Leading International Marathi News Daily

बुधवार, १२ ऑगस्ट २००९

(सविस्तर वृत्त)

पक्षनेत्यांमध्ये आघाडीचा दिग्विजयसिंग यांना विश्वास
पुणे, ११ ऑगस्ट / खास प्रतिनिधी

आगामी विधानसभा निवडणुका काँग्रेस व राष्ट्रवादीने एकत्र येऊन लढवाव्यात की नाही याबाबतचा अंतिम निर्णय पक्षश्रेष्ठींकडून घेतला जाणार असला तरी त्यांच्यात आघाडी होईल, असा विश्वास

 

अखिल भारतीय काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस दिग्विजयसिंह यांनी आज येथे व्यक्त केला.
राज्यातील राजकीय परिस्थितीची पाहणी करून येथील नेत्यांशी चर्चा करण्यासाठी दिग्विजयसिंह दोन दिवसांच्या पुणे दौऱ्यावर आले असता पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला. ते म्हणाले की, आघाडीच्या निर्णयाबद्दल विलंब होतो आहे, असे समजण्याचे कारण नाही. दोन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांना त्याची चांगली जाणीव आहे. केवळ राष्ट्रवादी काँग्रेसच नव्हे तर रिपब्लिकन पक्षाबरोबरही आघाडी व्हावी अशी आमची इच्छा आहे.
जातीयवादी पक्षांना सत्तेपासून रोखायचे उद्दिष्ट असल्याने सर्वाना एकत्र घेऊन जाण्यावर काँग्रेसचा भर आहे, असेही त्यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले. जागा वाटपाचा प्रश्नही दोन्ही पक्ष चर्चेने सोडवतील, असेही ते म्हणाले. पुण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने पुणे पॅटर्नद्वारे सत्ता मिळविली आहे. त्यामुळे पुण्यात परिस्थिती कशी हाताळणार असे विचारता ते म्हणाले की प्रत्येक ठिकाणी काही स्थानिक वाद व प्रश्न असतात. परंतु, राज्य व केंद्र पातळीवर त्यांचा परिणाम होणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
स्वाइन फ्लूबाबत गुलाम नबी आझाद यांनी केलेल्या बोलण्याचा विपर्यास झाला असून त्यांनी स्वतच या प्रश्नी स्पष्टीकरण दिल्याने त्यांच्या वक्तव्यांचा वाद आता मिटला आहे. स्वाइन फ्लूबाबत केंद्र व राज्य सरकार गांभीर्याने परिस्थिती हाताळत आहे, असेही ते म्हणाले.