Leading International Marathi News Daily
गुरुवार १३ ऑगस्ट २००९

घरोघरी
इस आवाजसे मुझे बचाओ
शाल्मली
: आत्या उद्या गोकुळाष्टमी म्हणजे दहीकाला करणार असशील ना? आत्या, तुझ्या हातचा काला म्हणजे एकदम यमी यमी असतो. आत्या उद्या खूप काला कर हं. मला खूप खायचाय.
निर्मला: अगं काला करायला काय लागतं गं? त्यासाठी एवढी गोकुळाष्टमीची वाट कशाला बघायला हवी?
शाल्मली: ते आहेच गं. पण मला असं वाटतं ना आत्या, ज्या सणाची जी स्पेशालिटी असते ना ती त्या सणासाठीच ठेवावी. ते पदार्थ कधीही करुन खाल्ले तर त्यातली मजाच जाते.
निर्मला: हे अगदी बरोबर बोललीस बाई तू. बघ ना, हल्ली फराळाचे पदार्थ कायम मिळतात, मग दिवाळीची अशी काही गंमतच रहात नाही.
शंतनू: आत्या दिवाळीला खूप वेळ आहे अजून.
निर्मला: अरे, वेळ कुठला? श्रावण लागला की दिवस कसे भरभर जातात कळत नाही. गौरी गणपती तर आलेच जवळ. म्हणता म्हणता दसरा दिवाळी येतील बघ. बरं पण आज ही सगळी मुलं एवढय़ा सकाळी सकाळी कशी? कॉलेज वगैरे नाही का तुम्हाला?
शंतनू: आत्या, अगं असं काय करतेस? प्रश्नध्यापक मंडळी संपावर आहेत ना? शिवाय स्वाइन फ्लूचा गोंधळ चाललाय. कॉलेजं बंदच आहेत..
निर्मला: खरंच की, प्रश्नध्यापक संपावर आणि अकरावी अजून अ‍ॅडमिशनच्या गोंधळात.. मजा आहे मग तुमची.
विराज: मजा कसली? आता सुट्टी आणि नंतर कंबक्ती. पोर्शन तर पूर्ण व्हायला हवा ना.
चैतन्य: त्यांना काही पोर्शन पूर्ण करण्याचं टेन्शन नसणार. ते काय भराभर शिकवून टाकतील. हालत आपली वाईट होणार माहित्येय. सुट्टय़ाही कॅन्सल करणार आहेत म्हणे..
दिव्या: खरंतर कित्येक प्रश्नध्यापकांनाही हा संप पटलेला नाहीय. माझी मावशीच सांगत होती.
चैतन्य: पण मग त्यांनी संपात सामिल होऊ नये ना. त्यांच्यात आपापसात फूट पडली की संप टिकणारच नाही. सिंपल.
निर्मला: हे तू लाखमोलाचं बोललास चैतन्य. ज्या गोष्टी पटत नाहीत त्यांना विरोध केलाच पाहिजे.
शंतनू: आत्या, मग ऐक. आम्हीही या वर्षी तेच करायचं ठरवलं आहे. तुला माहीत आहे ना आता सणांचे दिवस आलेत उद्या गोकुळाष्टमी, मग १५ ऑगस्ट, मग गणपती, दसरा, दिवाळी.. पुढचे चार महिने बघायलाच नको.
निर्मला: हो रे बाबा. पण किती छान वाटतं ना. सगळं वातावरण कसं चैतन्यमय होऊन जातं बघ. मला तर हे दिवस खूप आवडतात बाई.
शाल्मली: मान्य आहे. पण मला हल्ली हे सण जवळ आले ना की धास्तीच वाटते. हे सगळे सण म्हणजे धांगडधिंग्याला परवानगीच मिळते. इस आवाज से मुझे बचाओ असं होऊन जातं.
शंतनू: तर काय. आपल्या लोकांना आवाजाचं इतकं का आकर्षण असतं तेच मला कळत नाही. काल माझ्या मित्राकडे गेलो होतो तर तिथे दहीहंडीसाठी केवढे स्पीकर लावले आहेत. एक मोठी काळी भिंतच उभी केली आहे, असं वाटत होतं.
दिव्या: अरे, त्यातून कानठळ्या बसाव्यात एवढा मोठा आवाज येतो.
निर्मला: ती तर काय फॅशनच झाली आहे. आजकाल. लहान मुलं बघत नाहीत, हॉस्पिटलं बघत नाहीत, म्हातारे कोतारे बघत नाहीत.
