Leading International Marathi News Daily

बुधवार, १२ ऑगस्ट २००९

(सविस्तर वृत्त)

‘.. तर जीवितहानी टाळता येईल’
पुणे, ११ ऑगस्ट / खास प्रतिनिधी

‘स्वाइन फ्लू’ पासून बचावासाठी या रोगाचे वेळेत निदान होणे गरजेचे आहे. निदानास झालेल्या विलंबामुळेच उपचारास विलंब होऊन पुण्यातील पाचजण या साथीला बळी गेले असण्याची

 

शक्यता अधिक आहे. रुग्ण व डॉक्टरांनी सतर्कता बाळगल्यास वेळेवर निदान होऊन पुढील दुर्घटना टाळता येणे सहजशक्य आहे, असे मत राष्ट्रीय विषाणू संशोधन संस्थेचे (एनआयव्ही) संचालक डॉ. ए. सी. मिश्रा तसेच, शहरातील ज्येष्ठ डॉक्टरांनी व्यक्त केले आहे.
स्वाइन फ्लूला कारणीभूत ठरलेल्या ‘एच१एन१’ या विषाणूमध्ये काही बदल होत नाहीत ना, यावर एनआयव्हीतर्फे लक्ष ठेवण्यात येत आहे. आतापर्यंत तरी त्याच्या जनुकांमध्ये कोणताही बदल (म्युटेशन) झालेला नाही. तरीसुद्धा देशात स्वाइन फ्लूमुळे मृत्यू झाले आहेत. योग्य औषधोपचार मिळण्यास झालेला विलंब हे त्या मागचे प्रमुख कारण आहे, असे डॉ. मिश्रा यांनी ‘लोकसत्ता’ शी बोलताना स्पष्ट केले.
या संदर्भात माहिती देताना प्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ डॉ. आनंद पंडित म्हणाले की, स्वाइन फ्लूमुळे रुग्णालयात दाखल कराव्या लागणाऱ्या रुग्णांना अखेरच्या टप्प्यात न्यूमोनिया होतो. त्यामुळे फुफ्फुसावर परिणाम होऊन श्वसनावाटे हवेतून घेतलेला प्रश्नणवायू शरीराच्या विविध भागांना पुरविण्याच्या त्याच्या कामात अडथळे येतात. यालाच वैद्यकीय परिभाषेत ‘एआरडीएस’ (अ‍ॅक्युट रेस्परेटरी डिस्ट्रेस सिंड्रोम) म्हणजेच फुफ्फुसाचा गंभीर आजार असे म्हणतात. जगभर सर्वत्रच या आजाराचा मृत्युदर मोठा आहे. त्यामुळे रुग्ण या टप्प्यापर्यंत पोहोचणार नाही, याची दक्षता घेणे अधिक गरजेचे आहे.
स्वाइन फ्लूचे निदान झाल्यावर ४८ तासांच्या आत रुग्णाला ‘टॅमी फ्लू’ हे औषध देणे गरजेचे आहे. किंबहुना ४८ तासांच्या आत ते सुरू झाले तरच ते अधिक परिणामकारक ठरते. त्याला उशीर झाल्यास त्याची परिणामकारकता कमी होत जाते. स्वाइन फ्लू बरा करण्यासाठी सध्या तरी ‘टॅमी फ्लू’ हे एकमेव औषध उपलब्ध आहे. सिप्ला कंपनीच्या ‘रिलेक्झा’ या ओढायच्या गोळ्या त्यासाठी दिल्या जात असल्या, तरी प्रश्नमुख्याने त्या रोगप्रतिबंधक गोळ्या आहेत. रोगाची लागण झाल्यावर त्या उपयुक्त ठरत नाहीत, असेही डॉ. पंडित यांनी स्पष्ट केले.
‘एच१एन१’ हा विषाणू अद्याप तरी सौम्य स्वरूपाचा असून त्याचा मृत्युदरही कमी आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही. साथ सुरू होतानाच ती रोखणे गरजेचे असते, अन्यथा नंतर ती रौद्र रूप धारण करते. त्यामुळे या रोगाची लागण झाल्यावर त्याच्यावर उपचार घेत बसण्यापेक्षा तो होऊ नये म्हणूनच काळजी घेणे गरजेचे आहे. साधा सर्दी, खोकला झाला तरी लोकांनी स्वत:च घरी बसावे व पूर्ण बरे झाल्यावरच घराबाहेर पडावे, असे आवाहनही डॉ. पंडित यांनी केले.
स्वाइन फ्लूचे वेळीच निदान होऊन उपचार सुरू होणे गरजेचे असले, तरी त्यामध्ये असंख्य प्रकारच्या अडचणी आहेत. या साथीमुळे धास्तावलेले नागरिक साध्या सर्दी-पडशासाठीही रुग्णालय व प्रश्नथमिक तपासणी केंद्राकडे धाव घेत असल्याने येणाऱ्या प्रत्येकाचे तपासणीसाठी नमुने घेणे शासकीय यंत्रणेलाही शक्य नाही. त्यामुळे अशा संशयितांना उपचार देणाऱ्या डॉक्टरांनीच त्यांच्यावर बारीक लक्ष ठेवावे, अशी अपेक्षा ज्येष्ठ फिजिशियन व बालरोगतज्ज्ञ डॉ. गोविंद नेर्लेकर यांनी व्यक्त केली आहे. सर्दी, खोकला, तापाचा आजार असलेल्या रुग्णांवर डॉक्टरांनी सुरुवातीपासूनच स्वाइन फ्लूचे संशयित म्हणून बारकाईने लक्ष ठेवले पाहिजे. नेहमीच्या औषधाने ते बरे होत नाहीत, असे निदर्शनास आल्यावर वेळ न दवडता योग्य शिफारसीसह त्याला नायडू रुग्णालयात पाठवावे. तेथेही त्याच्या घशातील व नाकातील द्रवाचे नमुने घेऊन तातडीने त्याच्यावर उपचार सुरू होतील, याचीही दक्षता डॉक्टरांनी घेतली पाहिजे, असेही ते म्हणाले.