Leading International Marathi News Daily

बुधवार, १२ ऑगस्ट २००९

राज्य

नको पुनरावृत्ती.. चुकांच्या पुणे मॉडेलची!
पुण्यामध्ये क्रांती घडते नि कालांतराने सर्वत्र तिचा प्रसार होतो. चोखंदळ पुणेकर ग्राहकांनी एखादी गोष्ट स्वीकारली की, मग तिला सर्वमान्यता मिळते.. अशी वक्तव्ये कधी गौरवार्थ, तर कधी उपहासाने केली जातात. ‘स्वाइन फ्लू’च्या संसर्गामध्येही पुणे हाच केंद्रबिंदू आहे. ‘स्वाइन फ्लू’चा सामना करताना पुण्यामध्ये झालेल्या चुका, नियोजनात राहिलेल्या त्रुटी प्रारंभीच टाळल्यास मुंबईसह राज्यातील अन्य ठिकाणी या संसर्गाचा मुकाबला करण्यातील निम्मे अडथळे दूर होतील. म्हणूनच, चुकांच्या या ‘पुणे मॉडेल’वर टाकलेला प्रकाश..

‘स्वाइन फ्लू’च्या विषाणूंचा प्रसार रोखणे शक्य!
पुणे, ११ ऑगस्ट/प्रतिनिधी

थंडी-ताप, सर्दी-खोकला आणि घशाचे दुखणे सुरू होताच वेळ न दडवता त्वरित टॅमी फ्लूसारखे प्रभावी औषध रुग्णांना दिल्यास ‘स्वाइन फ्लू’च्या विषाणूंचा प्रसार रोखणे शक्य आहे, असे मत ज्येष्ठ आरोग्यतज्ज्ञ बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाचे निवृत्त प्राध्यापक डॉ. एन. एस. देवधर यांनी आज व्यक्त केले. तसेच शाळा, महाविद्यालये आणि चित्रपटगृहे बंद केल्याने या विषाणूंचा प्रसार रोखणे शक्य नाही,असेही त्यांनी स्पष्ट केले.

‘स्वाइन फ्लू’च्या संशयितांचे नमुने यापुढे तपासणार नाही
पुणे, ११ ऑगस्ट/खास प्रतिनिधी

‘स्वाइन फ्लू’च्या संशयितांना या रोगाची लागण झाली आहे की नाही याची खात्री करण्यासाठी राष्ट्रीय विषाणू संस्थेच्या (एनआयव्ही) प्रयोगशाळांमध्ये घेण्यात येणाऱ्या चाचण्या यापुढे न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अशा चाचण्यांसाठी येणाऱ्या नमुन्यांची संख्या खूपच जास्त असल्याने आणि सर्वाचीच चाचणी करण्याची आवश्यकता नसल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती या संस्थेचे संचालक डॉ. ए. सी. मिश्रा यांनी आज ‘लोकसत्ता’ला दिली.

नव्या फ्लूवर औषधोपचार
प्रत्येक सर्दी, खोकला हा तथाकथित ‘स्वाईन फ्लू’ नसतो, हे पालकांनी ध्यानात घेतले पाहिजे. फ्लूचा आजार हा विषाणूजन्य असतो.पहिल्या दिवशी जोरदार ताप आला तरी दुसऱ्या आणि त्यानंतर तिसऱ्या दिवशी तो हळूहळू कमी कमी होत जातो. तापाचे औषध दिल्यावर तो नॉर्मलला येतो आणि मूल खेळू लागते. रुग्णाच्या खाण्या-पिण्यावर अशा व्हायरल इन्फेक्शनचा परिणाम होत नाही. इतर जीवाणूजन्य आजारांमध्येही खूप ताप येतो.

गुलटेकडीतील फुलांचा बाजार ‘स्वाइन फ्लू’मुळे बंद
पुणे, ११ ऑगस्ट / खास प्रतिनिधी

‘स्वाइन फ्लू’ची ग्रामीण भागात लागण होऊ नये यासाठी गुलटेकडी येथील फुलांचा बाजार येत्या रविवारपर्यंत (दि. १६) बंद ठेवण्याचा निर्णय फूल बाजार आडते असोसिएशनने घेतला आहे. बाजार बंद केल्यामुळे दररोज पन्नास लाखांहून अधिक रुपयांची उलाढाल थांबणार असून शेतकऱ्यांनी सुरक्षिततेच्या कारणास्तव नुकसान सहन करण्याची तयारी दर्शविली आहे.

