Leading International Marathi News Daily

बुधवार, १२ ऑगस्ट २००९

(सविस्तर वृत्त)

पुण्या-मुंबईतील शाळांच्या घटक चाचण्या रद्द
पुणे, ११ ऑगस्ट / खास प्रतिनिधी

पुणे-मुंबई महानगर परिसरातील सर्व शाळांच्या पहिली ते दहावी इयत्तेच्या पहिल्या सत्रात घेण्यात येणाऱ्या दोन्ही घटकचाचण्या रद्द करण्यात आल्या आहेत. ‘स्वाइन फ्लू’ संसर्गाच्या पाश्र्वभूमीवर

 

शाळा, विद्यार्थी-पालकांमध्ये परीक्षा व अभ्यासाचा तणाव राहू नये, यासाठी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेत असल्याचे शालेय शिक्षणमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी ‘लोकसत्ता’ला स्पष्ट केले.
‘स्वाइन फ्लू’ संसर्गामुळे पुणे-िपपरी, ठाण्यातील सर्व शाळा आठवडाभरासाठी बंद ठेवण्यात आल्या आहेत. मुंबई महानगर परिसरातील शाळाही बंद करण्यासाठी दबाव टाकण्यात येत आहे. ‘स्वाइन फ्लू’ चा संसर्ग होण्याच्या भीतीने विद्यार्थ्यांना शाळेत पाठविण्याबाबत पालक तयार नाहीत. त्यामुळे उपस्थितीही घटू लागली आहे. काही शाळांमध्ये पहिली घटकचाचणी झाली असून आता दुसऱ्या घटकचाचणीचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे, तर काही ठिकाणी या आठवडय़ामध्ये पहिल्या चाचणीची घोषणा करण्यात आली आहे. परीक्षा बुडू नये, यासाठी ‘स्वाइन फ्लू’ ची लक्षणे असूनही विद्यार्थ्यांना शाळेत पाठविण्यासाठी पालक धडपड करतील, अशी भीती व्यक्त करण्यात येत होती. शालेय शिक्षणमंत्री विखे-पाटील यांच्याशी ‘लोकसत्ता’ ने संपर्क साधून ही परिस्थिती कथन केली. ‘स्वाइन फ्लू’ च्या घबराटीत परीक्षेचा ताण शाळा, विद्यार्थी-पालकांवर देऊ नये, अशी विनंतीही त्यांना करण्यात आली. विखे-पाटील यांनी तातडीने सकारात्मक प्रतिसाद दिला. मुंबईचे विभागीय शिक्षण उपसंचालक व्ही. के. वानखेडे यांच्या कार्यालयात बैठक घेतली. राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाशीही चर्चा करण्यात आली. त्यानंतर तातडीने परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेत असल्याचे विखे-पाटील यांनी स्पष्ट केले. ‘पुणे व मुंबई महानगर परिसरातील सर्व शाळांच्या पहिली ते दहावी इयत्तेच्या वर्गामधील पहिल्या सत्रातील दोन्ही घटक चाचण्या रद्द करण्यात येणार आहेत. ज्या ठिकाणी पहिली चाचणी झाली असेल, तेथे दुसरी घटक चाचणी घेतली जाणार नाही. परीक्षा घेण्यात आली, तर त्यासाठी शाळा, विद्यार्थी-पालकांसह सर्वच यंत्रणांवर त्याचा ताण येतो. ‘स्वाइन फ्लू’ संसर्गाच्या पाश्र्वभूमीवर अशा प्रकारचा कोणताही दबाव टाकून चालणार नाही. त्यामुळेच परीक्षा रद्द करण्यात येत असून त्या संदर्भातील आदेश उद्या जारी केला जाईल. पाचगणीमधील शाळाही बंद असून तेथील परिस्थितीचा आढावा घेऊन सातारा जिल्ह्य़ासाठी लवकरच निर्णय घेण्यात येईल. त्याचप्रमाणे राज्यातील इतरत्र उद्भवणाऱ्या परिस्थितीचा आढावा घेऊन योग्य ते निर्णय घेतले जातील. ‘स्वाइन फ्लू’ संसर्गामुळे कोणत्याही विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ दिले जाणार नाही,’ असेही विखे-पाटील यांनी स्पष्ट केले.
‘शाळांमधील उपस्थितीबाबतही शिथिल धोरण स्वीकारण्याचा आदेश देण्यात येणार आहे. उपस्थिती बंधनकारक असताना ‘स्वाइन फ्लू’ सदृश आजार, त्याची लक्षणे आढळल्याने अनुपस्थित राहणाऱ्या विद्यार्थ्यांला उपस्थिती सक्तीची राहणार नाही. तथापि, त्यासाठी शाळेने संबंधित विद्यार्थ्यांला तसे प्रमाणित करणे आवश्यक आहे,’ असे विखे-पाटील यांनी सांगितले.