शाल्मली: अगं म्हणून तर सायलेन्स झोन अस्तित्वात आले होते. तर गणपती-नवरात्रासाठी हे सायलेन्स झोन शिथिल करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत.
चैतन्य: सायलेन्स झोन शिथिल करणं म्हणजे अगदीच मूर्खपणा ठरेल.
दिव्या: पण मला काय वाटतं, आता इथून पुढे येणाऱ्या सगळ्या सणांमध्ये आवाजाची भूमिका खूप महत्वाची आहे. कल्पना करा गणपती नवरात्रीला ढोल ताशे नसतील, दिवाळीला फटाके नसतील, तर काय मजा? उद्या दहीहंडी आहे. तेव्हा ढोल वाजले नाहीत, गाणी वाजली नाहीत तर काही मजाच येणार नाही. गोविंदांना सॉलिड मोटीव्हेशन मिळतं त्या आवाजानं.
शंतनू: मान्य आहे दिव्या. पण कुठल्याही गोष्टीचा अतिरेक वाईटच. मीठानं पदार्थाची चव वाढते. बरोबर? अरे म्हणून कोणी बचकभर मीठ घालतं का? ते प्रमाणातच असलं तरच चव वाढते. नाहीतर बेचवच लागतो तो पदार्थ. तसंच या सणांचं आहे. आवाजाची जोड मिळाली तर त्यांची मजा वाढते यात शंका नाही. गणपतीच्या सुंदर आरत्या, १५ ऑगस्टसाठी देशभक्तीपर गाणी, दहीहंडीसाठी किंवा नवरात्रीसाठी ढोल, दिवाळीसाठी फटाके. हे सगळे आवाजकी दुनिया के दोस्त आहेत. पण त्याचा अतिरेक करुन तुम्ही त्यांना दुश्मन करुन टाकलं आहेत. हा अतिरेक झाला म्हणून तर सायलेन्स झोन तयार करावे लागले ना? आणि आता तेच शिथिल करायचे? याला काय अर्थ आहे?
शाल्मली: आणि एकदा अशी परवानगी मिळाली की सगळे पुढे येतील. वर्षभर आपल्याकडे अनेक धर्माचे अनेक सण असतातच. मग वर्षभर कोणी न कोणी परवानगी मिळवण्यासाठी गळ घालत राहील, मग त्या सायलेन्स झोनला काही अर्थ राहील का?
शंतनू: यासाठीच आत्या, आम्ही ठरवलं आहे की, आपल्या एरियात तरी या कानठळ्या बसवणाऱ्या आवाजाला शिरकावच करु द्यायचा नाही.
चैतन्य: म्हणजे मोठय़ा आवाजाच्या फटाक्यांना मनाई.
शाल्मली: गणपती, स्वातंत्र्यदिनासाठी लावल्या जाणाऱ्या गाण्यांच्या आवाजावर नियंत्रण.
दिव्या: आणि मुख्य म्हणजे वाटेल ती गाणी लावायची नाहीत. त्या सणास योग्य अशीच गाणी लावली जातील. यावरही आम्ही बारकाईने लक्ष ठेवणार आहोत.
निर्मला: अरे तुम्ही लाख लक्ष ठेवाल. बंधनं घालाल. पण लोकांनी ऐकलं तर पाहिजे ना. तिथंच तर सगळे वांदे असतात. स्वत:हून चांगलं करण्याची इच्छा नसते आणि आपण काही चांगलं सांगायला जावं तर पटवून घ्यायची तयारी नसते.
शंतनू: आत्या, तू म्हणतेस तशी परिस्थिती आहे खरी. म्हणूनच आम्ही यावर्षी आमचे प्रयत्न अधिक काँक्रीट करायचे ठरवले आहेत. आपल्या एरियातल्या लोकांना पटवण्यात आम्ही यशस्वी झालोय. एकदा या वर्षी आम्ही करुन दाखवलं की, इतरांना पण सांगता येईल. तूच नेहमी म्हणत असतेस ना, आधी केले मग सांगितले. तेच आम्ही करणार आहोत.
निर्मला: हो रे बाबा.
बोलाचीच कढी आणि बोलाचाच भात या वृत्तीला सन्मान देई ना कुणी पण आधी केले मग सांगितले ही वृत्ती मात्र आपोआप होई मान सन्मानाची धनी.
shubhadey@gmail.com