Leading International Marathi News Daily

बुधवार, १२ ऑगस्ट २००९

(सविस्तर वृत्त)

बालकाला वाचवल्याचा खोटा दावा करणाऱ्या डॉक्टरवर कारवाईची मागणी
पुणे, ११ ऑगस्ट / प्रतिनिधी

अत्यवस्थेत असलेल्या १९ दिवसांच्या बालकाला दुर्मीळ शस्त्रक्रियेद्वारे वाचविल्याचा दावा पत्रकार परिषदेत करणाऱ्या डॉक्टरला ‘महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल’ने दिलेल्या अपुऱ्या शिक्षेच्या

 

निर्णयाविरुद्ध उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याची माहिती बालकाच्या कुटुंबीयांनी आज पत्रकार परिषदेत दिली. संबंधित डॉक्टरला किमान दोन वर्षाकरिता निलंबित करण्याची मागणी न्यायालयाक़डे करणार असल्याचे बालकाच्या कुटुंबीयांनी यावेळी सांगितले.
‘हेरंब हेमाडे या नवजात बालकाचा जन्म १६ मार्च २००८ रोजी रत्ना रुग्णालयात झाला. मात्र रक्तातील ऑक्सीजनचे प्रमाण कमी आढळल्याने त्याला केईएम रुग्णालयात हलविण्यात आले. तेथे त्याच्यावर विविध चाचण्या करण्यात आल्या. रुग्णालयातील डॉ. नित्यानंद ठाकूर यांनी हेमाडे कुटुंबीयांना बालकावर एक दुर्मीळ शस्त्रक्रिया करण्यासाठी राजी केले. ही शस्त्रक्रिया २ एप्रिल २००८ रोजी डॉ. ठाकूर यांनी केली मात्र शस्त्रक्रियेनंतर बालक जगू शकले नाही. परंतु बालकाची स्थिती नाजूक असल्याचे माहिती असूनही डॉ. ठाकूर यांनी दरम्यानच्या काळात घाईघाईने पत्रकार परिषद घेऊन बालकाला वाचविल्याचा दावा करीत हेमाडे कुटुंबीय व नागरिकांची दिशाभूल केल्याचा आरोप, बालकाचे आजोबा कुमोदचंद्र हेमाडे यांनी यावेळी केला. हेमाडे म्हणाले, ‘‘डॉ. ठाकूर यांच्याविरुद्ध केलेल्या तक्रारीनंतर मुंबईतील ‘महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल’ने चौकशी केली. त्यामध्ये डॉ. ठाकूर यांना दोषी धरले गेले. मात्र डॉ. ठाकूर यांना निलंबनासारखी कठोर शिक्षा करण्याऐवजी कौन्सिलने त्यांना फक्त ‘वॉर्निग’ देऊन सोडले आहे. त्यामुळे नियम व शिस्तभंग करणाऱ्या डॉक्टरांना जरब बसणार नाही.’
‘डॉ. ठाकूर यांचे किमान दोन वर्षाकरिता निलंबन करावे, अशी मागणी करणारा व कौन्सिलच्या निर्णयाविरुद्ध अपिल करणारा अर्ज लवकरच उच्च न्यायालयात दाखल करणार आहोत,’ असे हेमाडे यांनी यावेळी सांगितले. ‘अत्यवस्थ असलेले बालक फार दिवस जगणार नसल्याचे ठाऊक असूनही डॉ. ठाकूर यांनी बालकावर दुर्मीळ शस्त्रक्रिया करण्याचे जाहीर करून प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न केला. हा प्रयत्न अंगाशी येत असल्याचे पाहिल्यावर डॉ. ठाकूर यांनी केईएम रुग्णालयावर प्रकरण ढकलण्याचा प्रयत्न केला, मात्र कौन्सिलच्या चौकशीमध्ये त्यांच्यावरील आरोपसिद्ध झाले आहेत,’ असे हेमाडे म्हणाले.