Leading International Marathi News Daily

बुधवार, १२ ऑगस्ट २००९

सुंदर ठाण्याची अस्वच्छतेकडे वाटचाल!
शशिकांत कोठेकर

ठाणे - राज्याची वाटचाल हागणदारीमुक्ततेकडे चालली असताना प्रत्येक गाव हागणदारीमुक्त करण्याचा विडा राज्य शासनाने उचलला असताना एकेकाळी सुंदर, स्वच्छ शहराचा पुरस्कार मिळविलेल्या ठाणे शहराची वाटचाल हागणदारीयुक्त शहर अशी होत चालली आहे.शहरातील मोकळ्या भूखंडांवर, कचरा, डेब्रिज टाकायचा, आसपासच्या परिसरातील नागरिकांनी या मोकळ्या जागेवर आपले प्रातर्विधी उरकायचे असा प्रकार राजरोस सुरू आहे.

पोलिसांच्या मानवाधिकाराची जपणूक करण्याची जबाबदारी आयुक्तांची - मानवाधिकार आयोग
ठाणे/प्रतिनिधी
भिवंडी पोलीस ठाण्याच्या बांधकामावरून झालेल्या दोन पोलिसांच्या निघृण हत्येची दखल घेत राज्य मानवाधिकार आयोगाने ‘पोलिसांना मानवाधिकार असतात व त्याची जपणूक करण्याची जबाबदारी पोलीस आयुक्तांची असते’, असा स्पष्ट निर्वाळा दिला आहे, अशी माहिती रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे कार्यकारी संचालक रवींद्र साठे व मानवाधिकार मंचाचे मिलिंद आरोलकर यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. तीन वर्षांपूर्वी भिवंडीतील पोलीस ठाण्याच्या बांधकामाला विरोध करताना दंगेखोरांनी दोन पोलिसांची निघृण हत्या केली होती.

देशात स्थानिक इतिहासाची उपेक्षा - डॉ. दाऊद दळवी
कल्याण/प्रतिनिधी - भारतात स्थानिक इतिहास हा नेहमीच उपेक्षित राहिला. त्यामुळे या इतिहासाविषयी स्थानिक समाज कधीच बांधिलकी निर्माण करू शकला नाही. ही बांधिलकी निर्माण करण्यासाठी स्थानिक इतिहासावर संशोधन होणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन डॉ. दाऊद दळवी यांनी रविवारी येथे केले.
कल्याणच्या सार्वजनिक वाचनालयातर्फे ‘कल्याणचा सांस्कृतिक इतिहास’ या दुर्मिळ पुस्तकाचे ई-बुक करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाला महापौर रमेश जाधव, सुभेदारवाडा गणेशोत्सवाचे संचालक वसंतराव फडके, अध्यक्ष अ. ना. भार्गवे, प्रशांत मुल्हेरकर उपस्थित होते. डॉ. दळवी म्हणाले, ऐतिहासिक वास्तू या नवशोधाच्या प्रेरणास्त्रोत आहेत. पण सरकारच्या मनात आले की हल्ली त्याच्यावर हातोडा टाकला जातो. हे दुर्दैवी आहे. ‘कल्याणचा सांस्कृतिक इतिहास’ या दुर्मिळ पुस्तकाच्या सुधारित आवृत्त्या प्रसिद्ध झाल्या पाहिजेत. जोपर्यंत स्थानिक इतिहास नागरिकांना कळत नाही, तोपर्यंत त्याविषयी कोणतीही आपुलकी निर्माण होत नाही. हे कळण्यासाठी हा इतिहास जनतेसमोर आला पाहिजे. कल्याणच्या ऐतिहासिक लिखाणासाठी अजून फारसी कागदपत्र, शिलालेख यांचा अभ्यास होणे आवश्यक आहे. मुल्हेरकर यांनी ई-बुक संकल्पनेची माहिती दिली. अंजली फडके हिने स्वागत, तर भार्गवे यांनी प्रास्ताविक केले. भिकू बारसकर यांनी सूत्रसंचालन आणि प्रा. उदय सामंत यांनी आभार मानले.

स्वाईन फ्ल्यूसाठी पालिकेची हेल्पलाईन
ठाणे/प्रतिनिधी - शहरातील काही जणांना स्वाईन फ्ल्यूची लागण झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पालिकेने मंगळवारी यासंदर्भात माहिती देणारी हेल्पलाईन सुरू केली असून कळवा आणि कोरस रुग्णालयात विशेष कक्ष स्थापन करण्यात आला आहे. मुंब्रा येथील काका मंजिल इमारतीत राहणाऱ्या सईदा अब्दुल दारुवाला (६२) या महिलेचे मुंबईच्या नूर हॉस्पिटलमध्ये स्वाईन फ्ल्यूने निधन झाले. शहरातील हिरानंदानी स्कूलमध्ये शिकणाऱ्या आणि हॅप्पी व्हॅलीत राहणाऱ्या पुष्कर ताडे यालाही स्वाईन फ्ल्यूची लागण झाली असून त्याच्यावर मुलुंडच्या अग्रवाल रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर पालिकेने स्वाईन फ्ल्यूसंदर्भात नागरिकांना माहिती देण्यासाठी हेल्पलाईन सुरू केले असून त्याचे क्रमांक पुढीलप्रमाणे : कोरस (२५८८१३२६), कळवा (२५३०४१३९)

