Leading International Marathi News Daily

बुधवार, १२ ऑगस्ट २००९

विशेष लेख

अनवट गायकीची बिकट वाट

गायकी कितीही बिकट असली तरी गायनाचा एकूण परिणाम सहजतेचा, स्वाभाविकतेचा हवा. स्वाभाविकता आणि संयम ही तत्त्वे गाभ्याची असायला हवीत. स्वत:चा नैसर्गिक आवाज चोरटा न लावता खुला लावायचा, तरीही स्वराला स्पर्श करायचा मुलायमपणे. पं. रत्नाकर पई यांच्या सहवासात येणाऱ्यावर हे संस्कार नकळत होत. पईंच्या गायकीमध्ये आलापीच्या बेभान धुंदीचा मोह कटाक्षाने टाळलेला असे. ताना गुंतागुंतीच्या असूनही त्यांची आतषबाजी नसे. लयकारीबाबतही त्यांची गायकी प्रगल्भ होती.

 

रविवार, ९ ऑगस्ट २००९ ला आय. आय. टी., पवईमध्ये गुरुपौर्णिमेनिमित्त कार्यक्रम चालू होता. संध्याकाळी सातच्या सुमाराला फोन आला. पं. रत्नाकर पई गेले. पईंचा सहवास मला खूप र्वष लाभला. गेली दहा वर्षे ते आय. आय. टी.मध्ये गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमात दरवर्षी येत असत आणि गातही असत. आपला म्हणून एक श्रोतृवर्ग त्यांनी वयाच्या सत्तरीमध्ये इथेही तयार केला. माझं मन एकदम चाळीस-पंचेचाळीस वष्रे मागे गेलं.
१९६६-६७ चा काळ असावा. त्या वेळी ‘टिळक संगीत विद्यालय’ हा दादरमधल्या संगीतप्रेमींचा एक मुख्य अड्डा होता. या विद्यालयाचे संचालक होते पईंचेच गुरुबंधू जी. टी. टिळक. दोघेही पं. मोहनराव पालेकर या अग्रगण्य गुरूंचे शिष्य. टिळक मास्तर स्वत: उत्कृष्ट गात, अतिशय जीव लावून गाणे शिकवीत आणि गाण्यातल्या इतर गुणिजनांची मनापासून कदर करीत. त्यांच्या गुणग्राहक वृत्तीमुळे आणि उमद्या स्वभावामुळे त्यांच्या संगीत विद्यालयामध्ये गानप्रेमींचं एक वर्तुळच तयार झालेलं होते. या वर्तुळामध्ये ‘तानसेन’ बनू पाहणारे महत्त्वाकांक्षी विद्यार्थी जसे होते, तसेच ‘आपल्याला आवाजच नाही’ किंवा ‘या गाण्याला फारच मेहनत पाहिजे बुवा!’ असे म्हणून केवळ ‘कानसेन’ ही भूमिका निभावणारे रसिकही होते. या साऱ्यांच्या गानप्रेमाला चोखंदळ दृष्टीची जोड द्यायचे काम टिळक मास्तर करीत असत आणि याला प्रात्यक्षिकाची जोड असे ती पई यांच्या गायनाच्या मैफलीची.
मी गुरुकुलात वाढलो नाही, संगीत हा माझा व्यवसाय नाही, परंतु तरीही गुरूंच्या सहवासात आम्ही शिष्यमंडळी बराच वेळ असायचो. शिकताना आणि ऐकताना संगीताचे उत्तम संस्कार सहजपणे आणि अप्रत्यक्षपणे होत असत. टिळक मास्तर आणि पई यांच्या सहवासातून, शिकविण्यातून आणि गायनातून हे संस्कार अगदी नकळत होत होते. गुरूंच्या आवाजाची, हावभावांची आणि गायनाची केवळ वरवरची नक्कल करायला या दोघांनी कधीही उत्तेजन दिले नाही. गायकी कितीही बिकट असली तरी