Leading International Marathi News Daily

बुधवार, १२ ऑगस्ट २००९

(सविस्तर वृत्त)

आरोग्य अधिकाऱ्यांवर कारवाईच्या मागणीसाठी नगरसेविकेचे उपोषण
िपपरी, ११ ऑगस्ट / प्रतिनिधी

भोसरीच्या इंद्रायणी परिसरात गेल्या काही दिवसांपासून घाणीचे साम्राज्य निर्माण झाले असून योग्य ती कार्यवाही करण्याऐवजी आरोग्य अधिकारी उध्दट वर्तन करीत असल्याचा आरोप करीत त्या

 

बेजबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाईच्या मागणीसाठी येथील भाजपच्या नगरसेविका वर्षा मडेगिरी यांनी आजपासून उपोषणास सुरुवात केली.
इंद्रायणीनगर परिसरात गेल्या काही दिवसांपासून तीव्र अस्वच्छता आहे. यासंदर्भात सातत्याने तक्रार करून आरोग्य अधिकारी दुर्लक्ष करीत असल्याने नगरसेविका मडेगिरी यांनी येथील दत्तमंदिरात आजपासून उपोषणास सुरुवात केली. सहायक आरोग्य अधिकारी प्रकाश जवळकर, वरिष्ठ आरोग्य निरीक्षक जनार्दन जानकर, आरोग्य निरीक्षक दीपक कोटियाना, किरण पालसौरा व कर्मचारी सुनील वाटाडे या पाचजणांवर निलंबनाची कारवाई करावी, अशी मडेगिरी यांची मागणी आहे. अन्यथा, उपोषण कायम ठेवण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. याबाबतची माहिती मिळताच आयुक्त आशिष शर्मा यांनी प्रभाग अधिकारी रोहिदास गायकवाड यांना घटनास्थळी पाठविले. गायकवाड यांनी उपोषण मागे घेण्याची विनंती मडेगिरी यांना केली. तथापि, या अधिकाऱ्यांवर कारवाई केल्याशिवाय आपण आंदोलन मागे घेणार नाही, असे त्यांनी गायकवाड यांना सांगितले. यावेळी उपोषणकर्ते व पालिकेचे अधिकारी यांच्यात जोरदार वादविवाद झाला. त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. अखेर, घटनास्थळी आलेल्या पोलिसांनी हस्तक्षेप केल्याने पुढील प्रकार टळला. दरम्यान, जमीन घोटाळाप्रकरण आणि लँडमाफियांच्या विरोधात राष्ट्रवादीचे नगरसेवक जावेद शेख यांनी आकुर्डी येथे चार दिवसांपासून सुरू केलेले उषोपण आज मागे घेतले. समता फोरमचे अध्यक्ष डॉ. सीताराम अभंग यांच्या हस्ते सरबत प्रश्नशन करून शेख यांनी उपोषण सोडले.