Leading International Marathi News Daily

बुधवार, १२ ऑगस्ट २००९

(सविस्तर वृत्त)

स्वाइन फ्लूच्या साथीचा वराहपालनास फटका
पुणे, ११ ऑगस्ट/ खास प्रतिनिधी

वेगाने पसरत असलेल्या स्वाइन फ्लूच्या साथीशी वराहपालन केंद्र वा इतस्तत: वावरणाऱ्या डुकरांचा काहीही संबंध नाही, असे राज्याचे पशुसंवर्धन आयुक्त दादासाहेब झगडे यांनी आज

 

लोकसत्ताशी बोलताना स्पष्ट केले.
स्वाइन फ्लू (एच१एन१) हा माणसापासून माणसाला होणारा रोग असून डुकरापासून माणसाला तो झाला आहे हे अजूनही स्पष्ट झालेले नाही. परदेशात प्रश्नमुख्याने डुकरांचे मांस मोठय़ा प्रमाणावर खाल्ले जाते. त्यामुळे डुकरांमुळे तो झाला असावा, अशी शंका व्यक्त करण्यात आली होती. तथापि, या आजाराच्या मुळाबद्दल अजूनही वाद आहेत, असेही झगडे यांनी सांगितले. दोन- तीन महिन्यांपूर्वी जळगाव, जालना जिल्ह्य़ातील काही वराहपालन केंद्रांमध्ये अचानक डुकरे आजारी पडत असल्याचे आढळून आले होते. त्यावेळी त्यांच्या नाकातील स्रावाचे नमुने भोपाळच्या इज्जतनगर येथील पशुरोग संशोधन संस्थेकडे (व्हीआरआय) पाठविण्यात आले होते. त्यावेळी तापाबरोबरच ‘फ्लू’ च्या दृष्टिकोनातूनही त्यांची तपासणी करण्याची विनंती करण्यात आली होती. या तपासणीत हे नमुने तापासाठी पॉझिटिव्ह आढळले, तर फ्लूसाठी निगेटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले होते. या तपासणीनंतर केलेल्या औषधोपचारामुळे डुकरांना होणाऱ्या आजाराला प्रतिबंध बसला आहे. त्यानंतर राज्यात कोठेही डुकरे आजारी पडल्याच्या घटनांची नोंद झालेली नाही, असेही झगडे यांनी स्पष्ट केले.
‘पोर्क’ विक्रीत घट
स्वाइन फ्लूमुळे शहरातील पोर्क विक्रेत्यांना मोठा फटका बसला आहे. चवीने पोर्कची चव घेणाऱ्यांनी भीतीमुळे डुकराचे मांस खरेदी करण्याचे टाळले आहे. त्यामुळे दररोज किमान शंभर किलो पोर्कची विक्री करणाऱ्या व्यावसायिकांकडून दिवसभरात कसेबसे २०- २५ किलो मांस विकले जाऊ लागले आहे. कैकाडी, खाटीक, वाल्मिकी, कोल्हाटी, वडार अशा विविध समाजातील ३० हजाराहून कुटुंबे या व्यवसायावर अवलंबून असून पुण्यातही त्यांची संख्या दीडशे ते दोनशेच्या आसपास आहे. स्वाइन फ्लूच्या भीतीमुळे व्यवसाय अडचणीत आले असून या बाबतचा गैरसमज लवकर दूर होणे गरजेचे आहे, अशी अपेक्षा डायमंड पोर्क शॉपचे किरण परदेशी यांनी व्यक्त केली आहे.