Leading International Marathi News Daily

बुधवार, १२ ऑगस्ट २००९

(सविस्तर वृत्त)

‘सिटिझन सायन्टिस्ट’ विकसित करण्यासाठी आयुकाकडून पुढाकार
पुणे, ११ ऑगस्ट / खास प्रतिनिधी

खगोलशास्त्राची आवड असलेल्या नागरिकांमधून शास्त्रज्ञ (सिटिझन सायन्टिस्ट) विकसित करण्याच्या दृष्टीने ‘आयुका’तर्फे पुढाकार घेण्यात आला असून, त्यासाठीची आवश्यक खगोलशास्त्रीय माहिती उपलब्ध करून देण्याबरोबरच इच्छुकांना योग्य प्रशिक्षण देण्यात येणार

 

आहे.
इंटर युनिव्हर्सिटी काऊन्सिल फॉर अ‍ॅस्ट्रॉनॉमी अ‍ॅन्ड अ‍ॅस्ट्रोफिजिक्स (आयुका) या संस्थेच्या स्थापनेला वीस वर्षे पूर्ण झाल्याबद्दल या संस्थेचे माजी विद्यार्थी व संबंधितांचे संमेलन आजपासून पुण्यात सुरू झाले. या संदर्भात कालच झालेल्या बैठकीत खगोलशास्त्राचा नागरिकांमध्ये प्रसार करण्याच्या दृष्टीने चर्चा झाली. त्या वेळी माजी विद्यार्थी व सध्या अमेरिकेत संशोधन करणारे प्रश्न. आशिष महाबळ यांनी ‘सिटिझन सायन्टिस्ट’ची कल्पना मांडली. जगभरातील खगोलशास्त्रज्ञांनी दुर्बिणींच्या साहाय्याने मिळविलेल्या नोंदी प्रचंड संख्येने त्यांच्या संकेतस्थळांवर उपलब्ध आहेत. नोंदींची संख्या पाहता त्या सर्वाचेच विश्लेषण करणे शास्त्रज्ञांना शक्य नाही. जगभरातील काही नागरिक त्यांचा वापर करतही आहेत. पण त्यांचे विश्लेषण कसे करायचे याबाबत अनेकांना नेमकी माहिती नसल्याने त्यात अडथळे येत आहेत. ही उणीव दूर करण्यासाठी नागरिकांना पुरेसे प्रशिक्षण देण्यासाठी आयुकातर्फे पुढाकार घेण्यात येणार आहे. इच्छुकांनी \scipop@gmail.com या ई-मेलवर संपर्क साधावा, असे आवाहन या संस्थेचे जनसंपर्क अधिकारी अरविंद परांजपे यांनी केले आहे.
केंब्रिजचे डॉ. शोमकराय चौधरी यांनी तिथे असा प्रयोग राबविला आहे. त्यामुळे सहाव्या-सातव्या इयत्तेतील विद्यार्थीसुद्धा खगोलशास्त्रीय नोंदींचे विश्लेषण करू शकत आहेत. ‘सिटिझन सायन्टिस्ट’ म्हणून काम करणे हा विद्यार्थी व इतरांसाठी शास्त्रज्ञ बनण्याच्या मार्गातील प्रमुख टप्पा ठरेल, असे मत काही शास्त्रज्ञांनी व्यक्त केले. दरम्यान, आयुकातील संमेलनाच्या आजच्या उद्घाटनाच्या दिवशी संचालक डॉ. नरेंद्र दधिच यांनी या संस्थेच्या वीस वर्षातील कामगिरीचा आढावा घेतला. आंतरराष्ट्रीय पातळीवरील शास्त्रज्ञ व संस्थांनाही आयुकाच्या या कामगिरीचे कौतुक वाटते, असे त्यांनी सांगितले. या संमेलनाच्या आजच्या पहिल्या दिवशी ‘गुरुत्वाकर्षण आणि विश्व’ या विषयावर परिसंवाद झाला. त्या वेळी विविध देशांमधून आलेल्या शास्त्रज्ञांनी याबाबत केलेले संशोधन व सद्यस्थितीबाबत सादरीकरण केले.