Leading International Marathi News Daily

बुधवार, १२ ऑगस्ट २००९

(सविस्तर वृत्त)

फुलांचा बाजार बंद
पुणे, ११ ऑगस्ट / खास प्रतिनिधी

‘स्वाइन फ्लू’ची ग्रामीण भागात लागण होऊ नये यासाठी गुलटेकडी येथील फुलांचा बाजार येत्या रविवारपर्यंत (दि. १६) बंद ठेवण्याचा निर्णय फूल बाजार आडते असोसिएशनने घेतला आहे.

 

बाजार बंद केल्यामुळे दररोज पन्नास लाखांहून अधिक रुपयांची उलाढाल थांबणार असून शेतकऱ्यांनी सुरक्षिततेच्या कारणास्तव नुकसान सहन करण्याची तयारी दर्शविली आहे.
गुलटेकडी येथील फुलांच्या बाजारात जिल्ह्य़ाच्या सर्व भागांमधून शेकडो फूल उत्पादक शेतकरी सकाळी माल घेऊन येतात. मालाची विक्री झाल्यानंतर हा शेतकरी वर्ग पुन्हा आपल्या गावी परततो. शेतकऱ्यांचा हा फूलमाल खरेदी करण्यासाठी शहरातील व्यापारी, ठोक विक्रेते, किरकोळ विक्रेते, फुलवाले मोठय़ा संख्येने बाजारात येतात.
पुण्यात सध्या ‘स्वाइन फ्लू’चा प्रसार झपाटय़ाने होत आहे. शहरातील विक्रेते व शेतकऱ्यांच्या संपर्कातून स्वाइन फ्लूचा प्रसार होऊ नये, यासाठी हा निर्णय घेण्यात आला असल्याचे असोसिएशनचे आप्पा गायकवाड यांनी सांगितले.
ग्रामीण भागात याचा प्रसार टाळण्यासाठी फुलबाजारच बंद ठेवण्याचा निर्णय असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी घेतला आहे. त्यानुसार येत्या गुरुवारपासून (दि.१३) रविवारपर्यंत (दि. १६) बाजार बंद ठेवण्याचा निर्णय झाल्याचे गायकवाड यांनी स्पष्ट केले.
या रोगाची तीव्रता कमी झाल्यावर फुलबाजार पूर्ववत सुरू राहील. मात्र तीव्रता वाढल्यास त्याबाबत फेरविचार करण्याचा प्रस्तावही असोसिएशनच्या विचाराधीन आहे, असेही सांगण्यात आले.