Leading International Marathi News Daily

बुधवार, १२ ऑगस्ट २००९

(सविस्तर वृत्त)

रुग्णांचे नमुने घेण्याची परवानगी देण्याची खासगी डॉक्टरांची मागणी
पुणे, ११ ऑगस्ट / प्रतिनिधी

ताप, सर्दी, खोकल्याची तपासणी करण्यासाठी खासगी दवाखाने तसेच डॉक्टरांची तयारी असून

 

रुग्णावर तातडीने उपचार करण्यासाठी त्यांना रुग्णाचे नमुने घेण्याचे अधिकार जिल्हा प्रशासनाने द्यावेत, अशी मागणी जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशनर्सच्या वतीने आज करण्यात आली आहे. विविध मागण्याही त्यांनी केल्या आहेत.
या संदर्भात जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशनचे (जीपीए) अध्यक्ष डॉ. अनिल भांडवलकर यांनी ‘लोकसत्ता’ ला ही माहिती दिली. प्रश्नथमिक रुग्णांची तपासणी करण्यास खासगी दवाखाने तसेच डॉक्टर नकार देत असल्याचा आरोप त्यांनी या वेळी फेटाळून लावला. ‘‘शहरात आठ ते दहा हजार फॅमिली डॉक्टर्स आहेत. सध्या स्वाइन फ्लूची साथ असल्याने या रुग्णांना तपासण्यास आम्ही तयार आहेत. आजही प्रत्येक डॉक्टर रोज शंभर ते सव्वाशे रुग्णांची तपासणी करीत आहेत. त्यामुळे या साथीचा सर्वाधिक धोका हा रुग्णांना तपासणाऱ्या डॉक्टरांनाच आहे. हे नुकत्याच मृत्यू झालेल्या डॉ. बाबासाहेब माने यांच्यावरून स्पष्ट होते. राज्य सरकारने रुग्णांची तपासणी करणाऱ्या खासगी रुग्णालयातील डॉक्टरांना ‘एन ९५’ हा मास्क द्यावा. तसेच प्रतिबंधात्मक उपचार म्हणून ‘टॅमी फ्लू’ हे औषध उपलब्ध करून द्यावे. कोणी संशयित असेल, तर त्याची तातडीने घशातील, नाकातील द्रवाचे नमुने घेण्याची परवानगी आम्हाला द्यावी,’’ अशी मागणी डॉ. अनिल भांडवलकर यांनी केली.
रुग्णांची तपासणी करण्यासाठी राज्य आणि केंद्र सरकारकडून येणाऱ्या विविध मार्गदर्शिका वेळोवेळी बदलल्या जातात. मात्र त्याची खासगी रुग्णालये, डॉक्टरांना माहिती नसते. त्यामुळे नव्याने जारी करण्यात आलेल्या मार्गदर्शिकांची आम्हाला माहिती नाही. त्यामुळे ही मार्गदर्शिका आम्हाला देण्यात यावी. राज्य सरकारचे अधिकारी, खासगी वैद्यकीय संघटना आणि स्वयंसेवी संस्था यांच्यात समन्वय साधण्यासाठी एका सुकाणू समितीची स्थापना करण्यात यावी, अशीही मागणी असल्याचे त्यांनी सांगितले.