Leading International Marathi News Daily

शुक्रवार, १४ ऑगस्ट २००९

लोकमानस

SCF च्या भूलथापांपासून सावध

 

रविवार, ९ ऑगस्ट २००९ SCF Managment Instituteतर्फे रवींद्र नाटय़मंदिर, प्रभादेवी, मुंबई येथे सकाळी नऊ वाजता मराठी माध्यमातून मॅनेजमेण्टचे प्रशिक्षण देणारी भारतातील एकमेव संस्था ‘यशस्वी उद्योजक होण्यासाठी खास उद्योजकता विकास प्रशिक्षणक्रम तयार केलेला आहे.’ ही ‘लोकसत्ता’च्या पहिल्या पानावर आलेली जाहिरात वाचून या प्रशिक्षणासाठी सहभागी झालेल्या उमेदवारांची घोर फसवणूक झाली, त्याबद्दल आमचे अनुभव तमाम इच्छुक उद्योजकांपर्यंत पोहोचविण्याची आपणास नम्र विनंती. आमच्या अनुभवावरून पुढील अनर्थ टाळण्याची आपणास कळकळीची विनंती.
SCF जाहिरातीमध्ये ज्या गोष्टी नमूद करून आवाहन केले ते पुढीलप्रमाणे आहे: १) SCF मॅनेजमेण्ट इन्स्टिटय़ूट, ज्यांनी भारतात सर्वप्रथम मराठीतून मॅनेजमेण्टचे धडे देऊन एक क्रांतिकारी पर्व सुरू केले.
२) बँकिंग फायनान्समधील तज्ज्ञ आपणास विनातारण पाच लाख ते एक करोड रुपयांपर्यंतचे कर्ज मिळविण्यासाठी संपूर्ण मार्गदर्शन करतील.
३) सर्व गैरसमजुती, अडचणी व शंकांचे संपूर्ण निरसन होईल याची आम्ही १०० टक्के हमी देतो.
४) अधिक माहितीसाठी ६४५०३०४५, ६५७६५८६६ येथे संपर्क साधला त्या वेळी या सेमिनारची फी रुपये ४५०/- फक्त आकारण्यात येण्याची माहिती देण्यात आली. या ४५०/- रु. फीमध्ये काय देण्यात येईल, या प्रश्नावर असे सांगण्यात आले, की ट्रेनिंग मटेरियल देण्यात येईल व सेमिनारचा कालावधी साडेनऊ ते साडेबारा असेल.
प्रत्यक्षात रविवार, ९ ऑगस्ट रोजी घडलेला घटनाक्रम पुढीलप्रमाणे:
१) सकाळी साडेआठ वाजल्यापासून उमेदवारांनी नोंदणी रुपये ४५०/- केली व त्यानंतर प्रत्येकाला आधीच्या कार्यक्रमाची एक स्मरणिका, एक पेन, एक पॅड देण्यात आले.
२) कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने केल्यानंतर अतुल राजोळी यांनी उपस्थितांचे स्वागत केले. दोन गोष्टी सांगून पुढील वक्ते एकनाथ यांची ओळख करून दिली. एकनाथ यांनी SIDBIची लघू व मध्यम उद्योजकांसाठी डिसेंबर २००८ मध्ये ‘आरबीआय’ने घोषित केलेल्या बिनातारण कर्जासंबंधीची माहिती संपूर्ण इंग्लिशमधून दिली व त्यावरचे त्यांचे विचार व सल्ला मराठीतून व इंग्लिशमधून दिला.
३) एकनाथजींच्या सादरीकरणानंतर SCF चे दुसरे अधिकारी व्यासपीठावर आले, त्यांनी काही सूचना देण्यास सुरुवात केली व उपस्थितांपैकी कोणास सामान्य शंका असल्यास विचाराव्यात व वैयक्तिक शंकानिरसन करायचे असल्यास स्वतंत्र वेळ घेण्यासाठी त्यांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा; त्याचे वेगळे शुल्क आकारण्यात येईल असे सांगितले. पाच-सात लोकांनी जे प्रश्न विचारले ते सर्व वैयक्तिक स्वरूपाचे आहेत त्यामुळे त्यांना इथे उत्तर देता येणार नाही असेही ते म्हणाले. सर्व उपस्थितांकडून अभिप्राय जमा केले. एका उमेदवाराला व्यासीठावर बोलाविण्यात आले. लकी ड्रॉ काढून ‘मॅनेजमेण्ट गुरू मुंबईच्या डबेवाल्यांकडून’ ही रुपये ५००/- किमतीची एक सीडी देण्यात आली व मग सर्वाना अक्षरश: हॉलच्या बाहेर काढण्यात आले.
आम्ही काही उमेदवारांनी ज्या वेळी नाराजीचा सूर काढला, त्या वेळी बाकीच्याही ठाणे, अंधेरी, सातारा, रत्नागिरी (चिपळूण), भिवंडी, वसई, मालाड अशा दुरून आलेल्या मंडळींनी उत्स्फूर्तपणे निषेध नोंदविला. मराठीतून मार्गदर्शन करण्याची खोटी जाहिरात करून रउा ने सर्व उपस्थित मराठी उद्योजकांची अतिशय घोर फसवणूक केली आहे, हीच सार्वत्रिक भावना होती.
शुभदा जहागीरदार, वडाळा, मुंबई
(या कार्यक्रमास उपस्थित असलेल्या,
लोकसत्ताच्या अनेक वाचकांनी
आपला निषेध पत्राद्वारे नोंदविला आहे.)

