Leading International Marathi News Daily

गुरुवार, १३ ऑगस्ट २००९

मुंबईतील शाळा-कॉलेज सात दिवस बंद
मुंबई, १२ ऑगस्ट/खास प्रतिनिधी
‘स्वाइन फ्लू’ या आजाराची लक्षणे आढळल्यास चाचणीपूर्वीच रुग्णाला टॅमी फ्लूच्या गोळ्या देण्याचा निर्णय राज्याच्या आरोग्य विभागाने घेतला आहे. स्वाइन फ्लूची साथ पसरू नये म्हणून उद्यापासून सात दिवस म्हणजे १९ ऑगस्टपर्यंत मुंबईतील सर्व शाळा- महाविद्यालये बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचप्रमाणे मुंबईतील सर्व सिनेमागृहे आगामी तीन दिवस बंद राहतील, असे राज्याच्या अतिरिक्त मुख्य सचिव (आरोग्य) शर्वरी गोखले यांनी आज जाहीर केले.

महाराष्ट्रातील स्वाइन फ्लूच्या बळींची संख्या ११
गेल्या चोवीस तासात पुण्यात दोन पुरुष व एका महिलेचा स्वाइन फ्लूमुळे मृत्यू झाला असून नाशिक येथील शासकीय रुग्णालयात एका डॉक्टरांचा मृत्यू झाल्यामुळे मृतांची एकूण संख्या ११ झाली आहे. राज्यात स्वाइन फ्लूचे एकूण १९२८ संशयित रुग्ण आहेत. एकूण ४२,८५१ जणांची तपासणी करण्यात आली असून मुंबईत आज ३७२१ तर पुणे येथे २९१४० जणांची तपासणी करण्यात आल्याचे शर्वरी गोखले यांनी सांगितले. आजपर्यंत उपचारानंतर ११६५ लोकांना घरी पाठविण्यात आले असून १६ रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. दरम्यान, मुंबईत आतापर्यंत जवळपास १४ हजार रुग्णांची तपासणी करण्यात आली, त्यापैकी १२२ रुग्णांना स्वाइन फ्लू’ची लागण झाली होती. आज कस्तुरबा रुग्णालयातून १६ रुग्ण ठणठणीत बरे होऊन घरी परत गेले. त्यापैकी सात जणांना स्वाइन फ्लूची लागण झालेली होती. एकाच कुटुंबातील तीन बहिणींनाही घरी पाठविण्यात आले आहे. त्यांना स्वाइन फ्लूची लागण झाली होती. आतापर्यंत एकूण २६८ रुग्णांना घरी पाठविण्यात आले आहे. अशीही माहिती पालिका अतिरिक्त आयुक्त यांनी दिली.

दहीहंडी उत्सव रद्द करण्यासाठी उद्धव ठाकरे यांचा पुढाकार!
मुंबई, १२ ऑगस्ट/प्रतिनिधी
दुष्काळ, पाणीटंचाई, शेतकऱ्यांच्या आत्महत्या या पाठोपाठ स्वाइन फ्लूने राज्याच्या प्रमुख शहरांत थैमान घातले असल्याने मुंबई, ठाण्यासह राज्यातील दहीहंडी उत्सव रद्द करण्याकरिता शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी आज पुढाकार घेतला. त्यापाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेस, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दहीहंडी उत्सव पारंपरिक पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय घेऊन शिवसेनेच्या निर्णयाचे अनुकरण केले. सुमारे पंच्याऐंशी टक्के दहीहंडी मंडळांवर शिवसेनेचे प्राबल्य असल्याने दहिहंडीचा उत्सव शहरात अत्यंत मर्यादित स्वरूपात साजरा होईल, असे यामुळे स्पष्ट झाले आहे.

