Leading International Marathi News Daily

बुधवार, १२ ऑगस्ट २००९

क्रीडा

थोडी खुषी, थोडा गम
पी. कश्यप विजयी तर अरविंद भट्ट पराभूत
हैदराबाद, ११ ऑगस्ट / पीटीआय
भारताच्या पी. कश्यप याने जागतिक बॅडमिंटन स्पर्धेतील पहिला अडथळा दूर करीत दुसऱ्या फेरीत स्थान मिळविले. मात्र त्याच्या अरविंद भट्ट व सायली गोखले या सहकाऱ्यांना एकेरीत पराभव स्वीकारावा लागला. कश्यप याने इराणच्या अली शाहसोईनी याच्यावर २१-९, २१-१३ असा दणदणीत विजय नोंदविताना चतुरस्र खेळ केला. त्याने ड्रॉपशॉट्सचा सुरेख खेळ केला तसेच त्याने सव्‍‌र्हिसवरही चांगले नियंत्रण राखले होते. या स्पर्धेत पुण्याचे आशास्थान असलेल्या सायली हिला आज पहिला अडथळा पार करण्यात अपयश आले. जेई याओ हिने तिच्यावर २१-१५, २१-१४ अशी मात केली.

स्वाइन फ्लूच्या अफवेमुळे बॅडमिंटन स्पर्धेत खळबळ
मलेशियाचा प्रशिक्षक रुग्णालयात दाखल
अतिशय प्रतिष्ठेच्या मानल्या गेलेल्या जागतिक बॅडिमटन स्पर्धेत आज स्वाइन फ्लूच्या अफवेमुळे खळबळ उडाली. मलेशियाच्या एका प्रशिक्षकास फ्लूच्या आजारामुळे येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याला स्वाइन फ्लू झाला असल्याची अफवा पसरली होती.जागतिक बॅडमिंटन महासंघाचे मुख्य कार्यकारी अधिकारी थॉमस लुंड यांनी या प्रशिक्षकाचे नाव सांगण्यास नकार दिला.

फिटनेस चाचणीला सचिनची दांडी
मुंबई, ११ ऑगस्ट/ क्री. प्र.

येथील वांद्रा-कुर्ला क्रीडा संकुलात आजपासून सुरू झालेल्या फिटनेस चाचणीला मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरने पहिल्याच दिवशी दांडी मारली. त्याच्याबरोबरच संघाचा वरिष्ठ सभासद असलेला राहुल द्रविडही फिटनेस चाचणीला गैरहजर राहीला होता. हे दोघेही वरिष्ठ खेळाडू फिटनेस चाचणीला उपस्थित नसले तरी संघाचे प्रशिक्षक गॅरी कर्स्टन यांच्या मार्गदर्शनाखाली पश्चिम आणि दक्षिण विभागातील क्रिकेटपटूंनी चांगलाच घाम गाळला.
काल दिल्लीतील फिरोश शहा कोटला येथे संघातील काही क्रिकेटपटूंची फिटनेस चाचणी घेतल्यानंतर आज येथे संघाचे प्रशिक्षक गॅरी कर्स्टन सकाळीच हजर झाले होते.

पॉन्टिंगला आराम हवाय
मेलबर्न, ११ ऑगस्ट/ पीटीआय

अ‍ॅशेस मालिकेच्या मानसीक दबावाने ऑस्ट्रेलियाचा कर्णधार रिकी पॉन्टिंग थकलेला असून त्याला विश्रांती हवी आहे. त्यामुळे अ‍ॅशेस मालिका संपल्यानंतर पॉन्टिंग मायदेशी रवाना होणार असून त्याला इंग्लंडविरूद्धच्या ट्वेन्टी-२० आणि काही एकदिवसीय सामन्यांना मुकावे लागणार आहे. पॉन्टिंगच्या गैरहजेरीत मायकेल क्लार्क संघाची धुरा वाहणार आहे. तर उपकर्णधारपद यष्टीरक्षक बॅड्र हॅडिनला देण्यात येणार आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या निवड समितीचे अध्यक्ष अ‍ॅन्ड्रय़ू हिल्डीच म्हणाले की, अ‍ॅशेस मालिकेतील अंतिम सामना ओव्हल येथे होणार असून त्यानंतर पॉन्टिंग विश्रांतीसाठी मायदेशी रवाना होणार आहे.

