Leading International Marathi News Daily

गुरुवार, १३ ऑगस्ट २००९

‘स्वाईन फ्लू’ चा धसका..
महापालिका ५० हजार विद्यार्थ्यांची तपासणी करणार
शहरात ५ ठिकाणी तपासणी केंद्र
‘महानिर्मिती’ ने केल्या लेखी परीक्षा स्थगित
नागपूर, १२ ऑगस्ट/ प्रतिनिधी
‘स्वाईन फ्लू’च्या संशयित रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत असल्याने महापालिका पाच तपासणी केंद्र उघडणार येणार असून महापालिका शाळेतील ५० हजार विद्यार्थ्यांची वैद्यकीय तपासणी केली जाणार आहे. दरम्यान, महानिर्मितीने १६ ऑगस्टला होणाऱ्या कारागीर पदासाठी घेण्यात येणाऱ्या लेखी परीक्षा स्थगित करण्यात आल्या आहेत. तशा सूचनाही संबंधितांना देण्यात आल्या आहेत.

रेल्वेस्थानकावर दोन परप्रश्नंतीयांना सोन्याच्या विटेसह अटक
नागपूर, १२ ऑगस्ट / प्रतिनिधी

नागपूर लोहमार्ग पोलिसांनी बुधवारी सकाळी दोन परप्रश्नंतीयांना पकडून त्यांच्याजवळून पावणेदोन किलो वजनाची नकली सोन्याची विट जप्त केली. स्वातंत्र्यदिनी दहशतवाद्यांपासून असलेला धोका लक्षात घेता लोहमार्ग पोलिसांची रेल्वे स्थानकावर पाळत आहे. किशोर चांभारे, बाबू ठाकूर हे दोन शिपाई पहिल्या क्रमांकाच्या फलाटावर सकाळी सहा वाजताच्या सुमारास गस्त घालत होते. या फलाटाच्या उत्तरेकडील बाजूच्या दारातून तिघेजण स्थानकाबाहेर पडताना त्यांना दिसले.

गृहोपयोगी वस्तूंच्या विक्रीवर परिणाम
बाजारपेठेतील उलाढाल मंदावली
नागपूर, १२ ऑगस्ट/प्रतिनिधी
वाढती महागाई आणि अपुऱ्या पावसाचा शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांवरही परिणाम झाला आहे. वाढती महागाई आणि ग्राहकांची कमी झालेली क्रयशक्ती यामुळे बाजारपेठेतील उलाढाल मंदावली आहे. कापड, वाहने, किराण्यासह अनेक गृहोपयोगी वस्तूंच्या विक्रीवर परिणाम होण्याची शक्यता बाजारपेठेतून व्यक्त करण्यात येत आहे.

सिद्धार्थ जाधव म्हणतो, त्याचा कल विनोदी भूमिकांकडे
नागपूर, १२ ऑगस्ट / प्रतिनिधी

नाटक आणि चित्रपटात विनोदी नट म्हणून निर्माण झालेली ओळख बघता येणाऱ्या काळात अशाच भूमिका करण्याचा माझा जास्तीत जास्त प्रयत्न राहणार असल्याचे नाटय़ आणि चित्रपट कलावंत सिद्धार्थ जाधव यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. ‘जागो मोहन प्यारे’ या नाटकाच्या निमित्ताने सिद्धार्थ जाधव नागपुरात आला असता तो पत्रकारांशी बोलत होता. हे एका वेगळ्या घाटणीचे विनोदी नाटक आहे. ‘तुमचा मुलगा करतो काय?’ आणि ‘लोच्या झाला रे’ या नाटकांनंतर ‘जागो मोहन प्यारे’ रसिकांनी अक्षरश डोक्यावर घेतले आहे.