दहीहंडी उत्सव पारंपरिक पद्धतीने साजरा करण्याचा समन्वय समितीचा निर्णय
दहीहंडी उत्सव समन्वय समिती आणि मुंबई ठाण्यातील समस्त गोिवदा पथके यांनी यंदाचा दहीहंडी उत्सव पारंपरिक पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय आज झालेल्या बैठकीत एकमताने घेतला. स्वाइन फ्लूच्या भीतीमुळे सकाळपासून वृत्तवाहिन्यांवर दहीहंडी उत्सव रद्द करण्यात आाल्याचे वृत्त झळकत होते. त्यामुळे समन्वय उत्सव समितीने आज गोिवदा पथकांची वरळी येथील विसावा गेस्ट हाऊस येथे तातडीने बैठक बोलावली होती. त्या बैठकीत मुंबई-ठाण्यातील अनेक गोविंदा पथकांचे प्रतिनिधी, संघर्ष प्रतिष्ठानचे जितेंद्र आव्हाड, ‘संकल्प’चे सचिन अहिर आदी उपस्थित होते. गोविंदा मोठय़ा प्रमाणात साजरा करण्याऐवजी यंदा तो पारंपरिक पद्धतीने साजरा करावा, मोठय़ा संख्येत सेलिब्रेटीना येऊ देऊ नये, त्याची आयोजकांनी काळजी घ्यावी, तसेच प्रसार माध्यमानाही दहीहंडी उत्सवाचे दिवसभर थेट प्रक्षेपण करण्यास सांगावे, त्यामुळे उत्सवस्थळीगर्दी होणार नाही. तसेच उत्सव पाहण्यासाठी येणाऱ्या प्रेक्षकांनी आयोजकांतर्फे मास्क देण्याचा प्रयत्न करण्यात येईल, असे सांगून अहिर म्हणाले की, दहीहंडी उत्सवानंतर प्रत्येकगोविंदा पथकाने वैद्यकीय शिबीर भरवावे, त्यामध्ये एखाद्याला या रोगाची बाधा झाल्याचे निदर्शनास आले तर त्याची विशेष काळजी घेतली जाईल. ही शिबीरे भरवण्यिासाठी गोविंदा मंडळांवर सक्ती करण्यात आली आहे. शिवसेना, भारतीय विद्यार्थी सेना दहिसर विधानसभा क्षेत्र आयोजित दहीहंडी प्रतिकात्मक पद्धतीने फोडण्यात येईल. जाहीर केलेली बक्षिसाची रक्कम स्वाइन फ्ल्यू रुग्णांच्या उपचारासाठी खर्च करण्यात येईल, असे अभिषेक घोसाळकर यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे जाहीर केले आहे.

चोवीस तासात पुण्यात पाच जणांचा बळी..
पुणे, १२ ऑगस्ट / प्रतिनिधी

‘स्वाइन फ्लू’चा वाढता प्रसार रोखण्यासाठी आरोग्य विभाग आणि जिल्हा प्रशासन तातडीची पावले उचलत असताना दिवसभरात एका नऊ महिन्याच्या बाळासह पाच जणांचा ‘स्वाइन फ्लू’ने बळी घेतला. ‘ही परिस्थिती म्हणजे धोक्याची घंटा’ असल्याची जिल्हाधिकारी चंद्रकोंत दळवी यांनी आज कबुली दिली. काही तासांच्या अंतराने पाच जणांचा ससून रुग्णालयाच्या अतिदक्षात विभागात मृत्यू झाला.

स्वाइन फ्लूमुळे नाशिकमध्ये वैद्यकीय अधिकाऱ्याचा मृत्यू
नाशिक, १२ ऑगस्ट / प्रतिनिधी

स्वाईन फ्लूने नाशिक जिल्ह्य़ात पहिला बळी नोंदविला असून रूपेश प्रल्हाद गांगुर्डे (२८) या वैद्यकीय अधिकाऱ्याचा मंगळवारी मध्यरात्री या आजाराने मृत्यू झाला. जिल्हा रुग्णालयात वेळेवर योग्य उपचार न झाल्यामुळे गांगुर्डे यांचा मृत्यू झाल्याचा आरोप त्यांच्या कुटूंबियांनी केला. परंतु, शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असताना नातेवाईकांनी रूग्णास खासगी रुग्णालयात नेण्याचा केलेला प्रकार त्यांची प्रकृती खालावण्यास कारणीभूत ठरल्याचे आरोग्य विभागाने म्हटले आहे.

मुंबईतील स्थिती नियंत्रणात
पालिकेचा दावा
मुंबई, १२ ऑगस्ट / प्रतिनिधी

राज्यातील इतर शहरांतून ‘स्वाइन फ्लू’चा प्रादुर्भाव वाढत असल्याचे चित्र सध्या दिसत असले तरी मुंबईत मात्र स्वाइन फ्लू नियंत्रणात असल्याचा दावा पालिका अतिरिक्त आयुक्त मनीषा पाटणकर - म्हैसकर यांनी केला. दिवसेंदिवस रुग्णालयातून ठणठणीत बरे होऊन घरी जाणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत आहे, असे त्या म्हणाल्या. दरम्यान, कस्तुरबा रुग्णालयातील प्रयोगशाळा अत्याधुनिक करण्यासाठी प्रशासनाने आवश्यक यंत्रे खरेदी करावीत आणि ‘स्वाइन फ्लू’चा सामना करण्यासाठी औषधी खरेदी करण्याची स्थायी समितीने प्रशासनाला मान्यता दिली आहे. पालिकेने सुरू केलेल्या ‘१०८’ या हेल्पलाईनला मुंबईकरांनी मोठय़ा प्रमाणावर प्रतिसाद दिला असून बुधवारी एक हजार ३५० जणांनी इथे संपर्क केला. आजही एक हजारावर मुंबईकरांनी संपर्क करून आपल्या शंकेचे निरसन करून घेतले. स्वाइन फ्लूबाबत जनतेच्या मनातील भीती कमी होण्यासाठी प्रसारमाध्यमांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन मनीषा म्हैसकर यांनी केले.

