Leading International Marathi News Daily

बुधवार, १२ ऑगस्ट २००९

(सविस्तर वृत्त)

‘स्वाइन फ्लू’ वर आता नऊ खासगी रुग्णालयांमध्येही उपचार
पुणे -पिंपरीत उपचारासाठी खासगी डॉक्टरांना सहभागी करणार
पुणे, १० ऑगस्ट / प्रतिनिधी

‘स्वाइन फ्लू’च्या भीतीमुळे शहरातील नायडू रुग्णालय, औंधमधील जिल्हा रुग्णालयात तपासणीसाठी नागरिकांनी गर्दी केल्यामुळे त्यांच्यावरील येणारा ताण कमी करण्यासाठी आता पुणे

 

आणि पिंपरी-चिंचवड शहरातील खासगी नऊ रुग्णालयांमध्ये ही सुविधा सुरू केली असून तेथेच रुग्णांवर उपचारही करण्यात येणार आहेत.
या खासगी रुग्णालयात केल्या जाणाऱ्या उपचाराचा खर्च हा संबंधित रुग्णांनी करायचा असून त्यांच्या केल्या जाणाऱ्या चाचण्यांचा खर्च हा मात्र राज्य सरकार करणार आहे.
मात्र ससून, नायडू रुग्णालय तसेच औंध येथील जिल्हा रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांवरील उपचार आणि त्यांच्या चाचण्यांचा खर्च हा राज्य सरकार करणार असून त्याचे कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही शहरातील नायडू रुग्णालय, औंधमधील जिल्हा रुग्णालयात रुग्णांची तपासणीसाठी होणारी गर्दी कमी करण्यासाठी पुणे, पिंपरीसह तेवीस दवाखान्यांत ही तपासणीची सुविधा सुरू केली आहे. मात्र जे पॉझिटिव्ह असून स्थिती गंभीर असणाऱ्या रुग्णांना ससून रुग्णालयात दाखल केले जात आहे. तसेच जिल्ह्य़ामधील कोणालाही सर्दी, खोकला, ताप अशी लक्षणे आढळत असतील तर त्यांनी डॉक्टरांकडून तपासून घ्यावे. जिल्ह्य़ातील नागरिकांनी ग्रामीण रुग्णालयाशी संपर्क साधावा. या दरम्यान महाराष्ट्राला कें द्राकडून दहा लाख गोळ्या मिळणार असून त्यातील एक लाख गोळ्या शहराला मिळणार आहेत. जिल्हय़ात औषधांची कमतरता भासल्यास संबंधित अधिकाऱ्यांनी तो खरेदी करण्याचे त्यांना अधिकार देण्यात आले आहेत. राष्ट्रीय विषाणू संस्थेकडून चाचणीची क्षमता वाढविण्यासंदर्भात काही तांत्रिक बाबींची तपासणी पूर्ण केली जाईल. त्यानंतर त्या तपासण्या वाढीचा निर्णय घेतला जाईल.
स्वाइन फ्लू नियंत्रणावर कुटुंब कल्याणचे अतिरिक्त संचालक डॉ. अशोक लड्डा हे देखरेख करतील. तसेच जिल्ह्य़ात जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. महेश नगरे यांच्यावर ही जबाबदारी देण्यात आली आहे. तसेच खासगी डॉक्टरांना आम्ही या कामात मदत करण्याचे आवाहन केले असून त्यांनी मदतीचे आश्वासनही दिले आहे.
ही आहेत नऊ रुग्णालये
पुण्यातील नोबेल, सह्य़ाद्री, रुबी हॉल, केईएम, दीनानाथ मंगेशकर, भारती विद्यापीठ रुग्णालय तसेच पिंपरीतील लोकमान्य आणि निरामय या नऊ रुग्णालयांमध्ये ही सुविधा उपलब्ध केली जाणार आहे. या रुग्णालयात तपासणीसह उपचारही केले जातील. परंतु, उपचारांचा खर्च हा त्या संबंधित रुग्णांनी करावा. मात्र रक्ताचे, घशासह नाकातील द्रवाचे नमुने घेऊन ते एनआयव्हीला पाठविण्याचा खर्च हा राज्य सरकार करणार आहे. तसेच दोन्ही शहरांतील तपासणी सुरू करण्यात आलेल्या दवाखान्यांत आजपासून ‘टॅमी फ्लू’ही गोळी उपलब्ध केली जाणार आहे.