Leading International Marathi News Daily

बुधवार, १२ ऑगस्ट २००९

(सविस्तर वृत्त)

उजनीतील प्रदूषणाने आरोग्याला धोका
इंदापूर, ११ ऑगस्ट/वार्ताहर

उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील औद्योगिक कारखान्यातील रासायनिक घाण पाणी उजनी धरणाच्या जलाशयात येत असल्याने उजनी धरणातील पाणी दिवसेंदिवस प्रदूषित होत असून,

 

उजनी धरणाच्या जलाशयातून अथवा जलाशयालगतच्या पाणीपुरवठा योजनेतून ज्या गावांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होत आहे. तेथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या प्रदूषणाबाबत राज्य शासनाने हे पाणी त्वरित तपासून उजनीचे पाणी लोकांना पिण्यास योग्य आहे की, अयोग्य हे तातडीने जाहीर करावे अशी मागणी या परिसरातून होत आहे.
गत तीन वर्षापूर्वी उजनी धरणाच्या जलाशयात पळसदेव, काळेवाडी, बांडेवाडी, माळेवाडी या भागात जवळपास १० किलोमीटर अंतरात फेसाळयुक्त तवंग उजनी जलाशयात आढळून आला होता. त्यावेळी दैनिक लोकसत्ताने उजनीतील पाण्यात वाढत्या प्रदूषणाबाबत आवाज उठविला होता. त्यावेळी प्रदूषण नियामक मंडळाने उजनीच्या पाण्याचे नमुने तपासणीसाठी नेले होते. मात्र त्यावेळी प्रदूषण नियामक मंडळाने पाणी तपासून त्यात आढळलेल्या घटकाचा अहवाल वृत्तपत्रातून जाहीर केला नाही.
मागील आठवडय़ात तर उजनी धरणाच्या जलाशयात कुंभारगावच्या परिसरात अक्षरश: पाण्याला उकळ्या फुटल्या, काळसर रंगाचे पाणी हवेत फवाऱ्यासारखे उडाले, मच्छीमारांमध्ये या प्रकारामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले. हा नेमका काय प्रकार आहे ते पाणी तपासून लोकांना सांगावे, अशी मागणी होत आहे.
यावर्षी उजनीच्या पाणलोट क्षेत्रात समाधानकारक पाऊस अद्यापही झाला नाही, त्यामुळे धरण भरून, अतिरिक्त पाणी वाहून न गेल्यामुळे रासायनिक घाणीचे विघटन न झाल्याने उजनीचे पाणी तोंडातही धरवत नाही. परंतु हेच पाणी जलाशयालगतच्या लोकांना पिण्यासाठी वापरावे लागत असल्याने, येथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात असून, दूषित पाणी प्यालाने येथील लोकांना पोटाचे विकार, जिवघेणी कावीळ आदी विकार जडले असल्याचे निदर्शनास येत आहे.
उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील कारखानदार आपल्या कारखान्याच्या प्रदूषित पाण्याचे व रासायनिक घाणीची विल्हेवाट कशी लावतात. त्या घाणीत कोणते जिवघेणे रासायनिक घटक आहेत. हे तातडीने तपासून सर्व कारखान्यांची प्रदूषित पाण्याच्या विल्हेवाटीची त्वरित चौकशी करावी व कारखानदारीपासून लोकांच्या जिवीतास, पर्यावरणास धोका येत असेल तर तातडीने उपाययोजना करण्याची गरज आहे. उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात दरवर्षी हिवाळ्यात जगाच्या कानाकोपऱ्यातून अनेक पक्षी येतात, काही जातीच्या पक्षांचा तर येथे विणीचा हंगाम येथेच होतो. या पक्ष्यांचे वास्तव्य व अन्न, पाण्यातूनच मिळविले जात असल्याने प्रदूषित पाण्याचा या पक्ष्यांनाही फटका बसत आहे. अनेक वेळा उजनी जलाशयालगत लहान- लहान पक्षी मृत्यूमुखी पडल्याचे आढळून आले आहे. त्याचबरोबर उजनीच्या पाण्यात असलेल्या अनेक पानवनस्पतीचे अस्तित्वच आता धोक्यात आले आहे. अनेक पानवनस्पती नामदोष होण्याच्या मार्गावर असून, जलचर प्रश्नण्याच्या अनेक जाती, प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. अनेक जलचर प्रश्नणी आता पाण्यात आढळत नसल्याचे अभ्यासक्रमाचे व या परिसरात वावरणाऱ्यांचे मत आहे. उजनीतील पाण्याचे प्रदूषण असेच वाढत गेले तर पर्यावरणासह मानवी जिवीतास मोठा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.