पालिकेने वेळीच खबरदारी घेतली असती तर ?
‘स्वाइन फ्लू’चा सामना करण्यासाठी पालिका प्रशासन सध्या दिवसरात्र मेहनत करीत आहे. अतिरिक्त आयुक्त मनीषा म्हैसकर, केईएमचे अधिष्ठाता डॉ. संजय ओक, पालिकेचे कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. जयराज ठाणेकर आणि पालिका रुग्णालयांतील डॉक्टर्स, परिचारिका आणि इतर कर्मचारी दिवसरात्र काम करीत आहेत. अवघ्या काही तासांत पूर्व, पश्चिम उपनगरात तपासणी केंद्रे सुरू करण्यात आली. मात्र पालिका प्रशासनाने मे महिन्यातच अशी तयारी केली असती तर आता स्वाइन फ्लूबाबत गंभीर परिस्थिती निर्माण झाली नसती, अशी चर्चा पालिका वर्तुळात होत आहे. मे महिन्यात स्वाइन फ्लूच्या साथीबाबत आयुक्तांनी पालिका प्रशासन सज्ज असल्याचा दावा केला होता. २६ जून रोजी पालिका रुग्णालयात स्वाइन फ्लूची लागण झालेला पहिला रुग्ण दाखल झाला होता. मात्र तेव्हाही पालिकेच्या आरोग्य खात्याने भविष्यात काय स्थिती निर्माण होईल, याचा अंदाज बांधून पावले उचलली नाहीत. उलट मुंबईच्या वातावरणात स्वाइन फ्लूचे विषाणू जगणार नाहीत, असा दावा पंधरादिवसांपूर्वी डॉ. ठाणेकर यांनी आयुक्त जयराज फाटक यांच्या समक्षच केला होता. मे महिन्यातच आंध्र प्रदेशात ‘स्वाइन फ्लू’ची चर्चा सुरू झाली होती. आंध्र प्रदेश सरकारने तातडीने पावले उचलली, त्यामुळे आता आंध्र प्रदेशात ‘स्वाइन फ्लू’चे रुग्ण आढळून येत नाहीत, असेही काही अधिकारी सांगतात. महापालिका प्रशासनाने मे महिन्यातच खबरदारी घेतली असती तर ?

‘सीआरझेड’मुळे अडकलेले प्रकल्प मार्गी लागणार
मुंबई, १२ ऑगस्ट / प्रतिनिधी

सागरकिनारा व्यवस्थापनासाठी २००८ मध्ये प्रस्तावित करण्यात आलेली सीझेडएम (कोस्टल झोन मॅनेजमेंट ) अधिसूचना २२ जुलै २००९ पासून निकालात निघाल्याचे केंद्रीय पर्यावरण आणि वन मंत्री जयराम रमेश यांनी आज जाहीर केले. त्यामुळे सीआरझेड अधिसूचना कायम राहणार आहे. त्यामध्ये सुधारणा करताना मुंबईला विशेष दर्जा देण्याची शक्यता बोलून दाखवली. यात ‘वाढीव’ चटईक्षेत्र निर्देशांक (एफएसआय) फक्त अल्प उत्पन्न गटालाच (एलआयजी) देण्यात येईल, असे स्पष्ट केले.

नागपूरातही सापडले तीन रुग्ण
नागपूर, १२ ऑगस्ट/प्रतिनिधी

पुण्यात फोफावलेल्या स्वाईन फ्लूचे लोण आज नागपुरात येऊन पोहोचले. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पुण्याहून मिळालेल्या अहवालानुसार शहरातील तीन रुग्णांना सौम्य स्वाईन फ्लूची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. पाच दिवसांपूर्वी पाठवलेल्या या तिन्ही रुग्णांच्या रक्ताचे नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. मात्र, तिघांनाही एच१एन१ व्हायरसची लागण झालेली नसून यांच्यात एच-१ व्हायरस पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यामुळे यांचा आजार विशेष गंभीर नसला, तरी त्यांना तपासणीसाठी रुग्णालयात बोलावण्यात आले आहे पण, रात्री उशिरापर्यंत ते मेडिकलमध्ये दाखल झाले नसल्याचे मेडिकलच्या अधिष्ठाता डॉ. दिप्ती डोणगावकर यांनी सांगितले. यातील दोघे पुण्यात नोकरी करणारे सॉफ्टवेअर इंजिनिअर दाम्पत्य असून पुण्यात शिकणाऱ्या एका विद्यार्थ्यांचाही त्यात समावेश आहे. पाच दिवसानंतर आज दुपारी या तिघांचेही अहवाल प्राप्त झाले. विशेष म्हणजे, हा अहवाल एच-१ याच व्हायरससाठी पॉझिटिव्ह होता. त्यामुळे हा व्हायरस विशेष गंभीर नसल्याने याचा विशेष धोका नाही. त्यातच या तिन्ही रुग्णांना तपासणीनंतर दाखल करण्यात आले होते. त्यावेळी त्यांना आवश्यक ती औषधे देण्यात आली होती.

 

प्रत्येक शुक्रवारी