गायनाचा एकूण परिणाम सहजतेचा, स्वाभाविकतेचा हवा. स्वाभाविकता आणि संयम ही तत्त्वे गाभ्याची असायला हवीत. स्वत:चा नैसर्गिक आवाज चोरटा न लावता खुला लावायचा; परंतु तरीही स्वराला स्पर्श करायचा तो मुलायमपणे. लयीवर आणि तालावर प्रभुत्व मिळवायचे, परंतु त्यात झटापट करायची नाही. बंदिशीचा मुखडा आणि तिचे संपूर्ण चलन या गोष्टी नेमक्या वजनाने म्हणायच्या. बंदिशीमधून म्हणजेच तिच्या अस्ताई-अंतऱ्यामधून रागस्वरूपाचे जे पैलू दिसतात त्यांच्या अंगाने विस्तार करायचा. ख्याल-गायनाच्या सौंदर्यशास्त्रातली ही पायाभूत मूल्ये होती आणि त्यांचे संस्कार टिळक मास्तरांच्या आणि पईंच्या गायनातून आणि शिकविण्यातून अगदी स्वाभाविकपणे होत गेले.
गुरुपौर्णिमेच्या एका कार्यक्रमात पं. पई गायला बसले. एका तंबोऱ्यावर त्यांचे अतिशय तयारीने गाणारे नरेंद्र कणेकर होते. दुसऱ्या तंबोऱ्यावर टिळक मास्तरांनी मला बसविले. तबल्यावर साथीला डी. आर. ऊर्फ लाली नेरूरकर होते. ‘अरे रतन, काही समजेल असं गा’, असे कोणीतरी म्हटले. पई फक्त हसले. एकाग्र होऊन त्यांनी सुरुवातीला मध्य सप्तकामधला सा भरला आणि- गम(नि)ध- अशी हमीर रागाची पकड दाखवून लगेच तार षड्जाला भिडले. अतिशय सुरेल आणि उंच पट्टीच्या आवाजामध्ये हमीर रागातली ‘करीम करम करे अल्ला’ ही चीज सुरू केली आणि क्षणार्धात मैफल काबीज झाली. नेरूरकर लयीशी आणि तालाशी समरस होऊन साथ करीत होते. द्रुत लयीतल्या ‘तेंडेरे कारन’ या बंदिशीने रंगत वाढतच गेली. हमीर या आम-रागानंतर पईंनी जयपूरच्या अनवट रागांचा आणि बिकट चिजांचा खजिना उघडला. नट, भूपनट, पटबिहाग, डागोरी असे अनवट राग असूनही श्रोतृवर्ग दीड-दोन तास अक्षरश: डोलत होता.
नटाचे प्रकार, कानडय़ाचे प्रकार, बहारचे प्रकार, अशा रागस्वरूपांचे भांडारच पं. पई यांच्याकडे होते. ही पारंपरिक रागस्वरूपे त्यातल्या बंदिशींच्या वैशिष्टय़ांसह त्यांनी कंठगत केलेली होती. निसर्गत:च अत्यंत सुरेल असा आवाज त्याचप्रमाणे लयीची सूक्ष्म आंदोलने टिपण्याची शक्ती या निसर्गदत्त देणग्यांबरोबरच दोन अत्यंत व्यासंगी गुरूंकडून घराणेदार तालीम मिळण्याचं भाग्यही त्यांना लाभलं होतं.
रागदारी संगीत किंवा अभिजात शास्त्रीय संगीत हे समजायला आणि गायला अवघड. त्यात जयपूर घराण्याची गायकी तर अधिकच बिकट आणि पं. पई हे घराणेदारपणाला, त्यामागच्या शिस्तीला सर्वाधिक महत्त्व देणारे. लहानपणापासून पं. मोहनराव पालेकर या अत्यंत व्यासंगी गुरूकडून घराणेदार गायकीचं खास शिक्षण जवळजवळ बावीस र्वष त्यांना मिळाली. १९६२ मध्ये पालेकरांचं निधन झालं. त्यानंतर उस्ताद गुलुभाई जसदनवाला या अल्लादिया खाँसाहेबांच्या शिष्यानेही त्यांना विद्या दिली. या दोन्ही प्रकांडपंडित गुरूंविषयी अधिक सांगायला हवं.