चंद्रकांत बढे पतसंस्था संचालकांकडून १६२ कोटी वसुलीचे आदेश
नाशिक, ११ ऑगस्ट / खास प्रतिनिधी
वादग्रस्त घंटागाडी ठेकेदार रामराव पाटील प्रकरणामुळे चर्चेत आलेल्या ‘सहकार मित्र चंद्रकांत हरी बढे सर सहकारी पतसंस्था मर्यादित, वरणगाव’ या राज्यस्तरीय कार्यक्षेत्र असलेल्या पतसंस्थेच्या चौकशीचे काम पूर्ण झाले आहे. त्यानुसार संचालक मंडळाचे सर्व सदस्य व मुख्य कार्यकारी अधिकारी अशा एकूण २४ जणांना दोषी धरत त्यांच्याकडून तब्बल १६२ कोटी रुपयांची रक्कम वसूल करण्याचे आदेश बुलढाण्याचे जिल्हा उपनिबंधक तथा चौकशी अधिकारी डॉ. अशोक खरात यांनी दिले आहेत.

अर्धवट घाटघर जलविद्युत प्रकल्पाचे जलसंपदा व ऊर्जा मंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन!
शहापूर, ११ ऑगस्ट/वार्ताहर

एकीकडे ‘स्वाईन फ्लूचा’ फैलाव होतो म्हणून राजकीय पक्षांनी जाहीर सभा व मेळावे घेऊ नये, अशा सूचना पुण्यात देणाऱ्या जललंपदामंत्री अजितदादा पवार यांनी केवळ आगामी विधानसभेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून घाटघर जलविद्युत केंद्राच्या अर्धवट सयंत्राचे उद्घाटन उरकून श्रेय आज उपटले.

मंदिरांच्या मालमत्तेवर चोरटय़ांची नजर
संगमेश्वर, ११ ऑगस्ट/ वार्ताहर

कोकणातील मंदिरांना प्राचीन परंपरा आहे. शेकडो वर्षांंपूर्वीच्या या मंदिरांची रचना व शिल्पकला वैशिष्टय़पूर्ण आहे, तेवढीच या मंदिरांच्या मालकीची असणारी सोन्या-चांदीची संपत्तीही महत्त्वपूर्ण आहे. या संपत्तीचे कधीही मोजमाप केले गेले नाही. मात्र या संपत्तीवर चोरटय़ांची नजर गेल्यानंतर तिचे मोल लक्षात येऊ लागले असून संपत्तीच्या सुरक्षेचा मोठा प्रश्न पुढे आला आहे. मंदिराच्या व्यवस्थापनापुढे संपत्तीच्या सुरक्षेची चिंता निर्माण झाले असून याबाबत विविध शक्यता आणि पर्यायाचा विचार सुरू झाला आहे.

गोगटे यांना मिळालेल्या पुरस्कारामुळे त्याचीच उंची वाढली - मुंडे
सावंतवाडी, ११ ऑगस्ट/ वार्ताहर

सिंधुभूमी फाऊंडेशनच्या जीवन गौरव पुरस्काराने माजी आमदार आप्पासाहेब गोगटे यांना भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस खासदार गोपीनाथ मुंडे यांच्या हस्ते नुकतेच सन्मानित करण्यात आले. सिंधुभूमी फाऊंडेशनचा राजकीय क्षेत्रातील जीवनगौरव पुरस्कार आप्पासाहेब गोगटे यांना जाहीर झाला. एक लाख रुपये रोख, शाल, श्रीफळ व चांदीचा रथ असे पुरस्काराचे स्वरूप होते. सिंधुभूमी फाऊंडेशनचे प्रमोद जठार यांच्या संस्थेने हा पुरस्कार जाहीर केला होता.

वरिष्ठांभोवती भ्रष्टाचाराचा गाळ मग जिल्हा प्रशासनाच्या कारवाईची कशी शिजणार डाळ !
जयंत धुळप
रायगड जिल्हयाच्या खालापुर तालुक्यातील तांबाटी गावाच्या हद्दीत, दोनच वर्षांपूर्वी नव्याने सुरू झालेल्या वाशी (नवीमुंबई) येथील अनिल अग्रवाल यांच्या मालकीच्या ‘मयुरेश प्रोटिन्स मिल’ या कारखान्यात कारखान्याच्या नोंदीप्रमाणे ४५ हजार ५०० क्विंटल तुरडाळीचा असलेला साठा मनसे कार्यकर्त्यांनी सरकारी यंत्रणेस सोमवारी लक्षात आणून दिला.

