Leading International Marathi News Daily

बुधवार, १२ ऑगस्ट २००९

(सविस्तर वृत्त)

नव्या फ्लूवर औषधोपचार
स्वाइन फ्लूव्षियी सर्व काही..

प्रत्येक सर्दी, खोकला हा तथाकथित ‘स्वाईन फ्लू’ नसतो, हे पालकांनी ध्यानात घेतले पाहिजे.

 

फ्लूचा आजार हा विषाणूजन्य असतो.
पहिल्या दिवशी जोरदार ताप आला तरी दुसऱ्या आणि त्यानंतर तिसऱ्या दिवशी तो हळूहळू कमी कमी होत जातो. तापाचे औषध दिल्यावर तो नॉर्मलला येतो आणि मूल खेळू लागते. रुग्णाच्या खाण्या-पिण्यावर अशा व्हायरल इन्फेक्शनचा परिणाम होत नाही.
इतर जीवाणूजन्य आजारांमध्येही खूप ताप येतो. पण प्रतिजैविके (अंॅटीबायोटिक्स) दिल्याशिवाय ताप उतरत नाही. सात, आठ दिवस चालणारा ताप हा विषमज्वाराचाही असू शकतो. प्रत्येक तापाचे चित्र वेगवेगळे असते. स्वाइन फ्लूच्या मानसिक दहशतीखाली याचा विसर पडू नये.
ऑसेल्टॅमीव्हिर (टॅमीफ्लू) हे विषाणूविरोधी (अँटीव्हायरल) औषध आजार सुरू झाल्यावर पहिल्या ४८ तासांतच लागू पडते. नंतर त्याची परिणामकारकता कमी होते. या औषधामुळे आजाराची तीव्रता कमी होते. रुग्णालयात दाखल केलेल्या सर्व रुग्णांना हे औषध द्यावे.
नव्या फ्लूचे पक्के निदान झाल्यानंतरच हे औषध दिले जायचे. पण निदान पक्के होईपर्यंत ४८ तास निघून जायचे म्हणून आता फ्लूसारखी लक्षणे असल्यास हे औषध लगेचच दिले जात आहे. विषाणूजन्य आजार नसताना हे औषध दिले गेले तर औषधाला ‘रेसिस्टन्स’ निर्माण होतो आणि औषधाची खरी गरज निर्माण होते तेव्हा ते लागू पडत नाही.
एक वर्षाच्या आतील मुलांमध्ये हे औषध जपून द्यावे. तीन महिन्यांच्या आतील बालकाला देऊ नये. रुग्णाच्या सहवासातील निकटवर्तीय कुटुंब, डॉक्टर्स, परिचारिका यांना प्रतिबंधात्मक उपाय म्हणून हे औषध देण्यात येते.
सॅनॅमीव्हिर (व्हायरेंझा) हे तोंडावाटे फवाऱ्याने ओढण्याचे (ओरल इन्व्हेलेशन) औषधही उपलब्ध झाले आहे.
डॉ. प्रमोद जोग
भारतीय बालरोगतज्ज्ञ संघटना, पुणे