आहे. ससूनला पर्यायी व्यवस्था म्हणून वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालकांनी केलेल्या शिफारशीनुसार सेव्हन लव्हज चौकातील सह्य़ाद्री-मुनोत हॉस्पिटलमध्ये रुग्णांची सोय केली जाणार आहे. या हॉस्पिटलमध्ये १२ खाटा अतिदक्षता विभागाच्या व २० खाटाचा स्वतंत्र कक्ष असणार आहे. या हॉस्पिटलमध्ये येत्या एक-दोन दिवसांत रुग्णसेवा सुरू केली जाणार आहे.
अतिरिक्त ४५ डॉक्टरची कुमक मागविणार
स्वाइन फ्लूच्या रुग्णांची तपासणी करण्यासाठी सध्याच्या डॉक्टरांवर ताण पडत आहे. महापालिकेच्या रुग्णालयात सुरू करण्यात आलेल्या तपासणी केंद्रांवर गर्दी होत आहे. त्यांचा हा ताण कमी करण्यासाठी तसेच रुग्णांना जलद गतीने सेवा मिळण्यासाठी जिल्ह्य़ाबाहेरून अतिरिक्त ४५ डॉक्टरांची कुमक मागविण्यात येणार आहे. आरोग्य खात्यामार्फत लवकरच या डॉक्टरांची नियुक्ती केली जाणार आहे. तसेच सध्या काम करणारे डॉक्टर व कर्मचाऱ्यांनाही सुरक्षितता देण्याची सूचना करण्यात आली आहे.
तपासणी केंद्र व खासगी रुग्णालयात ‘टॅमी फ्लू’ देणार
आरोग्य संचालनालयाने ‘स्वाइन फ्लू’च्या रुग्णांबाबत मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. त्यानुसार रुग्णांचे ‘अ’, ‘ब’ आणि ‘क’ असे वर्गीकरण करण्यात आले आहे. तापाची प्रश्नथमिक लक्षणे दिसणाऱ्या ‘क’ वर्गातील रुग्णांना खासगी डॉक्टरांनी तपासले पाहिजे. मात्र ‘ब’ आणि ‘अ’ वर्गातील रुग्णांना शासकीय तपासणी केंद्रात जाण्याचा सल्ला डॉक्टरांनी द्यावा असे या तत्त्वांमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे.याशिवाय तपासणी केंद्रांमध्ये ‘टॅमी फ्लू’ च्या गोळ्या देण्यास सुरुवात करण्यात आली आहे. ग्रामीण भागातील रुग्णालयांमध्येही या गोळ्या उपलब्ध करून देण्यात येत आहेत. तसेच प्रश्नथमिक आरोग्य केंद्रातही ‘टॅमी फ्लू’च्या गोळ्या देण्यात येणार आहेत.
खासगी रुग्णालयातील खर्च रुग्णांचाच
स्वाइन फ्लूचे संशयित रुग्ण उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल होतात. अशा रुग्णालयांत दाखल झालेल्या रुग्णांचा टॅमी फ्लूच्या गोळ्या आणि ‘एनआयव्ही’मधील तपासणीचा खर्च शासन करणार आहे. खासगी रुग्णालयातील राहण्याचा व अन्य खर्च रुग्णांनाच करावा लागणार आहे. नायडू हॉस्पिटल व औंध रुग्णालयातील खर्चाचा बोजा शासन उचलणार आहे.
पर्यटनस्थळी जाण्याचे टाळा; मास्कची विल्हेवाट लावा
स्वाइन फ्लूचा प्रसार रोखण्यासाठी शाळांना सुट्टय़ा देण्यात आल्या आहेत. या काळात तसेच १५ ऑगस्ट रोजी लोणावळा, खंडाळा तसेच जवळच्या पर्यटनस्थळी जाण्याचे टाळावे असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे. या रोगापासून वाचण्यासाठी मोठय़ा प्रमाणावर मास्क वापरले जात आहेत. मात्र या मास्कची योग्य विल्हेवाट लावण्याची गरज आहे. मास्क वापरून कोठेही फेकलेले दिसतात. याबाबत नागरिकांनी काळजी घ्यावी. मास्कऐवजी कापडी रुमाल वापरणे हा सर्वात चांगला व आरोग्यदायी उपाय आहे, असेही त्यांनी नमूद केले.
नवीन सात तपासणी केंद्रे
कै. सुंदराबाई राऊत दवाखाना (केळेवाडी, पौड रस्ता), कै. संजय गांधी प्रसूतिगृह (बोपोडी), कै. अण्णासाहेब मगर प्रसूतिगृह (हडपसर), डॉ. होमी भाभा प्रसूतिगृह (दीप बंगला चौक, वडारवाडी), कै. नामदेव शिवरकर प्रसूतिगृह (फातिमानगर, वानवडी), भारतरत्न राजीव गांधी प्रसूतिगृह (येरवडा) व कै. मीनाताई ठाकरे प्रसूतिगृह (कोंढवा)