नागरिकांची मेडिकलकडे धाव; ९ नमुने पुण्याला पाठवले
नागपूर, १२ ऑगस्ट/प्रतिनिधी

स्वाइन फ्लूचा प्रसार झपाटय़ाने वाढत असून खबरदारी म्हणून या आजाराची लक्षणे आढळणाऱ्या नागरिकांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आज पुन्हा तपासणीसाठी गर्दी केली. डॉक्टरांनी १८० रुग्णांची तपासणी करून फक्त ९ संशयित रुग्णांच्या लाळेचे आणि रक्ताचे नमुने पुण्याला पाठवले. यातील दोन रुग्णांनी पुण्यात स्वाईन फ्लू झालेल्या रुग्णांच्या संपर्कात आल्याची माहिती दिल्याने त्या दोघांनाही विशेष वॉर्डात दाखल करून घेण्यात आले.

विदर्भातील १३६ अधिकाऱ्यांचा समावेश
राज्यातील ९६६ पोलीस उपनिरीक्षकांना बढती
नागपूर, १२ ऑगस्ट / प्रतिनिधी
गृह खात्याने राज्यातील ९६६ पोलीस उपनिरीक्षकांना सहायक पोलीस निरीक्षकपदी पदोन्नत केले असून त्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. नागपूर शहरासह विदर्भातील १३६ जणांचा त्यात समावेश आहे. नागपूर शहरातील अशोक देवतळे, नलिनी चानपूरकर, रामशिरोमणी त्रिवेदी, यादव राजनकर, प्रदीप लांबट, सतीशसिंह राजपुत, ज्ञानेश्वर धामंदे, दीनदयाल गुप्ता, गिरीश ताथोड, वाल्मिक तिडके, पूनमचंद्र बहादुरे, िहमत पवार, बाबुराव चव्हाण, ओमप्रकाश ठाकूर, बाळकृष्ण दरवे, अनुग्रह ठाकूर, रमेश गजभिये, गजानन वासेकर, सुरेश ढोबळे यांना शहरात, लोहमार्गचे रामेश्वर गाडे, भटुलाल सूर्यवंशी यांना पदोन्नतीने तेथेच कायम ठेवण्यात आले.

विदर्भात ठिकठिकाणी आज कृष्णजन्माष्टमी
नागपूर, १२ ऑगस्ट / प्रतिनिधी

कृष्ण जन्मोत्सवानिमित्त विदर्भात उद्या, गुरुवारी विविध धार्मिक कार्यक्रम, शोभायात्रा तसेच दहीहंडी स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी शहरात मोठय़ा उत्साहाने तयारी सुरू असून अतिभव्य हलत्या देखाव्यांबरोबरच आकर्षक संगीताचे आयोजन यंदा अनेक मंडळांनी केले आहे.

समुपदेशन केंद्रांना अनुदान देण्याची संचालकांची मागणी
नागपूर, ११ ऑगस्ट / प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या निर्देशानुसार जिल्हा परिषदेच्या शेषफंडातून समुपदेशन केंद्रांकरिता १० लाख ३२ हजार रुपयांची तरतुद करण्यात आली होती. त्यानुसार नागपूर जिल्हय़ातील १३ तालुक्यात फेब्रुवारी २००९ पासून सर्व पंचायत समिती स्तरावर महिला समुपदेशन केंद्रे सुरू झाली. या सर्व समुपदेशन केंद्रांचा आढावा घेऊन ती पुढे कार्यरत राहतील, असे सांगण्यात आले होते. एक वर्षाकरता स्थापन झालेली केंद्रे कार्यरत राहून सर्व केंद्रांना पुढील महिन्यापासून निधी उपलब्ध केला जाईल, असेही आश्वासन शासनातर्फे देण्यात आले. ही सर्व केंद्रे कार्यरत आहेत पण, अजूनपर्यंत त्यांना अनुदान प्रश्नप्त झालेले नाही. महिला बालकल्याण विभाग व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांनी ऑगस्ट २००९ पासून ही केंद्रे बंद करण्याचे संकेत दिले आहेत. ही केंद्रे बंद करण्यात येऊ नये, अशी मागणी कुही येथील केंद्राच्या संचालक रुबिना पटेल यांनी पत्रकार परिषदेत केली. पत्रकार परिषदेला पी.जी. खेरगडे, मंजू निकोसे, राजन गोंडाणे, राजकुमार बागडे, ज्ञानेश्वर वागदे, नंदा गजभिये, आशिष चांभारे आदी विविध केंद्रांचे संचालक उपस्थित होते.