पं. पालेकर यांनी जयपूर गायकीचं शिक्षण उस्ताद अहमद भैय्या यांच्याकडे (त्याचप्रमाणे काही काळ अहमद भैय्यांच्या पिताजींकडेही) घेतलं. या अहमद भैय्यांचे आणि उस्ताद अल्लादिया खाँसाहेबांचे गुरू एकच. ते म्हणजे चाचा जहांगीर खाँ. तेव्हा, पईंनी जी गायकी तावून-सुलाखून घेतली ती जयपूर घराण्याच्या दोन उपप्रवाहांच्या मीलनातून निर्माण झालेली होती.
पईंचे दोन मोठे सत्कार मुंबईमध्ये झाले. १९८८ मध्ये त्यांच्या षष्ठय़ब्दीच्या सत्काराच्या वेळी आणि २००३ मध्ये त्यांच्या सत्तरीच्या सत्काराच्या वेळी. कै. राम मराठे, कै. तात्या बाक्रे, कै. अप्पा कानिटकर, पं. सुरेश तळवलकर, संगीत समीक्षक नंदू धनेश्वर या जाणकारांनी केलेल्या भाषणांमधून पईंच्या गायकीची काही महत्त्वाची वैशिष्टय़ं स्पष्ट झाली. पईंच्या गायकीमध्ये सुरेलपणा होता पण मुक्तपणे केलेल्या आलापीच्या बेभान धुंदीचा मोह कटाक्षाने टाळलेला होता. अत्यंत गुंतागुंतीच्या ताना होत्या; पण तानांची आतषबाजी नव्हती. आडलयीशी कौशल्याने आणि लीलया केलेला खेळ होता, पण लयीशी झटापट नव्हती. आलाप, ताना, लयकारी, बंदिशी या सर्वच बाबतीत ही गायकी अत्यंत काटेकोर, संयत आणि प्रगल्भ होती. परिश्रमपूर्वक मिळविलेल्या आणि कर्मठपणे व काळजीपूर्वक जतन करून ठेवलेल्या या गायकीचा मूलाधार म्हणजे बंदिशी. घराणेदार बंदिशींवरचं पईंचं प्रभुत्व हे केवळ असामान्यच म्हणायला हवं.
केसरबाई, मोघुबाई, मल्लिकार्जुन यांच्याच परंपरेतील हे बलस्थान आहे. बंदिशीचा डौल सांभाळून व तिच्यातून व्यक्त होणाऱ्या रागस्वरूपाशी सुसंगत अशी आलापक्रिया या गायकीमध्ये अभिप्रेत आहे. आडलयीची आणि वक्र चलनांची वळणे लीलया घेत अस्ताई-अंतरे अगदी काटेकोरपणे भरणं ही त्यांची खासियत होती. बंदीश कितीही पेचदार असो, तिचं हुकमी दर्शन पई कोणत्याही क्षणी घडवू शकत.
हा केवळ स्मरणशक्तीचा वा यांत्रिकपणे केलेल्या रियाजाचा चमत्कार नव्हे. बंदिशींमध्ये दडलेल्या रागस्वरूपाचे आणि लयीच्या आडवळणांचे सूक्ष्म बारकावे टिपून, त्यावर मनन-चिंतन करून हे शिवधनुष्य त्यांनी पेललं. ही गायकी भावहीन निश्चितच नव्हती. मात्र तिचा भर सर्वसामान्य श्रोत्याला प्रिय असणाऱ्या भावनिक आवाहनापेक्षा बौद्धिक आविष्कारावर अधिक होता. त्यामुळे छोटय़ा मैफलींमध्ये ही गायकी उत्तम खुलत असे. आता हा आवाज प्रत्यक्षात ऐकू येणार नाही; पण स्मृतीमध्ये मात्र गुंजन करीत राहील. अनवट गायकीच्या बिकट वाटेवरचा हा वाटसरू आता पलीकडच्या तीरावरच भेटेल.
मिलिंद मालशे
milindmalshe@yahoo.com