क्लार्कगिरी कामी आली- जॉन्सन
लीड्स, ११ ऑगस्ट/ वृत्तसंस्था

अ‍ॅशेस मालिकेतील पहिल्या तीन सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियाचा वेगनाव गोलंदाज अपयशी ठरला होता. यावेळी त्याच्यावर चोहोबाजूंनी टिका तर होतच होती, पण त्याचबरोबर अनेक सल्लेही त्याला देण्यात येत होते आणि या सल्ल्यांनी तो हैराण झाला होता. यावेळी काय करावे आणि काय करू नये हे त्याला कळत नव्हते. पण अश्या दडपणाखाली असताना त्याला संघाचा उपकर्णधार मायकेल क्लार्कने सल्ला दिला आणि ही ‘क्लार्कगिरी’ त्याच्या चांगलीच कामी आली, असे दस्तरखुद्द जॉन्सनने सांगितले आहे.

फ्लिन्टॉफ फिट
लीड्स, ११ ऑगस्ट/ पीटीआय

दुखापतीमुळे चौथ्या सामन्याला मुकलेला इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू अ‍ॅन्ड्रय़ू फ्लिन्टॉफ फिट झाला असून २० ऑगस्टपासून अ‍ॅशेस मालिकेतील पाचव्या आणि निर्णायक सामन्यात तो खेळू शकणार आहे. ३१ वर्षीय फ्लिन्टॉफ गेले काही वर्ष दुखापतीने हैराण आहे. आयपीएल दरम्यान त्याला झालेल्या दुखापतीमुळे त्याला ट्वेन्ची-२० विश्वचषकाला मुकावे लागले होते. तर त्यानंतर उजव्या गुडघ्याला झालेल्या दुखापतीमुळे त्याला अ‍ॅशेस मालिकेतील चौथ्या सामन्याला मुकावे लागले होते.

आयपीएलचा तिसरा टप्पा १२ मार्चपासून
मुंबई, ११ ऑगस्ट/ क्री.प्र.

इंडियन प्रिमियर लिगच्या तिसऱ्या टप्प्यातील स्पर्धेला पुढील वर्षी १२ मार्चपासून सुरुवात होणार असून दुसऱ्या टप्प्यातील विजेते डेक्कन चार्जर्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात हैदराबाद यांच्यात सलामी झडणार आहे. स्पर्धेसाठी चार नवीन ठिकाणांचा समावेश आणि तिसऱ्या क्रमांकासाठीची लढत ही तिसऱ्या टप्प्यातील आय.पी.एल. स्पर्धेची वैशिष्टय़े आहेत.

निवड समिती सदस्यत्वाचा शिशिर हट्टंगडी यांचा राजीनामा
मुंबई, ११ ऑगस्ट/ क्री.प्र.

मुंबई क्रिकेट असोसिएशनमधील वाद आणि संघर्ष पुन्हा एकदा चव्हाटय़ावर आले असून निवड समितीचे सदस्य शिशिर हट्टंगडी यांनी तडकाफडकी आपल्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. सुनील गावसकर यांच्या नेतृत्वाखाली नियुक्त करण्यात आलेल्या क्रिकेट विकास समितीला नव्या निवड समितीची निवड करण्यासाठी अद्यापि वेळ मिळाला नाही.

आशियाई कॅरम स्पर्धेत भारताचा दुहेरी विजय
पुणे, ११ ऑगस्ट / प्रतिनिधी

भारताने पुरुष व महिला गटात सहज विजय मिळवित आशियाई कॅरम स्पर्धेत आज उद्घाटनाच्या दिवशी दुहेरी कामगिरी केली.शिवछत्रपती क्रीडानगरीत आजपासून सुरू झालेल्या या स्पर्धेत भारताने पुरुष गटात मालदीव संघावर ३-० अशी मात केली. त्या वेळी पहिल्या लढतीत जागतिक विजेत्या योगेश परदेशी याने हमीद खान याचा २५-०, २५-७ असा दणदणीत पराभव केला.

ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघटनेमध्ये मॅथ्यू हेडन
मेलबर्न, ११ ऑगस्ट,/ वृत्तसंस्था
ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघटनेत खेळाडूंचा प्रतिनिधी म्हणून माजी आघाडीवीर मॅथ्यू हेडन याची निवड करण्यात आली आहे.१४ सदस्यीय ऑस्ट्रेलिया मंडळात खेळाडूंचे प्रतिनिधित्व सध्या अ‍ॅलन बोर्डर करीत आहेत. हेडनची बोर्डर यांच्या जागी नियुक्ती करण्यात आली आहे.हेडन याचा दीर्घ अनुभव व आयपीएलसारख्या स्पर्धेतील त्याचा सहभाग लक्षात घेता त्याच्याशिवाय चांगला प्रतिनिधी मंडळाला मिळणार नाही. खेळाडूंची मानसिकता हेडनला चांगली ठाऊक आहे. खेळाडूंची विचार करण्याची पद्धतही त्याला माहीत आहे. त्यामुळे त्याची मंडळाला मोठी मदत होणार आहे, असे ऑस्ट्रेलिया मंडळाच्या एका पदाधिकाऱ्यांने सांगितले.‘ऑस्ट्रेलियन क्रिकेटर्स असोसिएशन’ या संघटनेचा पदाधिकारी म्हणून हेडनने काम केले आहे. तसेच ऑस्ट्रेलिया मंडळाबरोबर कराराबाबतच्या वाटाघाटींतही त्याने भाग घेतला आहे. आठ वर्षे काम पाहिल्यानंतर अ‍ॅलन बोर्डर यांनी या कामातून मुक्त करण्याची विनंती ऑस्ट्रेलिया मंडळाला केली.

पाकिस्तान संघातील काही खेळाडूंनी निवृत्ती घ्यावी- राजा
कराची, ११ ऑगस्ट,/ वृत्तसंस्था
श्रीलंका दौऱ्यातील दारुण पराभवाच्या पाश्र्वभूमीवर पाकिस्तान संघातील काही खेळाडूंनी निवृत्ती पत्करणेच इष्ट ठरेल, असे मत पाकिस्तानचा माजी कर्णधार रमीझ राजा याने व्यक्त केले आहे.
पाकिस्तान संघाला श्रीलंका दौऱ्यात कसोटी आणि एकदिवसीय मालिकाही गमवावी लागली आहे.त्यासंदर्भात रमीझ म्हणाला की, श्रीलंका दौऱ्यातील स्वत:ची कामगिरी पाहून काही खेळाडूंनी निवृत्तीचा निर्णय घ्यावा व तरुण खेळाडूंना संधी द्यावी. त्यांनी तसे केले तर एक चांगला पायंडा पडेल.यावेळी रमीझने कोणत्याही खेळाडूचे नाव घेतले नाही. तो पुढे म्हणाला की, पाकिस्तान निवड समितीने आगामी पाच-सहा वर्षांचा विचार करून संघ निवडावा. २०११ ची विश्वचषक स्पर्धा दोनच वर्षांनी होणार आहे. त्यामुळे जे खेळाडू वर्षां-दोन वर्षांपेक्षा अधिक काळ खेळू शकणार नाहीत अशा खेळाडूंना निवड समितीने आत्ताच डच्चू देऊन टाकावा.
पाकिस्तान खेळाडूंचे बुकींशी संबंध असल्याचा आरोप करणाऱ्या माजी खेळाडूंनाही रमीझने यावेळी फटकारले.

झहीरच्या अनुपस्थितीमुळे भारताच्या कामगिरीवर परिणाम होणार नाही- गांगुली
कोलकाता, ११ ऑगस्ट/वृत्तसंस्था

डावखुरा जलदगती गोलंदाज झहीर खान याच्या अनुपस्थितीमुळे चॅम्पियन करंडक स्पर्धेत भारताच्या कामगिरीवर काहीच परिणाम पडणार नाही, असे मत भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली याने व्यक्त केले आहे. कोलकाता नाईट रायडर्स संघाच्या फिटनेस चाचणीनंतर पत्रकारांशी बोलताना सौरव म्हणाला की, वेस्ट इंडिजमध्ये वीरेंद्र सेहवाग आणि झहीर खान संघात नसतानाही भारताने एकदिवसीय मालिकेत २-१ असा विजय मिळविला होता. उलट झहीरच्या अनुपस्थितीमुळे युवा गोलंदाजांना आपली गुणवत्ता दाखविण्याची संधी मिळेल.चॅम्पियन करंडक स्पर्धेत झहीर खेळू शकणार नाही हे मंडळातर्फेच जाहीर करण्यात आले आहे. सेहवाग या स्पर्धेत खेळणार की नाही याबाबत संदिग्धता आहे. चॅम्पियन करंडक स्पर्धेसाठी दिल्लीत सोमवारी झालेल्या फिटनेस शिबिराला सेहवाग उपस्थित नव्हता. श्रीलंका दौऱ्यासाठी आणि चॅम्पियन करंडक स्पर्धेसाठीचा संघ या फिटनेस चाचणीच्या आधारे निवडण्यात येणार आहे.