वन कर्मचाऱ्यांनी शेतीची नासधूस केल्याचा किसान सभेचा आरोप
नागपूर, १२ ऑगस्ट/ प्रतिनिधी

वन खात्याच्या पडिक जमिनीवर शेती करणाऱ्या शेतकऱ्याचे पीक वन कर्मचाऱ्यांनी उद्ध्वस्त के ल्याचा आरोप अखिल भारतीय किसान सभेने केला आहे. रामटेक तालुक्यातील शिवनी येथील वन खात्याच्या जमिनीवर विश्वनाथ चौधरी, राधेश्याम मेश्राम, रूपेश उईके, परसराम वडिवे, बंडू मडावी, लेखाराम सोनबोईर, संतोष दखने हे शेतकरी शेती करीत होते. अलीकडेच वन खात्याचे कर्मचारी तेथे आले व त्यांनी शेतातील तूर व धानाची रोपटी उपटून फेकून दिली. ‘आदिवासी वनअधिकार कायदा २००५ नुसार शेतकऱ्याच्या ताब्यात असलेल्या शेतीवर त्यांचाच अधिकार असतो. अशा शेतकऱ्यांचे सर्वेक्षण करण्याचे काम सध्या सुरू आहे. विशेष म्हणजे वनखात्याची जमीन ताब्यात मिळावी यासाठी उपरोक्त जमीन नावे करून घेण्यासाठी यापूर्वीच या शेतकऱ्यांनी अर्ज केले आहेत. त्यावर कारवाई करण्याऐवजी शेतकऱ्यांच्या शेतीतील रोपटी उपटून फेकणे हा त्यांच्यावर अन्याय आहे.

डॉ. ग. त्र्यं. देशपांडे जन्मशताब्दी; शुक्रवारपासून व्याख्यानमाला
नागपूर, १२ ऑगस्ट / प्रतिनिधी

साहित्यशास्त्र आणि व्याकरणातील जाणकार ग. त्र्यं. देशपांडे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त १४ ऑगस्टपासून व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली आहे. अमरावती जिल्ह्य़ातील दर्यापूर तालुक्यातील वडनेरगगाई येथे १४ ऑगस्ट १९१० रोजी डॉ. गणेश त्र्यंबक देशपांडे यांचा जन्म झाला. नागपूर विद्यापीठातील संस्कृत विभागात प्रश्नध्यापक आणि विभाग प्रमुख ही पदे भूषवून ते सेवानिवृत्त झाले. त्यांच्या जन्मशताब्दीला १४ ऑगस्टपासून सुरुवात होत आहे. त्यानिमित्ताने ग. त्र्यं. देशपांडे यांचे ज्येष्ठ चिरंजीव न्या. बाळासाहेब देशपांडे यांच्यासह डॉ. द. भि. कुळकर्णी, डॉ. के. रा. जोशी, डॉ. श्यामला मुजुमदार. डॉ. के.एच. देशपांडे, डॉ. प्रज्ञा देशपांडे यांनी व्याख्यानमाला, चर्चासत्र आणि ग्रंथप्रकाशन आदी कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. संस्कृत विद्यापीठ आणि अमरावती विद्यापीठाचीही यासाठी मदत घेण्यात येणार असल्याचे श्यामला मुजुमदार यांनी कळविले आहे.

