Leading International Marathi News Daily

बुधवार, १२ ऑगस्ट २००९

विविध

१६१ जिल्ह्यांमध्ये दुष्काळ
पेरण्यांत २० टक्क्यांची घट : प्रणव मुखर्जी
नवी दिल्ली, ११ ऑगस्ट/खास प्रतिनिधी
भारतावर ओढवलेल्या यंदाची दुष्काळी स्थितीची १९८७ सालच्या दुष्काळाची तुलना करताना आज केंद्रीय अर्थ मंत्री प्रणव मुखर्जी यांनी देशातील १६१ जिल्हे दुष्काळग्रस्त असून पेरणीचे प्रमाण किमान २० टक्क्यांनी घटणार असल्याची माहिती दिली. मान्सूनची स्थिती अजूनही लहरी आणि बेभरवशाची आहे. पण घाबरण्याचे कारण नाही. दुष्काळ पडणार असल्याची ओरड केल्यास आणखी विपरित परिणाम होतील, असे मुखर्जी यांनी बजावले.

आंग सान स्यू की यांना आणखी १८ महिन्यांची नजरकैद
यांगून, ११ ऑगस्ट/वृत्तसंस्था

म्यानमारच्या लष्करशाहीविरोधात अथक लढा देत असलेल्या लोकशाहीवादी नेत्या आंग सान स्यू की यांनी त्यांना देण्यात आलेल्या स्थानबद्धतेच्या शिक्षेचे उल्लंघन केल्यावरून म्यानमारच्या न्यायालयाने त्यांना तीन वर्षांची सक्तमजुरी ठोठावली मात्र देशाच्या लष्करी राजवटीने त्यात कपात करून त्यांना १८ महिने घरातच नजरकैदेत ठेवण्याचा निर्णय जाहीर केला.

पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेच्या अध्यक्षपदी पुन्हा डॉ. रंगराजन
नवी दिल्ली, ११ ऑगस्ट/खास प्रतिनिधी
पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या आर्थिक सल्लागार परिषदेची पुनर्रचना करण्यात आली असून या समितीच्या अध्यक्षपदी राज्यसभा सदस्य व रिझव्‍‌र्ह बँकेचे माजी गव्‍‌र्हनर डॉ. सी. रंगराजन यांची तीन वर्षांनंतर फेरनियुक्ती करण्यात आली आहे. ७७ वर्षीय रंगराजन यांनी प्रा. सुरेश तेंडुलकर यांची जागा घेतली आहे.आयसीआरएचे आर्थिक सल्लागार डॉ. सौमित्र भट्टाचार्य, एशियन सोसायटी ऑफ अ‍ॅग्रीकल्चरल इकॉनॉमिस्टस्चे अध्यक्ष डॉ. विजय शंकर व्यास, नॅशनल कौन्सिल ऑफ अप्लाईड इकॉनॉमिक्स रिसर्चचे महासंचालक सुमन बेरी, नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ पब्लिक फायनान्स अँड पॉलिसीचे महासंचालक डॉ. गोविंद राव हे या परिषदेचे सदस्य आहेत. या सर्व सदस्यांना राज्यमंत्र्यांचा दर्जा देण्यात आला आहे. पंतप्रधानांना वेळोवेळी आर्थिक मुद्यांवर सल्ला देणे, देशांतर्गत आणि परदेशातील आर्थिक घडामोडींविषयी पंतप्रधानांसाठी दरमहा अहवाल तयार करणे आणि महत्त्वाच्या आर्थिक घडामोडींकडे पंतप्रधानांचे लक्ष वेधून योग्य सूचना करण्याचे काम आर्थिक सल्लागार परिषद करीत असते. रंगराजन यांनी २००५ ते २००८ दरम्यान आर्थिक सल्लागार परिषदेचे अध्यक्षपद भूषविल्यानंतर राज्यसभेच्या सदस्यपदी नियुक्ती झाल्यामुळे त्यांनी हे पद सोडले होते. गेल्या वर्षी १३ ऑगस्ट रोजी प्रा. तेंडुलकर यांनी या पदाची सूत्रे स्वीकारली होती.

मुशर्रफ यांच्यावर गुन्हा दाखल
वाढदिवसाची ‘आगळीवेगळी’ भेट
इस्लामाबाद, ११ ऑगस्ट/पी.टी.आय.

सत्तेवर असताना २००७ मध्ये आणीबाणी लागू केल्यानंतर देशातील ६० न्यायाधीशांना बेकायदेशीरपणे अटक केल्याबद्दल पाकिस्तानचे माजी अध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांच्यावर झरदारी प्रशासनाने खटला दाखल केला आहे. या अनपेक्षित घटनेने मुशर्रफ यांना एकतर तुरूंगात जावे लागेल किंवा आपले परदेशातील वास्तव्य वाढवून विजनवासात जावे लागेल. व्याख्याने देण्याच्या निमित्ताने लंडनमध्ये वास्तव्यास असलेले मुशर्रफ यांचा आज वाढदिवस असून त्यांनी ६६ व्या वर्षांत पदार्पण केले. ३ नोव्हेंबर २००७ ला आणीबाणी लागू केल्यानंतर देशातील वरिष्ठ न्यायाधीशांना अटकेत ठेवल्याबद्दल आज इस्लामाबाद पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली. आणीबाणी लागू करण्याची घटना घटनाबाह्य़ असल्याचा निकाल दिल्यानंतर दोन आठवडय़ांनी न्यायाधीश अकमल रझा यांनी तक्रार दाखल करण्याचे आदेश काल दिले होते. मुशर्रफ यांच्याविरुद्ध खटला दाखल करण्याची मागणी करणारी याचिका अस्लम गुहमान यांनी कोर्टात दाखल केली होती. मुशर्रफ यांच्याविरुद्ध तक्रार दाखल करण्याचा आदेश कोर्टाने प्रथमच दिला असून यापूर्वी अनेकांनी अशी मागणी केली होती. मात्र, त्याकडे प्रशासनाने लक्ष दिलेले नव्हते.

