Leading International Marathi News Daily

बुधवार, १२ ऑगस्ट २००९

(सविस्तर वृत्त)

पिंपरीत जन्माष्टमी, संमेलन, मेळावे रद्द
पिंपरी, ११ ऑगस्ट/प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड शहरातही ‘स्वाइन फ्लू’चा संसर्ग वाढत असल्याने येत्या आठवडाभरातील बहुतेक सार्वजनिक कार्यक्रम, मेळावे, संमेलने रद्द करण्यात आल्याचे संयोजकांनी कळविले आहे.

 

प्रश्नमुख्याने श्रीकृष्ण जन्माष्टमी ,दहीहंडी महोत्सव, साहित्य संमेलन, तसेच विविध मेळावे रद्द करण्यात आले आहेत.
आंतरराष्ट्रीय श्रीकृष्ण भावनामृत संघाच्या (इस्कॉन)वतीने आयोजित रावेत येथील १३ व १४ ऑगस्टचा नियोजित जन्माष्टमी सोहळा पुढे ढकलण्यात आला आहे. मंदिराचे अध्यक्ष रघुपती दास यांनी ही माहिती दिली. भोसरी येथील शिवराजमुद्रा प्रतिष्ठानच्या वतीने पीएमटी चौकात आयोजित १४ ऑगस्टचा दहीहंडी महोत्सवही रद्द करण्यात आल्याचे प्रतिष्ठानचे अध्यक्ष नगरसेवक अजित गव्हाणे यांनी सांगितले. शहरातील हा सर्वात मोठा गर्दी खेचणारा महोत्सव रद्द केल्याने युवकांच्या उत्साहावर विरजण पडले आहे.
पिंपरी-चिंचवड शहर अण्णा भाऊ साठे प्रतिष्ठानतर्फे १३ ऑगस्ट रोजी साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले होते. आचार्य अत्रे सभागृहातील हा नियोजित समारंभ रद्द करीत असल्याचे प्रतिष्ठानचे अध्यक्ष संदिपान झोंबाडे यांनी कळविले आहे. सध्याचे संकट कमी झाल्यावर संमेलनाची नवीन तारीख जाहीर करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
शहरातील खान्देश मित्रमंडळाने स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून कुटुंब मेळावा व गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्काराचा कार्यक्रम हडपसर येथील नीलकमल मंगल कार्यालयात जाहीर केला होता. तो रद्द केल्याचे मंडळाचे सचिव किशोर वाघ यांनी सांगितले. आताचे वातावरण निवळल्यावर मेळाव्याची नवीन तारीख जाहीर करण्यात येईल, असेही ते म्हणाले. आंबेगाव तालुका मित्रमंडळाने १९ ऑगस्ट रोजी तालुक्यातील पुणे व पिंपरी-चिंचवड शहरात राहणाऱ्या नागरिकांचा मेळावा घेण्याचे प्रयोजन रद्द केल्याचे मंडळ अध्यक्ष दत्तात्रय भालेराव यांनी कळविले.
स्वरसागर महोत्सव, पवारांचा दौराही रद्द
‘स्वाइन फ्लू’मुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा आजचा िपपरी-चिंचवड दौरा रद्द करण्यात आला. शुक्रवारी पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते होणारे भूमिपूजन व उद्घाटनांचे विविध कार्यक्रमही लांबणीवर टाकण्यात आले आहेत, अशी माहिती महापौर अपर्णा डोके यांनी पत्रकारांना दिली.