अविनाश लाड, महेंद्र चोंदे यांची नियुक्ती
बदलापूर/वार्ताहर

बदलापूर शिवसेना शहरप्रमुख वामन म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभाग क्र ३२ च्या शाखाप्रमुखपदी अविनाश लाड व उपशाखाप्रमुखपदी कल्पेश माळी, सचिन फाले, दिनेश गवळी यांची नियुक्ती करण्यात आली. गटप्रमुखपदी नितीन गवाणकर, प्रवीण सांगळे, विश्वास गवळी, अजय गवळी आदींची नियुक्ती करण्यात आली, तर प्रभाग क्र. २५ च्या शाखाप्रमुखपदी महेंद्र चोंदे, उपशाखाप्रमुखपदी केशव मोहिते, सुहास लाड, सतीश राऊत, यांची नियुक्ती झाली. गटप्रमुख पदी राजू कुलकर्णी, अविनाश कोदे, संदीप दळवी, प्रसन्न भोसले, ओमकार कुलकर्णी, सतीश शेट्टी, स्वनील कोयंडे आदींची नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीबद्दल नगरसेवक प्रकाश मर्गज व उपविभागप्रमुख अर्जुन घोसाळकर यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

स्वच्छतागृहाच्या मागणीसाठी पालिकेवर मोर्चा
बदलापूर/वार्ताहर

अंबरनाथच्या बुवापाडा विभागातील स्वच्छतागृहाच्या बांधणीसाठी शहर युवक काँग्रेस अध्यक्ष प्रकाश पाटील यांच्या नेतृत्वाखाली नगरपालिका कार्यालयावर शुक्रवारी मोर्चा नेण्यात आला होता.
प्रभाग पाच बुवापाडा येथील अस्तित्वात असलेले जुने स्वच्छतागृह बांधण्यात येणार होती. तथापि, प्रभागातील नागरिकांची स्वच्छतागृहाची पर्यायी व्यवस्था न करता जुने स्वच्छतागृह तोडण्यात आले. नागरिकांच्या होणाऱ्या गैरसोयीसंदर्भात पालिकेकडे वारंवार पाठपुरावा करूनही कार्यवाही न झाल्याने मोर्चा काढण्यात आल्याचे पाटील म्हणाले. ब्लॉक अध्यक्ष अ‍ॅड. यशवंत जोशी, जिल्हा ग्रामीण सचिव किसन तारमळे आदी यावेळी उपस्थित होते.

कार्य अहवालाचे प्रकाशन
ठाणे- विद्याधर ठाणेकर यांच्या कार्य अहवालाचे प्रकाशन बुधवार १२ ऑगस्ट रोजी संध्याकाळी साडेसहा वाजता मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या सभागृहात करण्यात येणार आहे. सतीश प्रधान, शालिनी ठाकरे, लोकसत्ताचे उपनिवासी संपादक चंद्रशेखर कुलकर्णी, राजू परुळेकर, शिरीष पारकर, उदय निरगुडकर, रवींद्र प्रभुदेसाई आदी मान्यवर या सोहळ्यास उपस्थित राहणार आहेत.

डोंबिवली संक्षिप्त :श्रद्धांजली सभा
डोंबिवली - संकेत ज्योतिषी मंडळातर्फे गुरुवर्य स्व. सुरेश शहासने यांना श्रद्धांजली वाहण्याचा कार्यक्रम १६ ऑगस्ट रोजी सकाळी ९.३० वाजता शुभमंगल हॉल येथे आयोजित केला आहे.
‘मानस’तर्फे कार्यशाळा
मानसतर्फे म्युझिक थेरेपी व तणाव नियोजन कार्यक्रमाचे १५ ऑगस्ट रोजी डोंबिवली जिमखान्यातील पाठारे हॉलमध्ये आयोजन केले आहे. यावेळी शुभार्थीच्या फिनिक्स स्व-मदत गटाचा पहिला वर्धापनदिन साजरा करण्यात येणार आहे. यावेळी म्युझिक थेरपिस्ट डॉ. शशांक कट्टी यांचे व्याख्यान आयोजित केले आहे. संपर्क ९८२०६०९५३५.
पै फ्रेन्डस लायब्ररीचा विस्तार
डोंबिवलीतील पै फ्रेन्डस लायब्ररीने आपला विस्तार ठाणे, मुलुंड परिसरात केला आहे. या भागातील नागरिकांनी सभासदत्वासाठी ९७६९८४६८०७ येथे संपर्क साधावा. मनपसंत घरपोच पुस्तक पोचविण्याची सुविधा येथे आहे.