Leading International Marathi News Daily

बुधवार, १२ ऑगस्ट २००९

(सविस्तर वृत्त)

‘विकास केल्याचे सिद्ध करा, मगच मते मागा’
हडपसर, ११ ऑगस्ट/वार्ताहर

विकास केल्याचे दाखवून द्या आणि मग मते मागा, अशी रोखठोक भूमिका मतदारांनी घेऊन उमेदवारांना जाब विचारला पाहिजे. शिवसेना सत्तेवर असो वा नसो, मराठी माणसांच्या न्याय्य हक्कांसाठी काम करण्याचा धर्म शिवसेनेचा आहे, असे शिवसेनानेते संजय राऊत यांनी

 

कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना सांगितले.
हडपसर विधानसभा मतदारसंघातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी व्यासपीठावर भारतीय कामगार सेनेचे उपनेते सूर्यकांत महाडिक, पुणे शहरप्रमुख नाना वाडेकर, नगरसेवक प्रमोद भानगिरे, विजय देशमुख, तानाजी लोणकर, महादेव बाबर, महिला शहर संघटक राधिका हरिश्चंद्रे आदी उपस्थित होते. या वेळी राऊत मार्गदर्शन करताना बोलत होते. शिवसेनेच्या विचारांच्या ठिणग्या गावागावांत धगधगत आहेत. आतापर्यंत आदिवासी भागात दोन हजार मुले कुपोषणाने मृत्युमुखी पडली. १४ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. कामगार आत्महत्या करीत आहेत. कारखाने बंद होत आहेत, बेकारी वाढत आहे. याला आघाडी सरकार जबाबदार असल्याची खरमरीत टीका राऊत यांनी केली. विकासाच्या नावाखाली शरद पवार आणि अजित पवार शेतकऱ्यांच्या जमिनी घेऊन बिल्डरच्या घशात घालीत आहेत. महाराष्ट्राला ओरबाडण्याचे काम ते करीत आहेत. शेतकरी देशोधडीला लावण्याचेच काम ते करीत असल्याचे राऊत यांनी या वेळी सांगितले. शिवसेनाप्रमुखांनी मराठी माणसाला न्याय्य हक्क मिळवून देण्यासाठी शिवसेना स्थापन केली. िमराठी माणसाचा कैवार घेऊन लढणाऱ्यांची दररोज खंडणीसाठी नामावली प्रसिद्ध होत असल्याचे सांगून नाव न घेता मनसेवर हल्लाबोल केला.