Leading International Marathi News Daily

बुधवार, १२ ऑगस्ट २००९

(सविस्तर वृत्त)

न्यू इंडिया इन्श्युरन्स कंपनीच्या अधिकारी पदासाठीची मुख्य परीक्षा २५ ऑक्टोबरला
पुणे, ११ ऑगस्ट / प्रतिनिधी

न्यू इंडिया इन्श्युरन्स कंपनीमध्ये ‘प्रशासकीय अधिकारी’ या पदासाठीची भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली असून त्यासाठी आवश्यक अर्ज उमेदवारांनी मुदतीत पोहोचवावे, असे आवाहन

 

‘भारतीय विमा कर्मचारी सेना’ या संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.
प्रशासकीय अधिकारी हे वरिष्ठ पद असून त्यामध्ये राज्यातील स्थानिक तरुणांना संधी मिळावी, याकरिता अर्ज भरण्याबाबत व या क्षेत्रातील करिअर संधीबाबत विशेष प्रशिक्षण वर्ग सुरू करण्यात येत आहे, अशी माहिती संघटनेच्या वतीने शिरीष फडतरे व राजेश टेंबे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
ते म्हणाले, ‘‘भरती प्रक्रिया, स्पर्धात्मक परीक्षा आणि मुलाखत यावर आधारित असून मुख्य परीक्षा २५ ऑक्टोबर रोजी होणार आहे. उमेदवारांना द्यावी लागणारी स्पर्धा परीक्षा पर्यायी उत्तरांची (ऑप्शनल) आहे. २१ ते तीस वर्ष वयोगटातील उमेदवार परीक्षेला पात्र असून यासंदर्भातील अर्ज कंपनीच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. डाऊनलोड करून भरलेल्या अर्जाची प्रत उमेदवारांनी कंपनीच्या मुंबई येथील कार्यालयाच्या पत्त्यावर (संकेतस्थळावर दिलेल्या) १७ ऑगस्ट पूर्वी पाठविणे आवश्यक आहे. राज्यामध्ये पुणे, मुंबई आणि नागपूर याठिकाणी परीक्षेसाठीची केंद्र निश्चित करण्यात आली आहेत.’’
‘‘न्यू इंडिया इन्श्युरन्स कंपनी ही केंद्र सरकारच्या मालकीची सर्वसाधारण विमा कंपनी आहे. ३६० वरिष्ठ श्रेणीच्या अधिकारी पदासाठी यावेळी भरती करण्यात येणार आहे. प्रशासकीय अधिकारी पदासाठी दोन गट करण्यात आलेले आहेत. स्पेशलिस्ट व जनरलिस्ट असे हे दोन गट आहेत. स्पेशलिस्ट गटासाठी शैक्षणिक पात्रता पुढीलप्रमाणे- एमसीए, एमसीएम, एमआयटी, एमई, एमटेक किमान ५५ टक्के, बी.ई., बी.टेक किमान साठ टक्के अशी आहे. जनरलिस्ट गटासाठी शैक्षणिक पात्रता पुढीलप्रमाणे- कोणत्याही शाखेतील पदवी (किमान ६० टक्के) किंवा पदव्युत्तर पदवी (किमान ५५ टक्के) अशी आहे. मागासवर्गीय व इतर मागासवर्गीयांसाठी नियमांनुसार वयोमर्यादेची अट शिथिल करण्यात आलेली आहे,’’ असे टेंबे यांनी यावेळी सांगितले. स्पेशलिस्ट गटासाठी ‘विशेष प्रश्नेफेशनल नॉलेज’ या विषयावरील आणखी एक परीक्षा उमेदवारांना द्यावी लागणार आहे. मुख्य परीक्षा व विशेष परीक्षा प्रत्येकी शंभर गुणांच्या आहेत. मुख्य परीक्षेमध्ये रिझनिंग (गणित), बुद्धीमापन, सामान्यज्ञान आणि इंग्रजी असे चार विभाग आहेत. परीक्षेसाठी विशेष प्रशिक्षण वर्गाचे आयोजन २२ ऑगस्ट रोजी करण्यात आले आहे, अशी माहिती फडतरे यांनी यावेळी दिली. नागरिकांनी परीक्षेबाबत अधिक माहितीसाठी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या ‘इन्श्युरन्स अकॅडमी, पेरुगेट भावेस्कूल आवार, सदाशिव पेठ’ या पत्त्यावर किंवा ९६५७७०९६७८ या क्रमांकांवर अथवा फडतरे यांना ९४२२००१४०२ किंवा टेंबे यांना ९७२२०७५०४६ या क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.