Leading International Marathi News Daily

बुधवार, १२ ऑगस्ट २००९

(सविस्तर वृत्त)

छातीचे हाड न कापता ‘बायपास’ शस्त्रक्रिया शक्य
पुणे, ११ ऑगस्ट / प्रतिनिधी

हृदयशस्त्रक्रिया किंवा बायपास करण्यासाठी रुग्णाच्या छातीचे हाड न कोपता त्याद्वारे शस्त्रक्रिया करणे शक्य झाले आहे, ते सुद्धा पूर्वीच्या खर्चात! हृदय शल्यचिकित्सक डॉ. रणजित जगताप यांनी

 

ही किमया साध्य केल्याने केवळ तीन दिवसांत रुग्णाला घरी जाता येणार आहे.
४५ वर्षीय विजय गणोजकर यांच्यावर अशा प्रकारची बायपास शस्त्रक्रिया ही जहांगीर रुग्णालयात यशस्वीरीत्या करण्यात आली. अशा प्रकारच्या सात शस्त्रक्रिया आतापर्यंत करण्यात डॉ. जगताप यांना यश आले आहे. डॉ. जगताप यांना डॉ. आनंद नाडकर्णी, डॉ. आशिष खनिजो, डॉ. विनित पांडे, डॉ. स्वप्नील क र्णे, भूलतज्ज्ञ डॉ. चंद्रशेखर कुलकर्णी, शशी काळे आदींनी विशेष सहकार्य केले. याबाबत माहिती देताना डॉ. रणजित जगताप म्हणाले, ‘‘ बायपास शस्त्रक्रिया करताना पूर्वी छातीचे हाड कापावे लागत होते. त्यामुळे शस्त्रक्रियेनंतर छातीवरील ती जखम पूर्णपणे बरी होण्यास महिना दोन महिन्यांचा अवधी लागायचा. त्यामुळे रुग्णाला शस्त्रक्रियेनंतर दहा दिवस रुग्णालयात तसेच त्यानंतर घरी राहावे लागत होते. मात्र शस्त्रक्रियेनंतर त्या व्यक्तीच्या छातीवर जखमेचे मोठे व्रण मात्र कायमच राहायचे. एक किंवा दोन रक्तवाहिन्या खंडीत झालेल्या रुग्णांवर ही शस्त्रक्रिया करण्यात येते. शस्त्रक्रियेच्या नव्या पद्धतीत छातीचे हाड कापले जात नाही. केवळ छातीच्या स्नायूचा काप घेऊन आतील बरगडय़ा थोडय़ाशा ताणून त्याद्वारे शस्त्रक्रिया केली जाते. पूर्वी हात किंवा पायाच्या रक्तवाहिन्या कापाव्या लागत होत्या. मात्र आता छातीतील रक्तवाहिन्या या टिकाऊ असल्याने त्या कापून रक्तपुरवठा सुरळीत केला जातो. या नवीन पद्धतीमुळे शस्त्रक्रियेदरम्यान रक्तस्त्राव होण्याचा धोका अंत्यत कमी असतो. या पद्धतीमुळे रुग्ण एक दिवस अतिदक्षता विभागात राहून त्याला तिसऱ्या दिवशी घरी जाणे शक्य होत आहे. तसेच लवकरच कामावर रुजू होणे देखील सोपे होणार आहे. पूर्वीच्या खर्चात यामुळे आणखीच कपात होण्याची संधी रुग्णांना मिळणार आहे.