नितेश राणे यांच्या अंगरक्षकाचा हवेत गोळीबार
मालेगाव, ११ ऑगस्ट / वार्ताहर
धुळे येथे आयोजित स्वाभिमान संघटनेच्या मेळाव्यासाठी जात असताना मालेगाव तालुक्यातील उमराणे गावाजवळ एका ट्रॅक्टरला धक्का लागल्यामुळे स्थानिक ग्रामस्थांशी झालेल्या वादातून माजी मुख्यमंत्री व राज्याचे विद्यमान उद्योग मंत्री नारायण राणे यांचे पूत्र आणि स्वाभिमान संघटनेचे अध्यक्ष नितेश राणे यांच्या अंगरक्षकाने हवेत गोळीबार केल्याने आज दुपारी साडे पाच वाजेच्या सुमारास ग्रामस्थ व सुरक्षा रक्षक यांच्यात संघर्ष निर्माण झाला. संतप्त जमावाने रुद्रावतार धारण करीत दगडफेक केली तसेच राणे यांच्या सुरक्षा ताफ्यातील एक जीप पेटवून दिल्यानंतर नितेशसह सर्वानीच घटनास्थळावरून काढता पाय घेतल्याने पुढील अनर्थ टळला. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. नितेश यांचा ताफा धुळ्याकडे जात असताना उमराणे गावाजवळ रस्ता ओलांडणाऱ्या राजेंद्र अहिरे या ट्रॅक्टर चालकाला ताफ्यातील एका वाहनाचा धक्का लागल्यामुळे त्याच्यासह जिप्सीमधील चार जण जखमी झाल्याने ही तणावाची परिस्थिती निर्माण झाली. जखमींना येथील खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले असून त्यापैकी एकाची प्रकृती चिंताजनक असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले.

कुणबी आगरी सेनेचे रास्ता रोको आंदोलन मुंबई-नाशिक महामार्ग दीड तास बंद
शहापूर, ११ ऑगस्ट/वार्ताहर
ठाणे जिल्ह्यातील प्रकल्पग्रस्तांच्या प्रलंबित मागण्या तात्काळ सोडवाव्यात, या मागणीसाठी कुणबी व आगरी सेनेने आज रस्त्यावर उतरून मुंबई-नाशिक महामार्ग अडवून आपला संताप व्यक्त केला. किन्हवलीकडे जाणाऱ्या फाटय़ाजवळ महामार्ग दीड तास रोखून धरला. दरम्यान येत्या दोन महिन्यात प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न सुटले नाहीत, तर रेल्वेसह मुंबईचा पाणीपुरवठा बंद करण्याचा इशारा कुणबी सेनाप्रमुख विश्वनाथ पाटील यांनी यावेळी दिला.

आदिवासी विभाग कर्मचाऱ्यांचा संप स्थगित
नाशिक, ११ ऑगस्ट / प्रतिनिधी
आदिवासी विकास विभाग कर्मचारी संघटनेच्यावतीने विविध मागण्यांसाठी पुकारलेला शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा संप तूर्त स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती विभागीय सचिव संजय जाधव यांनी येथे प्रसिद्धी पत्रकाव्दारे दिली. उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसंदर्भात मुंबई येथे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसमवेत चर्चा केल्यानंतर हा संप स्थगित करण्यात आल्याचेही या पत्रकात नमूद केले आहे. या बैठकीमध्ये प्रामुख्याने शासकीय व अनुदानित आश्रमशाळेची वेळ सकाळी अकरा ते पाच करण्यात यावी, प्राथमिक मुख्याध्यापकांची पदे पुनरु ज्जीवित करावीत, रद्द केलेली पदे पुर्नस्थापित करावीत, भरती नियम दुरुस्त करावेत आणि वर्ग १ ते वर्ग ४ मंजूरपदांना पदोन्नती द्यावी आदी मागण्यांवर याप्रसंगी चर्चा झाली. उपमुख्यमंत्र्यांनी सकारात्मक तोडगा काढल्यामुळे हा संप मागे घेण्यात आल्याचे संघटनेने म्हटले आहे. या बैठकीला आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित व संघटनेचे अध्यक्ष विक्रम गायकवाड हेही उपस्थित होते.

