Leading International Marathi News Daily

बुधवार, १२ ऑगस्ट २००९

(सविस्तर वृत्त)

‘ सहावी पातळी अद्याप नाही’
पुणे, ११ ऑगस्ट / प्रतिनिधी

‘स्वाइन फ्लू’ला महासाथ म्हणून संबोधण्यात आले असले तरी त्याला ‘सहावी पातळी’ जाहीर

 

करण्याची गरज नाही, असे स्पष्टीकरण जिल्हाधिकारी चंद्रकांत दळवी यांनी आज दिले.
‘स्वाइन फ्लू’ ही साथ नसून ती जागतिक महासाथ म्हणून तिला जागतिक आरोग्य संघटनेक डून संबोधण्यात आले आहे. तसेच शहरात ‘स्वाइन फ्लू’ने अनेक जणांना बाधा झाली आहे. त्यातच शहरात या फ्लूमुळे पाचजणांचा बळी गेल्याची घटना घडली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. साथीची ही सहावी पातळीच असल्याचे काही तज्ज्ञांचे म्हणणे आहे. ती जाहीर करावी, अशी मागणीही करण्यात आली. यासंदर्भात जिल्हाधिकारी चंद्रकांत दळवी यांना विचारता ते म्हणाले, ‘‘राज्याचे मुख्य सचिव जॉनी जोसेफ यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील ‘स्वाइन फ्लू’ नियंत्रणासाठी एका कोअर ग्रुपची स्थापना मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केली. त्या समितीमार्फत स्वाइन फ्लूचा संसर्ग असलेल्या भागातील स्थितीचा आढावा घेण्यात येत आहे. पुणे विभागाचे विभागीय आयुक्त दिलीप बंड हे त्या समितीचे एक सदस्य आहेत. पुणे विभागातील पुण्याच्या स्वाइन फ्लूच्या परिस्थितीची माहिती, उपचार, निदान, संशयित, तसेच पॉझिटिव्ह रुग्णांची माहिती या बैठकीत देण्यात येते. तसेच येथील परिस्थिती नियंत्रित करण्यासाठी केंद्र सरकारने नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ कम्युनिकेबल डिसीजेस (एनआयसीडी) या संस्थेचे काही तज्ज्ञांचे पथक पुण्यात आले आहे. त्यांच्याकडून या पथकाची पाहणी करण्यात येत असून परिस्थिती नियंत्रित करण्यासाठी काही सूचनाही त्यांच्याकडून करण्यात येत आहेत. तसेच येथील आरोग्य यंत्रणेला मार्गदर्शनही केले जात आहे. सर्व परिस्थिती पाहूनच ही समिती पुण्यात महासाथीची सहावी पातळी जाहीर करण्याची शिफारस करू शकते. या समितीमार्फत अद्याप महासाथीची सहावी पातळी जाहीर करण्याची कोणतीही शिफारस करण्यात आलेली नाही. त्यामुळे पुण्यात कोणतीही सहावी पातळी अद्याप तरी जाहीर क रण्याची गरज नाही, असेही जिल्हाधिकारी दळवी यांनी स्पष्ट केले.