Leading International Marathi News Daily

शुक्रवार, १४ ऑगस्ट २००९

डबल रोलची जादू
‘कमिने’ हा चित्रपट शूटिंग सुरू होण्यापूर्वीपासूनच गाजतोय. सेक्स, हाणामारी, गाणी हे सगळे तर यात आहेच. शिवाय, शाहीद कपूरचा डबल रोल आहे. चित्रपटाच्या नावावरून तरी ‘सॉलिड हीट’चा फॉम्र्युला दिग्दर्शकाने वापरला असावा. चार्ली आणि गुड्डू अशा जुळ्या भावांच्या दुहेरी भूमिकेत शाहीद कपूर असून ‘फॅशन’फेम प्रियंका चोप्रश्न यांच्या प्रमुख भूमिका आहेत. एक भाऊ तोतरा बोलणारा आहे तर दुसरा भाऊ ‘स’ ऐवजी ‘फ’ असे बोलत असतो. दिग्दर्शक विशाल भारद्वाज आणि यू टीव्हीचा बॅनर यावरून चित्रपट ‘जरा हटके’ असणार अशी अटकळ बांधायला हरकत नाही. जुळे भाऊ असले तरी त्यांचे एकमेकांशी अजिबात पटत नसते. श्रीमंत बनण्यासाठी वाट्टेल ते ण्याची तयारी असलेल्या या दोघांचा संबंध ड्रग माफिया, गँगस्टर्सशी येतो. ‘जब वुई मेट’, ‘किस्मत कनेक्शन’ अशा चित्रपटांमुळे शाहीद कपूरकडून प्रेक्षकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. हा बिग बॅनरचा चित्रपट आता शाहीद कपूरची बॉलिवुडमधील वाटचाल अधिक वेगवान होईल किंवा काय हे ठरविणारा हा चित्रपट आहे. अमोल गुप्ते यात भोपे भाऊ ही व्यक्तिरेखा साकारतोय हेही या चित्रपटाचे वैशिष्टय़ आहे. ‘मकबूल’, ‘ओमकारा’ अशा चित्रपटांचा दिग्दर्शक विशाल भारद्वाजचा हा नवा चित्रपट असल्यानेही तिकीटबारीवर बॉलिवुडवाल्यांचेही लक्ष लागले आहे. एकंदरीत काहीतरी नवं पाहायला मिळेल या अपेक्षेने थिएटरमध्ये जायलाच हवे.

देखण्या सिनेमॅटोग्राफीची बरसात
अलीकडच्या ज्या थोडय़ा थोडक्या दिग्दर्शकांनी इथल्या प्रेक्षकांच्या मानसिकता जपण्यासाठी आपल्या चित्रपटांचा बळी जाऊ दिला नाही, त्यात संतोष सिवन याचे नाव कायम पुढे राहिलेले आहे. ‘हॅलो’ आणि ‘माली’ या दोन आंतरराष्ट्रीय बालचित्रपट महोत्सवात गाजलेल्या (तरीही भारतात दुर्लक्षित राहिलेल्या) चित्रपटानंतर सिनेमॅटोग्राफर संतोष सिवन याने बनविलेली ‘टेररिस्ट’ ही फिल्म आजही दहशतवादावर बेतलेल्या जगातील पहिल्या दहा सिनेमांमध्ये उल्लेखनीय म्हणून निवडली गेली आहे, ती उगाच नाही. आपल्या प्रेक्षकांना संतोष सिवनचे चित्रपट पटले, देखणेही वाटले; पण तरीही त्याच्या चित्रपटांना लोकांनी उचलून धरले असे कधी झाले नाही. ‘हॅलो’पासून ते ‘टहान’पर्यंत त्याच्या चित्रपटांच्या मर्यादित प्रेक्षकवर्गात वाढ झाली नाही. त्यामुळे २००६ साली त्याने बनविलेल्या ‘बिफोर द रेन्स’ या पहिल्या इंग्रजी चित्रपटाचे प्रदर्शन भारतात आजतागायत केले गेले नव्हते. ‘बिफोर द रेन्स’मध्ये स्वातंत्र्य युद्धाच्या कालावधीत घडणारी प्रेमकथा आहे. पिरियॉडिक फिल्म असली तरी १९३७ चा भारत दाखविण्यासाठी निश्चितच या चित्रपटाची निर्मिती केली गेली नाही, हे उघड आहे. इस्रायलच्या ‘यलो अस्फाल्ट’ या चित्रपटाचा बिफोर द रेन्सला आधार आहे. दिग्दर्शकाने तो जाहीरपणे मान्य केला असला, तरी या चित्रपटात आधारित असल्याच्या खुणा नावालाही नाहीत. संतोष सिवनच्या देखण्या सिनेमॅटोग्राफीची बरसात, नंदिता दास आणि राहुल बोस यांचा सशक्त अभिनय असे बरेच काही या चित्रपटात आहे. या चित्रपटामुळे हॉलीवूडमधील ‘सीएए’ या सिनेमॅटोग्राफर्सच्या अग्रगण्य स्टुडिओने संतोष सिवनला करारबद्ध केले. ज्याद्वारे आता हॉलीवूडमधील त्याची कारकीर्द सुरू झाली आहे. र्मचट आयव्हरी प्रश्नॅडक्शनची सर्वात वेगळी भारतीय फिल्म म्हणून अमेरिकेत गाजलेली आणि परदेशी महोत्सवांमध्ये पारितोषिके पटकावणारी ही फिल्म उशिरा का होईना, आपल्या चित्रपट गृहांमध्ये प्रदर्शित होतेय, ही स्वागतार्ह बाब आहे.