Leading International Marathi News Daily

बुधवार, १२ ऑगस्ट २००९

(सविस्तर वृत्त)

मोलेदिना उर्दू व डॉ. झाकीर हुसेन शाळेवर पालकांचा मोर्चा
खडकी, ३ ऑगस्ट/प्रतिनिधी

खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या मोलेदिना उर्दू प्रश्नथमिक शाळा व डॉ. झाकीर हुसेन उर्दू माध्यमिक शाळेतील प्रलंबित प्रश्न व दुरवस्थेबाबत संतप्त पालकवर्गाने खडकी कॅन्टोन्मेंट कार्यालयावरच

 

धडक मोर्चा काढला.
खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या मोलेदिना उर्दू प्रश्नथमिक शाळा व डॉ. झाकीर हुसेन माध्यमिक विद्यालयातील अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या प्रश्नांसंदर्भात येथील पालकांच्या वतीने आज दुपारी खडकी कॅन्टोन्मेंट कार्यालयावर मोर्चा काढून प्रशासनाच्या कारभाराचा निषेध करण्यात आला. शाळेतील दोन वर्षापासून सेवानिवृत्त झालेल्या शिक्षकांच्या जागी अद्याप नवीन शिक्षक भरती केले गेले नसल्याने एका शिक्षकावर दोन-दोन वर्ग सांभाळण्याची वेळ आली आहे. तुकडीस मान्यता न मिळाल्याने एकाच वर्गात शंभर ते एकशे वीस विद्यार्थी बसविण्याची वेळ शाळेवर आली आहे.
दीड ते दोन हजार विद्यार्थिसंख्या असलेल्या या शाळेस एकच सफाई कर्मचारी दिल्याने साफसफाई नियमित केली जात नाही. त्यामुळे शाळेच्या परिसरात सतत घाणीचे व कचऱ्याचे साम्राज्य, विद्यार्थ्यांच्या आरोग्यास धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. विद्यार्थिसंख्येनुरूप शौचालय व स्वच्छतागृह, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने विद्यार्थ्यांसह शिक्षकांचे प्रचंड हाल, पाण्याची टाकी नियमित स्वच्छ केली जात नसल्याने दूषित पाणीपुरवठा, अशा विविध प्रलंबित प्रश्नांसंदर्भात आज पालकांच्या वतीने कॅन्टोन्मेंट कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.
सामाजिक कार्यकर्ते रफिक कुरेशी व शब्बीर शेख यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या या मोर्चात अस्लम सय्यद, खेरुनिसा कादरी, शबाना शेख, शाकिरा शाह, अलीमुन शेख, चाँद बागवान, रुखसाना बागवान, नजिरा सय्यद आदी अनेक पालक मोठय़ा संख्येने सहभागी झाले होते.
मुख्य कार्यकारी अधिकारी एस. सी. कौशिक हे सदन कमांड येथील एका महत्त्वाच्या बैठकीस गेले असल्याने संतप्त पालक दुपारी १२ पासून ते ३ पर्यंत कार्यालयाबाहेरच थांबून होते. दुपारी तीन वाजता कौशिक आले असता पालकांच्या वतीने शाळेच्या प्रलंबित प्रश्नांसंदर्भात लेखी निवेदन देण्यात आले. मुख्य कार्यकारी अधिकारी कौशिक यांनीही शाळेचे प्रलंबित प्रश्न आठवडाभरात मार्गी लावण्याकामी प्रयत्न केले जातील, असे आश्वासन या वेळी दिले.