विकास अर्बनची वार्षिक सर्वसाधारण सभा
नागपूर, १२ऑगस्ट/प्रतिनिधी

विकास अर्बन क्रेडिट सहकारी संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा प्रगती सभागृहात नुकतीच पार पडली. संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मण जुमडे, सचिव ज्ञानेश्वर नखाते यांनी संस्थेच्या प्रगतीविषयी सभेत माहिती दिली. संस्थेच्या विकासाला संस्थेच्या सभासदांचे, ठेवीदारांचे महत्त्वाचे योगदान आहे, त्यामुळेच सभासदांना १० टक्के लाभांश देणे शक्य झाले, असे मत जुमडे व नखाते यांनी सभेत मांडले. संस्थेच्या प्रगतीविषयी अनेक सभासदांनी त्यांचे मत व्यक्त केले. सभेत सभासदांच्या पाल्यांचा सत्कार करून त्यांना संस्थेद्वारे रोख बक्षीस देण्यात आले. सभेचे संचालन संस्थेचे सहसचिव दिलीप सुरकार यांनी केले. आभार संस्थेच्या संचालक रंजना कावळे यांनी मानले. सभेला भाऊराव कांबळे, मोहन हाडके, रजनी बांदरे, संजय भागवत, राजू बुटले, सुभाष ढगे, तिवारी, खानवलकर, निकम उपस्थित होते.

आचार्य बाळकृष्ण महाराज यांचा जन्मदिनी वृक्षारोपण
नागपूर,१२ ऑगस्ट/प्रतिनिधी

नागपूर जिल्हा योग समितीच्या वतीने पतंजली योगपीठ हरिद्वारचे कुलगुरू आचार्य बाळकृष्ण महाराज यांचा जन्मदिवस, वासंती उच्च प्रश्नथमिक शाळेतील विद्यार्थ्यांच्या सहकार्याने वृक्षारोपण करून साजरा करण्यात आला. यावेळी पतंजली योग समितीचे नागपूर अध्यक्ष अॅड. नामदेव फटिंग, भारत स्वाभिमान व विकास आश्रम शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रदीप काटेकर, महामंत्री शशिकांत जोशी, मंत्री छाजुराम शर्मा, वृक्षारोपण प्रमुख भारती मोहिते उपस्थित होते. पतंजली योग समितीच्या वतीने शहरात वृक्षारोपण व वृक्ष संवर्धनाचे काम सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हणून आचार्य बाळकृष्ण महाराजांच्या जन्मदिवसाचे औचित्य साधून या कार्याचा शुभारंभ करण्यात आला. प्रश्नस्ताविक मुख्याध्यापिका शोभा कांदेकर यांनी केले. बोरीकर यांनी आभार मानले.

आयुर्वेद महाविद्यालय कँटिन अस्वच्छतेचे माहेरघर
नागपूर, १२ ऑगस्ट/ प्रतिनिधी

देशभरात स्वाइन फ्लूने थैमान घातले असताना आयुर्वेद महाविद्यालयाच्या कँटिनमध्ये मात्र, अस्वच्छतेला तोटा नसून रुग्णांच्या जिविताबरोबर खेळ होत असल्याचा आरोप त्या भागातील नागरिकांनी केला आहे. स्वाईन फ्लूला प्रतिबंध करण्यासाठी सरकारने स्वच्छतेवर विशेष भर दिला आहे. आयुर्वेद महाविद्यालयात मात्र वैद्य, विद्यार्थी व रुग्णांच्या जीवाशी खेळ होत असल्याचा आरोप त्या भागातील नागरिकांनी केला आहे. महाविद्यालयाच्या कँटिनमधील पाणी पिण्याजोगे नसून त्यात अनेक कृमी तरंगताना दिसतात. हे दुषित पाणी येथील वैद्य, विद्यार्थी व रुग्णांना पुरवण्यात येते. याबाबत कँटिन चालकास हटकले असता, ते महाविद्यालयाच्या व्यवस्थापनाकडे बोट दाखवतात. स्वत:ही स्वच्छतेकडे लक्ष पुरवत नाही. समाजाचे आरोग्य राखणे ज्या वैद्य मंडळींच्या हाती आहे, त्यांचेच आरोग्य यामुळे धोक्यात आले असल्याचे नागरिकांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रात म्हटले आहे.