सुहास कांदेच्या मेहुण्याविरुद्ध मारहाणीचा गुन्हा
नाशिक, ११ ऑगस्ट / प्रतिनिधी

कार्यालयातील कर्मचाऱ्यास डांबून मारहाण केल्याप्रकरणी मंगळवारी मनसेचा वादग्रस्त माजी ग्रामीण जिल्हाप्रमुख सुहास कांदेचा शालक आणि देवाज् ग्रुपचा अध्यक्ष रवींद्र नागरे याच्यासह त्याच्या साथीदारांविरुद्ध सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी तीन संशयितांना अटकही करण्यात आली आहे. सिडकोतील जाळपोळीच्या घटनेनंतर फरार असणाऱ्या सुहास कांदेच्या देवाज ग्रुपच्या गुन्हेगारी स्वरूपाच्या कारवाया हळूहळू पुढे येत आहे. देवाज ग्रुपच्या कार्यालयात शिपाई म्हणून कार्यरत असलेल्या सचिन चावरे याने या प्रकरणी तक्रार दिली. तीन महिन्याचा थकलेला पगार घेण्यासाठी चावरे देवाज ग्रुपच्या कॅनडा कॉनर येथील कार्यालयात गेला होता. या ठिकाणी त्याला पगार तर दिला नाही उलट डांबून मारहाण करण्यात आली, असे त्याचे म्हणणे आहे.

सावंतवाडी, दोडामार्ग भागात हत्ती व गवा रेडय़ांचा धुमाकूळ
सावंतवाडी, ११ ऑगस्ट/ वार्ताहर
हत्ती व गवा रेडय़ांच्या कळपाने सावंतवाडी आणि दोडामार्ग तालुक्यात भातशेती व बागायतीची मोठय़ा प्रमाणात हानी केली आहे. मात्र वन खात्याने त्याकडे दुर्लक्ष चालविले आहे.सावंतवाडी व दोडामार्ग तालुक्यात गवा रेडे, हत्ती, माकड, मोर यांसह विविध पशु-पक्ष्यांनी भातशेती व फळ बागायतीचे मोठे नुकसान केले.हत्ती रात्रीच्या वेळी भरवस्तीत येत आहेत. सावंतवाडी शहरापासून सुमारे दोन कि.मी. अंतरावर असणाऱ्या माजगाव या गावात हत्ती लोकवस्तीत आले. त्यामुळे संध्याकाळ झाल्यानंतर लोकांनी घरात कोंडून घेण्याचा प्रसंग घडला.हत्तीचे खाद्य असणारे भातशेतीसह अन्य पिकेही घराच्या बाहेर ठेवण्यास लोक तयार नाहीत. हत्ती चक्क घराच्या अंगणातही पोहोचत आहेत. त्यामुळे लोकांत भीती पसरली आहे.गेली आठ वर्षे हत्तींनी भातशेती, फळझाड लागवडीचे मोठे नुकसान केले. त्याची काही प्रमाणात भरपाई देण्यात आली. मात्र लोक शेती-बागायतीपासून मुकले आहेत. कष्टाने केलेल्या बागायतीत हत्ती पुन्हा पुन्हा येत असतात. त्यामुळे नारळ, केळी झाडांचे मोठे नुकसान होत आहे.हत्ती, गवा रेडे, मोर व माकडांचा हैदोस शेतकऱ्यांना तापदायक ठरत आहे, त्याकडे शासनाने जाणीवपूर्वक लक्ष देण्याची मागणी करण्यात आली आहे.