अखेर माहितीचा अधिकार सर्वोच्च!
नवी दिल्ली, ११ ऑगस्ट/वृत्तसंस्था
माहितीच्या अधिकाराखाली न्यायाधीशांवरील कारवाईची माहिती उघड करता येणार नाही, हा आपला आधीचा पवित्रा सर्वोच्च न्यायालयाने बदलला आहे.अलाहाबाद न्यायालयाच्या एका न्यायाधीशाबद्दल आपण सरन्यायाधीशांकडे तक्रार दिली होती. त्यावर काय कारवाई झाली, अशी विचारणा माहिती अधिकाराखाली पी. के. दालमिया या ७७ वर्षीय नागरिकाने केली होती. त्यावर ही माहिती देण्याचा आदेश माहिती आयोगाने दिला होता. माहिती अधिकाराच्या कक्षेत न्यायाधीश येत नसून त्यामुळेच असा आदेश माहिती आयुक्त देऊ शकत नाहीत, असा पवित्रा आधी न्यायालयाने घेतला होता. आज दिल्ली उच्च न्यायालयासमोर अ‍ॅटर्नी जनरल गुलाम ई. वहानवटी यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या वतीने सांगितले की, केंद्रीय माहिती आयोगाचा आदेश यथायोग्य नसला तरी या प्रकरणात पारदर्शकतेच्या धोरणासाठी ही माहिती उघड करण्यास आमची तयारी आहे.

आयटी क्षेत्रातही ‘स्वाइन फ्लू’चे सावट
नवी दिल्ली, ११ ऑगस्ट/वृत्तसंस्था
बंगलोरखालोखाल ‘आयटी’ अर्थात माहिती व तंत्रज्ञान क्षेत्राचा व्यापक विस्तार असलेल्या पुणे शहर व परिसरात स्वाइन फ्लूचा फैलाव वेगाने होत असल्याने ‘आयटी’ क्षेत्रात घबराट पसरली असून या क्षेत्रातील कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना अत्यंत आवश्यक इतकाच प्रवास करण्याच्या सूचना दिल्या आहेत. ‘आयटी’ क्षेत्रातील ‘इन्फोसिस’ या आघाडीच्या कंपनीच्या पुणे येथील कार्यालयात तब्बल २० हजार कर्मचारी व अभियंते काम करतात. त्यांना शक्यतो पुण्याबाहेर न जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. ‘इन्फोसिस’च्या प्रवक्त्याने सांगितले की, स्वाइन फ्लूच्या फैलावाकडे आणि आमच्या कर्मचाऱ्यांच्या आरोग्याकडे आम्ही बारकाईने लक्ष ठेवून आहोत. सर्व कर्मचाऱ्यांना आरोग्यरक्षक उपायांची माहिती वेळोवेळी दिली जात आहे.

सोहराबुद्दिनच्या आप्तांना १० लाखांची भरपाई
नवी दिल्ली, ११ ऑगस्ट/वृत्तसंस्था
गुजरात पोलिसांकडून २००५ मध्ये बोगस चकमकीत मारल्या गेलेल्या सोहराबुद्दिन शेख याच्या आप्तांना १० लाख रुपयांची भरपाई देण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने आज दिला.
न्या. तरुण चटर्जी, न्या. आफताब आलम यांच्या खंडपीठाने हा आदेश दिला. हे प्रकरण अधिक चौकशीसाठी सीबीआयचे माजी प्रमुख आर. के. राघवन यांच्या विशेष पथकाकडे सोपवावे की नाही, याबाबतचा निर्णय दोन सप्टेंबरला जाहीर केला जाणार आहे. या विशेष पथकाकडे ही चौकशी सोपविण्यास गुजरात सरकारने विरोध दर्शविला आहे. सोहराबुद्दिन हा पाकिस्तानी होता व लष्कर ए तयबाचा हस्तक होता, असे प्रथम गुजरात पोलिसांनी भासविले होते.

जपानमध्ये वादळात १३ मृत्युमुखी
कोबे, ११ ऑगस्ट/वृत्तसंस्था
तुफान वादळ आणि त्यानंतर आलेल्या पूरामुळे पश्चिम जपानमध्ये किमान १३ जणांचा बळी गेला असून १८ हून अधिकजण बेपत्ता आहेत. भारतीय प्रमाणवेळेनुसार सोमवारी दुपारी ही दुर्घटना घडली. वादळाच्या जोरदार तडाख्याने सायो शहराचे सर्वाधिक नुकसान झाले. या शहरातील अनेक घरांची पडझड झाली तसेच वादळानंतर आलेल्या पुरामुळे अनेकांचे संसार वाहून गेले.सायो शहरापासून जवळच असलेल्या स्वालोन नदीला आलेल्या पुराचा सर्वात जास्त तडाखा सायो तसेच ह्योगो या शहरांना बसला. येथील ११ जणांचा यामध्ये मृत्यू झाल्याचे सूत्रांनी सांगितले.