गोकुळाष्टमीनिमित्त आज बडकस चौकात दहीहंडी
नागपूर, १२ ऑगस्ट / प्रतिनिधी

गोकुळाष्टमीनिमित्त उद्या, १३ ऑगस्टला दुपारी २ वाजता बडकस चौकात बडकस मित्र मंडळ व महाल व्यापारी संघाच्या संयुक्त विद्यमाने अविनाश यावलकर व मनोज खुरगे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ दहीहंडी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. दरवर्षी ही स्पर्धा घेण्यात येणार आहे. स्पर्धेचे बक्षीस ५१,००० रुपये आहे. स्पर्धेचे उद्घाटन आमदार देवेंद्र फडणवीस करतील. रवींद्र दुरुगकर, मोहन मते, प्रवीण बर्डे यावेळी उपस्थित राहतील. यासोबतच विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेत नागपूर व नागपूरच्या बाहेरील १२ संघांनी भाग घेतला आहे. स्पर्धेचे मुख्य संयोजक संदीप चेंडके असून अनुप धर्मे, राकेश सातभैया, अजम वारे व बडकस चौक मित्र परिवारचे सहकारी तयारी करीत आहेत. सहप्रश्नयोजक गुरू गोविंदसिंग बाजार, बालाजी बॅग्ज, सत्यम ड्रेसेस, राम गारमेंटस्, राम भंडार, जय संतोषी मॉ ड्रेसेस, महाराष्ट्र एम्पोरियम हे आहेत. अधिक माहितीसाठी संदीप चेंडके यांच्याशी ९९६००१४००० यांच्याशी संपर्क साधता येईल.

भाजप जातीयवादी; आठवलेंना आरोप करण्याचा अधिकार काय?
नागपूर, १२ ऑगस्ट / प्रतिनिधी

भाजपला जातीयवादी पक्ष संबोधित करण्याचा अधिकार रिपाइं नेते रामदास आठवले यांना नाही, अशी टीका भाजपच्या अनुसूचित जाती मोर्चाचे विदर्भ संपर्क प्रमुख धर्मपाल मेश्राम यांनी केली आहे. आठवले यांनी जालना येथे भाजपवर अशी टीका केली होती. सर्व राजकीय शक्यता संपत आल्याचे चित्र समोर आल्यावर आठवले यांनी रिपाइं ऐक्याचे भूत उभे केले आहे. ही जनतेची धुळफेक असून यामागे काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचा डाव असल्याटी टीका मेश्राम यांनी प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकातून केली आहे. खरे जातीयवादी पक्ष कोण हे रिपाइं जनता ओळखून असून भाजपच्या मागे ती उभी आहे, असा दावाही त्यांनी केला.

इतवारीतील सात दुकानात चोरीचा प्रयत्न
नागपूर, १२ ऑगस्ट / प्रतिनिधी

इतवारीतील भारतमाता चौकातील सात दुकानांमध्ये एकाच रात्री चोरीचा प्रयत्न झाल्याने व्यापार वर्तुळात खळबळ उडाली आहे. आज सकाळी दुकाने उघडण्यास आलेल्या दुकानदारांना शटर अर्धवट उघडी दिसली. या दुकानाला लागून असलेल्या रंग, हार्डवेअर आणि इतर सहा दुकानांचीही शटर्स तुटलेली होती. चोरटय़ांनी दुकानात शिरून कपाटे, ड्रॉवर शोधली. त्यातील वस्तूंची फेकाफेक केली. येथील काही पावलांवरील तीन नल चौकातील एका दुकानातही चोरीचा प्रयत्न झाला. शटर तोडण्यासठी लोखंडी पहारीचा वापर झाला असल्याची शंका दुकानदारांना आहे. एकाच रात्री इतक्या दुकानात चोरीचा प्रयत्न झाल्याने व्यापार वर्तुळात खळबळ उडाली.