ट्रक-मोटारसायकल अपघातात १ ठार
पाली, ११ ऑगस्ट/ वार्ताहर

पेडली गावच्या हद्दीत राज्य महामार्गावरील एका धोकादायक वळणावर वाळूचा भरलेला ट्रक व मोटारसायकल यांची टक्कर होऊन मोटारसायकलस्वार नीलेश पांडुरंग खेत्री (२८, रा. शेंडुग, ता. पनवेल) जागीच ठार झाला. पनवेल येथून हरिहरेश्वराच्या दर्शनासाठी मोटारसायकलवर निघालेले नीलेश खेत्री व ज्ञानेश्वर सार्डेकर (रा. आजिवली, पनवेल) हे पेडली गावच्या हद्दीत अल्ट्रा ड्रायटेक कंपनीसमोरील वळणावर आले असताना खोपोलीकडे जाणाऱ्या वाळूच्या ट्रकशी टक्कर झाली व त्यात नीलेश जागीच ठार, तर ज्ञानेश्वर हा किरकोळ जखमी झाला. ट्रकचालक हनुमंत बिरासदार (सावरोली, ता. खालापूर) यास पोलिसांनी अटक केली आहे.

स्वाईन फ्ल्यूच्या अफवेमुळे कर्जतमध्ये विनाकारण भीती
कर्जत, ११ ऑगस्ट/ वार्ताहर
कर्जतमध्ये स्वाईन फ्ल्यू या संसर्गजन्य रोगाची लागण झाली असल्याच्या अफवेमुळे शहरात विनाकारण घबराटीचे वातावरण निर्माण झाले. मात्र प्रत्यक्षात अशी परिस्थिती नसून नागरिकांनी मुळीच घाबरून जाऊ नये, असे आवाहन कर्जतच्या उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. भालचंद्र निलेगावकर यांनी केले आहे. कर्जत नगर परिषद क्षेत्रातील दहिवली येथील एका महिलेला स्वाईन फ्ल्यूची लागण झाली असल्याचे वृत्त काही वृत्तपत्रांतून (‘लोकसत्ता’मध्ये नव्हे) प्रसिद्ध झाल्यापासून संपूर्ण तालुक्यात प्रचंड भीतीचे वातावरण अनुभवास येऊ लागले. मात्र प्रत्यक्षात ही बाब मुळीच निष्पन्न झालेली नसल्याचे डॉ. निलेगावकर यांनी सांगितले. संबंधित महिलेला पूर्वीपासूनच त्रास होत होता. तिची तपासणी करण्यात आल्यानंतर तिच्या नातेवाईकांच्या आग्रहावरूनच पुढील तपासणीकरिता तिला कस्तुरबा रुग्णालयात पाठविण्यात आले होते. तिच्या तपासणीचा अहवाल अद्याप प्राप्त झालेला नव्हता. कालपासून आपण स्वत: संबंधित महिलेशी भ्रमणध्वनीवरून संपर्कात आहोत. आज आपल्या प्रकृतीत बरीच सुधारणा झाली असल्याचे तिने स्वत: आपल्याला सांगितले असल्याचेही त्यांनी सांगितले.

पाली ग्रामपंचायत सदस्य मनोज शिंदे यांचे सदस्यत्व रद्द
जातीचा दाखला अवैध
पाली, ११ ऑगस्ट/ वार्ताहर

मार्च २००८ मध्ये झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत पालीतील वॉर्ड क्र. पाचमधून इतर मागासवर्गीय जागेसाठी मनोज शिंदे हे विजयी झाले, परंतु त्यांनी दिलेला ‘हिंदू कुणबी’ हा दाखला अवैध ठरल्याने त्यांचे सदस्यत्व रद्द झाल्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी सुधागडच्या तहसीलदारांना दिले आहेत. शिंदे यांनी हिंदू कुणबी असल्याचा दाखला देऊन इतर मागासवर्गीय जागेवर निवडणूक लढविली होती, परंतु भाजपचे तालुका अध्यक्ष सुनील दांडेकर व सदस्य जितेंद्र केळकर यांनी सदर दाखला खोटा असल्याबाबत तक्रार दाखल केली होती. या दाखल्याबाबत विभागीय जात पडताळणी समिती, मुंबई यांच्यातर्फे सुनावणी होऊन हा दाखला अवैध ठरविण्यात आला. याचा आधार घेत राज्य निवडणूक आयोग यांच्या आदेशान्वये जिल्हाधिकारी यांनी शिंदे यांना ग्रुप ग्रामपंचायत पालीतील सदस्य म्हणून काम करण्यास अपात्र ठरविले असून, त्यांचे पद रिक्त झाल्याचे जाहीर केले आहे.जातीचा दाखला अवैध आहे हे ठरविण्यासाठी दांडेकर यांनी जवळपास सात पुरावे सादर केले होते.