‘जेएनएनयूआरएम’अंतर्गत महापालिकेच्या वतीने तयार करण्यात आलेल्या झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतील ४०० सदनिकांचे वाटप निगडी येथे शरद पवार यांच्या हस्ते होणार होते. त्याचप्रमाणे चिंचवड येथील रामकृष्ण मोरे नाटय़गृहात आजपासून पालिकेचा स्वरसागर संगीत महोत्सव सुरू होणार होता. याशिवाय पोलीस आयुक्त डॉ. सत्यपालसिंह व पालिका आयुक्त आशिष शर्मा यांच्या उपस्थितीत संत तुकारामनगर येथील आचार्य अत्रे मंदिरात गणपती मंडळांच्या कार्यकर्त्यांची बैठकही झाली नाही. शरद पवार यांनीही व्यक्तिश: दूरध्वनी करून हे कार्यक्रम पुढे ढकलण्याची सूचना केली असल्याचे महापौरांनी सांगितले. शहरातील सर्व थिएटर्स व मॉल्स बंद असल्याचे आज दिसले. नेहमी गजबजलेल्या या परिसरात आज शुकशुकाट होता.
संस्था, संघटनांचे जनजागृती अभियान
शहरातील संस्था-संघटनांनी ‘स्वाइन फ्लू’बद्दल जनजागृती अभियान सुरू केले आहे. या आजाराबद्दल भीती बाळगू नका, अफवांवर विश्वास ठेवू नका, असे या कार्यकर्त्यांनी नागरिकांना सांगितले. नेहरूनगर येथील युवा प्रतिष्ठानच्या वतीने ‘रॅली’चे आयोजन करण्यात आले होते. माजी महापौर हनुमंत भोसले व डॉ.संजय घाडगे यांच्या नेतृत्वाखाली मदन चौधरी, संजय चौधरी, अजय गव्हाणे, शेषनाथ ठाकूर, श्रीकांत इंगळे आदी प्रमुखांनी सहभाग घेतला होता. भोसरी येथील ओम हॉस्पिटलच्या वतीने चंद्रफुल गार्डन येथे शहरातील डॉक्टरांसाठी मार्गदर्शन शिबिर आयोजित केले होते. दीडशे डॉक्टर्स सहभागी झाले होते. रुबी हॉलच्या ट्रामा युनिटचे संचालक डॉ.कुपल झिरपे व ससून रुग्णालयातील मेडिसिन विभागाचे प्रमुख डॉ.श्रीमती एस.ए.सांगळे यांनी मार्गदर्शन केले.महापालिकेच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ.नागकुमार कुणचगी, तसेच ओम हॉस्पिटलचे संचालक अशोक अग्रवाल यांनीही मार्गदर्शन केले.
भोसरी येथील राजमाता जिजाऊ महाविद्यालयाने आयोजित केलेल्या व्याख्यानात डॉ.किशोर खिलारे यांनी या आजाराविषयी घ्यावयाच्या खबरदारीची माहिती दिली. संस्था खजिनदार अजित गव्हाणे, तसेच विश्वस्त प्रताप खराडे या वेळी उपस्थित होते. यमुनानगर येथील मॉडर्न महाविद्यालयात पालक व शिक्षकांसाठी डॉ.अन्नू गायकवाड यांनी सतत हात धुणे, मास्क वापरणे, गर्दीपासून दूर राहण्याचा सल्ला दिला. शाळा समिती अध्यक्ष शरद इनामदार,प्रश्नचार्य श्यामराव बनसोडे व लायन्स क्लबचे अध्यक्ष डॉ.सुशील आग्रवाल उपस्थित होते. चिंचवड येथील कर्तव्य फाऊंडेशनने शहरातील सर्व पोलिसांना मोफत मास्क वाटप केले. गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांनी चिंचवड परिसरात नागरिकांना मास्क वाटप केले. अ‍ॅड.सचिन पटवर्धन, संचालिका अपर्णा मणेरीकर, सतीश चव्हाण या मोहिमेत सहभागी झाले होते. शिवसेनेचे माजी शहरप्रमुख बाबासाहेब धुमाळ यांनी निगडी येथील पेट्रोल पंपावर ‘स्वाइन फ्लू’ आजारावर आयुर्वेदिक उपचार म्हणून येणाऱ्या प्रत्येक दुचाकीचालकाला निलगिरी तेलाचा बोळा व कापराच्या वडय़ा भेट दिल्या. दरम्यान, उपमहापौर शरद बोऱ्हाडे यांनी मोशी येथे या आजाराची तपासणी करण्यासाठी केंद्र सुरू करण्याची मागणी आयुक्त आशिष शर्मा यांच्याकडे केली आहे.