प्रश्नचार्य अरुण कलोडे महाविद्यालयात ‘फ्रेंडशिप डे’ साजरा करण्यात आला.
सांस्कृतिक कार्यक्रमांनी ‘फ्रेंडशिप डे’ साजरा
नागपूर, १२ ऑगस्ट / प्रतिनिधी

प्रश्नचार्य अरुण कलोडे महाविद्यालयात आगळ्यावेगळ्या पद्धतीने ‘फ्रेंडशिप डे’ साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आरती कलोडे होत्या, तर प्रमुख पाहुणे डी.आर. सातपुते होते. मैत्री दिवसांतर्गत विद्यार्थ्यांनी मैत्रीवर कविता, गीते सादर केली. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांनी मैत्रीवर विचार मांडले. शंतनू कांबळेने पाचही बोटावर व्हॉलिबॉल फिरवून सर्वाचे लक्ष वेधले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धा आयोजित केल्या. त्यामध्ये सामान्य ज्ञान स्पर्धा, अॅक्टिंगद्वारे सिनेमाचे नाव ओळखणे, फुगा फुगवणे स्पर्धा, सुईदोरा द्वारे माळ बनवणे इत्यादी एक मिनिटाच्या स्पर्धा घेण्यात आल्या. कार्यक्रमाची सांगता एका मिनिटात जास्तीत जास्त फ्रेंडशिप बँड बांधण्याने झाली. संचालन प्रश्न. राहुल लांडे यांनी केले. प्रश्न. मिताली येवले यांनी आभार मानले. कार्यक्रमाला विद्यार्थी, प्रश्नध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

गोरक्षण सभेतर्फे भजन स्पर्धा
नागपूर, १२ ऑगस्ट / प्रतिनिधी
राधा गोविंद चॅरिटेबल ट्रस्ट व गोरक्षण सभा यांच्या संयुक्त विद्यमाने भजन स्पर्धा आयोजित करण्यात आली. स्पर्धेचे उद्घाटन आयुर्वेद तज्ज्ञ डॉ. रंजना व्याघ्रळकर यांनी केले. गोरक्षण सभा व राधा गोविंद चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष श्रीप्रसाद रिसालदार यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडला. याप्रसंगी गोरक्षण सभेच्या उपाध्यक्ष डॉ. वासंती वैद्य यांनी उपस्थितांचे स्वागत केले. या कार्यक्रमासाठी गोरक्षण सभेचे सचिव निखील मुंडले व राधा गोविंद चॅरिटेबल ट्रस्टेचे सचिव निरंजन रिसालदार यांनी परिश्रम घेतले.

शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा आंदोलनाचा इशारा
नागपूर, १२ प्रतिनिधी / प्रतिनिधी

शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना ग्रेड वेतन मंजूर करताना सहाव्या वेतन आयोगाने अन्यायकारक अटी घालून कर्मचाऱ्यांचे नुकसान केले आहे, असा आरोप करीत खासगी प्रश्नथमिक व उच्च प्रश्नथमिक शाळा शिक्षकेत्तर कर्मचारी संघाचे अध्यक्ष वीरेंद्र फुलाडी व सरचिटणीस राजेंद्र नखाते यांनी आंदोलनाचा इशारा दिला. प्रश्नथमिक वेतन पथकामार्फत शाळांनी सादर केलेली देयके विहित मुदतीत पारित होत नाही, तृटींबाबत सूचना तात्काळ लावली जात नाही त्यामुळे बहुतांश शाळांचे वेतन विलंबाने होते आदी मागण्यांचे निवेदन विभाग प्रमुखांकडे सादर केले जाणार आहे. शिक्षकेत्तर कर्मचारी अतिरिक्त ठरल्यास त्याला मुळच्याच आस्थापनेवर संरक्षण मिळावे, लिपिक व परिचारक वर्गीय पदांची भरती करण्यात यावी, अशी पदे मंजूर करताना पदाचे निर्धारण करताना पटसंख्येची अट शिथिल करण्यात यावी, या मागण्यांचाही यात समावेश आहे. सभेला संघाचे कोषाध्यक्ष हेमंत कुळकर्णी, उपाध्यक्ष श्रीनिवास शर्मा, संघटन सचिव आनंद इंगळे व इतर पदाधिकारी उपस्थित होते.