Leading International Marathi News Daily

बुधवार, १२ ऑगस्ट २००९

व्यक्तिवेध

नियाझ ए. नाईक हे पाकिस्तानचे माजी परराष्ट्र सचिव. त्यांचा अलीकडेच इस्लामाबादेत त्यांच्या राहत्या घरी खून झाला. त्यांना अतिशय हालहाल करून मारण्यात आले असावे, असा पोलिसांचा कयास आहे. या खुनाचे धागेदोरे नीट उकलण्यात आले तर त्यामागे लष्कर ए तैयबा, जमात उद् दावा, सिपाह ए साहबा, लष्कर ए झंगवी किंवा जमात ए इस्लामीचा एखादा गट असण्याची शक्यता आहे. भारत आणि पाकिस्तान यांचे संबंध कधीच सुधारू नयेत, असे वाटणाऱ्या एखाद्या गटाचे हे काम आहे, असे इस्लामाबादेत असणाऱ्या राजनैतिक अधिकाऱ्यांचे

 

म्हणणे आहे. नियाझ नाईक हे ‘ट्रॅक-टू’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुत्सद्देगिरीचे पाकिस्तानातील प्रणेते होत. भारत आणि पाकिस्तान यांच्यात १९९९ मध्ये कारगिल युद्ध झाले, त्यानंतर नियाझ नाईक यांना पडद्यामागे हालचाली करण्यासाठी पाकिस्तानचे तेव्हाचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी पाठविले होते. त्यांना ओळखणाऱ्या भारतीय राजनैतिक अधिकाऱ्यांचेही त्यांच्याविषयी चांगले मत होते. १९९९ मध्ये २७ मार्च ते १ एप्रिल या दरम्यान नाईक यांनी तेव्हाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार ब्रजेश मिश्रा आणि पत्रकार आर. के. मिश्रा यांच्याशी चर्चा करून कारगिलचा गुंता सोडवायचे प्रयत्न केले होते. काश्मीर प्रश्नासंबंधात तेव्हाचे पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्याही ते संपर्कात होते. त्यांच्या पडद्यामागल्या हालचालींची माहिती तेव्हा दोन्ही देशांच्या पंतप्रधानांनाच दिली जात असे. भारत आणि पाकिस्तान यांच्यात मतैक्य व्हावे, यासाठी निमराणा चर्चेतही ते सहभागी झाले होते. या चर्चेत आजी-माजी लष्करी अधिकारी तसेच नागरी तसेच राजनैतिक प्रतिनिधींनी भाग घेतला होता. २००१-२००२ मध्ये दोन्ही देशांमध्ये वितुष्ट निर्माण झालेले असतानाही त्यांनी दोन्ही देशांची सरहद्द अधिक खुली व्हावी, यासाठी प्रयत्न केले. त्या चर्चेचे फळ म्हणून श्रीनगर आणि मुझफ्फराबाद या दरम्यान २००४ मध्ये बस सेवा सुरू होऊन काश्मीरच्या दोन्ही भागांमध्ये राहणाऱ्या नागरिकांमध्ये आदानप्रदान होऊ लागले. त्यांच्या या ‘ट्रॅक-टू’ मुत्सद्देगिरीचाच हा विजय मानण्यात येतो. ते अतिशय प्रामाणिक आणि तज्ज्ञ संवादक होते. नाईक यांचा जन्म ३१ मे १९२६ रोजी झाला. पंजाब विद्यापीठातून त्यांनी पदव्युत्तर पदवी मिळविली आणि ते परराष्ट्र सेवेत दाखल झाले. १९५१ ते १९५४ सिडनी येथे ते पाकिस्तानचे राजनैतिक प्रतिनिधी होते. न्यूयॉर्क, यांगून, बडगोडेसबर्ग (बॉन), जीनिव्हा, पॅरिस आदी ठिकाणी राजदूत म्हणूनही त्यांनी काम पाहिले. ‘युनेस्को’मध्ये ते पाकिस्तानचे कायमचे प्रतिनिधी होते. संयुक्त राष्ट्रसंघाचे १९६७ ते १९७० या दरम्यान महासंचालक म्हणूनही त्यांनी काम पाहिले. १९८२ ते १९८६ या दरम्यान ते पाकिस्तानच्या परराष्ट्र सचिव पदावर होते. नाईक हे ८२ वर्षांचे होते आणि या वयातही वेगवेगळ्या स्तरांवर भारताबरोबरचे पाकिस्तानचे संबंध चांगले व्हावेत, यासाठी ते प्रयत्न करीत असत. नियाझ नाईक हे अविवाहित होते आणि इस्लामाबादेतल्या राजनैतिक विभागातच ते राहात होते. त्यांच्या शरीरावर असंख्य जखमा होत्या आणि त्यांचे घर बाहेरून बंद करून घेण्यात आले होते, असे पोलिसांनी सांगितले. घटना उघडकीस येण्याच्या चार-पाच दिवस आधीच त्यांचा मृत्यू झाला असावा, असे सांगण्यात आले.