‘भकास’ विकासाचे धोरण वृक्षांच्या मुळावर!
शुभदा पटवर्धन यांच्या ‘मुकी बिचारी कुणीही तोडा’ आणि ‘वृक्ष जोपासण्याची गरज’ या दोन्ही लेखांतून (२८, २९ जुलै २००९) वृक्षाबद्दलच्या सत्य परिस्थितीची विदारक विधाने अचूक शब्दात व्यक्त केली आहेत.
विकासाच्या नावाखाली मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर ही शहरे सरकार, राजकारणी, बिल्डर, धनदांडगे भकास करीत आहेत. वृक्षतोड केल्यानंतर मुंबई- पुणे एक्स्प्रेस रोडला किती वृक्ष लावले? कोणते वृक्ष लावले? रस्त्याच्या कडेला लोणावळ्यापासून पुढे भकासपणाच नजरेत भरतो नव्हे का? याला जबाबदार कोण?
सिंगापूर, बँकॉक शहरात रस्त्याच्या कडेलाच झाडे लावली आहेत. त्यांची देखभाल, निगराणी ही नित्यनियमाने होते, हे त्या झाडांकडे पाहिल्याबरोबर नजरेत भरते.
आपल्याकडे जी जुनी झाडे आहेत तीच सुस्थितीत आहेत. नवीन लावलेली झाडे जरा कुठे मूळ धरून उभी राहू लागली की वादळ-पावसाने कोसळतात व त्याहून जास्त टँकर्स, ट्रक, ट्रेलर्स अन् इतर अवजड वाहने रस्त्याच्या बाजूला उभी करताना झाडांना ठोकतात व त्यांना आडवे करतात. तेव्हा आपले कोण वाकडे करणार आहे असाच त्या मागचा माज असतो.
रस्त्याची कामे करताना, रस्ते बनविताना वेगवेगळी स्वयंचलित यंत्रे वापरली जातात, त्यावेळी खोदकाम करताना कित्येक झाडांचा बळी जातो. त्या यंत्रांवर काम करणाऱ्याला फक्त आपले काम उरकायचे असते अन् त्याच्या मालकाला पैसा कमवायचा असतो.
आपल्याकडे अवाढव्य वाढलेल्या झाडाची योग्य प्रकारे निगा राखली जात नाही. ‘बेस्ट’च फक्त झाडांची ‘छाटणी’ करते. मग इतर संस्था काय करतात? वास्तविक आधुनिक मशीनच्या साह्य़ाने वाढलेल्या फांद्या तोडून त्या लगेच उचलून नेऊन साफसफाई करण्याची जबाबदारी कुणाची?
आजकाल रस्त्यावरची झाडे दुकानाच्या पाटय़ांच्या पुढे येतात म्हणून संधी साधताच दुकानवाले, मॉलवाले झाडांना एका रात्रीत झोपवतात, त्याबद्दल कुणालाच काही वाटत नाही? ठाण्याच्या नौपाडा- गोखले रस्त्यावरची झाडे अशीच गायब झाली ना?
आता तर राजकीय पुढारी वाढदिवसानिमित्ताने सर्व शहरे विद्रूप करीत आहेत. त्यासाठी याच झाडांचा वापर केला जातो. अन् त्यातही लहान झाडांचा बळी जातो. वास्तविक राणीच्या बागेचा ‘मेक ओव्हर’ करण्याचा घाट घातला जात आहे. तेव्हा निसर्गप्रेमी, पर्यावरणप्रेमी बेंबीच्या देठापासून ओरडून सांगताहेत की ‘बाबांनो! जुनी झाडे सांभाळा. त्यांना जीवदान द्या!’ त्यासाठीसुद्धा आपल्याला सुंदरलाल बहुगुणांसारखे ‘चिपको’ आंदोलन करावे लागणार की काय?
सत्तेवर अन् अधिकारी वर्गाच्या हातातच वृक्ष जोपासण्याचे ‘खरे बळ’ आहे. पण त्यांना ते बळ मनापासून वापरावेसे वाटते का, हाच कळीचा मुद्दा आहे. तोपर्यंत आपण फक्त उघडय़ा डोळ्यांनी वृक्षाचे मरणे पहायचे!
आपल्याकडे कोणताही प्रश्न पूर्णपणे सोडवायचा नाही असेच सरकारी धोरण आखले जाते. त्याला ‘वृक्ष’ तरी कसे अपवाद असतील?
उमेश कुगावकर, ठाणे

सैनिकी शिक्षणाबद्दल अनास्था का?
आपली शिक्षण पद्धती पाहता आपल्या राज्यातील शालेय अभ्यासक्रमात सैनिकी शिक्षण का नसावे याचा विचार कोणी केलाय? तरुणांना अशा शिक्षणापासून दूर ठेवण्यामागचा उद्देश काय? अनेक पुढारलेल्या देशांनी काळाची गरज केव्हाच ओळखून हा विषय आपल्या अभ्यासक्रमात अनिवार्य केलेला आहे. महाराष्ट्रासारख्या पुढारलेल्या राज्याची सदर शिक्षणाबाबतची अनास्था अस्वस्थ करणारी आहे. सदर अभ्यासक्रमाने निश्चितच देशाचा फायदाच होईल. तरुणांना सैन्यदलाकडे जायला प्रोत्साहन देता येईल, देशाच्या सैन्यदलात असणारा महाराष्ट्राचा टक्का किती? तो वाढावा असे वाटत नाही काय? सदर शिक्षणाने तरुणाईला शिस्त लागू शकेल. परंतु कुणीही सैनिकी शिक्षणाचा पाठपुरावा करताना दिसत नाहीत. शिक्षणसम्राट, धनदांडगे शैक्षणिक संस्था काढत असले तरी सैनिकी शाळा काढताना दिसत नाहीत.
शैलेश पुरोहित, मुलुंड, मुंबई